विचिटॉ फॉल्स: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्याच्या उत्तर-मध्य भागातील एक महत्त्वाचे व्यापारी व औद्यौगिक शहर आणि विचिटॉ परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९६,२५९ (१९९०).ओल्काहोमा राज्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस १६ किमी. विचिटॉ नदीकाठावर हे वसलेले आहे. १८५१−६० या दशकात हे एक छावणीचे ठिकाण होते. विचिटॉ नदीवरील धबधब्यांच्या या परिसरात १८७६ मध्ये एका नगराची स्थापना करण्यात आली. विचिटॉ अमेरिकन इंडियन तसेच येथील धबधब्यांच्या नावावरून त्या नगराला ‘विचिटॉ फॉल्स’ हे नाव देण्यात आले. १८८२ मध्ये फोर्ट वर्थ आणि डेन् व्हर सिटी हे लोहमार्ग या नगराला येऊन मिळाल्याने गुरांच्या व्यापारासाठी याचे महत्त्व वाढले. १८८३ मध्ये ते विचिटॉ परगण्याचे मुख्य ठाणे करण्यात आले व १८८९ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात याच्या आसमंतात खनिज तेलाचा शोध लागल्याने शहरात खनिज तेल उद्योगाचा झपाट्याने विकास झाला. परिसरातील जलसिंचत क्षेत्रात कापूस, धान्य यांचे उत्पादन तसेच गुरांची पैदास या उद्योगांची वाढ झाल्याने हे शहर उत्तर-मध्य टेक्सस व ओक्लाहोमा प्रदेशातील यावरील उत्पादनांशी संबंधित उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र बनले.
खनिज तेल शुद्धीकरण तसेच त्या उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्मिती करणे हे शहरातील प्रमुख उद्योग आहेत. त्यांशिवाय शहरात इलेक्टॉनिकी उपकरणे, कातडी व रबरी वस्तू, ओतकाम व काचतंतू उत्पादने, प्लॅस्टिकचे नळ, वैद्यकीय तसेच वातानुकूलन उपकरणे, पीठगिरण्या, खाद्यपदार्थ निर्मिती, मांस व दुग्धोत्पादने इ. व्यवसाय चालतात. त्याचबरोबर बांधकामाचे साहित्य, खनिज तेल व कृषी अवजारे यांचा ठोक व्यापार शहरामध्ये चालतो. अनेक खनिज तेल उत्पादक कंपन्यांची कार्यालये येथे असून रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. शहराच्या जवळच ‘शेपर्ड’ हा वायुसेना तळ असून एप्रिल १९६४ मधील झंझावातामुळे (टोर्नेडो) शहराचे व विमानतळाचे अतोनात नुकसान झाले होते. कनिष्ठ महाविद्यालय म्हणून १९२२ मध्ये स्थापन झालेली मिड् वेस्टर्न स्टेट यूनिव्हर्सिटी, केंप हे सार्वजनिक ग्रंथालय (१९१८), सिंफनी वाद्यवृंद ह्या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था शहरात आहेत.
चौधरी, वसंत