विंचेस्टर -२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील फ्रेडरीक परगण्याचे हे मुख्य ठिकाण ‘ॲपल कॅपिटल’ म्हणूनही ओळखले जाते. हे प्रशासकीय दृष्ट्या स्वतंत्र शहर आहे. लोकसंख्या २०,३०० (१९८२ अंदाज). उत्तर व्हर्जिनियातील सुपीक व निसर्गसुंदर अशा शेननडोअ खोऱ्यात, वॉशिंग्टन डी.सी. च्या वायव्सेस ११६ किमी. अंतरावर हे शहर वसले आहे. व्हर्जिनियातील हे सर्वात जुने शहर मानले जाते. इ. स. १७३२ मध्ये अमेरिकन इंडियनांच्या शॉनी या गावाजवळ यूरोपीय वसाहत झाली. १७४४ मध्ये कर्नल जेम्स वुड व टॉमस फेअरफॅक्स यांनी फ्रेडरीक टाउन म्हणून याची स्थापना केली. १७५२ मध्ये इंग्लंडमधील शहरावरून याचे नाव विंचेस्टर असे करण्यात आले. १७७९ मध्ये विंचेस्टरला नगराचा, तर १८७४ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला.
देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटना विंचेस्टर येथे घडल्या. सर्वेक्षक म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या कारकीर्दीची सुरुवात (१७४८) विंचेस्टरमधूनच केली. ब्लू. रीज पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेशाच्या सर्वेक्षणाच्या वेळी, तसेच फ्रेंच व इंडियन युद्धात व्हर्जिनियाच्या सैन्याचे नेतृत्व करत असताना वॉशिंग्टनचे मुख्य ठाणे विंचेस्टरलाच होते. वॉशिंग्टनच्या येथील मोजणी कार्यालयात सध्या वस्तुसंग्रहालय आहे. अमेरिकेन यादवी युद्धकाळात हे ठिकाण विशेष महत्त्वाचे आहे. या काळातील तीन महत्त्वपूर्ण लढाया येथे लढल्या गेल्या. स्टोनवॉल जॅक्सन (१८६१-६२) व जनरल फिलिप शेरडन (१८६४-६५) यांचा तळ येथेच होता. प्रसिद्ध ध्रुवीय समन्वेषक रिअर ॲड्मिरल रिचर्ड ई. बर्ड आणि त्याचा भाऊ व्हर्जिनियाचा गव्हर्नर व अमेरिकेचा सीनेटर हॅरी एफ्.बर्ड तसेच लेखक बिला कॅथर यांचे हे जन्मस्थळ आहे.
विंचेस्टरच्या आसमंतात मोठ्या प्रमाणावर सफरचंदांचे उत्पादन होत असून त्यावरील प्रक्रिया उद्योगही येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. त्यामुळे याला ‘ॲपल कॅपिटल’ असे संबोधिले जाते. एप्रिल-मे महिन्यांत येथे ‘शेनन्डोअ ॲपल ब्लॉसम फेस्टिवल’ हा प्रसिद्ध वार्षिक उत्सव भरतो. रबरी वस्तू, प्लॅस्टिके, पोलाद व कथलाच्या वस्तू, फवारण्याची रसायने, कापड, लाकडी सामान, बांधकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ इत्यादींचे निर्मितिउद्योग येथे चालतात. शहरात हँड्ले ग्रंथालय असून शेनन्डोअ कॉलेज अँड कन्सर्व्हेटरी ऑफ म्यूझिक (१८७५) ही प्रसिद्ध संस्था आहे. येथील वॉशिंग्टनचे ऐतिहासिक कार्यालय व जुने प्रेस्बिटेरियन चर्च (१७९०) इ. वास्तू, तसेच शहराच्या जवळ शेनन्डोअ राष्ट्रीय उद्यान व जॉर्ज वॉशिंग्टन राष्ट्रीय अरण्य ही पर्यटकांची आकर्षणे असून दरवर्षी हजारो पर्यटक या शहराला भेट देतात.
चौधरी, वसंत.