वाँबट: या शिशुधान (पोटावर पिलासाठी पिशवीसारखा अवयव असणाऱ्या) प्राण्यांचा समावेश मार्सुपिएलिया गणाच्या फॅस्कोलोमिडी किंवा बाँबॅप्टेडी कुलात होतो. या कुलात दोन प्रजाती असून ऑस्ट्रेलिया, टास्मानिया व बास सामुद्रधुनीतील फ्लिंडर्स बेटे येथे त्या आढळतात. कमी उंचीच्या व डोंगराळ प्रदेशातील जंगले, रुक्षवन व गवताळ प्रदेशात ते राहतात.

सामान्य वाँबट (फॅस्कोलोमिस अर्सिनस )वाँबट दिसायला लहान अस्वलासारखे असतात. त्यांचे शरीर जाडजूड व वजनदार असून प्रौढाच्या शरीराची डोक्यासकट लांबी ७०-१२० सेंमी. आणि वजन १५-२७ किग्रॅ. असते. फॅस्कोलोमिस प्रजातीतील प्राण्यांचे मुस्कट अनाच्छादित व केस भरड असतात पण लॅसिओऱ्हिनस प्रजातीतील प्राण्यांच्या मुस्कटावर केस असतात व अंगावरील केस मऊ असतात. डोळे बारीक असतात. मागचे व पुढचे पाय आखूड, लांबीला सारखे व बळकट असतात. प्रत्येक पायाला पाच बोटे व नखे असतात. मागच्या पायाचे दुसरे व तिसरे बोट कातडीने अंशतः जोडलेले असते. शिशुधानी मागच्या बाजूला उघडते व तीत स्तनांची एक जोडी असते. त्यांच्या पोटात असामान्य संरचना असलेल्या ग्रंथी असतात. त्यांचा संबंध विशेष प्रकारच्या शाकाहारी अन्नाच्या पचनाशी असावा. कवटी मोठी व पसरट असते.

वाँबटांचे दात अगदी कृंतकाच्या (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) दातासारखे असतात. त्यांच्या व कृंतकांच्या अन्नग्रहण करावयाच्या पद्धतीत खूपच साम्य आहे. दातांना मुळे नसतात व ते सतत वाढत असतात. प्रत्येक जबड्यातील दोन मूलहीन कृंतक (पटाशीचे) दात मोठे व बळकट असतात. या दातांच्या पुढच्या व बाजूच्या पृष्ठभागांवर एनॅमल असते आणि चर्वणाचे दात व त्यांमध्ये मोठी फट असते. उपदाढा लहान, एकखंडी आणि दाढांना जवळ असतात. दाढांना दोन खंड असतात आणि त्यांवर बरेच उंचवटे असतात. दंतसूत्र:कृंतक १/१, सुळे ०/०, उपदाढा १/१, दाढा ४/४ x २=२४.

वाँबट लाजरे व बुजरे असून जंगलात त्यांचे निरीक्षण करणे कठीण असते. ते कधीकधी दिवसाही क्रियाशील असतात पण ते निशाचर समजले जातात. ते बिळांत राहतात. ते फार जलद बिळे तयार करतात. विशिष्ट परिस्थितीत ते ३० मी.पेक्षाही लांब असे बिळांचे जाळे तयार करतात. ते पुढच्या पायांनी माती उकरतात व मागच्यापायांनी ती बाहेर ढकलतात. आणि मुळांसारखे अडथळे पटाशीच्या दातांनी फस्त करतात. शरीर मावेल अशी कमी उंचीची कमान म्हणजे बिळांचे प्रवेशद्वार असते. बिळाच्या शेवटी गवत किंवा साल यांचे अस्तर असलेले घरटे असते. बिळाच्या तोंडाशी झाड किंवा ओंडक्याच्या जवळ सामान्यतः एक उथळ विश्रांतीची जागा तयार केलेली असते तेथे ऊन खातात. वाँबट मुख्यतः गवते, मुळे, साली व कवक (अळिंबे) यांवर उपजीविका करतात.

वाँबट छंद म्हणून पाळण्यासाठी उत्तम प्राणी असून ते पिंजऱ्यात चांगले राहतात. त्यांची संख्या बरीच घटली आहे व प्रसारही मर्यादित झाला आहे. मनुष्य प्राणी त्यांचा प्रमुख शत्रू आहे. पिकांचे नुकसान करीत असल्यामुळे त्यांच्या वसाहती नष्ट करण्यात आल्या आहेत. मांस व फरसाठीही त्यांची शिकार करतात. त्याचबरोबर अन्नासाठी त्यांना सशांशी स्पर्धा करावी लागते.

विणीचा हंगाम सोडल्यास एरवी वाँबट एकएकटे राहतात. एप्रिल ते जून या काळात मादी एका पिलाला जन्म देते. डिसेंबरपर्यंत त्याला शिशुधानीत वागविले जाते, तोपर्यंत त्याच्या अंगावर भरपूर फर आलेली असते.

सामान्य वाँबटचे शास्त्रीय नाव फॅस्कोलोमिस अर्सिनस (वाँबॅटस अर्सिनस) असून त्याचे केस काळे व कान आखूड असतात. तो दक्षिण ऑस्ट्रेलिया व टास्मानिया येथे आढळतो. क्वीन्सलँडमधील दुर्मिळ वाँबटचे शास्त्रीय नाव लॅसिओ‍‍ऱ्हिनस बर्नार्डी असून त्यांच्या मुस्कटावर केस असून फर मऊ व दाट आणि कान लांब असतात. वाँबटांना कायद्याने संरक्षण दिले आहे व बहुतांश वाँबट राष्ट्रीय उद्यानांत आढळतात.

ऑस्ट्रेलियाच्या प्लाइस्टोसीन (हिमकाल) ते अभिनव (रीसेंट) या काळातील (गेल्या ६ लाख वर्षांतील) वाँबटांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळले आहेत. त्यांवरून असे दिसून येते की, पाण्याघोड्याएवढे मोठे वाँबट अस्तित्वात होते.

डाहाके, ज्ञा. ल. जमदाडे, ज. वि.