वाहिनी क्लथन : (थ्राँबोसिस). रक्ताचे अभिसरण होत असताना रोहिणी किंवा नीला या वाहिन्यांमध्ये रक्तातील काही घटकांचे द्रवरूपातून स्थित्यंतर (साखळण्याची क्रिया ) झाल्याने गाठ वा गुठळी निर्माण होण्याच्या क्रियेला वाहिनीक्लथन म्हणतात. निरोगी व्यक्तीच्या शरीरात कोठेही जखम झाल्यास तेथील रक्तस्त्राव बंद होण्यासाठी घडून येणारे क्लथन (साखळणे), शरीराबाहेर काढून ठेवलेल्या रक्तामधून रक्तरस वेगळा होत असताना घडणारे क्लथन आणि वाहिनीक्लथन या तिन्ही क्रियांमध्ये मूलभूत साम्य आहे. त्यामध्ये बिंबाणू (रक्तातील वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार, २-३ मायक्रॉन व्यासाच्या तबकड्या १ मायक्रॉन= मीटरचा दशलक्षांश भाग), विविध क्लथनकारक घटक आणि फायब्रिनोजेन (तंत्वीजन) यांच्या आंतरक्रियांमुळे  फायब्रिनाचे (तंत्वीचे) सूक्ष्मजाल निर्माण होते आणि रक्तातील सर्व प्रकारच्या कोशिका (पेशी) त्यात अडकून क्लथ वा गाठ तयार होऊ लागते. ही मऊ गाठ हळूहळू कठीण व आकुंचित होते.

कारणे : प्रवाही रक्तात क्लथनाची क्रिया सुरू होण्यास पुढील तीन प्रकारचे दोष कारणीभूत असू शकतात. रुडोल्फ फिरखो (१८२१ – १९०२) या जर्मन विकृतिवैज्ञानिकांनी यांचे प्रथम वर्णन केले म्हणून त्यांना ‘फिरखोत्रय’ म्हणतात : (१) रक्ताची क्लथनशीलता (साखळण्याची क्षमता ) वाढणे. बिंबाणूंची संख्या व पर्यायाने असंजकता (चिकटपणा) वाढल्याने असे होऊ शकते. (२) वाहिन्यांमध्ये अंशतः अडथळा आल्याने किंवा हृदयाच्या अकार्यक्षमतेमुळे रक्तप्रवाहाचा वेग मंदावणे. रोहिणीपेक्षा नीलेतील रक्तप्रवाहाचा वेग बराच कमी असल्याने नीलेत क्लथन होण्याची अधिक शक्यता असते. (३) वाहिनीभित्तीच्या अंतःस्तरास झालेली इजा, विकारामुळे होणारा अपकर्ष (ऱ्हास), जंतुसंसर्ग किंवा अन्य कारणांमुळे वाहिनीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत न राहता खरबरीत होणे. खरबरीत भागावर बिंबाणू सहज चिकटतात. अशा रीतीने होणाऱ्या क्लथनाची अधिक तपशीलवार माहिती आता झालेली आहे. क्लथनास कारणीभूत होणारे सु. सोळा घटक रक्तात आढळले आहेत. यांपैकी बहुतेक प्रत्येक घटकाचे एखाद्या अन्य घटकाकडून सक्रियण (अधिक क्रियाशील बनविण्याची क्रिया) होऊन ही संपूर्ण प्रक्रिया प्रपातमालेप्रमाणे टप्याटप्याने घडून येते, असे दिसते. [⟶ रक्तक्लथन].

शरीराबाहेर काढलेल्या रक्तात ही क्लथनक्रिया फायब्रीन पूर्णपणे संपेपर्यंत चालू राहते व सर्व कोशिका फायब्रिनाच्या जालात अडकतात. वाहिनीक्लथनामध्ये मात्र एका विशिष्ट आकारमानाची गाठ तयार झाल्यावर प्रक्रिया थांबते व क्लथन तेवढ्या भागापुरते मर्यादित राहते. रक्तातील ‘प्रथिन सी’ व ‘प्रिथिन एस’ या के जीवनसत्त्वावर अवलंबित अशा दोन क्लथनविरोधी घटकांकडून हे नियंत्रण होत असावे. यांशिवाय थॉंब्रिनाच्या क्रियेला विरोध करून रक्तातील हा बदल थांबविणारी पाच-सहा अँटिथ्राँबीन (एटी थ्राँबिनाला अक्रिय बनविणारी) द्रव्ये सापडली आहेत. यकृतातील प्रसित (क्षारकीय रंजन सहजपणे होणाऱ्या अनेक कणिकांनी युक्त अशा मोठ्या) कोशिकांमध्ये असणारे हेपॉरीन हे द्रव्यही क्लथनास विरोध करते.

वाहिनीक्लथनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते प्रवाही रक्तात घडून येते व क्लथाची संरचना विषम असते. क्लथनाची सुरुवात जेथे होते त्या ठिकाणी वाहिनीच्या अंतःस्तरास इजा झाल्यामुळे बिंबाणूंचे पुंज आणि श्वेतकोशिका यांचा फायब्रिनाने बद्ध असा गोळा तयार होतो. त्याला क्लथाचे शीर्ष वा डोके म्हणतात. तेथून रक्तप्रवाहाच्या दिशेने पसरलेल्या निमुळत्या भागामध्ये बिंबाणू कमी असून फायब्रीन व तांबड्या कोशिकांचे प्रमाण जास्त असते. हे क्लथाचे पुच्छ वा शेपूट म्हणता येईल. वाहिनीबाहेर होणाऱ्या क्लथनात असा भेद आढळत नाही. नीलेमधील क्लथाचे शीर्ष लहान असते. बऱ्याच वेळा ते झडपेजवळ अंतःस्तरास चिकटलेले असते. त्यापासून सुरू होणारे लाल पुच्छ मात्र बरेच लांब असू शकते. याउलट रोहिणीतील बिंबाणुप्रधान शीर्ष बरेच मोठे असते व कधीकधी त्यामुळे रक्तप्रवाह पूर्णपणे थांबू शकतो. अडथळा पूर्ण नसल्यास किंवा सुरूवातील असलेला अडथळा क्लथप्रत्याकर्षणाने (आत वा मागे ओढला गेल्याने) अंशतः दूर झाल्यास रक्तप्रवाहात तरंगणारे फायब्रीनयुक्त पुच्छ तयार होते.

वाहिनीक्लथनाची शक्यता वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाहिनीशोथ [वाहिनीभित्तीची दाहयुक्त सूज ⟶ नीलाशोथ], अंतःस्तराचा वसापकर्ष (कोशिकांत वसेचे-मेदाचे-कण साचून उतकांचा-समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहांचा-ऱ्हास होणे), दीर्घकाल अंथरुणावर पडून रहावे लागणे, मोठ्या शस्त्रक्रिया, नीलेमध्ये वरचेवर अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) औषधे अथवा द्रव पदार्थ देणे वाहिनीमार्गावर दीर्घकाल दाब उत्पन्न करणारी अर्बुदे (कोशिकांच्या अत्याधिक वाढीने बनलेल्या व शरीरास निरुपयोगी अशा गाठी), जलोदर, घट्ट बांधलेले पट्टे इ. होत. आर्सेनिक, पारा, सर्पविषे, गर्भिणी विषबाधा [⟶ गर्भारपणा], सर्वांग भाजणे यांमुळेही वाहिनीक्लथन होऊ शकते. झडपांवर संधिवातामुळे चामखिळीसारखा अंकुरोद्‌भव होतो. त्यावर आणि तंतुक आकुंचनामुळे (हृदयाच्या स्नायूच्या तंतूंच्या अतिजलदपणे होणाऱ्या अनियमित आकुंचनामुळे) अलिंदाच्या (जिच्यात नीलांमार्फत रक्त येते व जिच्यातून ते निलयात पाठविले जाते त्या) पोकळीत रक्तसंचय होते. त्यांमध्येही  वाहिनीक्लथनाची शक्यता जास्त असते. स्त्रीमदजनक व गर्भरक्षक हॉर्मोने (उत्तेजक स्त्रावाप्रमाणे कार्य करणारी संयुगे) असलेल्या प्रतिबंधक गोळ्यांच्या अनिष्ट परिणामातील एक परिणाम म्हणूनही वाहिनीक्लथनाचा उल्लेख केला जातो.

परिणाम व लक्षणे : वाहिनीक्लथनाने रक्तप्रवाहात अंशतः अडथळा आला, तरी संबंधित ऊतकाची कार्यक्षमता घटते. तीव्र रोधामध्ये रक्तातील पोषक द्रव्ये, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे वेदना, ऊतकहानी किंवा अभिकोथ (एक प्रकारचा ऊतकमृत्यू) हे परिणाम होतात. रोहिणीक्लथनाच्या परिणामांची गंभीरता त्या इंद्रियाचे शरीरक्रियेतील महत्त्व, पर्यायी वाहिन्यांची उपलब्धता, क्लथनाची पूर्णता आणि त्यामुळे होणारा अडथळा किती काळ टिकला आहे यांवर अवलंबून असते.  उदा., हृदयाच्या रोहिणीमध्ये क्लथन झाल्यावर (हृदयविकाराचा झटका) रक्ताभिसरणात तत्काळ बाधा येते रक्तदाब कमी होतो आणि तीव्र वेदना होऊ लागतात. अशा वेदनांमुळे अस्वस्थ होऊन रुग्णाने जास्त हालचाल केल्यास मृत्यूचाही धोका असतो. मेंदूच्या रोहिणीक्लथनाने विशिष्ट क्षेत्रातील तंत्रिका कोशिकांचे (मज्जापेशींचे) कार्य कमी होऊन त्यांनी नियंत्रित केलेला शरीराचा भाग दुर्बल होतो किंवा पूर्णपणे बलहीन (पक्षाघात किंवा अंगघात) होतो. क्लथन जर पूर्ण किंवा विस्तृत असेल, तर असंख्य कोशिकांचा मृत्यू होतो व त्या परत निर्माण होऊ शकत नसल्याने कायमचे अपंगत्व येते. पायाच्या रोहिणीत होणाऱ्या अवरोधी वाहिनीक्लथनशोथ या रोगात मधूनमधून वेदना आणि लंगडणे अशी लक्षणे दिसतात.

नीलाक्लथनांमुळे रक्ताचा निचरा होण्यात अडथळा येतो. निचराक्षेत्रात सूज निर्माण होते. सोबत नीलाशोथ व जंतुसंक्रमण असल्यास आजूबाजूच्या क्षेत्रातील ऊतकांमध्ये पूतियुक्त शोथ ( पू असणारी दाहयुक्त सूज) पसरू लागते. आंत्र (आतडे) किंवा वृक्क (मूत्रपिंड) यांच्या नीलांमध्ये क्लथन झाल्यास विष्ठेमध्ये अथवा मूत्रात रक्त दिसून येते. नीलाक्लथाचे पुच्छ मुख्य भागापासून तुटून रक्तप्रवाहाबरोबर हृदयाच्या दिशेने वाहत जाऊन तेथून फुफ्फुसाच्या रोहिणीत पोहोचल्यास तेथे अंतर्कीलनाचा [ रक्तप्रवाह बंद पडण्याचा ⟶ अंतर्कीलन] धोका असतो. मोठ्या रोहिणीत निर्माण झालेल्या क्लथाचा एखादा भाग तुटून जर प्रवाहात गेला, तर पुढे असलेल्या एखाद्या लहान रोहिणीत असेच अंतर्कीलन होऊ शकते. अंतर्कीलनामुळे त्या विशिष्ट रोहिणीच्या पुरवठा क्षेत्रातील ऊतकांचा मृत्यू होऊन अभिकोथ दिसू लागतो.


रक्तप्रवाहाची पुनर्स्थापना : वाहिनीक्लथनाच्या निर्मितीमधील दुसरी अवस्था पूर्ण होत असताना म्हणजेच फायब्रिनाचे आकुंचन होताना क्लथाचे आकारमान लहान होत जाते व रक्तप्रवाहास वाव मिळतो. तसेच वाहिनी अंतःस्तराच्या नवीन कोशिका निर्माण होऊन त्यांचा थर क्लथाच्या पृष्ठभागावर पसरू लागतो. त्यामुळे क्लथाच्या जवळून रक्तप्रवाह पूर्वीप्रमाणेच पुनर्स्थापित होण्यास मदत होते.

रक्तामधील प्लाझ्मिनोजेन नावाच्या प्रथिनाचे विविध साहाय्यकारी घटकांकडून सक्रियण (क्रियाप्रवर्तन) होऊन प्लाझ्मीन या प्रथिनविघटक एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनांची) निर्मिती होते. या एंझाइमाकडून फायब्रिनाचे विघटन सुरू होते. त्यामुळे क्लथ पुन्हा मऊ होतो आणि भक्षिकोशिकांच्या (बाह्यपदार्थ गिळंकृत करणाऱ्या अमीबासारख्या कोशिकांच्या) साहाय्याने तो हळूहळू विलय पावतो. बंद पडलेल्या वाहिनीच्या नवीन फुटलेल्या शाखाही क्लथामध्ये वाढत जाऊन नवा मार्ग तयार करतात. या क्रियेला क्लथाचे नलिकाभवन असे म्हणतात. त्यातूनही रक्तप्रवाह सुरू होतो. याशिवाय ज्या वाहिनीत अडथळा निर्माण झाला असेल तिच्या बाजूंनी असलेल्या वाहिनींची वाढ होऊन किंवा नवीन वाहिन्यांचे जाळे निर्माण होऊन त्यातूनही प्रवाहाची पुनर्स्थापना होते. याला पार्श्वरक्ताभिसरण असे म्हणतात.

नीलांमध्ये कधीकधी दीर्घकाळ टिकलेल्या क्लथात कॅल्शियमाच्या लवणाचे थर बसून कठीण खड्यासारख्या गाठी तयार होतात. त्यांना नीलाश्मरी म्हणतात.

प्रतिबंध आणि उपचार : वाहिनीक्लथनामुळे उद्‌भवणारे हृदयविकार व पक्षाघातासारखे गंभीर परिणाम व अंतर्कीलनाची शक्यता यांमुळे त्यावर प्रतिबंधक उपाय योजणे आवश्यक असते. यासाठी शरीराची नियमित हालचाल, नीलाशोथ व अवरोध टाळणे आणि क्लथनविरोधी औषधोपचार हे मार्ग अवलंबावे लागतात. क्लथनक्रिया सुरू झालीच, तर क्लथाची वाढ होऊ नये आणि निर्माण झालेल्या क्लथाचा लवकर व सुरक्षितपणे निरास (लोप) व्हावा म्हणून औषधे व शक्य तर शस्त्रक्रियेने वाहिनी मोकळी करणे असे उपाय उपलब्ध असतात. यांशिवाय अशा रुग्णामध्ये वरचेवर क्लथन होण्याची प्रवृत्ती असल्याने दीर्घकाळ प्रतिबंधक औषधे घ्यावी लागतात.

पुढील प्रकारची क्लथनविरोधी औषधे उपयुक्त ठरली आहेत : (१) बिंबाणूंची आसंजकता आणि समूहनशीलता (समूहांच्या रूपात एकत्र येण्याची क्षमता) कमी करणारी उदा., ॲस्पिरीन. (२) यकृतातील प्रोथ्राँबिनाची निर्मिती कमी करणारी कुमारीन वर्गीय व इंडेनडायोन वर्गीय औषधे. (३) फायब्रिनाच्या निर्मितीस विरोध करणारे हेपॉरीन हे शरीरस्थ द्रव्य थ्राँबोप्लॅस्टीन आणि थ्राँबीन यांच्या क्रियांमध्ये अडथळा आणते व त्वरित परंतु काही तासच परिणाम घडवते. हे तोंडावाटे देणे परिणामकारक  नसल्याने वरचेवर अंतःक्षेपणाने देणे भाग पडते. म्हणून क्लथन झाले असता ताबडतोब या औषधाने सुरुवात करून नंतर काही आठवडे विलंबित पण दीर्घगुणी कुमारिनासारखी औषधे दिली जातात. त्यानंतर प्रदीर्घकाळ ॲस्पिरीन अथवा अन्य बिंबाणूलक्ष्यी द्रव्यांचा वापर केला जातो. (४) क्लथाचे विघटन करणाऱ्या औषधांत मुख्यतः फायब्रिनाचा विलय करणाऱ्या एंझाइमांचा समावेश होतो. नैसर्गिक प्लाझ्‌मीन, ॲस्परजिलस ओरायझी या कवकांपासून (हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींपासून) मिळणारी प्रथिनाचे अपघटन करणारी (मोठ्या रेणूचे तुकडे करणारी) एंझाइमे स्ट्रेप्टोकायनेज, युरोकायनेज यांसारखी प्लाझ्‌मिनाचे सक्रियण करणारी एंझाइमे व फायब्रिनाचा विलय करणाऱ्या प्रणालीचे नैसर्गिक सक्रियक ज्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात अशी विविध औषधे  उदा., चयकारी स्टेरॉइडे (शरीरात सतत घडणाऱ्या विधायक जीवरासायनिक क्रिया वाढवणारी कृत्रिम हॉर्मोने), स्त्रीमद-जनक हॉर्मोने, मधुमेहविरोधी बायग्वानांइड रसायने इत्यादी. मात्र या सर्व एंझाइमांची व औषधांची निश्चित उपयुक्तता अजून सिद्ध झालेली नाही.

वाहिनीक्लथनावर औषधयोजना करत असताना क्लथन-यंत्रणेचा नाजूक समतोल बिघडून अतिरिक्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यासाठी वरचेवर रक्ततपासणी करून आणि विशिष्ट क्लथन चाचण्यांचा उपयोग करून औषधमात्रेत योग्य ते बदल करतात. जरूर तेव्हा विरोधी औषधे वापरून क्लथनशीलता वाढवली जाते.

पहा :  अंतर्कीलन अभिकोथ नीलाशोथ पूयरक्तता रक्तक्लथन.

संदर्भ : 1. Anderson, J. R. Ed., Mulr’s Textbook of Pathology, London, 1985.

           2. Biggs, R. Rizza, C. R. Eds., Human Blood Coagulation, Hemostasis and Thromliosis, London, 1984.

श्रोत्री, दि. शं वेंगसरकर, अ. सा.