वालबिरी : मध्य ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील वाळवंटी भागाच्या परिसरात राहणारी एक आदिवासी जमात. वारपिरी, वेलबिरी असाही तिचा उल्लेख करतात. ती विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ज्ञात नव्हती. वालबिरींची लोकसंख्या १,४०० होती (१९८१). त्यांचे चार प्रमुख समुदाय आहेत. हे समुदाय स्थानिक असले, तरी त्यांचा अंतर्भाव निमभटक्या जमातीतच होतो. शिकारीसाठी व खाद्यपदार्थ गोळा करण्यासाठी ते टोळ्याटोळ्यांनी भटकत असतात. खाद्यपदार्थ स्त्रियाच प्राधान्याने गोळा करतात.

कुटुंब व टोळी असे वालबिरी जमातीचे दोन मूलभूत घटक आहेत. कुटुंबामध्ये नवरा -बायको व अविवाहित मुले यांचा समावेश होतो, तर टोळीमध्ये निश्चित असा भूप्रदेशावर मालकीहक्क असणाऱ्यांचा समावेश होतो या दोहोंच्या आधारानेच काहीशी संकीर्ण अशी कुलव्यवस्था तेथे असलेली दिसते. त्यांची जमात आठ उपकुलांत विभागलेली असून ती बरीच गुंतागुंतीची असते. स्वतःची जमीन असलेल्या या छोट्या जमातीत संपत्तीमध्ये सर्वांना समान अधिकार असतात. समुदायाचे सदस्यत्व वंशपरंपरेनेच मिळते परंतु स्वेच्छेने आपली मूळची टोळी सोडून दुसरी टोळीही स्वीकारता येते.

वालबिरींच्या टोळ्या स्वतंत्र व स्वयंशासित असतात. त्या बहिर्विवाही असून मुली विवाहानंतर पतीच्या घरी जातात. बालवयात मुलींची लग्ने ठरतात. विधवा स्त्री आपली मुले घेऊन स्त्रियांच्या मंडळात राहते. मुलगा सुंता झाल्यानंतर आईबापांना सोडून अविवाहित पुरुषांच्या मंडळात जातो.

सोन्याच्या खाणींचा शोध या भागात लावल्यानंतर टीनंट क्रीक येथे वसाहत स्थापन झाली. त्यावेळी काही वालबिरी खाणीत मजूर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ऑस्ट्रेलियन सैन्यात काही वालबिरी अकुशल कामगार होते.

अलीकडे ‘नेटिव्ह अफेअर्स’ या शाखेची स्थापना सरकारी धोरणानुसार झाली असून आदिवासींच्या कल्याणासाठी काही योजना तिच्यातर्फे राबविण्यात येतात. या शाखेच्या पुढाकाराने टीनंट क्रीकजवळ राहणाऱ्या वालबिरी, वारीमुंगा या आदिवासींसाठी वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत. आदिवासींच्या सामूहिकीकरणात यूरोपीय वसाहती स्थिर झाल्यानंतर त्यांच्यात झपाट्याने परिवर्तन झाले आहे. त्यामुळे त्यांचे राहणीमान, धार्मिक विधी इत्यादींत आमूलाग्र बदल जाणवतात. प्रॉटेस्टंटांमुळे बहुतेकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे तरीसुद्धा त्यांच्यात निसर्गपूजा व जादूटोणा यांचे महत्त्व अद्यापि आढळते. ते गणचिन्हांना मान देतात.

संदर्भ : 1. Bell, Diare, Daughters of the Dreaming, Melbourne, 1983.

          2. Berndt, R. M. Berndt, Catherine H. The World of the First Australians, Sydney, 1977.

          3. Meggitt, M. J. Desert People : A study of the Walbiri Aborigines of Central Australia, Sydney, 1962.

          4. Munn, Nancy D. Walbiri Iconography, Ithaca, 1973.

भागवत, दुर्गा