वाळवंट : (वाळवंटी प्रदेश). वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. जीवनोपयोगी साधनांच्या अभावामुळे हे प्रदेश निर्जन बनले आहेत. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८% तर थंड वाळवंटांनी १६% भाग व्यापलेला आहे. पहिल्या प्रकारात आफ्रिकेतील मध्य सहारा व नामिब वाळवंट, इथिओपिया व येमेन (साना) यांचा किनारी प्रदेश, सौदी अरेबियातील रब-अल्-खली, मध्य आशियातील ताक्लामाकान पेरू व चिलीमधील आटाकामा वाळवंट तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्नियाचा व उत्तर मेक्सिकोचा काही भाग यांचा समावेश होतो. हवामान, स्थानिक वनस्पती, भूरूपे, जलस्वरूप व मृदा यांच्या वैशिष्ट्यांनुसार अशा कोरड्या वाळवंटाचे वेगवेगळे प्रकार आढळतात.
वाळवंटी प्रदेशांची कालानुरूप स्थित्यंतरे : कमी पर्जन्य हा पृथ्वीवरील सर्वच वाळवंटांत आढळणारा सामान्य घटक असला, तरी प्राकृतिक आणि भूविज्ञानदृष्ट्या त्यांच्यात बरीच भिन्नता आढळते. त्यांच्या निर्मितीचा काळ वेगवेगळा आहे. काही वाळवंटे लक्षावधी वर्षांपूर्वीपासून निर्माण झालेली आहेत, तर काही वाळवंटांमध्ये प्लाइस्टोसीन कालखंडाच्या अखेरपासून (गेल्या सु. दहा हजार वर्षांत) आमूलाग्र बदल झालेले आढळतात.
पुराजीव महाकल्पात (६० कोटी ते २४.५ कोटी वर्षांपूर्वी) सहारा व ऑस्ट्रेलियन वाळवंट यांचा काही भाग हिमाच्छादित होता. सर्व वाळवंटी प्रदेशांच्या भूपृष्ठाखाली आढळणाऱ्या प्राचीन खडकांवरून पूर्वी हे प्रदेश समृद्ध असावेत. यांमध्ये काही ठिकाणी सागरी चुनखडी व वालुकाश्म आढळतात. त्यांपैकी मध्यपूर्वेत व इतर काही ठिकाणी खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे आढळतात तर काही प्रदेशांत आढळणाऱ्या कोळसाक्षेत्रावरून ते प्रदेश प्राचीन काळी पाणथळ व भरपूर वनस्पतींचे आच्छादन असलेले असावेत.
द्रवरूप सिलिकायुक्त पदार्थ (लाव्हा) थंड झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा अंतर्गत भागात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिकमय खडक अनेक भागांत आढळले आहेत. चतुर्थ कालखंडात (सु. २० लाख वर्षांपूर्वी) जलवायुस्थितीत खूपच बदल झालेले दिसतात. मोठ्या सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली मानवनिर्मित हत्यारे अल्जीरियन सहारामध्ये आढळली आहेत. मध्य सहारातील तिबेस्तीसारख्या उच्चभूमीच्या प्रदेशात पूर्वी ओक व सीडार वृक्षांची अरण्ये होती. कालाहारी, इराणचे वाळवंट व पश्चिम संयुक्त संस्थानातील वाळवंटात एकेकाळी मोठी सरोवरे होती. सध्याच्या तुलनेत जगातील अनेक वाळवंटी प्रदेशांत पूर्वी बरेच आर्द्र हवामान होते. लिबियातील लेप्टस मॅग्ना येथे काही हजार प्रेक्षक बसू शकतील असे प्रचंड प्रेक्षागृह होते, असे आढळले आहे. यावरून पूर्वी येथे खूप मनुष्यवस्ती असावी. सध्या हा भाग ओसाड आहे.
प्राचीन काळापासूनच ओसाड प्रदेश मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत. मौंट कार्मेल (इझ्राएल) जवळचा प्रदेश, सिरिया-लेबानन सरहद्दीवरील मौट हरमानचा परिसर व जॉर्डन खोरे या भागांत इ. स. पू. सु. ६००० वर्षांपूर्वीपासून तृणधान्यांचे उत्पादन केले जात असल्याचे, तसेच या प्रदेशातील शेतीसाठी जलसिंचन व्यवस्था व ईजिप्तमधील नाईल नदीच्या पाण्याचा केला जाणारा बारमाही उपयोग इ. दाखले मिळतात. त्याचप्रमाणे टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांतील सुपीक प्रदेशात व बलुचिस्तानमधील सिंधू नदीच्या खोऱ्यांत सु. ५,००० वर्षांपूर्वी मानवी संस्कृती भरभराटीस आल्या असल्याचे आढळले आहे. अशा प्राचीन वसाहती व भूमि-उपयोजनांचे दाखले काही वाळवंटी प्रदेशांत व इराणमध्येही आढळले आहेत. पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या बोगद्यांच्या कमानी तेथे आढळल्या आहेत. उत्तर व दक्षिण अमेरिकेत मानवाचे आगमन बरेच उशिरा झाले. कालमापनाच्या किरणोत्सर्गी कार्बन – १४ तंत्रानुसार १२,००० ते १५,००० वर्षांपूर्वी पश्चिम गोलार्धात मनुष्यवस्ती असल्याचे दाखविता आलेले नाही. मेक्सिको सिटीजवळ मात्र प्राचीन काळी मनुष्यवस्ती असावी असे दिसते. जुन्या व नव्या अशा दोन्ही जगातील मानवी विकासाच्या इतिहासावरून एक आश्चर्यकारक गोष्ट अशी दिसते की, सभोवतालच्या भरपूर पाणी असलेल्या प्रदेशापेक्षा तो ओसाड प्रदेशाकडेच अधिक आकर्षिला गेला आहे.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावरील खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे ओसाड प्रदेशात मनुष्यवस्ती बरीच वाढलेली आहे. सहारामधील अल्जीरिया, लिबिया व ईजिप्तमध्ये, तसेच सौदी अरेबिया, कुवेत, इराण इत्यादींच्या वाळवंटी प्रदेशांत फार मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. दक्षिण आफ्रिकेत सोने व हिरे, स्पॅनिश सहारामध्ये फॉस्फेट, चिलीमध्ये नायट्रेट, ऑस्ट्रेलियामध्ये सोने व लोह खनिजांचे मोठे साठे आहेत. काही वाळवंटी प्रदेशांना जलसिंचनासाठी पुरेसे पाणी व आवश्यक खतांचा पुरवठा करून कृषिविकास साधला जात असून त्यामुळे अन्न-समस्या सोडविण्यास मदत होत आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचे निर्क्षारीकरण तंत्रज्ञान तर किनारी वाळवंटी प्रदेशाला वरदानच ठरणार आहे. अंतर्गत वाळवंटी प्रदेशही जलसिंचनाखाली आणला जाऊ शकेल. मात्र सध्यातरी हा प्रयोग फार खर्चिक आहे. मोठ्या प्रमाणावर याचा यशस्वीरीत्या अवलंब झाला, तर जगातील सध्याचे वाळवंटी प्रदेश भविष्यकाळात दाट लोकवस्तीची केंद्रे निर्माण होतील.
प्राकृतिक वैशिष्ट्ये : (१) वाळवंटाची शुष्कता : जेथे अरण्ये किंवा गवतवाढीच्या दृष्टीने सलगपणे अतिशय कमी वृष्टी होते, तेथे कोरडी वाळवंटे आढळतात. महासागरांपासून दूरवरील खंडांतर्गत स्थान व महासागरावरून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे पोहोतू शकत नसल्यामुळे मध्य अक्षांशीय प्रदेशातील वाळवंटांची निर्मिती झालेली आढळते. पृथ्वीचे स्वांगपरिभ्रमण, पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले अक्षवृत्तीय कमी-जास्त भार-पट्टे व त्यांना अनुसरून नियमित वाहणारे ग्रहीय वारे यांमुळे दोन्ही गोलार्धात साधारणपणे २०° ते ३०° अक्षवृत्तांच्या दरम्यान, खंडांच्या पश्चिम भागात कोरडी वाळवंटे आढळतात. पर्वतीय प्रदेश व किनाऱ्याची दिशा यांनुसार या स्थानात थोडाफार फरक आढळतो. वातावरणाच्या जास्त भाराच्या पट्ट्यांमुळे या प्रदेशात वृष्टीचा अभाव आढळतो. खाली उतरणाऱ्या हवेच्या क्षेत्रातील स्थानामुळे उष्णकटिबंधीय वाळवंटांची निर्मिती झालेली आहे. जगातील काही मोठी वाळवंटे कर्क व मकरवृत्तांदरम्यानच्या जास्त भाराच्या पट्ट्यातच आढळतात. सहारा वाळवंट, मध्यपूर्व व दक्षिण आशियाई वाळवंटे, उत्तर अमेरिकन वाळवंट, दक्षिण अमेरिकेतील आटाकामा व पेरू वाळवंट, दक्षिण आफ्रिकेतील नामिब व कालाहारी वाळवंट, ऑस्ट्रेलियन वाळवंट हे जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश आहेत. उंच पर्वतश्रेण्या ओलांडून खाली उतरू लागणाऱ्या वाऱ्यांमधील बाष्पाचे प्रमाण कमी होत जाऊन पर्वतांच्या वातविमुख बाजूंकडील प्रदेशातही शुष्क प्रदेशांची निर्मिती झालेली आढळते. अशा प्राकृतिक कारणांमुळे मध्य आशियातील खंडांतर्गत भागात ताक्लामाकान व गोबी या वाळवंटांची निर्मिती झालेली आहे.
(२) हवामान : वृष्टी व बाष्पीभवन हे दोन घटक ओसाड प्रदेशाच्या बाबतीत महत्त्वाचे असून त्यांवरच या प्रदेशातील जलतोल अवलंबून असतो. वाळवंटातील हवा सर्वत्र अतिशय कोरडी असते. वर्षातील बहुतांश काळ सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता शून्याच्या जवळपास असते. पाऊस अतिशय अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा असतो. त्याचे वितरण खूपच विषम असते. पावसाचा कोणताही निश्चित ऋतू नसतो. जो काही आकस्मिक पाऊस पडतो, तो तीव्र वादळाबरोबर पडतो. जेव्हा केवळ हलक्या सरी पडतात, तेव्हा जमीन थोडीशी ओली होते परंतु उष्णतेने ताबडतोब बाष्पीभवन होऊन जाते. सामान्यपणे वृष्टीपेक्षा बाष्पीभवन अधिक होत असते काही वेळा ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू लागल्याचे दिसू लागते, परंतु तो जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच त्याचे पुन्हा बाष्पीभवन होऊन जाते. अशा प्रकारे वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते.
सहारामधील (मॉरिटेनिया – प. आफ्रिका) पोर्ट एत्येन (सांप्रतचे न्वादिबू) येथील बराच काळपर्यंतचे वार्षिक सरासरी वृष्टिमान ८१ मिमी. होते. १९१२ मध्ये तेथे केवळ २.५ मिमी. पाऊस पडला परंतु त्याच्याच पुढील वर्षी आलेल्या एका तीव्र वादळात ३०५ मिमी. पेक्षा अधिक पाऊस पडला. उच्च तापमान व त्यामुळे होणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्पीभवन यांमुळेही वाळवंटी प्रदेशाची शुष्कता वाढते. अगदीच थोडे पाणी जमिनीत झिरपते किंवा नदीप्रवाहास मिळते. जमिनीत झिरपलेले पाणी बऱ्याच अंतरापर्यंत जमिनीखालूनच वाहत जाते व एखाद्या मरूद्यानात भूपृष्ठावर येते. जलसिंचनाद्वारे अनेक वाळवंटांचा विकास करता येणे शक्य असले तरी जलसिंचन प्रकल्पांचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल की, जेणेकरून कालवे व जलाशयांमधील पाणी विशेष वाया जाणार नाही व जलसिंचन प्रकल्प असफल होणार नाही.
तापमानात स्थानपरत्वे भिन्नता आढळते. वाळवंटातील हवा इतकी कोरडे असते की, अधिक आर्द्र व ढगाळ हवेच्या प्रदेशाप्रमाणे येथील भूमीचे तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण होऊ शकत नाही. परिणामतः दिवसा येथे प्रखर उष्णता असते. तापमान सामान्यपणे ४९° ते ५४° से. आढळते. याउलट रात्री उष्णतेचे विसर्जन अतिशय जलद गतीने होत असल्यामुळे तापमान फारच कमी (साधारण २४° ते २९° से.) आढळते. अल् अझीझीयाह (लिबिया) येथील सावलीतील तापमानाची नोंद ५८° से. तर आग्नेय इथिओपिया आणि कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली येथे ५६.६° से. पेक्षाही अधिक तापमानाची नोंद झालेली आहे. सूदानमधील नाईल नदीकाठावरील वाडी हॅल्फा येथे जानेवारी वगळता उर्वरित महिन्यांत ३७.८° से. तापमान आढळते. ऑस्ट्रेलियन वाळवंटात ६० दिवसांपेक्षा अधिक दिवस ३७.८° से. पेक्षा अधिक तापमान असते. मध्य सहारातील इनसला मरूद्यानात चोवीस तासांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानाची नोंद ५२.२°से. तर रात्रीच्या किमान तापमानाची नोंद – ३.३°से. झालेली आढळते. बिर मिलऱ्हा (लिबिया) येथे १८७८ मधील नाताळच्या दिवशी कमाल ३७.२° से. तर किमान -५° से. ची नोंद झाली आहे. निम्न अक्षवृत्तीय प्रदेशातील खंडातंर्गत वाळवंटी प्रदेशात निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. किनारी भागात व मध्य अक्षवृत्तीय प्रदेशांत मेघाच्छादनाचे प्रमाण अधिक असते. निम्न अक्षवृत्तीय प्रदेशांत वार्षिक तसेच दैनिक तापमान कक्षा जास्त असते. येथे वार्षिक तापमान कक्षा ८° ते १७° से. असते. मध्य कटिबंधीय वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा २२° ते २८° से. असते. तसेच महासागरातील थंड समुद्रप्रवाहांमुळे तेथील वार्षिक तापमान कमीच असते. तसेच महासागरातील थंड समुद्रप्रवाहांमुळे तेथील वार्षिक तापमान कक्षीही कमी असते.
बहुतांश वाळवंटात कायमस्वरूपी व नेहमीच जोरदार वेगाने वाहणारे वारे आढळतात. काही वाळवंटी प्रदेशात मात्र महिनोंमहिने किंवा वर्षेदेखील वादळाशिवाय जातात. मात्र जेव्हा ती होतात, तेव्हा ती फारच विनाशकारी असतात. दिवसा सूर्याच्या उष्णतेने वातावरण तापून हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होतात. ही वाऱ्यांच्या निर्मितीची प्राथमिक कारणे आहेत. त्याशिवाय भूमिस्वरूप, भौगोलिक स्थान, ग्रहीय वारे यांचाही परिणाम वाऱ्यांवर होतो. अनेक वाळवंटी प्रदेशांत वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १०० किमी. आढळतो. वाऱ्याबरोबर वाळवंटातील वाळू व इतर सुटे घटक वाहून नेले जातात. वेगवान वाऱ्यांमुळे वाळूची व धुळीची वादळे निर्माण होताना आढळतात. काही वारे तर खूपच दूरपर्यंत वाहत जातात. ऑस्ट्रेलियातील धुळीची वादळे २,४०० किमी.चे अंतर पार करून न्यूझीलंडपर्यंत पोहोचलेली आढळतात. तसेच सहारामधील धूल ३,२०० किमी. चा प्रवास करून वायव्य यूरोपमध्ये गेल्याचे आढळले आहे.
भूमिस्वरूपे : भू-आकृतिविज्ञानाच्या दृष्टीने वाळवंटी प्रदेशात विदारण, गुरुत्वाकर्षण, वाहते पाणी आणि वाऱ्याचे कार्य या चार क्रिया महत्त्वाच्या आहेत.
विदारणक्रियेत घट्ट खडकांचे लहानलहान तुकड्यात व कणांत रूपांतर होते. असे सुटे कण मग वारा किंवा वाहत्या पाण्याबरोबर वाहून नेले जातात. विदारणक्रिया कायिक किंवा रासायनिक असू शकते. वाळवंटी हवामान-प्रदेशातील तलशिलांचे विघटन व लघुकरणक्रिया अतिशय मंद स्वरूपाची असते. या प्रदेशातील हजारो वर्षांपूर्वीची अनेक जुनी स्मारके त्याच स्थितीत असलेली दिसतात. कायिक विदारणाच्या बाबतीत अनेक वर्षे असे मानले जात होते की, केवळ वाळवंटातील दिवसाच्या प्रखर उष्णतेमुळे व रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमुळे खडकाच्या अनुक्रमे प्रसरण व आकुंचन या क्रियांमुळे खडकांचे विदारण घडून येते. परंतु आज संशोधनावरून असा समज चुकीचा असल्याचे आढळले आहे. वाळवंटातील दवामुळे यामध्ये काही रासायनिक प्रक्रिया घडून विदारणक्रिया वेगाने होत असते, असे सिद्ध झालेले आहे. गुरुत्वाकर्षणामुळे पर्वतीय किंवा टेकड्यांच्या प्रदेशातील विदारित घटक खाली कोसळतात किंवा भूमिपात घडून येतात. वाहत्या पाण्यामुळेही वाळवंटी प्रदेशांचे विदारण घडून येते. वाऱ्याचे कार्य मात्र वाळवंटी प्रदेशात विशेष प्रभावी आढळते.
आर्द्र प्रदेशापेक्षा वाळवंटी प्रदेशातील भूमिस्परूपे वेगळ्या स्वरूपाची असतात. पर्वत, पठारे व मैदाने ही भूमिस्वरूपे दोन्ही प्रदेशांत आढळत असली, तरी वाळवंटी प्रदेशातील त्यांचे स्वरूप आर्द्र प्रदेशांहून खूप भिन्न असते. कारण वाळवंटातील भूमिस्वरूपांवर मुख्यतः वाऱ्याच्या कार्यामुळे तसेच अचानक आलेल्या पावसामुळे वाहणाऱ्या वेगवान परंतु तात्पुरत्या पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम झालेला आढळतो.
वाहत्या पाण्याचे कार्य : वाळवंटातील नदीप्रवाह दोन प्रकारचे आढळतात. कोलोरॅडो, नाईल यांसारख्या काही विदेशज नद्यांचा उगम वाळवंटाबाहेर झालेला असून त्या वाळवंटात प्रवेश करतात, तेव्हा त्यांनी भरपूर पाणी वाहून आणलेले असते. त्यामुळे बाष्पीभवन होऊनही त्या पूर्णपणे कोरड्या पडू शकत नाहीत. याउलट काही नद्या अत्यंत अल्पकालीन असतात. अचानक पडलेल्या पावसामुळे त्या प्रवाहित होतात. परंतु ते पावसाचे पाणी जमिनीत झिरपेपर्यंत किंवा त्याचे बाष्पीभवन होईपर्यंतच त्या प्रवाहित राहतात. बहुतांश वाळवंटी प्रवाह गाळ, वाळू व रेती वाहून आणतात त्यामुळे पात्राची झीज होते. तीव्र उतारावरून वाहत आलेल्या नद्या जेव्हा मंद उतारावरून वाहू लागतात, तेव्हा बरोबर वाहून आणलेल्या गाळाचे त्या संचयन करतात. त्यामुळे उताराचे स्वरूप बदलते आणि तेथील गाळाच्या संचयनाला पंखाकार प्राप्त होतो. या पंखाकाराचा शिरोबिंदू नदीखोऱ्यात असतो. अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागातील वाळवंटात असे अनेक पंखाकार आढळतात. अनेक ठिकाणांच्या पर्वतपायथ्याशी असे दोन किंवा अधिक पंखाकार एकमेकांत मिसळून गाळाची मैदाने निर्माण होतात. अशा मैदानांना नैर्ऋत्य भागात ‘बहाडा’ (संयुक्त जलोढ पंखा) असे म्हणतात. यामधील सुटा गाळ तांत्रिक दृष्ट्या त्रिकोणिकेसारख्या सपाट प्रदेशाहून वेगळा असतो. पर्वतपायथ्याची त्रिकोणिका म्हणजे खडकाचा एक मंच असतो.
वाळवंटातील तीव्र उतारावरून पाणी जेव्हा वेगाने वाहू लागते, तेव्हा घळींची व उत्खातभूमीची निर्मिती होते. वाळवंटातील उघड्या भूमीवरील खडकांचे स्थलांतर होऊन निर्माण होणारे भूविशेष वाळवंटामधील तीव्र उताराच्या पर्वतांत, पठारांवर व मेसांमध्ये दिसून येतात. पर्वतातील घळीच्या निर्मितीसाठी पावसाची एखादी सरही पुरेशी ठरते. एकदा अशी घळ तयार झाली की, प्रत्येक सरीच्या वेळी ती अधिक विस्तारत जाते. विस्तृत पठारी प्रदेशांचेही अशा घळींनी विदारण केलेले आढळते. अचानक भरून वाहू लागलेल्या नद्यांमुळे गावांचे तसेच मरूद्यानांचे व तेथील बागांचे खूप नुकसान होते. काही वाळवंटी प्रदेशांत जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांमुळे तेथे नैसर्गिक बोगदे, विघरे किंवा पूल निर्माण झालेले दिसतात. दक्षिण ॲरिझोनामध्ये असे बोगदे आढळतात.
वाऱ्याचे कार्य : वाऱ्याच्या कार्यामुळे वाळवंटी प्रदेशांत विविध भूरूपे निर्माण होतात. वाऱ्याबरोबर वाहून जाणाऱ्या धुळीचे संचयन वाळवंटातच किंवा वाळवंटाच्या बाहेर दूरपर्यंत होत असते. ज्या ठिकाणावरून वाळू दुसरीकडे वाहून नेली जाते, त्या ठिकाणी काही किलोमीटर लांबीची खोल विवरे व उथळ लहान द्रोणीप्रदेश निर्माण होताना आढळतात. वैशिष्ट्यपूर्ण अशा वशीच्या आकाराच्या द्रोणीप्रदेशांचीही निर्मिती होत असते. वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे अनियमित अशा गुहांची निर्मिती होते. कठीण खडकांच्या प्रदेशात वाऱ्याच्या कार्यामुळे उत्तल दांडा शंकू किंवा मनोरे, कमानी, खिडक्या इ. भूविशेषांची निर्मिती होते. यांवरून खडकाचा कठीणपणा व सघनता लक्षात येते. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे जमिनीवरील वाळूचे किंवा धुळीचे सर्व सुटे कण वाहून नेले जातात. त्यामुळे संपूर्ण भूपृष्ठ गुळगुळीत व चकचकीत दिसते. सहारा व अरेबियन वाळवंटांत अशी परिस्थिती आढळते.
वाळू व धुळीच्या संचयनामुळे वेगवेगळे भूविशेष निर्माण झालेले पहावयास मिळतात. जेव्हा वाऱ्याच्या वाहण्याच्या मार्गात खडक किंवा झुडुपांचा अडथळा येतो, तेव्हा वाऱ्याचा वेग मंदावतो. बरोबर आणलेल्या वाळूचे व धुळीचे संचयन होऊन तेथे वालुकागिरींची (वालुकाधन्व) निर्मिती होते. अशा अडथळ्यांच्या वातविमुख बाजूंवर असे भूविशेष आढळतात. वालुकागिरी, अवग्रहकारी किंवा एस् आकाराचे वालुकागिरी, पिरॅमिड, घुमटाकार, ताराकार, अर्धचंद्राकार वालुकागिरी (बारखान) असे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वालुकागिरींची उंची ३०० मी. पर्यंतही आढळते. वालुकागिरींच्या मागील बाजूची वाळू पुढे-पुढे सरकून वाऱ्याच्या दिशेने वालुकागिरी सरकत असल्याचे दिसतात. या स्थलांतराचा वेग फारच कमी म्हणजे वर्षाला सरासरी ६-३० मी. असतो. परंतु किझिलकुममधील वालुकागिरी अतिशय वेगवान वाऱ्यांमुळे दिवसाला २० मी. पर्यंत पुढे सरकल्याचे आढळले आहे. या वालुकागिरींच्या मार्गात येणारे सर्व भूविशेष त्यांखाली गाडले जातात. तुर्कस्तानात तर संपूर्ण शहरे वालुकागिरींखाली गाडली गेल्याची उदाहरणे आहेत. काही वालुकागिरी म्हणजे अनियमित अशा वाळूच्या राशी असतात. जेथे विशिष्ट दिशेने कायमस्वरूपी वारे वाहत असतात, तेथील वालुकागिरींची वातसन्मुख बाजू लांबट व सौम्य उताराची असते व वातविमुख बाजूचा उतार सु. ३२ अंशांच्या कोनात असतो. ज्या वालुकागिरींचा वातविमुख उतार उंच, तीव्र व अर्धचंद्राकृती असतो, त्या वैशिष्ट्यपूर्ण वालुकागिरीस ‘बारखान’ असे म्हणतात. सर्व वालुकागिरी प्रदेशांत अनियमित असे अनेक खळगे आढळतात. काही खळगे वाऱ्याच्या भोवऱ्यांमुळे तर काही साधारण खोलगट भागाच्या चोहोबाजूंनी वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले असतात. [⟶ वालुकागिरि].
पर्वत व बोल्सन : ज्या वाळवंटात पर्वत व बोल्सन (सपाट तळाची, डोंगरांनी वेढलेली व मध्यभागी प्लाया अथवा क्षारयुक्त खोलवा असलेली दरी किंवा द्रोणी) आढळतात, त्यांना पर्वतीय व बोल्सन वाळवंटे म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ग्रेट बेसिनमधील वाळवंट, विशेषतः नेव्हाडा व उटा राज्यांतील, दक्षिण अमेरिकेतील पेरूचे वाळवंट, चिलीमधील आटाकामा वाळवंट, बोलिव्हियाचे पठार ही पर्वतीय व बोल्सन वाळवंटडे म्हणून ओळखली जातात. या वाळवंटांत पाऊस अधिक असतो विशेषतः पर्वतीय प्रदेशात, तो जास्तच असतो. तीव्र उतारांमुळे पाण्याचे प्रवाह पर्वतीय भागांत खोल दऱ्या व घळ्या निर्माण होतात. पाण्याने वाहून आणलेल्या गाळाचे बोल्सनमध्ये संचयन होते. पर्वतपायथ्याशी बोल्सनमध्ये केलेल्या संचयनाने गाळाची पंखाकृती मैदाने तयार होतात. दीर्घकाळपर्यंत असे संचयन होऊन पर्वताकडे तसेच अर्ध्या बोल्सनपर्यंत मैदानांचा विस्तार झालेला दिसतो. अचानक पावसामुळे जेव्हा पाण्याचे प्रवाह वाहू लागतात, तेव्हा ते प्रवाह पंखाकृती मैदाने पार करून कमी उंचीच्या बोल्सनमध्ये येतात व तेथे अल्पकालीन उथळ सरोवरांची निर्मिती होते. बाष्पीभवनाने सरोवरांचे पाणी लगेचच आटून जाते व तेथे पांढऱ्या रंगाचे मिठाचे संचयन झालेले आढळते. या सरोवराच्या भागाला ‘प्लाया’ असे म्हणतात. उटामधील ग्रेट सॉल्ट लेक हे कायमचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
हामाडा व अर्ग : काही वाळवंटात ‘हामाडा’ व ‘अर्ग’ ही भूरूपे आढळतात. त्यांवरून त्यांना ‘हामाडा व अर्ग वाळवंटे’ असे म्हणतात. हामाडा म्हणजे खडकाळ वाळवंट, तर अर्ग म्हणजे वालुकामय वाळवंट. हामाडा व अर्ग हे पश्चिम सहारात आढळणाऱ्या अशा भूरूपांच्या बर्वर संज्ञांचे इंग्रजी रूप आहे. अशा वाळवंटी प्रदेशात ⇨मेसा व ⇨ब्यूट ही भूस्वरूपेही आढळतात.
उष्ण अथवा कोरडी वाळवंटे : यांचे मुख्यतः दोन भाग करता येतात. (१) मध्यकटिबंधीय वाळवंटे, (२) उष्णकटिबंधीय वाळवंटे.
(१) मध्यकटिबंधीय वाळवंटे : मध्यकटिबंधीय वाळवंटे प्रामुख्याने महासागरांपासून दूर खंडांतर्गत भागात आढळतात. या प्रकारच्या वाळवंटी प्रदेशाचा सर्वाधिक विस्तार आशियात व त्याखालोखाल उत्तर अमेरिकेत आहे. अशी बहुतांश वाळवंटे पर्वतांनी किंवा पठारांनी वेढलेली आढळतात. त्यामुळे बाष्पयुक्त सागरी वारे तेथे पोहोचू शकत नाहीत. जेथे किनाऱ्याला अगदी जवळ व किनाऱ्याला समांतर असे पर्वतीय प्रदेश असतात, तेथील वाळवंटे तुलनेने समुद्राला जवळ असतात. उदा., उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील वाळवंटी प्रदेश. दक्षिण अमेरिकेच्या अगदी दक्षिण टोकाशी असलेले पॅटागोनियाचे वाळवंट अँडीज पर्वताच्या पर्जन्यच्छायेच्या प्रदेशात येते, तर मेक्सिकोमधील सनॉरा वाळवंट समुद्राला येऊन भिडलेले आहे.
वेगवेगळ्या मध्यकटिबंधीय वाळवंटातील तापमानात भिन्नता आढळते. उन्हाळे सामान्यपणे उबदार आणि उष्णही असतात तर हिवाळे थंड असतात. हिवाळ्यातील तापमान बराच काळ गोठण बिंदूखाली असते.
आशियातील मध्यकटिबंधीय वाळवंटाची हवामान व प्राकृतिक वैशिष्ट्ये तुर्कस्तान आणि गोबीच्या वाळवंटाप्रमाणे आढळतात. कॅस्पियन समुद्र व कझाक उच्चभूमी यांदरम्यानच्या कझाक, उझबेक व तुर्कमेन यांमध्ये तुर्कस्तान वाळवंटाचा विस्तार आहे, तर गोबी वाळवंट मंगोलियामध्ये विस्तारले आहे. आशियातील ही दोन्ही वाळवंटे खंडातंर्गत भागात असल्यामुळे कोणत्याही महासागराकडून बाष्पयुक्त वारे येथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हिंदी महासागरावरून येणारे बाष्पयुक्त उन्हाळी मोसमी वारे हिमालयाने अडविले जातात, त्यामुळे ते गोबीच्या वाळवंटात पोहोचू शकत नाहीत तर तुर्की व पश्चिम यूरोपातील पर्वतांमुळे अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमधील बाष्पाचे प्रमाण कमी होते. नैर्ऋत्य संयुक्त संस्थानांतील ग्रेट बेसिन व दक्षिण अर्जेंटिनातील पॅटागोनिया वाळवंट हीसुद्धा मध्यकटिबंधीय वाळवंटे आहेत.
तुर्कस्तान वाळवंट : रशियाच्या नैर्ऋत्य भागातील अरल व कॅस्पियन समुद्रांदरम्यानचे उस्त-उर्त पठार, अरल समुद्राच्या दक्षिणेकडील काराकुम व आग्नेयीकडील किझिलकुम हे तुर्कस्तान वाळवंटाचे प्रमुख भाग आहेत. क्षेत्रफळ सु. १९,४२,५०० चौ. किमी. अरल व कॅस्पियन यांना मिळणाऱ्या अंतर्गत नदीप्रणालीच्या द्रोणी प्रदेशात हे तिन्ही वाळवंटी प्रदेश आहेत. यातील तीन-चतुर्थांश प्रदेश वाळवंटी मैदानांचा असून त्यांच्याभोवती कोपेत दा, हिंदुकुश व अल्ताई हे एकदम उंचावलेले एकाकी पर्वतीय प्रदेश आहेत. काराकुम व किझिलकुम ही वालुकामय वाळवंटे असून त्यांत मोठ्या प्रमाणावर वालुकागिरी आढळतात. वाळवंटाच्या सखल प्रदेशात १५ सेंमी. पेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असून पर्वतांच्या उतारांवर ते ३६ सेंमी. पर्यंत वाढलेले आढळते.
उंच पर्वतांवर नेहमीच हिमवृष्टी होते. उन्हाळ्यात तापमान खूपच अधिक असून हिवाळ्यात ते -२° ते -४° से. पर्यंत कमी झालेले असते. सभोवतालच्या पर्वतीय प्रदेशातून वाहत येणाऱ्या अमुदर्या व सिरदर्या या नद्यांमुळे वाळवंटातील मर्यादित क्षेत्राला जलसिंचन केले जाते. या जलसिंचनावर उत्तम प्रतीचा कापूस, गहू व इतर तृणधान्यांचे उत्पादन घेतले जाते. अधिक बाष्पीभवनामुळे येथील मृदेत अतिरिक्त क्षार जमा होतात. या प्रदेशातून सोने, तांबे व तेल ही खनिज उत्पादने घेतली जातात.
गोबी वाळवंट : मध्य आशियातील हे विस्तृत वाळवंट चोहोबाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले आहे. या वाळवंटाच्या वायव्येस अल्ताई, नैर्ऋत्येस व दक्षिणेस आस्तिन ता व नानशान, पश्चिमेस पामीर आणि पूर्वेस खिंगन पर्वत आहेत. गोबी खोऱ्यात अनेक लहानलहान खोरी असून उन्हाळ्यात पर्वतीय प्रदेशांमधून वाहत येणाऱ्या प्रवाहांमुळे तेथे हंगामी सरोवरांची निर्मिती होते. येथील वार्षिक पर्जन्यमान २५ सेंमी. पेक्षाही कमी आहे. हिवाळ्यात सखल प्रदेशात अधूनमधून हलक्या स्वरूपाची हिमवृष्टी होते. उन्हाळ्याचे सायलीतील तापमान ४६° से.असून हिवाळ्यातील तापमानाची नोंद -४०° से. पर्यंत झालेली आहे. जोरदार वारे, गुदमरून सोडणारी धूळ, वाळूची वादळे ही परिस्थिती कायमची असते. हजारो वर्षांपासून या वाऱ्यांबरोबर वाहत येणारी धूळ व रेती यांचे संचयन ईशान्य चीनमध्ये होऊन तेथे लोएस मैदान निर्माण झाले आहे. प्रदेशनिहाय भूपृष्ठात भिन्नता आढळते. काही प्रदेश सपाट, तर काही प्रदेशांत कठीण खडक आढळतात. कोठे विस्तृत वालुकागिरी आढळतात. काळ्या खडकांपासून तयार झालेल्या वाळवंटास ‘ब्लॅक सँड डेझर्ट’ म्हणून ओळखले जाते. हंगामी सरोवरे व मरूद्याने यांसभोवती क्षारयुक्त चिकणमाती व मिठाचे थर आढळतात.
पर्वतांतून वाहत येणाऱ्या प्रवाहांच्या काठीच फक्त वनस्पती आढळतात. फारच थोडे लोक मरूद्यानापासून बाहेरच्या प्रदेशात जेथे पुरेसे पाणी उपलब्ध आहे, तेथे राहतात. रशिया-चीन यांदरम्यानचे लोहमार्ग व रस्ते या वाळवंटातून जातात. गोबी वाळवंटाच्या सरहद्द प्रदेशात उंदीर, कुरंग, मेंढ्या, उंट, गाढवे, हरिण, लांडगे इ. प्राणी आढळतात.
गोबीचे वाळवंट हे पहिल्यापासून कोरडे नव्हते. उत्तर जुरासिक व पूर्व क्रिटेशस कालखंडांत या वाळवंटांतून नद्या वाहत होत्या व त्यांनी गाळ, वाळू व रेती यांचे संचयन केलेले आढळते. या नद्यांच्या काठी झाडे होती. काही ठिकाणी अरण्येही होती. डायनोसॉर हा प्राणी या भागात होता. ‘अमेरिकन म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी’ या संस्थेच्या शोध मोहिमेला १९२१-३० यांदरम्यान या प्राण्याची अंडी या प्रदेशात आढळली होती. उत्तर जुरासिक काळापासून क्रिटेशस व तृतीय (टर्शरी) कालखंडापर्यंत सध्याचा हा वाळवंटी प्रदेश सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, कीटक वनस्पती व पक्षी यांच्या दृष्टींनी अनुकूल होता. उत्तर पुराणाश्मयुगीन, मध्याश्मयुगीन, नवाश्मयुगीन आणि इओलिथिक मानवांचे या प्रदेशात वास्तव्य असल्याचे पुरावे मिळतात. [⟶ गोबी-१].
ग्रेट बेसिन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील वाळवंटी प्रदेशाच्या पूर्वेश मध्य रॉकी पर्वताची वॉसॅच श्रेणी, तर पश्चिमेस कॅस्केड व सिएरा नेव्हाडा ह्या श्रेण्या आहेत. यामध्ये नेव्हाडा राज्याचा जवळजवळ सर्व भाग, कॅलिफोर्निया राज्याचा पूर्व भाग आणि ऑरेगन व आयडाहो राज्यांच्या दक्षिणेकडील भागांचा समावेश होतो. याच्यातील लहानलहान द्रोणी प्रदेश आखूड पर्वतश्रेण्यांनी अलग केले आहेत. या द्रोणी प्रदेशांना निर्गम मार्ग नसल्याने तेथे अनेक खाऱ्या सरोवरांची निर्मिती झालेली दिसते. उदा., उटामधील ग्रेट सॉल्ट लेक, नेव्हाडामधील पिरॅमिड सरोवर, कॅलिफोर्नियातील मोनो सरोवर इत्यादी. या सर्व सरोवरांना सभोवतालच्या पर्वतीय प्रदेशातून वाहत येणाऱ्या प्रवाहांमुळे पाणीपुरवठा केला जातो. ग्रेट बेसिन वाळवंटातून वाहत जाणारी कोलोरॅडो ही एकमेव मोठी नदी आहे. येथील वार्षिक वृष्टिमान २५ सेंमी. पेक्षाही कमी व हवा नेहमीच कोरडी असते. उन्हाळ्यातील तापमान ३८° से. पर्यंत असते. हिवाळे क्वचितच थंड असतात.
ग्रेट बेसिन वाळवंटाच्या बऱ्याचशा भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. मात्र अनेक ठिकाणांची मृदा सुपीक आहे. ती जलसिंचनाखाली आणली, तर शेती चांगली होऊ शकेल. ग्रेट बेसिनमधील बहुतांश प्रदेश पशुपालनासाठी वापरला जातो. मात्र उटामधील सॉल्ट लेक सिटीच्या जवळपासचे वाळवंटी क्षेत्र सिंचनाखाली व लागवडीखाली आणले आहे.
वाळवंटी भूरूप वैशिष्ट्यांची उत्कृष्ट उदाहरणे ग्रेट बेसिनमध्ये पहावयास मिळतात. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये विस्तृत वालुकागिरी आढळतात. नेव्हाडामध्ये बोल्सन, बहाडा, त्रिकोणिका, प्लाया व मिठाचे प्रदेश आढळतात. पूर्वीच्या बॉनव्हिल सरोवराच्या जागी (उटा राज्य) बनलेला वाळवंटी प्रदेश मोटारशर्यतींसाठी वापरला जातो. खडकावरील वाऱ्याच्या खननकार्यामुळे वाळवंटात उत्तल, कमान, खिडकी, यारदांग इ. वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष पहावयास मिळतात. नेव्हाडामध्ये सोने व चांदी, कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये टाकणखार आणि उटा राज्यात मीठ व युरेनियम मोठ्या प्रमाणावर सापडते. ग्रेट बेसिनचा दक्षिणेकडील विस्तारित भाग म्हणजे सनॉरा वाळवंट होय. दोहोंची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. मात्र सनॉरा वाळवंटामधील प्रवाह समुद्राला मिळतात. याचा बहुतांश भाग मेक्सिकोमध्ये येतो.
पॅटागोनियाचे वाळवंट : अर्जेंटिनातील पॅटागोनियाचे वाळवंट म्हणजे अँडीज पर्वताच्या पूर्व उताराकडील पायथ्याजवळच्या उच्चभूमीचा सु. ६,७३,४०० चौ. किमी. चा अरुंद पट्टा होय. याच्या बहुतांश शुष्क प्रदेशाचा विस्तार दक्षिणेकडे मकरवृत्तापासून ३५° दक्षिण अक्षांशापर्यंत झालेला आढळतो. पॅसिफिकवरून येणारे बाष्पयुक्त वारे अँडीज पर्वतावर पश्चिम बाजूस पाऊस देतात, त्यामुळे पूर्वेकडील हा वाळवंटी प्रदेश कोरडा राहिलेला आहे. येथे लोकसंख्या अतिशय कमी आहे. उन्हाळ्यातील (जानेवारी) सरासरी तापमान २१° से., तर हिवाळ्यातील (जुलै) सरासरी तापमान १०° ते १६° से. असते. या वाळवंटाला खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्त्व नाही. अगम्यतेमुळे जगातील किमान माहिती उपलब्ध असलेले हे वाळवंट आहे.
(२) उष्णकटिबंधीय वाळवंटे : आशियातील सौदी अरेबिया, सिरिया, इराक, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांमधील वाळवंटे, दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील आटाकामा वाळवंट, वायव्य भारतातील थरचे, ऑस्ट्रेलियातील महावाळवंट (सेंट्रल ऑस्ट्रेटियन), दक्षिण आफ्रिकेतील कालाहारी व उत्तरमध्य आफ्रिकेतील सहारा ही उष्णकटिबंधीय वाळवंटे आहेत. सर्व आशियाई वाळवंटे व आफ्रिकेलील सहारा ही उष्णकटिबंधीय वाळवंटे आहेत. सर्व आशियाई वाळवंटे व आफ्रिकेतील सहारा वाळवंट यांचा सलग विचार केला, तर आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्यापासून पूर्वेकडे ७,२०० किमी. लांबीच्या प्रदेशात, कर्कवृत्ताच्या दरम्यान हे वाळवंटी प्रदेश आहेत. ग्रहीय वारे या प्रदेशातून बाहेर वाहत असल्यामुळे आणि हवा वरून खाली उतरत असल्यामुळे येथे पाऊस पडत नाही. आशियाई वाळवंटांत व सहारा वाळवंटात फार पूर्वीपासून मनुष्यवस्ती होती असे दिसून येते मात्र येथील लोकसंख्या विरळ आहे.
सहारा वाळवंट : पश्चिमेस अटलांटिक महासागरापासून पूर्वेस तांबड्या समुद्रापर्यंत, तसेच उत्तरेस ॲटलास पर्वत व भूमध्य समुद्रापासून दक्षिणेस १५° उत्तर अक्षवृत्तापर्यंत सहारा वाळवंटाचा विस्तार आहे. दक्षिणेस सॅव्हाना प्रदेशात हे वाळवंट विलीन झालेले दिसते. या वाळवंटाखाली सु. ७७,००,००० चौ. किमी. क्षेत्र आहे. वाळवंटाच्या बहुतांश भागात जुलैचे सरासरी तापमान ३२° से., तर जानेवारी चे सरासरी तापमान १६° ते २७° से. असते. दिवसा प्रखर उष्णता असते. अल् अझीझीयाह (लिबिया) येथील कमाल तापमानाची नोंद ५८° से. पर्यंत झालेली आहे. रात्री हवा थंड असून जोरदार वारे नेहमीच वाहत असतात. वाऱ्याबरोबर सहारा वाळवंटातील धूळ व वाळू अटलांटिक महासागर व मध्य यूरोपकडे वाहून नेली जाते. सहारातील धूळयुक्त वारे ‘सिरोको’, ‘खमसिन’ व ‘हरमॅटन’ या नावांनी ओळखले जातात. काही पर्वतीय प्रदेश वगळता इतरत्र पाऊस २५ सेंमी. पेक्षा कमी व अनियमित असतो. अजूनही वृष्टीची नोंद न झालेली काही ठिकाणे या वाळवंटात आढळतात. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो अल्पकाळ असतो. या पावसाचे पाणी कोरड्या नद्यांद्वारे (वाडी) अतिशय जलद गतीने वाहून जाते.
कमी व मध्यम उंचीच्या टेबललँडची शृंखला आणि तीवरील एकाकी गिरिसमूह, असे सहारा वाळवंटाचे प्राकृतिक वैशिष्ट्य आढळते. उदा., अल्जीरियातील अहॅग्गर पर्वत, चॅडमधील तिबेस्ती पर्वतरांग यांच्या उत्तरेस अनेक द्रोणीप्रदेश आहेत. शॉट मेलररिर (अल्जीरिया) व शॉट जेरीद (ट्युनिशिया) ही मोठी खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. येथील स्थलरूप विविधतापूर्ण आहे. स्थलांतरित वालुकागिरी (अर्ग), वृक्षरहित शिलामंच (हामाडा) व रेतीयुक्त भूपृष्ठ (रेग) यांचा विस्तार खूप आढळतो. वाळवंटाच्या उत्तर भागातील मरुभूमींना खोल विहिरींचे व झऱ्यांचे पाणी पुरविले जाते व तेथे खजूर, ऑलिव्ह, द्राक्षे, गहू व सातू ही पिके घेतली जातात. ॲटलास पर्वतापासून मरुभूमीचे पाणी जमिनीखालून सु. ३२०-४८० किमी. पर्यंत दूर वाहत जात असावे, असे मानले जाते. प्राचीन काळी सहारा वाळवंटाच्या अनेक भागांत शहरे गाडली गेल्याचे आढळले आहे. पूर्वेकडे नाईल नदीचा जलसिंचनासाठी उपयोग झालेला आहे, तसेच पुराच्या वेळी गाळाचे संचयन होते, त्यामुळे वाळवंटाच्या विस्तारास अडथळा निर्माण झाला आहे. आस्वान हे ईजिप्तमधील नाईलवरील महत्त्वाचे धरण आहे. अल्जीरिया, ट्युनिशिया व लिबियातील सहारा वाळवंटी प्रदेश यांमध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहारामधून वाहतूक शक्य झाली आहे. दक्षिणोत्तर असे अनेक महामार्ग या वाळवंटातून गेलेले आहेत.
अरेबियन वाळवंट : जगातील पूर्णपणे ओसाड व वैशिष्ट्यपूर्ण असे हे वाळवंट आहे. याचे क्षेत्रफळ सु. २४,६०,५०० चौ. किमी. आहे. या वाळवंटाच्या काही भागांत स्थलांतरित वालुकागिरी व अपोढ वाळू आढळते, तर मध्य अरबस्तानमध्ये उघडे खडक आढळतात. पाऊस फारच कमी पडतो. तापमान उच्च असते. वेगवान वारे व वाळूची वादळे नेहमीच आढळतात.
आटाकामा वाळवंट : उत्तर चिलीमध्ये, अँडीज पर्वताच्या पायथ्यालगत पॅसिफिक महासागह किनाऱ्यावर हे वाळवंट असून त्याचे क्षेत्रफळ सु. ३, ६२,६०० चौ. किमी. आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक कोरड्या प्रदेशांपैकी हा एक असून येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ मिमी. आहे. काही प्रदेशांत तर चौदा वर्षात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. अँडीज पर्वतातून वाहत येणाऱ्या नद्या वाळवंटामध्ये कोरड्या पडतात. आरीका, कालामा व कोप्यापो यांसारख्या काही नद्याच समुद्राला येऊन मिळतात. सोडियम नायट्रेटचा जगातील सर्वात मोठा साठा आटाकाम वाळवंटात आहे. हा साठा ४६० किमी. लांब व ६४-६७ किमी. रुंदीच्या प्रदेशात पसरला आहे.
ऑस्ट्रेलियन वाळवंट : ऑस्ट्रेलिया खंडाच्या पश्चिम व मध्य भागात सु. ३१,००,००० चौ. किमी. क्षेत्रफळाचा, २५ सेंमी. पेक्षा कमी पर्जन्यमान असलेला वाळवंटी प्रदेश आहे. कमी व असमान पर्जन्यामुळे येथे सामान्यपणे स्पिनिफेक्स गवत व मल्गा या वनस्पती आढळतात. ॲलिस स्प्रिंग्ज जिल्ह्यासारख्या काही प्रदेशात पशुपालन व्यवसाय चालू शकतो. या मध्य भागात लांब व समांतर असे सलग वालुकागिरी विस्तृत क्षेत्रात आढळतात. मुख्यतः हाच वाळवंटी प्रदेश आहे. यामध्ये ग्रेट सँडी, गिब्सन, ग्रेट व्हिक्टोरिया, सिंप्सन या वाळवंटाचा समावेश होतो. या वाळवंटात चांगल्या प्रकारे वृक्षारोपण केलेले आहे. खडकाळ वाळवंटाखालीही बरेच क्षेत्र असून हा प्रदेश अगदी ओसाड आहे. नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.
थंड वाळवंटे : यात उत्तर अमेरिका व यूरेशियाचा उत्तरेकडील अतिथंड हवामानाचा सलग पट्टा येत असून त्यात वनस्पतींची वाढ होणे अवघड ठरते. हा प्रदेश सूचिपर्णी अरण्यांच्या उत्तरेस आहे. तेथे केवळ शेवाळे, दगडफूल, लव्हाळा व काही जातींचे गवत या वनस्पती आढळतात. या प्रदेशाला ⇨टंड्रा म्हणून ओळखले जाते. याच्या उत्तरेकडील भागात तर वनस्पती अजिबातच आढळत नाहीत. या प्रदेशाला ‘वाळवंटी टंड्रा’ किंवा ‘थंड वाळवंट’ असे म्हटले जाते. ग्रीनलंडसारख्या वनस्पतिरहित व विस्तृत हिमाच्छादित प्रदेशाला काही वेळा ‘हिमवाळवंट’ म्हणूनही संबोधले जाते.
वर्षातील बहुतांश काळ येथील पाणी हिमस्वरूपातच आढळते. त्यामुळे वनस्पतींना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच जमीनही हिमाच्छादित असते. बाष्पीभवनाचे प्रमाणही फार कमी असते. काही वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने अगदी अल्पकाळ तापमान पुरेसे असते. त्यावेळी पाण्याचे प्रमाणही अधिक असते. अशा वेळी केवळ अल्पकालीन वनस्पती आढळतात. बहुतांश टंड्रा प्रदेश उत्तर अमेरिका व यूरेशियाच्या उत्तर ध्रुवीय सीमान्त प्रदेशात येतो. याशिवाय दक्षिणेकडील अधिक उंचीच्या प्रदेशातही टंड्राचा विस्तार आढळतो. ग्रीनलंडचा बहुतांश भाग व त्याच्या वायव्येकडील एल्झमीअर बेटाचा मोठा भाग हिमाच्छादित असतो. उत्तर गोलार्धातच थंड वाळवंटाचा विस्तार अधिक आढळतो.
वाळवंटातील पाणी : पाणी हा वाळवंटातील वस्तीवर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याच्या प्रमाणावर मनुष्यवस्ती अवलंबून असते. विहिरी किंवा झऱ्यांच्या स्वरूपात मिळणारे भूमिगत पाणी, आर्टेशियन विहिरी व झऱ्यांपासून तसेच नद्या अथवा वाड्यांतून मिळणारे पाणी, अशा तीन प्रकारे वाळवंटात पाणी मिळू शकते. बऱ्याच वाळवंटामध्ये भूमिगत पाणी आढळत असले, तरी ते भूगर्भात खूप खोलवर व कमी प्रमाणात असते. पर्वतीय व बोल्सन वाळवंटांत पर्वतीय प्रदेशाकडून मैदानी प्रदेशाकडे वाहणारे परंतु तात्पुरत्या पाण्याचे प्रवाह आढळतात. तेथे दरीच्या तळाशी सामान्यपणे पर्वत व गाळाच्या पंखाकृती मैदानांचा शिरोबिंदू यांदरम्यान भूमिगत पाणी आढळते. खारटपणामुळे प्लाया किंवा खाऱ्या सरोवरांचे पाणी पिके, प्राणी व मानवी जीवन यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरत नाही. पर्वतीय प्रदेशांतून बारमाही वाहत येणाऱ्या प्रवाहांपासून जलसिंचनाच्या दृष्टीने कायमस्वरूपी पाणीपुरवठा होऊ शकतो.
हामाडा व अर्ग वाळवंटांत भूमिगत पाणी प्रामुख्याने जाड्या रेतीयुक्त वाडीमध्ये किंवा वालुकागिरींमधील खोलगट भागात आढळते. या तुलनेने ज्या अर्ग प्रदेशात वाड्यांची संख्या अधिक असते, तेथे वाडीमध्ये खोदलेल्या विहिरींपासून जास्त लोकसंख्येलाही पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. अर्गमधील पाण्याचे प्रमाण हे तेथून वाहणाऱ्या नद्यांची संख्या, वाळूच्या संचयनाची खोली व वालुकागिरींमधील खळग्यांची खोली यांवर अवलंबून असते. अर्गमधील वाड्यांमध्ये सुट्या वाळूमुळे विहिरी खोदणे जिकिरीचे असते. त्यामुळे हामाडाप्रमाणे अर्गमध्ये अधिक लोकसंख्येला पाणीपुरवठा होऊ शकत नाही.
आर्टेशियन विहिरी : जेथे आर्टेशियन विहिरींच्या दृष्टीने अनुकूल अशी भूगर्भरचना आढळते, तेथे पाणीपुरवठ्यासाठी आर्टेशियन विहिरींचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी आर्टेशियन झरे आढळतात. सहारा वाळवंटातील अनेक मरूद्यानांना त्यांपासून पाणीपुरवठा होतो. ऑस्ट्रेलियन वाळवंटातील अनेक ठिकाणी आर्टेशियन विहिरींच्या दृष्टीने योग्य आहेत.
प्रवाह : वाळवंटाला पाणीपुरवठा करणारा तिसरा मार्ग म्हणजे, वाळवंटातून वाहणारे प्रवाह. वाळवंटात नद्या अतिशय तुरळक आढळतात. या प्रदेशातील काही विदेशज प्रवाह अनेक लहान व उथळ मार्गांनी आणि नागमोडी वळणांनी वाहतात. अविकसित दऱ्यांतून वाहत आलेले असे प्रवाह जेथे वाळवंटात प्रवेश करतात, तेथे स्थलांतरित वाळूचे दांडे असल्याने ते बहुशाखांनीच वाहत राहतात. त्यांना गुंफित प्रवाह असे म्हणतात. प्रवाहाची दरी जर पुरेशी विकसित झाली असेल, तर तो वाळवंटातूनही एकाच मार्गाने वाहतो. पश्चिम आफ्रिकेतील नायजर नदी गिनी उच्चभूमीतून ईशान्येस सहारा वाळवंटाच्या दक्षिण सीमेपर्यंत वाहत जाते. वाळवंटात प्रवेश केल्याबरोबर ती अनेक शाखांमध्ये विभागली जाते व पुन्हा आग्नेयीस त्या मानाने दमट प्रदेशातून वाहू लागत. या भागात मात्र तिचा एकच मार्ग बनतो. या नदीचा उत्तरेकडील म्हणजेच वाळवंटातील वळणाचा भाग विदेशज नदीप्रवाह आहे. श्वेत नाईल युगांडातील विषुववृत्तीय आर्द्र उच्चभूमी विभाग सोडून उत्तरेस सहारा वाळवंटाकडे वाहत जाते. दक्षिण सूदानच्या साधारण सपाट मैदानी प्रदेशात तिचा प्रवाह गुंफित स्वरूपाचा बनतो. त्यानंतर मात्र वाळवंटी प्रदेशातून ती एकाच मार्गाने वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. विदेशज प्रवाहांची आर्द्र प्रदेशातील नद्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाची अशी दोन वैशिष्ट्ये आढळतात.अशा नद्यांना वाळवंटी प्रदेशांत तुलनात्मक दृष्ट्याकमी उपनद्या असतात आणि जास्त बाष्पीभवनामुळे त्यांचे पाणी कमी होत जाते. कोलोरॅडो नदीचा खोल दरीतील प्रवाह आणि अँडीजमध्ये उगम पावणारी लोआ नदी यांसारख्या अनेक नद्या अतिशय खोल व अरुंद दऱ्यांतून वाहत असल्यामुळे जलसिंचनाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. याउलट नाईल नदी रुंद दरीतून वाहत असल्यामुळे जलसिंचनाच्या तसेच लोकजीवनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
काही पर्वतीय व बोल्सन वाळवंटातील नद्या कायमस्वरूपी असतात. त्या आर्द्र पर्वतीय प्रदेशातून वाहत येत असल्यास त्यांना पुरेसे पाणी असते. विस्तृत बोल्सनमधून वाहत असताना तेथील कायमस्वरूपी खाऱ्या पाण्याच्या सरोवरांना त्या पाणीपुरवठा करतात. या नद्या गोड्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करीत असतात. अशा नद्यांच्या पर्वतापासून सरोवरापर्यंतच्या प्रवाहमार्गात अनेक मरूद्याने आढळतात.उदा. नैर्ऋत्य रशियाच्या आशियाई भागातील तुर्कस्तान वाळवंटातून वाहणाऱ्या अमुदर्या व सिरदर्या नद्या. या कायमस्वरूपी नद्या अरल समुद्राकडे अखंडपणे वाहत असतात.
वाळवंटातील काही नद्यांच्या मार्गात डबकी, सरोवरे किंवा पाणथळ प्रदेश आढळतात. जी सरोवरे प्रवाहित नसतात, ती प्रामुख्याने खाऱ्या पाण्याची असतात. अशा सरोवरातील पाण्याच्या कमाल क्षारतेचे प्रमाण दर हजारी २०० ते ३०० पर्यंत आढळते. उदा., ऑस्ट्रेलियातील एअर सरोवर. काही सरोवरे अल्पकालीन किंवा कोरडी आढळतात. अशी सरोवरे अल्पकालीन प्रवाहांनी एकमेकांना जोडलेली असतात. वाळवंटातील काही प्रवाह भूमिगत स्वरूपाचे असतात.
मानवी वस्ती : जगातील सु. ४ टक्के मानवी वस्ती वाळवंटी प्रदेशात आढळते. तीपैकी सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. मात्र जेथे पाणीपुरवठा होऊ शकतो, तेथेच शेती हा व्यवसाय चालू शकतो. अशी कृषीक्षेत्रे फारच मर्यादित व एकमेकांपासून दूर अंतरावर आहेत. तसेच वेगवेगळ्या वाळवंटांतील शेती प्रकारांत भिन्नता आढळते. सुरुवातीच्या काळात निर्वाह शेती व्यवसाय चालत असे. ज्या भागात यूरो-अमेरिकनांचा संपर्क आलेला आहे, तेथे व्यापारी शेती व्यवसाय प्रचलित झाला आहे. वाळवंटातील शेतीचा प्रकार व विस्तार यांवर पुरेसा व सलग पाणीपुरवठा, सूर्यप्रकाश या घटकांचा परिणाम होतो. खजूर हा वाळवंटातील महत्त्वाचा वृक्ष आहे.
प्राचीन वसाहती पूर्व गोलार्धातील (जुन्या जगातील) वाळवंटी प्रदेशांत, विशेषतः आफ्रिकन वाळवंटांत, होत्या. निग्रॉईड हे सहारा वाळवंटातील मूळ रहिवासी आहेत. वाळवंटातील पाणथळ जागी त्यांची वस्ती असे. हिमयुगात येथील हवामान सध्याच्या हवामानापेक्षा अधिक आर्द्र होते.
हामाडा व अर्ग वाळवंटातील मानवी वसाहती वाडीच्या पात्रात किंवा वाडीपात्राजवळच्या हामाडा पृष्ठभागावर वालुकागिरीमधील खोलगट भागात व विदेशज नद्यांच्या काठांवर अशा तीन प्रकारच्या प्रदेशांत आढळतात. वाडीच्या पात्रात मुख्यतः मरूद्याने असतात. साधारण स्थितीत शेतीसाठी विहिरींपासून पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो तसेच वाडीच्या पात्रात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून शेती केली जाते. वाडीच्या काठाजवळ जेथे पुराचा तडाखा बसणार नाही इतक्या उंचीवर, प्रामुख्याने हामाडावर, लोक आपली वस्ती करतात. पश्चिम सहारातील वाडी सौरा नदीकाठावर मात्र मोरोक्कोतील ॲटलास पर्वतापासून मध्य सहारापर्यंतच्या ९६० किमी.च्या प्रदेशात शेती केली जाते. अल्जीरियातील सहारा ॲटलास पर्वताच्या दक्षिण भागातील हामाडांचे अनेक वाड्यांमुळे खनन झालेले असून त्या भागात मुख्यतः लोकसंख्येची घनता अधिक आढळते. पश्चिम सहाराच्या काही भागांतील लोक काहीस प्रगत असून त्यांनी पाणीपुरवठा, कमी पावसाच्या प्रदेशातील पाणीप्रश्न सोडविणे तसेच वाडीच्या वरच्या टप्प्यातील पूरनियंत्रण या हेतूंनी धरणे बांधलेली आहेत.
हामाडापेक्षा अर्गमधील मरूद्याने संख्येने व आकाराने लहान असतात. असे असले, तरी अर्गमधील काही मरूद्यानांमध्ये खूप दाट लोकसंख्या आढळते. उदा. पूर्व अल्जीरियातील अर्ग ओरिएंटल (ग्रेट ईस्टर्न अर्ग). ज्या वाळवंटी प्रदेशांतून मोठ्या विदेशज नद्या वाहतात, त्या प्रदेशांत लोकसंख्येची घनता जास्त आढळते. ईजिप्तमधील नाईल नदीचे खोरे हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या नदीचा ईजिप्तने जलसिंचनासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. त्यामुळे या देशातील नाईलच्या खोऱ्यात दर चौ.किमी.स सु. ४०० लोक अशी लोकसंख्येची घनता आढळते.
पर्वतीय व बोल्सन वाळवंटांतील मानवी वसाहतींचे स्थान वेगळ्या प्रकारचे असते. मरूद्यानांचा आकार व ठिकाण पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सामान्यपणे पंखाकृती मैदानाचा शिरोभाग त्यासाठी निवडला जातो. पर्वतीय भागातील प्रवाहामध्ये मरूद्याने आढळतात. प्रत्येक वेळी असे प्रवाह बोल्सनपर्यंत वाहत येतीलच असे नाही परंतु पर्वतीय भागातून वाहत येणाऱ्या ज्या नद्या बारमाही स्वरूपाच्या असतात, त्या नद्यांच्या खोऱ्यांत दोन्ही काठांवरील अरुंद पट्ट्यात शेती होऊ शकते तेथे अधिक वस्ती आढळते.
भटक्या जमाती : स्थायी, सिंचित शेती हा जरी वाळवंटातील सामान्यपणे आढळणारा व्यवसाय असला, तरी काही प्रदेश असे आहेत की तेथील भटक्या जमाती दैवाधीन जीवन जगतात. आपल्या गुरांसाठी चाऱ्याच्या शोधार्थ ते संपूर्ण वाळवंटभर सतत भटकत असतात. स्थलांतर हा या गटांचा स्थायीभाव बनलेला असतो. पावसाची अनिश्चितता व तीमुळे निर्माण झालेली कुरणांची दुर्मिळता यांमुळे या जमातींचे जीवन खूपच कष्टप्रद बनले आहे. शेतीयोग्य मरूद्यानांतील वसाहती मात्र आपल्या गरजा भागवू शकतात, तसेच काही अधिक उत्पादनांचा साठाही करून ठेवतात. भटक्या पशुपालकांना जेव्हा चारा सापडत नाही, तेव्हा या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होतात. जुन्या जगातील वाळवंटामधील मरूद्यानवासी व भटक्या जमाती यांच्यातील संघर्ष प्रसिद्धच आहेत.
अमेरिकेतील व ऑस्ट्रेलियातील वाळवंटात मात्र भटक्या जमाती विशेष आढळत नाहीत. कारण युरोपीयांनी तेथे वसाहती स्थापन करण्यापूर्वी घोडे अथवा उंट हे प्राणी त्या भागात नव्हते व वाळवंटातील बहुतेक भटक्या जमातींचे जीवन त्या पाण्यांवरच अवलंबून असते. उत्तर नेव्हाडा व मध्य उटा या राज्यांमधील वाळवंटांसारख्या इतर काही वाळवंटी प्रदेशांत पशुपालन व्यवसायासाठी पुरेसे वनस्पतिजीवन आढळते. तसेच त्याला पर्याय म्हणून काही काळ पर्वतीय भागातील कुरणांवर गुरे चारली जातात.
खाणकामाची मरूद्याने : (माइनिंग ओॲसिस). उत्तर चिलीमधील वाळवंटासारख्या काही वाळवंटात अशा प्रकारची मरूद्याने आढळतात. तेथे मौल्यवान खनिजांचे उत्पादन होते. मानवी उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली कोणतीही उत्पादने येथील मरूद्यानात होत नाहीत. सर्व जीवनावश्यक वस्तू बाहेरून आणून येथील लोकांना पुरविल्या जातात. उत्तर चिलीमध्ये तर पाणीसुद्धा ८० किमी. अंतरावरील अँडीज पर्वतातून नळमार्गाने आणले जाते.
थंड वाळवंटातील मानवी जीवन : उत्तर अमेरिकन व यूरेशियन टंड्रा प्रदेशांत अतिशय कमी मनुष्यवस्ती आढळते. उत्तर अमेरिका व ग्रीनलंडपासून पूर्व सायबीरियापर्यंतच्या प्रदेशात आढळणारे एस्किमो शिकार, मासेमारी करून तसेच काही जंगल उत्पादने गोळा करून आपले निमभटके जीवन जगतात. त्याशिवाय यूरेशियाच्या सरहद्द भागात राहणाऱ्या लॅप, सॅमॉइड या जमातींच्या लोकांचे जीवन रेनडियरवर अवलंबून असते. बहुतांश यूरेशियन केवळ उन्हाळ्यात टंड्रा प्रदेशात वास्तव्य करतात व हिवाळ्यात अरण्यमय प्रदेशात येतात. पाश्चिमात्त्य संस्कृतीशी आलेल्या संपर्कामुळे व त्यांच्याकडून शिकार व मासेमारीसाठी पुरविण्यात येऊ लागलेल्या साधनसामग्रीमुळे एस्किमोंचे जीवनमान बदलले आहे. एस्किमोंच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार असलेली केसाळ सीलची शिकार नवीन साधनांमुळे खूपच सोपी झाली आहे. परिणामतः हा प्राणी दुर्मिळ होत आहे. एस्किमोंच्या जीवनमानाचे कोणतेही एक निश्चित स्वरूप राहिलेले नाही. यूरेशियातील जमातींचेही मूळ जीवनमान बरेच बदललेले आढळते. निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी एस्किमोंची संख्या सु. ४०,००० पर्यंत कमी झालेली आहे. दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका खंड हा बर्फाच्छादित प्रदेश असून त्या संपूर्ण खंडावर कायम मानवी वसाहत नाही.
वाळवंटातील प्राणी व वनस्पतिजीवन : उच्च तापमान, पाण्याचा अभाव व विषम हवामान यांमुळे वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने लहान प्राणी आढळतात. दिवसा हे प्राणी बिळांत राहतात आणि रात्री तापमान कमी झाले व हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढली की बाहेर निघतात. वेगवेगळे कीटक, कोळी, विंचू व इतर अष्टपादवर्गीय प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी वाळवंटात आढळतात. विशिष्ट शरीररचनेमुळे जास्त तापमानातही बाष्पीभवनाने त्यांच्या शरीरातील पाणी फारसे कमी होत नाही. त्यामुळे अशा हवामानात ते टिकाव धरू शकतात. जेव्हा उष्णता खूप वाढते, तेव्हा आफ्रिकन कासव (टेस्ट्यूडे सलकटा) हे अधिक प्रमाणात लाळ उत्पन्न करून डोके, मान व पुढचे पाय ओलसर करून ४०.५° से. इतके शरीराचे तापमान कायम ठेवते. अर्थात हे कासवाच्या शरीरातील पाण्यावर अवलंबून असते. तसेच हा उपाय दीर्घकाळ शक्य होत नाही. इतर प्राणीही कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व शरीराचे तापमान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुलनात्मकदृष्ट्या पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत असते. त्यामुळे पक्षी मुख्यतः वाळवंटाच्या सीमावर्ती भागात आढळतात. पाण्याच्या ठिकाणापासून ते खूप दूरपर्यंत जात नाहीत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ते मुख्यतः सावलीमध्ये थांबतात. शहामृगाच्या डोक्यात डोळ्याजवळ क्षारयुक्त पाणी साठवून ठेवणाऱ्या ग्रंथी असतात. आफ्रिकन व आशियाई वाळवंटांत आढळणारे भाटतीतर पक्षी नद्या व सरोवरांपासून खूप दूरवर राहतात. पिलांना पाणी पाजण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण असते. उष्णतेने पक्ष्यांची अंडी फुटून जातात, त्यामुळे पक्षी आपली अंडी झुडुपांच्या सावलीत, गुहांमध्ये किंवा खडकांच्या आडोशाला घालतात.
उंट हा वाळवंटात आढळणारा प्रमुख प्राणी आहे. हरणांच्या काही जाती तसेच कांगारू येथे आढळतात. उंदीर, जर्ब्रोआ, खार इ. कुरतडणारे प्राणीही वाळवंटात पहावयास मिळतात. जास्त तापमान, अतिशय कमी पर्जन्य, वालुकामय मृदा यांमुळे वाळवंटी प्रदेशांत लहान झुडुपे, काटेरी व बारीक पानांच्या, लहान आकाराच्या वनस्पती आढळतात.
संदर्भ : 1. Gautler, Emile F. Trans. Mayhew, Dorothy F. Sahara : The Great Desert, New York, 1935.
2. James, Preston, E. Kline, H.V. A Geography of Man, Boston, 1966.
3. National Geographic Society, Ed. The Desert Reaim : Lands of Majesty and Mystery, Washington, D.C., 1982.
4. Starker, Leopold A. The Desert, New York, 1967.
चौधरी, वसंत
“