वायोमिंग खोरे : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्याच्या लुझर्ने परगण्यातील खोरे. सस्क्केहॅना नदीच्या काठावरील सृष्टिसौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेले हे खोरे ३२ किमी. लांबीचे व ५ ते ६.५ किमी रुंदीचे आहे. या खोऱ्यातील विल्क्स बॅरे या शहराचा परिसर पूर्वीपासून अँथ्रासाइट कोळशाच्या साठ्यासाठी विशेष प्रसिद्ध होता. आज तो प्रदेश निर्मितिउद्योगांचा एक प्रमुख विभाग बनलेला आहे. विल्क्स बॅरेच्या उत्तरेस ५ किमी. वरील फॉर्टी फोर्ट हा या प्रदेशातील निवासी बरो आहे. वायोमिंग खोरे म्हणजे न्यू इंग्लंड व न्यूयॉर्ककडून मध्य पेनसिल्व्हेनियात येण्याचे एक ऐतिहासिक प्रवेशद्वार समजले जाते. वसाहतकाळात अनेक वसाहतकरी  या खोऱ्यात आले.

कनेक्टिकट व पेनसिल्व्हेनिया यांच्यांतील हक्काबाबत हा खोरेविभाग बराच काळ (१७५३ ते १८००) वादग्रस्त प्रदेश होता. सतराव्या शतकातील करारानुसार त्यावर दोन्ही राज्ये हक्क सांगत होती. सस्क्केहॅना कंपनीने १७५४ मध्ये इंडियनांकडून ही जागा खरीदल्यानंतर १७६२-६३ मध्ये येथे तात्पुरती , तर १८६९ मध्ये कायम वसाहतीची स्थापना करण्यात आली. येथील वसाहती मुख्यतः कनेक्टिकट मधून आलेल्या लोकांनी केलेल्या होत्या. कनेक्टिकट व पेनसिल्व्हेनिया यांच्यांतील पहिले पेनअमाइट युद्ध (१७६९-७१) येथे झाले. मात्र येथील वस्ती वेगाने वाढतच गेली. १७७४ मध्ये कनेक्टिकटने वेस्टमूरलँड नगराची येथे स्थापना केली. अमेरिकन क्रांतीच्या वेळी (१७७८ मध्ये) कनेक्टिकट वसाहतकऱ्यांचा पाडाव झाला. यावेळी वायोमिंग खोऱ्यात फार मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. फॉर्टी फोर्ट येथील सर जॉन जॉन्सन, जॉन बटलर आणि जोसेफ ब्रांट यांच्या नेतृत्वाखाली  अमेरिकन इंडियनांनी व ब्रिटिशांनी ३ जुलै १७७८ रोजी  येथील वसाहतकऱ्यांवर केलेल्या हल्‍ल्यात फार मोठ्या प्रमाणावर कत्तली झाल्या. ‘वायोमिंग खोरे हत्याकांड ’ म्हणून ही घटना प्रसिद्ध आहे. या प्रदेशाबाबतचा वाद तसाच  पुढे चालू राहिला. तो पूढे काँटिनेंटल काँग्रेसपुढे आला. न्यायालयाने  पेनसिल्व्हेनियाच्या बाजूने निकाल दिला (१७८२), तेव्हा कनेक्टिकटच्या वसाहतकऱ्यांनी या प्रदेशातून हलण्यास नकार दिला. १७८४ मध्ये दुसरे पेनअमाइट युद्ध झाले. शेवटी १७९९ च्या तडजोडीच्या कायद्यान्वये पेनसिल्व्हेनिया व कनेक्टिकट यांनी एकमेकांच्या वसाहतींना मान्यता दिली. कनेक्टिकट वसाहतकऱ्यांनी या खोऱ्यामध्ये अधिक सुसंस्कृतपणा आणला. त्यांनी येथे मोफत विद्यालयांचीही  स्थापना केली. [⟶ कनेक्टिकट  पेनसिल्व्हेनिया].

चौधरी, वसंत