वास्तववाद, कला-साहित्यातील : कला साहित्य क्षेत्रातील एक प्रमुख संप्रदाय. विशिष्ट वास्तवनिष्ठ विचारसरणी जाणीपूर्वक पुरस्कारणारा व त्यानुसार सहेतूक निर्मिती करणारा एक संप्रदाय म्हणून वास्तववाद जरी एकोणिसाव्या शतकात बहरास आला, तरी वास्तवता ही एक स्थिर व शाश्वत प्रवृत्ती आहे. मानवी जीवनाकडे पाहण्याचा वास्तव दृष्टिकोण व जीवनव्यवहाराचे वास्तव चित्रण ही प्रवृत्ती कला-साहित्याच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या कलावंतांच्या ठायी दिसून येते व तिचे भिन्नभिन्न विविधांगी आविष्कार त्यांच्या कलाकृतींतून गोचर होतात. कला-साहित्य क्षेत्रांतील ह्या वास्तवतेच्या स्थिर प्रवृत्तीचा व वास्तववादी संप्रदायाचा थोडक्यात स्थूल आढावा पुढील विवेचनात घेतला आहे.

वास्तववाद, साहित्यातील : आधुनिक युगात वास्तववादी साहित्यास एक खास महत्त्व प्राप्त झाले आहे. या साहित्याची निर्मिती यूरोपमध्ये अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत स्वच्छंदतावादी (रोमँटिक) साहित्याच्या प्रतिक्रियेतून झाली. स्वच्छंदतावादी साहित्यात ‘स्व’ आणि ‘वस्तू’ यांच्या एकात्म जाणिवेचा आविष्कार होत असला, तरी तो आत्मनिष्ठेच्या प्रभुत्वाखाली होत असतो. वास्तववादी साहित्यात वस्तुनिष्ठ वास्तवाला ‘स्व’ पासून स्वतंत्र अस्तित्व असते. वास्तववाद हा ⇨स्वच्छंदतावादा (रोमँटिसिझम) बरोबरच सरंजामी साहित्यालाही प्रतिक्रियास्वरूप आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि अभिजाततावादी साहित्यविषयक संकेत यांमुळे विषयवस्तूवर व अभिव्यक्तीवर पडणारी बंधने वास्तववादी साहित्याने झुगारून दिली. राजेरजवाडे आणि सत्ताधारी वर्गातील उच्चभ्रू व्यक्तिच्या जीवनाचे, त्यांच्या मूल्यव्यवस्थेचे चित्रण करण्याची प्रवृत्ती त्याज्य मानून तत्कालीन कनिष्ठ वर्गातील लोकजीवनाचे चित्रण करण्याची नवी रीती इंग्लंडमधील वास्तवाद्यांनी अठराव्या शतकात रूढ केली. तेव्हापासून मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय व कालांतराने कामगारवर्गीय जीवनाचे चित्रण साहित्यातून प्राधान्याने होऊ लागले.

साहित्यातील वास्तववाद म्हणजे व्यक्ती, प्रसंग, वस्तू, घटिते आदींचे-म्हणजेच जीवनाचे यथातथ्य आविष्करण होय. वास्तववादी साहित्यात वास्तवाचे व्यक्तिनिरपेक्ष, अनुभवपूर्ण अस्तित्व मान्य केलेले असते. हे वास्तव साहित्यकृतीच्या विषयवस्तू, तंत्र आणि लेखकाची तात्त्विक भूमिका या घटकांमधून साकार होत असते.

वास्तववादी प्रणालीनुसार कल्पनारम्य विषयांप्रमाणेच सर्वसामान्य व्यक्तिजीवनातील नित्याचे, जिव्हाळ्याचे अनुभवही साहित्याच्या विषयवस्तू होऊ शकतात. हे अनुभव चित्रित करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणाला साहजिकच महत्त्व प्राप्त होते. मध्यमवर्गापासून खालील वर्गांचे अनुभवविश्व सूक्ष्मपणे टिपले जाते. बहुसंख्याकांचे आयुष्य वास्तव म्हणून स्वीकारण्यात येते. वास्तववादाला कोणताच मानवी अनुभव वर्ज्य नसल्याने आर्थिक-सामाजिक व्यवस्था, व्यक्तीची मानसिक घडण आणि लैंगिक अनुभव हे सारे त्याच्या विषयवस्तूंमध्ये समाविष्ट होते.

नवीन विषयवस्तूंच्या निवडीमुळे ते साकार करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर अनिवार्य असतो. वास्तववादी तंत्राचा वस्तुनिष्ठता हा पाया असतो. वास्तव आहे तसे मांडण्यासाठी शास्त्रज्ञाचा दृष्टिकोण आत्मसात करण्याची लेखकाची महत्त्वाकांक्षा असते. केवल वस्तुनिष्ठता अशक्य असली, तरी या तत्त्वामुळे निव्वळ कल्पनारम्यतेतून निर्माण होणारा वस्तुस्थितिविक्षेप टाळता येतो व लेखक वास्तवाच्या खंबीर पायावर उभा राहू शकतो. व्यक्तिचित्रण, कथानक (प्लॉट) आणि तंत्ररचना यांतील कृत्रिमता टाळता येते. यामुळे जीवनाचा कुठलाही तुकडा परिपूर्णतेने साहित्यात अवतरू शकतो. पारंपारिक नायक हा एकमेवाद्वितीय असतो, म्हणून ते व्यक्तीचे कृतक रूप असते. वास्तववादातील चित्रणविषय व्यक्तीचे ‘सामान्यत्व’ हेच व्यवच्छेदक लक्षण असते. पारंपरिक नायकाची हकालपट्टी होऊन सामान्यत्वाच्या गुणामुळे बऱ्याचदा समूह हेच त्याची जागा घेतात. वास्तववादी लेखकाच्या तात्त्विक भूमिकेनुसार वास्तव वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिरपेक्ष असते. ते कार्यकारणभावाच्या नियमबद्ध साखळीत विणलेले असते. मानव हा त्या साखळीतील केवळ एक दुवा असल्याने त्यालाही कार्यकारणाचे नियम लागू होत असतात. मानवी जीवनव्यवहार हे त्याच्या भौतिकतेच्या परिघातच अर्थपूर्ण असतात. मानव हा प्राणी आहे आणि तो सामाजिक आहे. प्राणिजीवनाच्या व सामाजिक जीवनाच्या नियमांनीच त्याचे अस्तित्व निर्धारित झालेले असते.

वास्तववादी साहित्यव्यवहाराबरोबरच साहित्याच्या वास्तववादी सिद्धांतही प्रस्थापित झाला आहे. ‘साहित्य उपरिनिर्दिष्ट वास्तवाला यथातथ्यपणे साकार करीत असते’, हे ब्यिल्यीन्‌स्कईपासून ते टॉलस्टॉय व गॉर्कीपर्यंत मांडण्यात आलेल्या वास्तववादी सिद्धांतांचे समान सूत्र आहे. ब्यिलीन्‌‌‌स्कईच्या मते ‘साहित्य जीवनाची विविध घटिते आरशाप्रमाणे एका दृष्टिकोणातून प्रतिबिंबित करीत असते’. टॉलस्टॉयच्या सिद्धांतानुसार ‘खरा कलावंत वास्तव आहे तसे पाहतो, त्याला जे हवे आहे ते तो त्यात पाहत नाही’. ‘आरशातील प्रतिबिंब’ ही प्रतिमा आणि वास्तववाद यांचे एक ऐतिहासिक समीकरण तयार झाले आहे. याचीच तार्किक परिणती निसर्गवादामध्ये (नॅचरॅलिझम) होते. या संकल्पनेनुसार वास्तवाचे आकलन म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष वास्तवाचे तटस्थ वृत्तीने केलेले चित्रण होय. व्यक्तीचे सर्व व्यवहार बाह्य वास्तवाने नियंत्रित केल्याने त्याला स्वतंत्र कृतिशीलतेची शक्यता नसते. म्हणून निसर्गवाद मुळातच निराशावादाकडे झुकलेला असतो. ⇨एमिल झोलाने (१८४० – १९०२) आपले साहित्य हे ‘प्रायोगिक’ (एक्स्‌पेरिमेंटल) पद्धतीचे आहे, असे म्हटले. या पद्धतीतून दिसणारे वास्तव हे पराकोटीच्या वस्तुनिष्ठतेचे असते. यामुळेच निसर्गवाद म्हणजे वास्तवाचे वरवरचे घटिताचे ज्ञान, वास्तवाचे इंद्रियसंवेद्य ज्ञान असा अर्थ रूढ झाला आहे.

निसर्गवादात मानवाची कृतिशीलता दुर्लक्षिली जाते. यातून वस्तुस्थितीचा विपर्यास होतो. म्हणून वास्तववाद म्हणजे जीवनाच्या बाह्यांगाचे प्रतिबिंब नसून तो वास्तवाच्या आंतरिक सत्त्वाचा आविष्कार होय, असे मत मांडण्यात आले. हाच निसर्गवाद व वास्तववाद यांतील मूलभूत भेद होय. वास्तववादातून आविष्कृत होणारे आंतरिक सत्त्व कोणते याबाबत मात्र मतभेद आहेत. देकार्तच्या (कार्टीझन) मतानुसार विविध घटितांमधील कार्यकारणसंबंध हे वास्तवाचे सत्त्व ठरू शकते. ही भूमिका निसर्गवाद्यांना जवळची आहे. हेगेलियन तत्त्वज्ञानानुसार हे सत्त्व म्हणजे विश्वचैतन्य. आपण ज्याला वास्तव म्हणतो ते म्हणजे विश्वचैतन्याचीच विविध रूपे होत. म्हणजे साहित्यातील प्रतिबिंब हे मूलतः विश्वचैतन्याचे असते. एरिक हेलरच्या मते ‘मानवी मन किंवा विवेकपूर्ण जाणीव (रॅशनल कॉन्शसनेस) वास्तववादाची जागा घेण्याइतकी प्रभावी होते तोच खरा वास्तववाद.’ हेगेलियन व्याख्येत वास्तववादाचे मूलभूत भौतिक प्रमेयच नाकारण्यात येते.

निसर्गवाद आणि हेगेलियन विचारसरणीमुळे निर्माण होणारा वस्तुस्थितीचा विपर्यास टाळण्याचा प्रयत्न ड्यर्डी ल्यूकाक्स या मार्क्सवादी विचारवंताने केला. त्याच्या मते मानवी अस्तित्वाचे पूर्णत्व (होलनेस) हे वास्तवाचे सत्त्व असते. भांडवली समाजात या पूर्णत्वास विच्छिन्नता येते. समाजाची गती या विच्छिन्नतेवर मात करून पूर्णत्वाकडे जाण्याची असते. समाजाचा हा प्रवास म्हणजे इतिहास. भांडवलशाही ही गती रुद्ध करते. ही जाणीव ज्या साहित्यात होते, त्याला ल्यूकाक्स ‘टीकात्मक वास्तववाद’ (क्रिटिकल रिॲलिझम) हे नाव देतो. भांडवलशाहीच्या पलीकडे जाणारी दिशा दिग्दर्शित करून, मानवी पूर्णत्वाच्या दिशेने चाललेला हा प्रवास आणखी गतिमान करण्याचा प्रयत्न करणारे कृतिशील साहित्य म्हणजे ‘समाजवादी वास्तववाद’ (सोशॅलिस्ट रिॲलिझम) होय.


वास्तववादाच्या विविध व्याख्यांमध्ये अभिप्रेत असलेल्या वास्तवाच्या संकल्पना या त्या त्या विचारवंतांच्या विचारसरणींनुसार ठरत असल्या, तरी त्या कालसापेक्षदेखील  आहेत. त्यामुळे वास्तववादी सिद्धांताचे कार्यदेखील कालविशिष्ट राहिले आहे. ‘वास्तववादी साहित्य हे लोकशाही, धर्मनिरपेक्ष समाजाचे अपत्य आहे’ ही जाणीव तॅन, स्ट्रिन्‌बॅर्य, गाँकूर बंधू, ल्यूकाक्स आदींच्या विवेचनात आढळते. विविध समाजांतील वास्तववादाचे स्वरूप हे या शक्तींच्या इतिहासविशिष्ट, संस्कृतिसापेक्ष रूपांवर आणि कलांवर निर्भर झालेले आहे.

वास्तववादाचा पहिला परिपूर्ण आविष्कार इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात झाला. तो इंग्लंडच्या भांडवली लोकशाही क्रांतीने मुक्त केलेल्या शक्तींचा आविष्कार होता. त्यामुळे डीफो, फील्डिंग, रिचर्ड्‌सन यांचा वास्तववाद जोमदार होता. त्यांच्या कादंबऱ्या या नवनिर्मित मध्यमवर्गीयांनी सरंजामशाहीबरोबर चालवलेला संघर्ष अभिव्यक्त करतात. उत्पादनाची विविध क्षेत्रे काबीज करण्याची महत्वाकांक्षा ⇨डॅन्यल डीफो (१६६०-१७३१) याच्या रॉबिन्सन् क्रूसो (१७१९), मॉल फ्लँडर्स (१७२२) या कादंबऱ्यांतील नायक-नायिकांच्या व्यक्तिवादातून व्याक्त होते. ⇨ हेन्री फील्डिंग (१७०७-५४) आणि ⇨ सॅम्युएल रिचर्ड्‌सन (१६८९-१७६१) सरंजामी संस्कृतीने बहिष्कृत केलेल्या सामाजिक थरांच्या प्रतिनिधींना नायकत्व बहाल करतात. या काळातील कादंबऱ्या सरंजामशाहीच्या विरोधातील सर्व वर्गाना एकजुटीत आणण्याच्या स्वप्नरंजनाचा भाग होत्या. वास्तवादातील हा जोम पुढे एकोणिसाव्या शतकातील इंग्रजी कादंबरीत दिसत नाही. या काळात लोकशाही क्रांती यशस्वी झाल्याने समाजाला एक प्रकारचे स्थैर्य व सुरक्षितता प्राप्त झाली होती. ⇨ जेन ऑस्टेनच्या (१७७५-१८१७) प्राइड अँड प्रेज्युडिस (१८१३), एमा (१८१६) आदी कादंबऱ्यांतून या स्थितीची प्रचीती येते. अद्यापि औद्योगिक क्रांतीच्या भक्ष्यस्थानी न पडलेल्या ग्रामीण विभागातील वरिष्ठ समाजाचे चित्रण ऑस्टेन करते. ग्रामीण जीवनाचे जास्त व्यापक आणि प्रत्ययकारी चित्रण ⇨जॉर्ज एलियटच्या (१८१९-८०) मिड्लमार्च (१८७१-७२) वगैरे कादंबऱ्यांत आढळते. तिच्या लिखाणात प्रादेशिक जीवनातील कोंडीचा विषादही जाणवतो. औद्योगिक क्रांतीच्या हिंस्त्रतेचे दर्शन  ⇨चार्ल्स डिकिन्झच्या (१८१२ -७०) कांदबऱ्यांतून होते. समाजातील कनिष्ठ वर्गाबद्दल सहानुभूती, सामाजिक दुष्ट प्रथांचा उपहास हे त्याचे सामर्थ्य होय. परंतु त्याच्या वास्तववादाला भावविवशता आणि अतिनाट्य यांची बाधा झाली आहे. त्याच्या लेखनात आढळणाऱ्या निराशेचे कारण त्याच्या काळातच आढळते. एकतर, अठराव्या शतकातील मध्यमवर्गाप्रमाणे एकोणिसाव्या शतकातील मध्यमवर्गाला नवे जग निर्माण करण्याची उमेद नव्हती. तसेच पराभूत, निराश कामगारवर्ग लोकशाही प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थ होता.

अभिजात वास्तववाद हा फ्रेंच साहित्यिकांचा खास प्रांत होय. हा वास्तववाद जास्त समावेशक आणि कृतिशील होता. कारण त्याकाळी राजकीय-सांस्कृतिक बदलांची दखल घेणे लेखकांना अनिवार्य झाले होते. ⇨स्तँदालच्या (१७८३-१८४२) कांदबऱ्यांत व्यक्तिरेखा ह्या सामाजिक नमुने म्हणून प्रथम मांडण्यात आल्या. या व्यक्तिरेखा सामाजिक शक्तींचा संघर्ष साकार करतात. असा संघर्ष  ⇨बाल्झॅकच्या (१७९९ – १८५०) ‘ला कॉमेदी युमॅन’ (मानवी नाट्य) वर्गात मोडणाऱ्या कादंबऱ्यांच्या संचात तीव्र स्वरूपात दिसून येतो. माणसांच्या भावभावना व गुणदोष यांचे बाल्झॅक तपशीलवार वर्णन करतो. यामुळेच या कादंबऱ्या मानवी दस्तऐवज म्हणून ओळखल्या जातात. १८४८ नंतर भांडवलशाहीचा अपूर्व विकास व लोकशाही शक्तींच्या पीछेहाटीच्या काळात कलावादाचा प्रभाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर झोला आणि  ⇨ग्यूस्ताव्ह फ्लोबेअरच्या (१८२१ – ८०) वस्तुनिष्ठता व नकारवाद यांस राजकीय अर्थ प्राप्त होतो. फ्लोबेअरची मादाम बोवारी (१८५७) ही कादंबरी  सर्वसामान्यांच्या जीवनाचे महाकाव्य आहे. एमिल झोलाने ‘ले रूगाँ माकार’ मालेतील वीस कादंबऱ्यांमध्ये (१८७१ – ९३) भौतिकीविज्ञाच्या निष्ठेने व पद्धतीने वास्तवचित्रण केलेले दिसते. ⇨गाँकूर बंधूंच्या कादंबऱ्या ह्या झोला व तॅन यांच्या निसर्गवादी सिद्धांतांच्या उदाहरणे होत.

रशियात हुकूमशाही व अभ्यवेक्षण (सेन्सॉरशिप) या निर्बंधांमुळे बुद्धिजीवी आपली बंडखोरी केवळ साहित्यातूनच व्यक्त करू शकत होते. परिणामी त्यांचा वास्तववाद स्पष्ट राजकीय बांधिलकी मानणारा व कृतिशील होता. प्रस्थापितांचा उपहास करणाऱ्या ⇨निकोलाय गोगोलच्या (१८०९-५२) कादंबऱ्यांत युक्रेनियन ग्रामीण जीवनाचे तपशीलवार वर्णन आढळते. ⇨डॉस्टोव्हस्कीने (१८२१-८१) तत्कालीन बुद्धिजीवी वर्गाच्या दृष्टिकोणातून समाजाचे अण्वीकरण व वर्गविग्रह यांचे चित्रण केले. मानसिक दडपणातून मुक्त होऊ पाहणाऱ्या स्वातंत्र्याच्या जाणिवेचे त्याचे साहित्य भूमिगत वास्तववादी म्हणून ओळखले जाते. शेतकरीवर्गाच्या जीवनाबद्दल असलेल्या ओढीतून निर्माण झालेली भांडवलशाहीची समीक्षा ही ⇨टॉलस्टॉयच्या (१८२८-१९१०) वास्तववादाची  ठाम भूमी आहे. तर संक्रमणशील समाजाचे क्रांत्युत्सुक चित्रण ⇨ मॅक्झिम गॉर्कीच्या (१८६८-१९३६) साहित्यात आढळते.

नाटकात मात्र वास्तववादाचा प्रवेश उशीरा व अडखळतच झाला. नॉर्वेमध्ये ⇨ ब्यर्न्‌सॉन (१८३२ – १९१०) याने द न्यूली वेडेड पेअर हे पहिले वास्तववादी समस्याप्रधान नाटक लिहिले. आधुनिक नाटकाचा प्रणेता ⇨ हेन्रिक इब्सेन (१८२८ – १९०६) याची नाटके समस्याप्रधान आहेतच शिवाय व्यक्ती आणि समाज यांमधील विविध पातळ्यांवरील ताण व गुंतागुंत ती व्यक्त करतात. इंग्लंडमध्ये ⇨ आर्थर विंग पिनीरो (१८५५ – १९३४) याने इब्सेनपासून स्फूर्ती घेऊन समस्याप्रधान नाटके लिहिण्यास प्रारंभ केला. या प्रकारच्या नाटकाचा परमबिंदू म्हणजे ⇨ जॉर्ज बर्नार्ड शॉची (१८५६-१९५०) नाटके. भांडवलशाहीच्या सुबत्तेमुळे आत्मसंतुष्ट बनलेल्या मध्यमवर्गाची आत्मटीका असे त्याच्या नाटकाचे सूत्र होते. मॅक्झिम गॉर्की, स्वीडिश लेखक ⇨ आउगुस्ट स्ट्रिन्‌बॅर्य यांची प्रारंभीची नाटके आणि जर्मन ⇨ गेर्हार्ट हाउप्टमानची (१८६२ – १९४६) सुरुवातीची नाटके ही वास्तववादी नाटकांची उदाहरणे होत.

मराठीतील वास्तववादाची परंपरा त्रोटक व तुटक असली, तरी काही प्रमाणात कृतिशील आहे. ब्रिटिशांच्या वसाहतवादी व्यवस्थेशी एतद्देशीय व्यवस्थेचा संयोग होऊन त्यातून व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोण आणि प्रेषिताची भूमिका अशी नवी मूल्यव्यवस्था येथील मध्यमवर्गीयांच्या प्रवक्त्या लेखकांनी स्वीकारली होती. सुधारणावादाच्या आधारे समाजाचे नेतृत्व हाती घेऊ पाहणारा मध्यमवर्ग नवसमाजाची स्वप्नेही रंगवीत होता. या कारणाने सरंजामी चौकटीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याला निर्माण होणारे अडथळे यांविरुद्धचे बंड असे या वास्तववादाचे सुधारक स्वरूप होते.


मराठी वास्तववादी कादंबरीचा श्रीगणेशा ⇨ बाबा पदमनजींनी (१८३१-१९०६) यमुनापर्यटन (१८५७) मध्ये विधवांचे चित्र रेखाटून केला. ⇨ ह. ना. आपटे (१८६४ – १९१९) यांनी भोवतालच्या समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून मध्यमवर्गाच्या वृत्तीची व विचारसरणीची आपल्या कादंबऱ्यांद्वारा छाननी केली. मधली स्थिति (१८८८) या पहिल्या कादंबरीपासून ते पण लक्ष्यांत कोण घेतो? (१८९३) पर्यंत पुण्यातील पांढरपेशा मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबांतील दुःखे, कुचंबणा व व्यक्तिविनाश यांचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी केले, तसेच सामाजिक सुधारणेबाबतचा त्यांच्या मनाचा कलही त्यांतून व्यक्त होतो. ⇨वामन मल्हार जोशी (१८८२ -१९४३) यांनी बोधवादाला तत्त्वविचाराची बैठक दिली. स्वतंत्र तत्त्वजिज्ञासेने आणि विवेकवादी दृष्टीने वा. म. जोशी यांनी मध्यमवर्गाचे वैचारिक विश्व, त्यातील मतमतांतरे आणि त्याच्या समस्या जाणून घेऊन त्या वर्गांचे वास्तव चित्रण केले. स्त्रीस्वातंत्र्य, विधवाविवाह (रागिणी), पुनर्विवाह (आश्रमहरिणी), स्त्रीचा व्यक्तिविकासासाठी चाललेला सामाजिक संघर्ष (सुशिलेचा देव, इंदू काळे व सरला भोळे) आदी तत्कालीन सामाजिक समस्यांमागील तात्विकतेचे दर्शन ही त्यांनी वास्तववादी कादंबरीला दिलेली विशेष देणगी होय. ⇨ श्री. व्यं. केतकर (१८८४- १९३७) यांनी दंभ, स्वार्थ, विषयवासना अशा दुर्गुणांनी मध्यमवर्गाचा सामाजिक व्यवहार कसा नियंत्रित झाला, याचे विदारक वर्णन केले. सामान्य जीवनाच्या चित्रणापेक्षा लक्षणीय सामाजिक प्रश्न त्यांच्या साहित्याचे विषय बनले. या समस्यांना सामोरे जात त्यांनी या समस्यांची गुंतागुंत ज्या व्यक्तींच्या जीवनात निर्माण होते, त्यांचे अंतर्बाह्य  विश्लेषण केले. व्यक्तीचा भोवतालच्या सामाजिक परिस्थितीशी असलेला संबंध शोधणे, हे या विश्लेषणाचे सूत्र होते. पुनर्विवाह, प्रौढविवाह (गोंडवनातील प्रियंवदा) यांपासून ते वेश्यासंततीचे भवितव्य (ब्राह्मणकन्या) यापर्यंतच्या  विविध सामाजिक समस्यांचे विश्लेषण त्यांनी केले. ग. त्र्यं. माडखोलकर, भा. वि. वरेरकर यांच्या साहित्यात राजकीय विषय असले, तरी त्यांचा मूळ धर्म स्वप्नरंजनाचाच होता. काशीताई कानिटकर, जानकीबाई देसाई, शांताबाई नाशिककर इत्यादींनी स्त्रियांच्या अवस्थेला लिखाणात स्थान दिले. मात्र स्त्रियांचे खास प्रश्न धीटपणे मांडण्याचे काम ⇨ मालतीबाई बेडेकर ऊर्फ विभावरी शिरूरकर (१९०५ – ) यांनी कळ्यांचे निःश्वास (१९३३) या कथासंग्रहातून तसेच हिंदोळ्यावर (१९३४), विरलेले स्वप्न (१९३५) या कादंबऱ्यांतून केले. त्यांनी बळीमधून (१९५०) बहिष्कृत समाजाचे सह्रदय आणि वस्तुनिष्ठ चित्रण केले.

स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबऱ्यांमध्ये लेखक ज्या परिसरात जन्मला, वाढला त्या परिसराचे चित्रण करण्याची वृत्ती आढळते. या वृत्तीचा समर्थ आविष्कार⇨ श्री. ना. पेंडसे (१९१३ —) यांनी एल्गार (१९४९), हद्दपार (१९५०), गारंबीचा बापू (१९५२), रथचक्र (१९६२) इ. कादंबऱ्यांमधून केला. निसर्ग, व्यक्ती आणि सामाजिक परिसर यांच्या परस्परसंबंधातील गुंतागुंतीचे चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांत आढळते. पेंडश्यांच्या नंतर ⇨ व्यंकटेश माडगूळकर (बनगरवाडी, वावटळ), जयवंत दळवी (चक्र), मधू मंगेश कर्णिक (माहीमची खाडी), भाऊ पाध्ये (करंटा, वैतागवाडी, वासूनाका इ.), बाबुराव बागूल (जेव्हा मी जात चोरली होती, सूड), भालचंद्र नेमाडे (कोसला ते झूल) नाट्यक्षेत्रात विजय तेंडुलकर इ. लेखकांनी व्यक्ती व समाज यांमधील विविध नात्यांचे चित्रण करून बाबा पदमनजी, हरिभाऊंपासून सुरू झालेला वास्तववादी साहित्याचा प्रवाह अधिक विकसित व समृद्ध केला आहे.

नगरकर, उदय

वास्तववाद, कलेतील : ललित कलांतील अभिजाततावादी आदर्शीकरण व स्वच्छंदतावादी कल्पनाप्राचुर्य यांच्या ठाम विरोधात, एक तत्त्वप्रणाली वा विचारसरणी म्हणून १८४० या दशकात वास्तववाद हा संप्रदाय जाणीवपूर्वक अवतरला, तरी मानवी जीवनाकडे पाहण्याचा वास्तव दृष्टिकोण व जीवनव्यवहाराचे वास्तव चित्रण ही एक स्थिर व शाश्वत स्वरूपाची प्रवृत्ती असून, कलेतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या कलावंतांच्या ठायी ती आढळते व त्यांच्या निर्मितीतून तिचे विविध आविष्कार प्रकटलेले दिसून येतात.

वास्तववाद व निसर्गवाद या कलाक्षेत्रातील संज्ञा कलावंताची निर्मिती व प्रत्यक्ष वास्तव जग यांच्यातील विशिष्ट संबंधांच्या द्योतक आहेत. कलाकृती (चित्र, शिल्प, रेखन, मुद्रित इ.) ही तिच्या विषयाचे सृष्टीमध्ये दृग्गोचर होणारे जे बाह्य रूप त्याच्याशी निगडित असते. कलाकृती ही मूळ विषयाची वा वस्तूची हुबेहूब प्रतिकृती असली पाहिजे कल्पनाशक्तीने त्या वस्तूचे परिपूर्ण रूप न रेखाटता ती जशी आहे तसेच तिचे यथातथ्य चित्रण करणे महत्त्वाचे, अशा प्रकारचे गृहीत तत्व या संकल्पनांमागे आहे. पराकोटीचा अतिरिक्त वास्तववाद वा निसर्गवाद हा विशुद्ध अमूर्ततेच्या (अ – वस्तुनिष्ठा) ठाम विरोधात असतो. दृश्य अनुभवाचे जे साक्षात प्रत्यक्ष घटक असतात, अंगोपांगे असतात, त्यांचे बारकाईने तपशीलवार चित्रण वास्तववादात व निसर्गवादात केले जाते, तर अमूर्तीकरणात अनुभवाच्या अंगभूत असलेली आकरिक घडण शोधली जाते, आविष्कृत केली जाते.

वास्तवता ही एक स्थिर प्रवृत्ती असल्याने, सर्व काळातील कलाविष्कारांत तिचे जे वेगवेगळे आविष्कार कमीअधिक अंशाने आढळून येतात, त्यांचा पुढे थोडक्यात मागोवा घेतला आहे.

आदिम (प्रिमिटिव्ह) गुहामानवाची अश्मयुगीन कला ही वास्तवतेच्या प्रवृत्तीचे आंशिक दर्शन घडविते. बैल, घोडे, हरणे व इतर पशू यांच्या आकारिक घडणी व हालचाली त्यांत कौशल्याने व नेमकेपणाने रेषांतून पकडल्या आहेत. या रेषांची लय विलक्षण जोमदार असून त्यांतून गतिमानतेचा व सजीवतेचा प्रत्यय येतो. प्राचीन ग्रीक कलेत मायरन, पॉलिक्लीटस या शिल्पकारांच्या शिल्पांतून आदर्शीकरणयुक्त आकार दिसतात, तर त्यांचाच समकालीन झ्यूक्सीस (इ. स. पू. पाचवे शतक) याच्या चित्रांतून वास्तववादी प्रवृत्ती दिसतात. त्याने चितारलेले द्राक्षे घेतलेल्या मुलाचे चित्र इतके अस्सल होते की, ती द्राक्षे टिपण्यासाठी पक्षी त्या चित्रावर धावून येत, असे म्हटले जाते. या काळातील चित्रे आता उपलब्ध नाहीत. पण निसर्गाशी साधर्म्य दर्शविणाऱ्या चित्रांना अभिजात काळात मोठी मान्यता असल्याचे उल्लेख आढळतात.

उत्तर मध्ययुगात यूरोपीय कला साधारण अमूर्त आकारिक शैलीकडून अधिक मानवी, नैसर्गिक शैलीकडे झुकली. या परिवर्तनाचा उद्‌गाता इटालियन चित्रकार फ्लॉरेन्सचा ⇨जॉत्तो दी बोंदोने (१२६७-१३३७) होय. त्याने ख्रिस्त व कुमारी माता यांच्या जीवनचरित्रातील प्रसंगांची चित्रे पॅड्युआ येथील आरेना चॅपेलवर रंगवली (सु. १३०६). ती तत्पूर्वीच्या इटालो-वायझंटिन संप्रदायाच्या सपाट व शैलीकृत (स्टायलाइज्ड) चित्रांपेक्षा जास्त सजीव चैतन्ययुक्त वाटतात. पंधराव्या शतकात यूरोपीय कलावंत वस्तूच्या भासमानाच्या (ॲपीअरन्स) स्वरूपाविषयी जास्त जागरूकतेने विचार करू लागले. त्या भासमानांच्या हुबेहूब प्रतिकृती चित्र-शिल्पांतून साधण्याचा प्रयत्न त्यांनी कसोशीने केला. ⇨यथादर्शनाची (पर्स्पेक्टिव्ह) शास्त्रशुद्ध प्रणाली विकसित झाल्यानेच वास्तववादी चित्रणाचे मोठे साध्य प्रबोधन कालीन कलावंतांच्या आवाक्यात केले. या काळातील वास्तववादी चित्रणाचा विकास हा यथादर्शनाच्या तत्वातूनच साकार झाला आहे. तसेच मानवाच्या शारीर (ॲनॉटॉमी) रचनेचे अमूक ज्ञान हेही यथातथ्य वास्तवचित्रणास साहाय्यभूत ठरले. ⇨लिओनार्दो दा व्हींचीची (१४५२-१५१९) रेखाचित्रे या संदर्भात लक्षणीय आहेत. मानवाकृति चित्रणातील कौशल्य व प्रभुत्व हे या कलावंतांनी शारीर ज्ञानातूनच आत्मसात केले. सोळाव्या शतकातील यूरोपीय कलेत उच्च प्रतीचा विकसित वास्तववाद पाहावयास मिळतो पण वेगवेगळ्या प्रयोजनांनुसार त्याने वेगवेगळी रूपे धारण केलेली दिसतात. प्रबोधनाच्या उत्कर्षकालात (हाय रेनेसान्स) त्याने नव्या आदर्शवादाचे रूप धारण केले, तर रीतिलाघववादच्या (मॅनरिझम) संप्रदायात त्याने गुंतागुंतीचे परिष्कृत (सॉफिस्टिकेटेड) रूप प्रकट केले.


कलेच्या इतिहासात अधिकृतपणे ‘रिॲलिझम’ ही संज्ञा एकोणिसाव्या शतकात फ्रेंच चित्रकार गुस्तॉव्ह कूर्बे (१८१९-७७) याच्या चित्रांना अनुलक्षून वापरली गेली. कलेतील आदर्शीकरण व स्वप्नरंजन त्यास बिलकूल अमान्य होते. फ्रेंच रॉयल अकॅडमीने (स्थापना १७७५) नव-अभिजाततावादाच्या रूपाने प्रस्थापित केलेली प्रबोधनकालीन सौंदर्यमूल्ये, तसेच दलाक्र्‌वाच्या चित्रांतील कल्पकताप्रचुर स्वच्छंदता यांना कूर्बेने प्रखर विरोध केला. सौंदर्याऐवजी सत्य हे मूल्य  त्याने कलेत प्रस्थापित केले. भोवतालच्या समाजजीवनातील दुःखे, यातना, रूढी, रीतिरिवाज, आचारविचार यांचे यथातथ्य दर्शन कलेतून घडवण्याची त्याची भूमिका होती. शेतकरी व कष्टकरी जीवन हाच त्याच्या मते कलेचा आदर्श विषय होता. १८५५ मध्ये त्याने पॅरिसमधील एका झोपडीत स्वतःच्या चित्रांचे एकव्यक्ति-प्रदर्शन (वन मॅन शो) भरवले व त्याला नाव दिलेः ‘कूर्बेचा वास्तववाद’ (Le Realisime, G. Courbet). लोकशाही तत्त्वावर आधारित सामाजिक-राजकीय वास्तवाचा तो खंदा पुरस्कर्ता होता. त्याची ही वास्तवाची भूमिका त्या काळात सर्वस्वी अभिनव होता व त्यात कोठेही तडजोडीला जागा नव्हती. ‘रिॲलिझम’ ही संज्ञा (जी साहित्याच्या संदर्भातही तोपावेतो रूढ होऊ लागली होती) तत्कालीन समीक्षकांनी मोठ्या तत्परतेने कूर्बेला बहाल केली. त्यांत शांफूलरी या समीक्षकाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कूर्बेचा दुसरा समर्थक फेर्ना देन्वायेर्स याने उद्‌गार काढले की, ‘वस्तूचे खरेखुरे अस्सल चित्रण म्हणजे वास्तववाद’. कूर्बेची द स्टोन ब्रेकर्स (१८४९) व द बेरियल ॲट आर्नन्स (१८५०) ही चित्रे वास्तववादाच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. बेरियल हे एक अत्यंत भव्य चित्र असून त्यात खेड्यातील दफनविधीचे, खुल्या थडग्यासहित चित्रण केले आहे. त्यात जवळजवळ चाळीस शेतकरी-श्रमजीवी लोकांचा समुदाय चितारला आहे. ग्रामीण जीवनातील खडतर कष्टप्रद यातना, रांगडेपणा मायाळूपणा, साधेसुधे लोकविधी यांचे प्रत्ययकारी दर्शन त्यातून घडते. द स्टोन ब्रेकर्स या चित्रातही पाथरवटाच्या जीवनातील दारुण दारिद्र्य पाहावयास मिळते. झां फ्रांस्वा मिले (१८१४-७५) ह्याचीही गणना वास्तववादी चित्रकारांत केली जाते. तो स्वतः शेतकरी कुटुंबातील होता व त्याने स्वानुभवातून कृषिजीवनातील खरीखुरी दृश्ये शेतावर राबणारे स्त्री-पुरुष यांचे चित्रण केले.

१८६० च्या दशकात कलावंताच्या व्यक्तिविशिष्ट मर्मदृष्टीवर आधारलेला नव्या चित्रणतंत्राचा प्रकार तरुण चित्रकारांमध्ये लोकप्रिय ठरू लागला. ⇨ एद्‌वार माने (१८३२-८३) हा त्यांचा प्रणेता होता. निसर्गाशी तादात्म्यतेच्या संदर्भात, कूर्बेच्या तुलनेत त्यांची शैली कमी वास्तववादी असली तरी त्यांच्या चित्रांचे विषय सर्वसामान्य जीवनात रुजलेले होते. पूर्वोक्त वास्तववाद्यांपेक्षा त्यांना वेगळे संबोधण्यासाठी ‘निसर्गवादी’ म्हणून संबोधले गेले. निसर्गाशी कलेद्वारा आत्यंतिक जवळीक साधणे ही त्यांची भूमिका होती. रोजच्या जीवनाचे यथातथ्य चित्रण करणे हा त्यांचा उद्देश होता. दैनंदिन जीवनातील घटना ज्या ठिकाणी घडतात त्या जागा-उदा., कारखाना, शेत किंवा घरातील निवाऱ्याची जागा घटनास्थळ म्हणून उपयोगात आणून मानवी व्यवहाराचे अकृत्रिम, निरलंकृत व सरळसाधे चित्रण निसर्गवादी चित्रकारांनी केले.

एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाच्या दिशेने अखेरचा प्रयत्न हा दृक्‌प्रत्ययवादाच्या (इंप्रेशनिझम) रूपाने दिसून येतो. ⇨क्लोद मॉने (१८४०-१९२६) सारख्या चित्रकारांनी  शुद्ध, चमकदार रंगांच्या साहाय्याने स्टुडिओबाहेर नैसर्गिक बाह्य प्रकाशात प्रत्ययास येणारी वस्तुरूपे चित्रित केली. दृक्‌प्रत्ययवादी चित्रात वस्तूचे प्रत्यक्ष वास्तव हे वस्तूवरील प्रकाशाच्या वास्तवात रूपांतरित झालेले दिसून येते. ‘डोळ्यांना दिसेल तेच सत्य, दृश्य वास्तव हेच खरे वास्तव’ या विचारसरणीची अंतिम पायरी दृक्‌प्रत्ययवाद ही होती. या अर्थाने त्यास ‘अधिवास्तववाद’ (सुपर रिॲलिझम) असेही म्हटले जाते.

विसाव्या शतकात अमूर्त कलाप्रणालींबरोबरच वास्तववादी चित्रणाच्या  प्रवृत्तीही विविध रूपांत प्रकटत राहिल्या. अँड्र्यू वायेथ व रिचर्ड एस्टझ यांसारख्या भिन्न धर्मीय कलावंतांमध्येही त्या प्रकर्षाने दिसतात. वायेथने ग्रामीण परिसर व व्यक्तिचित्रे बारीकसारीक तपशीलांनिशी हुबेहूब रंगविली. त्यातून परिचित जगामधला पोकळपणा व शून्यभाव सूचित करण्याची त्याची धडपड जाणवते. एस्टझसारख्या चित्रकारांनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन छायाचित्राचा वापर चित्र वा रंगवलेली वस्तू यांच्या दरम्यानचे प्रतिमान (मॉडेल) म्हणून केला. अशा रीतीने अनुभवामध्ये कलावंताची जी तात्काळ गुंतवणूक असते, तिच्यापासून वेगळे होऊन चित्रणविषयाला तटस्थ व विकारशून्य तसेच चिंतनसाधनाचे रूप दिले जाते. द्यूएन हॅन्सन याने वास्तववादी पूर्णाकृती व्यक्तिशिल्पे घडविली. त्यांना खऱ्याखुऱ्या वेशभूषेची जोड दिल्याने ती इतकी अस्सल भासू लागली, की त्यांच्या शेजारी खऱ्याखऱ्या व्यक्तीही काहीशा कृत्रिम भासाव्यात. वास्तवतेच्या स्थिर आणि शाश्वत प्रवृत्तीचे भिन्नभिन्न आविष्कार अशा प्रकारे कलेतिहासाच्या प्रत्येक प्रमुख टप्प्यावर दिसून येतात.

इनामदार, श्री. दे.

 पहाः  दृक्‌प्रत्ययवाद निसर्गवाद – २

संदर्भ : 1. Boas, George, Ed. Courbet and the Naturalistic Movement, New York, 1967.

          2. Cary, Joyce, Art and Reality, New York, 1958.

          3. Grant, Damian, Realism, London, 1970.

         4. Hauser, Arnold, The Social History of Art, 2. vols. London, 1952.

        5. Lukacs, Gyorgy, Studies in European Realism, London, 1978.

        6. Mukherjee, Meenakshi, Realism and Reality The Novel and Society in India, Delhi, 1985.

        7. Nochlin, Linda, Realism, Harmondsworth. 1971.


'ख्रिस्तिनाज वर्ल्ड ' (१९४८) चिकणरंग - अँड्र्यू वायथ. 'द ग्लीनर्स' (१८५७) - झां फ्रांस्वा मिले.
'द बाल्कनी' (१८६९) - एद्‌वार माने. 'द स्टोन ब्रेकर्स' (१८४९) - गुस्ताँव्ह कूर्बे. 'अमेरिकन गॉथिक' (१९३०) - ग्रँट वुड.