वॉल्ड, जॉर्ज : (१८ नोव्हेंबर १९०६-    ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. डोळ्यांतील रासायनिक व क्रियावैज्ञानिक दृश्य (दिसण्याच्या) प्रक्रियांबद्दलचे शोध लावल्याबद्दल त्यांना ⇨रांगनार आर्थर ग्रानीट व ⇨हाल्डन केफर हार्टलाइन यांच्याबरोबर १९६७ साली वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

वॉल्ड यांचा जन्म न्यूयॉर्कला झाला. न्यूयॉर्क विद्यापीठाची बी.एस्. (१९२७) व कोलंबिया विद्यापीठाची पीएच्.डी. (१९३२) पदवी संपादन केल्यावर त्यांना नॅशनल रिसर्च कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळाली व मग त्यांनी बर्लिन, झुरिक, हायडलबर्ग व शिकागो विद्यापीठांत अध्ययन व संशोधन केले (१९३२-३४). १९३४ साली ते हार्व्हर्ड विद्यापीठात पाठनिर्देशक म्हणून दाखल झाले व १९४८ साली तेथे प्राध्यापक झाले. १९७७ पासून ते तेथे गुणश्री प्राध्यापक आहेत. त्यांच्या बहुतेक संशोधनामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीचे (रूथ हुबार्ड) साहाय्य लाभले आहे.

बर्लिनला असताना (१९३२-३३) त्यांनी दृक्पटलातील रंजकद्रव्याचा अ जीवनसत्त्व हा महत्त्वाचा घटक असल्याचे शोधून काढले. तसेच सस्तन प्राणी, बेडूक, सागरी मासे इत्यादींच्या दृष्टीतील (दिसण्याच्या क्रियेतील) अ जीवनसत्त्वाच्या कार्याविषयी संशोधन केले. अशा रीतीने दृष्टी टिकून राहाण्यासाठी अ जीवनसत्त्व महत्त्वाचे असल्याचे त्यांना आढळले. १९४० नंतर थोड्याच वर्षांनी त्यांना आढळून आले की, मोतीबिंदू झालेल्या व डोळ्यांची भिंगे काढू टाकलेल्या व्यक्ती जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण पाहू शकतात. यावरून भिंगांद्वारे जंबुपार किरण गाळले जातात, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

दृक्‌-दंडांच्या (अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देणाऱ्या व रात्रीच्या दृष्टीला कारणीभूत असणाऱ्या दृक्पटलातील प्रमुख ग्राही कोशिकांच्या-पेशींच्या) दृष्टीविषयक प्रक्रियेत उदभवणाऱ्या  रासायनिक विक्रिया त्यांनी स्पष्ट केल्या. प्रकाशामुळे अशा रीतीने दृक्‌-दंडांत रेणवीय बदल होतात. यांपैकी दृकनीलारुणाचे (अंधुक प्रकाशातील दृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकाशाला संवेदनशील अशा तांबड्या रंजकद्रव्याचे) विघटन हा बदल महत्त्वाचा आहे. प्रकाशामुळे दृकनीलारुणाचा रंग त्वरित जातो व ऑप्सीन (एक रंगहीन प्रथिन) व रेटिनीन (अ जीवनसत्त्वाशी निगडित नारिंगी तांबडे स्फटिकी संयुग) यांचे मिश्रण बनते व अंधारात दृक्‌निलारुण पुन्हा निर्माण होते. रेटिनिनातील बदलांचे तंत्रिका आवेग (तंत्रिका तंतूच्या-मज्जातंतूच्या पटलात प्रगमनशील भौतिक-रासायनिक बदल) निर्माण होतो व पाहिलेली प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. शरीरात अ जीवनसत्त्वापासून रेटिनीन बनते, हे वॉल्ड यांनी शोधून काढले होते. यावरून अ जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे रातांधळेपणा येतो, हे स्पष्ट झाले. पॉल के. ब्राउन यांच्याबरोबर त्यांनी १९५८-६० दरम्यान पिवळ्या, हिरव्या व तांबड्या आणि १९६१-६३ दरम्यान निळ्या प्रकाशाला (रंगाला) संवेदनशील असणारी डोळ्यातील रंजगद्रव्ये ओळखून काढली. तसेच या रंगद्रव्यांच्या निर्मितीमधील अ जीवनसत्त्वाचे कार्य या दोघांनी शोधून काढले आणि यांपैकी एखाद्या रंजकद्रव्याच्या अभावामुळे रंगांधत्व येते असे दाखविते. याकरिता या रंगद्रव्यांचे त्यांनी विश्लेषण केले व त्याच्याशी निगडित रासायनिक विक्रियाही करून पाहिल्या. शिवाय त्यांनी या विक्रियांचे शरीरक्रियावैज्ञानिक संबंधही स्पष्ट केले. अशा रीतीने त्यांनी दृक्‌पटलातील रासायनिक बदल हे दृष्टीशी कसे निगडित असतात, हे शोधून काढले.

एली लिली (१९३९), लास्कर (१९५३), प्रॉक्टर (१९५५), टी. डकेट (१९६७), माक्स बेर्ख (१९६९), जोसेफ प्रीस्टली (१९७०) इ. पुरस्कार रम्फर्ड (१९५९), आइव्ह्ज (१९६६), पॉल कारर (१९६७), ब्रॅडफर्ड-वॉशवर्न (१९६८) वगैरे पदके नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९५०) व अन्य संस्थांचे सदस्यत्व, हिगिन्स प्राध्यापक (१९६८-८०) तसेच विविध विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या वगैरे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.

वॉल्ड हे मानवी हक्काचे पुरस्कर्ते असून त्यांनी व्हिएटनाममधील युद्धाच्या विरोधी भूमिका घेतली होती. ते १९८० सालापासून मानवी हक्कांशी निगडित असलेल्या पर्मनंट पीपल्स ट्रायब्यूनल (रोम) या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.

भालेराव, य. त्र्यं. ठाकूर,अ.ना.