डेव्ही, सर हंफ्री : (१७ डिसेंबर १७७८ – २९ मे १८२९). इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ. खाणीतील ‘सुरक्षा दीप’ आणि पोटॅशियम व सोडियम ही मूलद्रव्ये यांच्या शोधांबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म पेंझॅन्स (कॉर्नवॉल) येथे झाला. त्यांचे शिक्षण पेंझॅन्स व ट्रुरो येथे झाले. १७९५ मध्ये पेंझॅन्स येथील शस्त्रचिकित्सक व औषधविक्रेते जे. बी. बॉर्लस यांच्याकडे त्यांनी उमेदवारी करण्यास सुरुवात केली व १७९७ साली रसायनशास्त्राच्या अभ्यासास आरंभ केला. १७९८ मध्ये ते टॉमस बेडोझ यांच्या क्लिफ्‌टन येथील मेडिकल न्यूमॅटिक इन्स्टिट्यूशनमध्ये साहाय्यक झाले व त्यांनी निरनिराळ्या वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामांसंबंधी प्रयोग केले. नायट्रस ऑक्साइड हा वायू हुंगल्याने उल्हसित परिणाम होतो, असे त्यांना दिसून आले. या कार्याचे वर्णन त्यांनी रिसर्चेस, केमिकल अँड फिलॉसॉफिकल, चीफली कन्सर्निंग नायट्रस ऑक्साइड (१८००) या आपल्या ग्रंथात दिले आहे. या ग्रंथाने त्यांना प्रसिद्धी मिळून बेंजामिन टॉम्पसन (काउंट रम्फर्ड) यांनी डेव्ही यांना लंडन येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये रसायनशास्त्राचे व्याख्याते म्हणून पाचारण केले. त्यांचे वक्‍तृत्व आणि त्यांच्या प्रयोगांतील नावीन्य व विविधता यांमुळे लवकरच ते एक लोकप्रिय व्याख्याते झाले. १८०३ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. १८०२ साली व त्यानंतर १८१२ पर्यंत दर वर्षी त्यांनी कृषी मंडळापुढे कृषी रसायनशास्त्रासंबंधी व्याख्याने दिली व १९१३ मध्ये या व्याख्यानांवर आधारलेला एलेमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ अनेक वर्षे प्रमाणभूत म्हणून मानण्यात येत होता. ओक वृक्षापासून काढलेल्या अर्कापेक्षा कातडी कमाविण्यासाठी काताचा चांगला उपयोग होतो, असे त्यांना १८०२ मध्ये आढळून आले.

 

रसायनशास्त्रात त्यांनी लावलेले बहुतेक प्रसिद्ध शोध १८०६ साली त्यांनी दिलेल्या व्याख्यानातून (ऑन सम केमिकल एजन्सीज ऑफ इलेक्ट्रिसिटी) उद्‌भवले. साध्या विद्युत् घटांचे कार्य रासायनिक विक्रियेमुळे चालते व विरुद्ध विद्युत् भार असलेल्या पदार्थांचा संयोग होतो, असा त्यांनी निष्कर्ष काढला होता. यावरून सर्व पदार्थांचे विद्युत् विश्लेषण करून त्यांचे मूलद्रव्यांच्या स्वरूपात विघटन करता येणे शक्य आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. इंग्लंड व फ्रान्स या देशांत त्या वेळी युद्ध चाललेले असूनही या व्याख्यानाकरिता त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सचे बोनापार्ट पारितोषिक मिळाले. याच कार्याच्या आधारे त्यांनी १८०७ मध्ये क्षारांपासून (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थांपासून अल्कलींपासून) सोडियम व पोटॅशियम अलग केले आणि १८०८ मध्ये कॅल्शियम, स्ट्रॉशियम, बेरियम व मॅग्नेशियम (क्षारीय मृत्तिका धातू) ही मूलद्रव्ये अलग केली. त्यांनी बोरॉन (पोटॅशियमबरोबर टाकणखार तापवून), हायड्रोजन टेल्यूराइड व हायड्रोजन फॉस्फाइड यांचाही शोध लावला. क्लोरीन हायड्रोक्लोरिक अम्ल यांतील संबंध दाखवून त्यांनी क्लोरिनाचे पूर्वीचे नाव ऑक्सिम्युरिॲटिक अम्ल हे चुकीचे असल्याचे प्रतिपादिले. क्लोरिनाचे मूलद्रव्यात्मक स्वरूप प्रस्थापित करून त्याला ‘क्लोरीन’ हे नाव डेव्ही यांनीच दिले. अम्लांच्या ऑक्सिजन सिद्धांताचे (प्रत्येक अम्लात ऑक्सिजन असलाच पाहिजे या सिद्धांताचे) त्यांनी खंडन केले. १८१३ मध्ये पॅरिस येथे असताना त्यांनी आयोडीन हेही मूलद्रव्यच असल्याचे (गे-ल्युसॅक यांनीही त्याच सुमारास हा शोध लावलेला होता) सिद्ध केले.

विद्युत् घट, कातडी कमाविणे व खनिज विश्लेषण यांसंबंधीच्या कार्याकरिता १८०५ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक मिळाले व १८०७ मध्ये ते सोसायटीचे सचिव झाले. १८१३ मध्ये त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूशनमधील रसायनशास्त्राच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला व त्याच वर्षी त्यांची रसायनशास्त्राचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून निवड झाली. ⇨ मायकेल फॅराडे यांची योग्यता ओळखून डेव्ही यांनी त्यांची रॉयल इन्स्टिट्यूशनच्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली. १८१३–१५ या काळात ज्वालामुखींसंबंधी अभ्यास करण्यासाठी डेव्ही यांनी फॅराडे यांच्यासह यूरोपात प्रवास केला. तेथून परतल्यावर त्यांनी कोळशाच्या खाणीत निसर्गतः आढळणाऱ्या वायूमुळे (मिथेन व इतर हायड्रोकार्बने यांच्या मिश्रणामुळे) होणाऱ्या स्फोटांचा अभ्यास केला व अशा वायूचे अस्तित्व दर्शविणाऱ्या सुरक्षा दीपाचा शोध लावला आणि तो दिवा त्यांच्याच नावाने ओळखण्यात येतो. या कार्याबद्दल त्यांना रॉयल सोसायटीची सुवर्ण व रजत रम्फर्ड पदके मिळाली. १८१२ मध्ये त्यांना ‘नाइट’ हा किताब देण्यात आला व १८१८ मध्ये त्यांना बॅरोनेट करण्यात आले. १८२० साली रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व या पदावर त्यांनी १८२७ पर्यंत काम केले. १८२६ मध्ये विद्युत् व रासायनिक बदलांचे संबंध या विषयावरील व्याख्यानाबद्दल त्य़ांना रॉयल सोसायटीचे रॉयल पदक देण्यात आले. त्यांच्या नावाने डेव्ही पदकही सुरू करण्यात आले.

त्यांनी एलेमेंट्स ऑफ केमिकल फिलॉसॉफी (१८१२), ऑन द सेफ्टी लॅम्प फॉर कोल माइनर्स (१८१८), सालमोनिया, ऑर डेज ऑफ फ्लाय-फिशिंग (१८२८), कन्सोलेशन्स इन ट्रॅव्हल (१८३०) इ. ग्रंथ लिहिले. त्यांचे सर्व कार्य जॉन डेव्ही या त्यांच्या बंधूंनी ९ खंडांत संपादित केले (१८३९-४०). आयुष्याच्या शेवटच्या काळात ते रोम येथे स्थायिक झाले. ते जिनिव्हा येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.