विचार नियम : पारंपारिक तर्कशास्त्रात प्रमाण विचारांचे नियमन करणारे अनेक मूलभूत विचारनियनम मानण्यात येतात. त्यांना ‘मुलभूत’ म्हणण्याचे कारण असे, की त्यांचे प्रमाण्य अनुमानाने सिद्ध करता येत नाही. ज्या अनुमानांनी ते सिद्ध करायचे, ती अनुमाने जर प्रमाण असायची असतील, तर ती ह्या नियमांना अनुकरून झाली असली पाहिजे. त्यांचे प्रमाण्य ‘स्वयंसिद्ध’ असते. ह्या नियमांचा अर्थ ध्यानी आला, की त्यांचे प्रामाण्य बुद्धीला दिसते आणि पटते. हे नियम आकारिक आसतात आशयात्मक नसतात. ह्याचा अर्थ असा, की विधान करणे, एखाद्या उद्देशाला उद्देशून एखाद्या विधेयाचे विधेयन करणे, विधान नाकारणे इ. विचारांत अंतर्भूत असलेल्या मूलभूत कृतींची स्वरूपे, त्यांचे परस्परसंबंध स्पष्ट करणारे हे नियम आहेत. कोणत्याही विवक्षित विषयासंबंधीच्या विचारात, मांडलेल्या विधानात, केलेल्या अनुमानात ह्या मूलभूत विचारकृतींची अंतर्भूत असतात. तेव्हा विचाराच्या एखाद्या विवक्षित विषयाची नव्हे, तर विचारात अंतर्भूत असलेल्या मूलभत कृतींची रूपे स्पष्ट करणाऱ्या ह्या नियमांना आकारिक म्हणणे योग्य आहे. अर्थात हे नियम अनुभवाधिष्ठित विचारांचे विषय असलेल्या वस्तूंच्या अनुभवांवर आधारलेले नसतात. ते ⇨पूर्वप्राप्त असतात तसेच ते अनिवार्य (नेसेसरी) असतात. ह्या नियमांचा भंग करणारे विधान असणे, अशा विधानांकडून कोणत्याही, स्थितीचे वर्णन होणे हे अशक्यच असते. ह्या विचारनियमांचे बंधन सर्व विचाराला मान्य करावेच लागेल.
सर्वसाधारण तादात्म्यनियम, अव्याधातनियम व विमध्यनियम असे तीन विचारनियम मानण्यात येतात. हे नियम पदांच्या संदर्भात आणि विधानांच्या संदर्भात अशा दुहेरी स्वरूपात मांडण्यात येतात.
तादात्म्यनियम : (१) पदांविषयी : ‘अ हा अ असतोच’. ह्या सूत्राचा अर्थ असा, की एखाद्या अनुमानात वा युक्तिवादात कोणतेही पद प्रत्येक प्रसंगी एकाच विवक्षित, स्थिर अर्थाने वापरले पाहिजे त्याच्या अर्थात बदल होऊ देता कामा नये.
(२) विधानांविषयी : विधान जर खरे असले, तर ते नेहमीच खरे असते आणि खोटे असले, तर नेहमीच खोटे असते. म्हणजे काळ, स्थल, परिस्थिती किंवा संदर्भ बदलल्याने विधानाच्या सत्यासत्यतेत बदल घडू शकत नाही.
अव्याघातनियम आणि विमध्यनियम परस्परव्याघाती पदे आणि व्याघाती विधाने ह्यांचे स्वरूप स्पष्ट करतात. समजा, ‘वि’ हे एक पद आहे आणि ‘ग’ हा गुण अंगी असलेल्या वस्तूंचा ‘वि’ ह्या पदाने निर्देश होतो, तर ‘ग’ हा गुण अंगी नसलेल्या वस्तूंचा ‘न−वि’ ह्या पदाने निर्देश होईल आणि ‘वि’ आणि ‘न−वि’ ही परस्परव्याघाती पदे होतील. उदा., तांबडा. तसेच समजा, ‘क’ हे एक विधान आहे आणि ‘क’ नाकारल्याने ‘न−क’ हे विधान निष्पन्न होते. तर ‘न−क’ हे ‘क’ चे व्याघाती विधान होय. त्याचप्रमाणे ‘क’ आणि ‘न−क’ ही परस्परव्याघाती विधाने होत.
अव्याघातनियम : (१) पदांविषयी : कोणत्याही उद्देश्याला उद्देशून दोन्हीही परस्परव्याघाती विधेयांचे अस्तिवाची विधेयन करता येत नाही. एखाद्या पदाचे एखाद्या उद्देशाविषयी जर अस्तित्त्वाची विधेयन केले असेल, तर त्याच्या व्याघाती पदाचे त्याच उद्देश्याविषयी नास्तिवाची विधेयन केले पाहिजे. म्हणजे, ‘उ‘ ‘वि‘ आहे, असे असेल, तर ‘उ’ ‘न-वि’ असू शकत नाही आणि ‘उ’ ‘न-वि’ आहे, असे असेल, तर ‘उ’ ‘वि’ असू शकत नाही.
(२) विधानांविषयी : दोन्ही परस्परव्याघाती विधाने खरी असू शकत नाहीत एक खरे असले, तर दुसरे खोटे असते.
विमध्यनियम: (१) पदांविषयी : कोणत्याही उद्देशाला उद्देशून दोघही परस्परव्याघाती पदांचे नास्तिघाची विधेयने करता येत नाही एखाद्या उद्देश्याविषयी जर नास्तिवाची विधेयन केले असेले, तर त्याच्या व्याघाती पदाचे त्याच उद्देश्याविषयी अस्तित्त्वाची विधेयन केले पाहिजे. म्हणजे, जर ‘उ’ ‘वि’ नाही, असे असेल, तर ‘उ’ ‘न-वि’ असला पाहिजे आणि जर ‘उ’ ‘न-वि’ नाही, असे असेल, तर ‘उ’ ‘वि’ असला पाहिजे.
(२) विधानांविषयी : दोन्ही परस्परव्याघाती विधाने खोटी असू शकत नाहीत एक खोटे असेल, तर दुसरे खरे असले पाहिजे.
ह्या परंपरागत नियमांत ⇨लायप्निट्स (१६४६−१७१६) आणि विल्यम हॅमिल्टन (१७८८−१८५६) ह्यांनी भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. लायप्निट्सने पर्याप्तकारण नियम म्हणून एक नियम मांडला. तो असा : ‘जे जे आहे, ते जसे आहे तसेच का आहे, वेगळे का नाही, ह्याचे पुरेसे कारण नेहमी असतेच’. कोणत्याही गोष्टीच्या विशदीकरणाचा प्रयत्न, ती गोष्ट तशी का आहे, हे समजावून घेण्याचा प्रयत्न ह्या नियमावर आधारलेला असतो. परंतु हा नियम वस्तुस्थितीचे स्वरूप कसे आहे हे सांगणारा म्हणून आशयात्मक आहे, रूपात्मक नाही. हॅमिल्टनने मांडलेला नियम असा : ‘विचारात जे अस्फुटपणे अंतर्भाव असेल, ते भाषेत स्फुटपणे व्यक्त करणे योग्य आहे’. विचार आणि भाषा ह्यांच्या संबंधाविषयीच्या एक गौण मुद्दा ह्या नियमात मांडला आहे.
मात्र, सर्व प्रमाण विचारांचे नियमन करायला सुरूवातीला दिलेले तीन नियम पुरेसे आहेत, असा कधी कधी मांडला जाणारा दावा गैर आहे. उदा., सामान्य नियम त्या नियमाखाली येणाऱ्या विवक्षित वस्तूला लावणे ही एक मुलभूत विचाराककती आहे पण ती ह्या विचारनियमांवर आधारलेली नाही. तिचे आधारतत्त्व वेगळेच आहे. विचारनियमांचे स्वरूप आणि कार्य, मूलभूत विचारनियम कोणते, विमध्यनियमांचे वैशिष्ट्य ह्यांबाबतचे आधुनिक विचार ⇨आकारिक तर्कशास्त्रात मोडतात.
ह्या तीन नियमांचे परस्परसंबंध काय आहेत ? ह्या नियमांपैकी कोणतेही नियम इतर नियमांपासून सिद्ध करता येत नाही. ह्या दृष्टीने हे सर्व नियम स्वतंत्र व प्राथमिक आहेत. तरीही ते एकमेकांशी निगडित आहेत. ‘विधेयाचे उद्देशाविषयी विधेयन करणे’ ह्या मूळ तार्किक कृतीची वेगवेगळी पण परस्परसंबद्ध अंगे ह्या नियमांकडून स्पष्ट होतात. ‘अ’ हा ‘अ’ असायचा, तर आपल्या स्वरूपाशी विरोधी असलेल्या अर्थोचा−म्हणजे ‘न−अ’चा अव्हेर करूनच तो तसा असू शकेल. म्हणून ‘अ’ ‘अ’ आहे (तादात्म्यनियम) आणि ‘न-अ नाही’ (अव्याघातनियम) हे दोन नियम विधेयनाची आस्तित्त्वाची आणि नास्तिवाची अंगाचे ‘अ’ आणि ‘न−अ’ते परस्परसंबंध ‘अ’ ‘न−अ’ असू शकत नाही’ (अव्याघातनियम) आणि ‘कोणतीही गोष्टी’ ‘अ’ किंवा ‘न−अ’असलीच पाहिजे’(विमध्यनियम) ह्या दोन नियमांनी स्पष्ट केले जातात. ⇨हेगेल (१७७०−१८३१) आणि त्याचे अनुयायी असलेले तर्कशास्त्रज्ञ ह्या विचारविनिमयांचा वेगळा, अधिक आशयात्मक अर्थ लावतात.
रेगे, मे. पुं.