वालुकाभित्ति : सागरी किनाऱ्याच्या सीमेवर आढळणारा वाळूचा व भरड द्रव्याचा बुटका कटक वा दांडा. हा जवळजवळ पाण्याच्या पातळीइतका उंच असतो. सागरी लाटांच्या क्रियेने हा निर्माण होतो. लाटांचे भोवरे फुटून अपवटी भागातील तळावरच्या वाळूत खळगा खणला जातो. यापैकी काही वाळू पुळणीकडे नेली जाते व उरलेली या खळग्याच्या कडांशी साचते. उलट जाणाऱ्या पश्चगामी व जलद प्रवाहांत लोंबकळत असणाऱ्या वाळूची यात भर पडते. तसेच अधिक खोल पाण्यातून किनाऱ्याकडे वाहात येणारी काही वाळूही येथे पडते. या रीतीने वालुकाभित्ती उंच होत जाते. वालुकाभित्तीचा माथा सामान्यपणे पाण्याच्या स्थिर पातळीखाली रहातो कारण लाटेची सुरकांडी त्याच्यावर फुटत असते. काही ठिकाणी मात्र वालुकाभित्ती काहीशी पाण्यावर आलेली आढळते. शांत समुद्रात वालुकाभित्तीचे किनाऱ्याकडे, तर खवळलेल्या समुद्रात समुद्राच्या दिशेत स्थलांतर होते.
दंतुर किनाऱ्याला लागून पुळणी, भूशिरे व वालुकाभित्ती तयार होतात. जेथे किनारा आत वळतो तेथे (उदा., उपसागराचे वा नदीचे मुख) गाळ सरळ येऊन पडतो. यामुळे उथळ उंचवट्याचे (भाटीचे) रुपांतर हळूहळू बांधात (वालुकागिरीत) होते. कधीकधी याची उंची पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त होते. याच्या टोकांशी भर पडत जाऊन वालुकाभित्तीची लांबी वाढते. अन्य ठिकाणच्या लाटा व प्रवाह यांनी अटकाव होईपर्यंत ही लांबी वाढते. कधीकधी वालुकाभित्ती एका मुख्य भूमीपासून दुसरीपर्यंत पसरलेली असते. तिला टोंबोलो असे म्हणतात. वालुकाभित्तीने उपसागर आतून पूर्ण बंद झाल्यास दलदल निर्माण होते, मुख्य भूमीतून जलप्रवाह येऊन तेथे मिळत असल्यास किनारी सरोवर तयार होते. तथापि भरती ओहोटीच्या जोरदार घर्षणाने निरुंद चर निर्माण होऊन या पाण्याचा निचरा होऊन उपसागराच्या मुखाशी वालुकाभित्ती बनते.
रोधक वालुकाभित्ती (दांडा बेटे) किंवा पुळणी या उघड्या पडलेल्या वालुकाभित्तीच असतात. पाण्याची पातळी जास्त असताना (वादळी हंगामात) या बनत असाव्यात व पाण्याने सरासरी पातळी गाठल्यावर त्या उघड्या पडतात. रोधक वालुकाभित्ती पुळणीपासून उथळ सिंधुतडागांनी अलग होतात, तर त्यांच्यामुळे भर समुद्र पुळणीपासून अलग होतो. रोधक वालुकाभित्ती या सामान्यतः बुटक्या किनाऱ्यापाशी आढळतात. (उदा., मेक्सिकोचे आखात. तेथे त्या किनाऱ्याला समांतर आहेत). कधीकधी त्यांच्यामुळे दंतुर किनारा सरळ होतो.
ठाकूर, अ. ना.