विटिग, गेओर्ख: (१६ जून १८९७-२६ ऑगस्ट १९८७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी फॉस्फरस संयुगांसंबंधी महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केल्याबद्दल त्यांना १९७९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨हर्बर्ट चार्ल्स ब्राउन यांच्याबरोबर विभागून मिळाले.
विटिग यांचा जन्म बर्लिन येथे झाला. १९१६ मध्ये ते ट्यूबिंगेन विद्यापीठात दाखल झाले. पहिल्या महायुद्धात भाग घेतल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांनी मारबर्ग विद्यापीठाची पदवी (१९२३) व पीएच्.डी. (१९२६) या पदव्या संपादन केल्या. याच विद्यापीठात त्यांनी व्याख्याते म्हणून काम केले (१९२६-३२). ते ब्रंझविक (१९३२-३७), फायबर्ग (१९३७-४४), ट्यूर्बिगेन (१९४४-५६) आणि हायडल्बर्ग (१९५६-६७) या विद्यापीठांत प्राध्यापक होते. ते हायडल्बर्ग विद्यापीठात १९६७ मध्ये गुणश्री प्राध्यापक झाले. मात्र त्यांनी आपले संशोधनाचे कामही जोमाने पुढे चालू ठेवले.
विटिग यांचे संशोधन ब्राउन यांच्या संशोधनास पूरक ठरेल आहे. बोरॉन या मूलद्रव्याऐवजी फॉस्फरस या मूलद्रव्याच्या अभ्यासावर विटिग यांचा ठसा उमटला आहे. त्यांनी शोध लावलेल्या फॉस्फरसयुक्त कार्बनी
संयुगांची विक्रिया कार्बोनिल |
( |
– C – |
) |
गट असलेल्या |
|| |
||||
O |
या विक्रियेमध्ये कार्बोनिल गटातील ऑक्सिजन दूर होऊन त्या ठिकाणी कार्बन जोडला जाऊन ओलेफीन गटातील पदार्थ (कार्बनी संयुग) तयार होतो. या पद्धतीमुळे जीवशास्त्रीय दृष्ट्या क्रियाशील आणि दोन कार्बन अणूंमध्ये द्विबंध असलेल्या पदार्थाची निर्मिती शक्य झाली आहे.
विटिग यांनी धन विद्युत् भारित मध्यस्थअसणाऱ्या विक्रियांऐवजी ऋण विद्युत् भारित मध्यस्थ (कार् बेनियम) असणाऱ्या विक्रियांवर आपले लक्ष केंद्रित केले आणि नवीन वर्गातील कार्बनी संयुगांचा शोध लावला. त्या संयुगांना त्यांनी ‘इलाइडे’ असे संबोधिले. ठराविक विक्रियांमध्ये इलाइडे महत्त्वाचे कार्य करतात व या विक्रियांना ‘विटिग विक्रिया’ असे संबोधतात. या महत्त्वपूर्ण विटिग विक्रियेमुळे असंख्य कार्बनी संयुगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात करणे शक्य झाले (उदा., अ जीवनसत्त्व). या शोधामुळे कार्बनी संयुगांच्या संश्लेषणाचे (घटक मूलद्रव्यांपासून किंवा त्यांच्या संयुगापासून रासायनिक विक्रियेद्वारे संयुग बनविण्याचे) एक नवीन पर्व सुरू झाले आणि पुढील विकासाला गती मिळाली.
विटिग यांना नोबेल पारितोषिकाखेरीज आडोल्फ फोन बेयर पदक (१९६७), ओटो हान पारितोषिक (१९६७), व्हिल द पॅरिस पदक (१९६९), पॉल कारर पदक (१९७२), ब्यूलांटस चेअर पदक (१९७२), रॉजर ॲडम्स पुरस्कार (१९७३), कार्ल झाइग्लर पारितोषिक (१९७५) इ. मानसन्मान मिळाले. ते म्यूनिक व हायडलबर्ग येथील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि स्विस केमिकल ॲसोसिएशन (१९६५), न्यूयॉर्क अँकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६५), सोसायटी केमिकल द फ्रान्स (१९७१) इ. संस्थांचे सन्माननीय सदस्य होते.
त्रिमितीय रसायनशास्त्र (१९३०), तसेच धातु-कार्बनी, इलाइड व कार्बोनियन रसायनशास्त्र या विषयावरील विटिग यांची पाठ्यपुस्तके प्रसिद्ध आहेत. ते हायडलबर्ग येथे मृत्यू पावले.
फाळके, धै. शं.
“