वालपट्टा : (लॅ. गिरिनॉप्स वाला कुल – थायमेलिएसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या लहान वृक्षाचा प्रसार तमिळनाडूत तिरुनेलवेली टेकड्यांत आहे. याच्या प्रजातीतील इतर जाती श्रीलंकेत व दक्षिण भारतात आहेत. याचे खोड बारीक व माथा गोल असतो. साल पातळ, पिंगट करडी, गुळगुळीत व सहज सुटून निघते. पाने साधी, एकाआड एक, सु. १० सेंमी. लांब, अरुंद व लांबट आणि तळाकडे निमुळती असतात. फिकट पिवळी फुले आखूड देठांच्या चवरीसारख्या फुलोऱ्यावर येतात. फुलात अरुंद पेल्यासारखे, पुष्पदलांचे एकच मंडल असून त्यामध्ये बाजूचे केसरदले व मध्ये ऊर्ध्वस्थ किंजपुट असतो. [⟶ फूल]. खोडाच्या अंतर्सालीपासून बळकट वाख काढतात व त्याचे दोर बनवितात. हॅट, चटया व सिगारच्या थैल्यांकरिता वाख वापरतात. लाकूड पांढरे, मऊ व हलके असल्याने तरंगणाऱ्या वस्तू, छपरांचे वासे व शोभेकरिता जडावाच्या कामास फार चांगले असते.
जमदाडे, ज. वि.