विंझर -१ : अधिकृत नाव न्यू विंझर. इंग्लंडमधील एक नगरपालिकीय बरो आणि इतिहासप्रसिद्ध शहर लोकसंख्या ३१,५४४ (१९८१). हे शहर बर्कशर परगण्यात लंडनच्या पश्चिमेस सु. ३० किमी., टेम्स नदीकाठावर वसलेले असून येथील सुप्रसिद्ध विंझर किल्ल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी या भागात रोमन वसाहत असावी, असे येथील अनेक पवित्र रोमन अवशेषांवरून आणि दोन रोमन थडग्यांवरून दिसून येते. शहराच्या नवीन भागाजवळच, ३ किमी.वरील ’ओल्ड विंझर’ (जुनी वसाहत) या भागात हा किल्ला आहे. हा किल्ला नॉर्मनांच्या काळपासून इंग्लंडमधील अनेक राजांचे निवासाचे ठिकाण असल्याने या शहरास विशेष महत्त्व प्राप्त झाले. ज्या जागी हा किल्ला आहे, तो प्रदेश विल्यम द काँकररने (कार. १०६६-८७) वेस्टमिन्स्टर ॲबीकडून घेऊन चुनखडकयुक्त जागवर किल्ल्याचे बांधकाम केले व जंगलमय परिसर शिकारीसाठी राखून ठेवला. तेव्हापासून विंझरच्या विकासाची व इतिहासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनी या किल्ल्याचा वेळोवेळी विस्तार करून एक आकर्षक निवासस्थान म्हणून त्याला आजचे भव्य स्वरूप दिले. १२७६ मध्ये एक सनद मंजूर करून घेऊन हा प्रदेश राजे आणि राजघराण्यातील व्यक्तींसाठी विकसित करण्यात आला. १२७७ मध्ये पहिल्या एडवर्डने ओल्ड विंझर या गावाला अधिकृत मान्यता दिली. दुसऱ्या एडवर्डने १३१५ मध्ये या गावाची सनद कायम करून त्याचा विकास चालूच ठेवला. १३२८ मध्ये तिसऱ्या एडवर्डने या शहरास स्वतंत्र बरो म्हणून मान्यता दिली. चौथा एडवर्ड, सातवा व आठवा हेन्री आणि दुसरा चार्ल्स यांच्या कारकीर्दीत या शहराला विशेषाधिकार मिळाले. एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत शहरात सु. ७० शैक्षणिक वसतिगृहे होती. राजे व राजघराण्यातील लोकांचे निवासस्थान म्हणून शहराचे महत्त्व वाढले. औद्योगिक दृष्ट्या प्रगत असे लंडन शहर जवळच असल्याने तेथे कामानिमित्त जाणाऱ्या व शहरात नोकरीनिमित्त असलेल्या लोकांचे निवासस्थान म्हणूनही विंझरला महत्त्व आहे. येथे मोठ्या व अवजड उद्योगांची गर्दी झालेली दिसून येत नाही. शहरात छपाई व हलके धातुउद्योग चालतात. १९१८ मध्ये शहराचा मताधिकार काढून टाकण्यात आला आहे.
शहराभोवतीच्या परिसरात मोठे उद्यान व राखीव जंगल असून राजघराण्यातील लोक जंगलाचा शिकारीसाठी उपयोग करतात. टेम्स नदीतील नौकाविहार हे पर्यटकांचे एक आकर्षण असते. शहरात दहाव्या शतकातील गिल्ड हॉल ही पुरातन वास्तू असून तीत विविध छायाचित्रांचे संग्रह आणि ऐतिहासिक कागदपत्रे जतन करण्यात आलेली आहेत. त्यांमध्ये शहराचा १२७७ ते १६८५ पर्यंतच्या सर्व सनदांचा समावेश आहे. सर क्रिस्टोफर रेनने बांधलेला (१६८६) ‘टाउन हॉल’ तसेच ग्रिनलिंग गिबन्झ याने केलेले सेंट जॉन चर्चमधील लाकडावरील कोरीव काम प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध विंझर किल्ल्यातील ‘राउंड टॉवर’ (गोलाकार मनोरा) दुसऱ्या हेन्ऱीने बांधला असून या मनोऱ्यामुळे किल्ल्याचे अप्पर वॉर्ड (पूर्वेकडील) व लोअर वॉर्ड (पश्चिमेकडील) असे दोन भाग झाले आहेत. यांपैकी अप्पर वॉर्डमध्ये राजांचे खाजगी प्रासाद, पर्यटकांसाठी दालने, अमूल्य असे चित्रसंग्रह, पुरातत्त्वीय व ऐतिहासिक वस्तूंचे संग्रह, कलादालने आहेत तर लोअर वॉर्डमधील सेंट जॉर्ज चॅपेल (इंग्लंडमधील भव्य चर्चमध्ये याचा समावेश होतो) ही चौथ्या एडवर्डने बांधण्यास सुरुवात करून आठव्या हेन्ऱीने पूर्ण केलेली वास्तू प्रसिद्ध आहे. याच वास्तूमध्ये मध्ययुगीन सरदारांना समारंभपूर्वक पदके बहाल करण्यात येत असत. येथे अनेक इंग्लिश राजांचे दफन करण्यात आलेले आहे. किल्ल्याच्या उत्तरेस व पूर्वेस ‘होम पार्क’ हे मोठे उद्यान असून तेथे व्हिक्टोरिया राणी व प्रिन्स ॲल्बर्ट यांचे दफन करण्यात आले आहे.
शहराजवळच ‘ईटन कॉलेज’असून ‘ॲस्कॉट’ हे घोड्यांच्या शर्यतीचे मैदान व हीथ्रो हा विमानतळ आहे.
दळवी, र. कों. चौंडे, मा. ल.