विकस्टीड, फिलिप हेन्री : (२५ ऑक्टोबर १८४४−१८ मार्च १९२७). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, वाङ्मयीन समीक्षक व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म वेस्ट यॉर्कशर परगण्यातील लीड्‌स या शहरात. वडील धर्मशास्त्रवेत्ता. जन्म वेस्ट यॉर्कशर परगण्यातील लीडस या शहरात. वडील धर्मोपदेशक होते. विकस्टीडने ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर धर्मशास्त्राचा अभ्यास केला व वयाच्या तिसाव्या वर्षी तो एकेश्वरवादी (युनिटेरियन) संप्रदायाचा धर्मोपदेश झाला. वीस वर्षे सेवा केल्यानंतर त्याची मते सनातनी धर्ममतांपेक्षा वेगळी असल्यामुळे त्याला धर्मोपदेशक पदाचा राजीनामा द्यावा लागला. वाङ्‌मय, विशेषतः अभिजात वाङ्‌मय, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांमध्ये त्याने इतके प्रावीण्य संपादन केले की, आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याची कीर्ती अर्थशास्त्रज्ञ म्हणून असण्यापेक्षा वरील विषयांमधील नैपुण्यावर अधिक प्रमाणात अधिष्ठित होती. अनेक विषयांवर त्याने लेखन केले आहे. त्यांपैकी दान्ते अँड अक्वाय्नस (१९१३) व डॉग्मा अँड फिलॉसफी (१९२०) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

हेन्री जॉर्जच्या प्रोग्रेस अँड पॉव्हर्टी या ग्रंथामुळे त्याला अर्थशास्त्राची आवड निर्माण झाली. भूमीचे/जमिनीचे राष्ट्रीयीकरण या कल्पनेस विकस्टीडचा पाठिंबा होता व सार्वजनिक हितासाठी स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली जावी, असेही त्याने मत मांडले होते. ⇨जेव्हन्झचा त्याच्यावर प्रभाव होता. त्याने द अल्फाबेट ऑफ इकॉनॉमिक सायन्स या ग्रंथात (१८८८) जेव्हन्झच्या उपयोगितेची अंतिम श्रेणी (फायनल डिग्री ऑफ युटिलिटी) या संज्ञेऐवजी ‘सीमांत उपयोगिता’ अशी नवी संज्ञा वापरली. या संज्ञेचे ⇨पारेअतो व अन्य नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी स्वागत केले. याच ग्रंथात त्याने आपल्या विवेचनासाठी अवकलनाचा (डिफरेन्शीयल कॅल्क्युलस) वापर सर्वप्रथम केला. विकस्टीडने इंग्लंडमध्ये नवसनातनवादी विचारसरणीचा प्रसार केला. १८९४ मध्ये त्याचा ॲन एसे ऑन द कोऑर्डिनेशन ऑफ द लॉ ऑफ डिस्ट्रिब्यूशन हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथात त्याने सीमांत उत्पादकतेवर आधारलेला विभाजनाचा सिद्धांत मांडला. त्यानुसार प्रत्येक उत्पादन-घटकाला त्याच्या उत्पादनक्षमतेमुळे मागणी येते. उत्पादनाचे विभाजन करताना प्रत्येक उत्पादन-घटकास त्याच्या सीमांत उत्पादकतेनुसार मोबदला दिल्यास एकूण उत्पादनाचे विभाजन योग्यपणे होते. द कॉमन सेन्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१९१०) हा त्याचा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

विकस्टीडने सम सीमांत उत्पादकतेची कल्पना मांडली. ती अशी की, विविध उत्पादन-घटकांच्या योगे समग्र उत्पादन जास्तीत जास्त वाढविणे, हे आर्थिक प्रक्रियेचे उद्दिष्ट असते. ते साध्य करण्यासाठी साधनसामग्रीची असा उपयोग केला जातो की, सर्व उपयोगातील सीमांत उत्पादकता समान होते. अशी सीमांत उत्पादकता समान होणे म्हणजेच सम सीमांत उत्पादकता होय. अर्थव्यवस्थेतील या अवस्थेला ‘सर्वसाधारण समतोल’ असे म्हटले जाते. जेव्हन्झच्या सीमान्त कल्पनेचा वापर विकस्टीडने साधनसामग्रीच्या वाटपाच्या व विभाजनाच्या सिद्धांतात केला.

विकस्टीडने ‘संधी परिव्यय’ वा ‘वैकल्पिक परिव्यय’ ही नवी संकल्पना मांडली. उत्पादन-घटकांचा एकाच वेळी अनेक वस्तूंच्या उत्पादनासाठी वापर करता येतो. एका वेळी एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन घटकाचा उपयोग केला, तर त्या घटकाचा वैकल्पिक वस्तूच्या उत्पादनासाठी उपयोग होऊ शकत नाही. याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी दुसऱ्या वैकल्पिक वा पर्यायी वस्तूचा त्याग करावा लागतो. हा त्याग म्हणजे पहिल्या वस्तूचा वैकल्पिक परिव्यय होय. वैकल्पिक परिव्ययाची संकल्पना इंग्रजीत प्रथम मांडण्याचे श्रेय विकस्टीड याला दिले जाते.

विकस्टीडचा व्युत्क्रमी पुरवठा-वक्राचा (रिव्हर्सिबल सप्लाय कर्व्ह) सिद्धांतही महत्त्वाचा मानला गेला. पुरवठा-वक्र व मागणी-वक्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे त्याने मानले. पुरवठा वक्राचा आकार हा साठ्यातील वस्तूंच्या राखीव किंमतीवर (रिझर्व्हेशन प्राइस) अवलंबून असतो. वस्तूचा एकूण पुरवठा हा विक्रेत्याने विक्रीस आणलेल्या व स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवलेल्या वस्तूच्या एकत्रित परिमाणावरून ठरतो. जर किंमत समाधानकारक नसेल, तर विक्रेता स्वतःच विक्रेय वस्तूंचा उपभोग घेतो, असे त्याला सुचवावयाचे होते. ज्या किंमतीला पुरवठा काढून घेतला जातो व बाजारात पुन्हा प्रवेश करण्याची प्रतीक्षा केली जाते, तिला ‘राखीव किंमत’ असे त्याने म्हटले. विकस्टीडच्या पुरवठा-वक्रच्या विवेचनामुळे आर्थिक विश्लेषणाचे एक साधन निर्माण झाले.

आपल्या विश्लेषणात गणिताचा वापर करण्यामागे विकस्टीडचा हेतू अर्थशास्त्राचे स्वरूप आदर्शवादी न राहता ते वास्तविक (पॉझिटिव्ह) बनावे, हा होता. त्याने आर्थिक देवाणघेवाणीची (नेवसस) संकल्पना मांडली. विशेषीकरण व अन्योन्य लाभाबाबतची त्याची संकल्पना ही काहीशी ॲडम स्मिथच्या ‘अदृश्य हाता’च्या संकल्पनेसारखी होती. व्यक्तींचे सर्व वर्तन−केवळ बाजारपेठेतीलच नव्हे, तर एकंदर व्यवहारातील वर्तन−हे सीमांत तत्त्वाने नियंत्रित केले जाते. प्रत्येक व्यवहारात सर्वाधिक लाभप्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो, असा सर्वाधिक लाभ वा समाधान हे सीमांत फलाशी निगडित असते. आर्थिक निवडीबाबतही त्याने सीमांत सिद्धांत लागू केला.

विकिस्टीडवर ऑग्यूस्त काँत व रस्किन यांच्या विचारांचाही प्रभाव पडला होता. फेबिअन विचारांबाबत त्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असला, तरी त्याने मार्क्सवादावर टीका केली आणि फेबिअन विचारवंतांना, विशेषतः जॉर्ज बर्नार्ड शॉ यास, मार्क्सवादापासून परावृत्त केले. तरीदेखील आयुष्याच्या अखेपर्यंत त्याला समाजवादाच्या उद्दिष्टांविषयी सहानुभूती होती. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती यांबाबत विकस्टीडने मूलभूत विचार मांडले. उत्पादनाच्या साधनसामग्रीचे वैकल्पिक उपयोगात होणारे वाटप हा अर्थशास्त्राचा विषय असून साधनसामग्रीच्या वाटपाचा प्रश्न सीमांत संकल्पनेद्वारा कसा सोडवता येतो, हे त्याने दाखविल्यामुळे अर्थशास्त्राची आणि सीमांत तत्त्वाची व्यापकता वाढली.

द कॉमन सेन्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमीमध्ये त्याने शुद्ध सीमांत सिद्धांत उदाहरणे देऊन सुलभ पद्धतीने मांडले. किंमत आणि परिव्ययातील सीमंत समता यांद्वारे दुर्मिळ साधनसामग्रीचा सर्वात चांगला वापर कसा करावयाचा, हे त्याने स्पष्ट केले.

विकस्टीडचा इटालियन महाकवी दान्ते यांच्याविषयी सखोल व्यासंग होता. वर्डस्वर्थ, इब्सेन या लेखकांविषयीही त्याने लिखाण केले. एफ्. एम्. कॉर्नफोर्डच्या सहकार्याने त्याने ॲरिस्टॉटलच्या भौतिकीविषयक लिखाणाचे भाषांतर केले. धर्मशास्त्रावरही त्याने लिखाण केले असून, त्यात टॉमस अक्वाय्नसवरील लेख उल्लेखनीय आहे. सीमांत संप्रदायाच्या विचारात मोलाची भर घालणारा आणि नव्या-जुन्या आर्थिक विचारांचा मिलाफ घडवून आणणारा अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्याचे कार्य महत्त्वाचे ठरते. तो बर्कशर परगण्यातील चाइल्ड्री येथे मृत्यू पावला.

संदर्भ : Herford, C. H. Phillip Henry Wicksteed: His life and work, London, 1931.

फरांदे, विजयकुमार