वायलर, विल्यम : (१ जुलै १९०२ – २७ जुलै १९८१). प्रख्यात अमेरिकन चित्रपट-दिग्दर्शक. जन्म म्यूलूझ (फ्रान्स) येथे. त्याने ‘एकोल स्यूपेरियुर दी कॉमर्स’, लोझॅन ‘कॉलेज दी फ्रान्स’ व ‘काँझवेत्वार नॅशनेल दी म्यूझिक’, पॅरिस येथे शिक्षण घेतले. १९२० मध्ये त्याने अमेरिकेस प्रयाण केले व १९२८ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. कारकीर्दीच्या प्रारंभी ‘ यूनिव्हर्सल पिक्चर्स ’, न्यूयॉर्क या चित्रसंस्थेची परदेशांत प्रसिद्धी केली. नंतर हॉलिवुडला साहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी केली. १९२५ – २७ या काळात ५० ‘वेस्टर्न ’ (एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अमेरिकेच्या इतिहासातील रोमहर्षक घडामोडींवर आधारित देमार चित्रपट) या प्रकारातील मूक लघुपटांचे दिग्दर्शन केले. द शेक डाउन, लव्ह ट्रॅप (१९२९), कौ न्सेलर-ॲट-लॉ (१९३३) आदी चित्रपटांनी त्याला दिग्दर्शक म्हणून मानमान्यता मिळवून दिली व नंतर त्याने दिग्दर्शित केलेल्या दर्जेदार व लोकप्रिय चित्रपटांची एक मालिकाच रसिकांसमोर आली. त्यांत दीज थ्री (१९३६), डॉड्स्वर्थ (१९३६), डेड एन्ड (१९३७), जेझेबेल (१९३८), वुदरिंग हाइट्स (१९३९), द वेस्टर्नर (१९४०), द लेटर (१९४०), द लिट्ल फॉक्सेस (१९४१), मिसेस मिनिव्हर (१९४२) इत्यादींचा उल्लेख करता येईल. मिसेस मिनिव्हर हा चित्रपट विलक्षण गाजला. ह्या चित्रपटाने त्याला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे अकॅडेमी पारितोषिक पहिल्यांदा मिळवून दिले (१९४३). या चित्रपटाद्वारे त्याने ब्रिटिश जीवनशैलीचा अत्यंत भावुकतेने गौरव केला आहे. ग्रीस गार्सन या अभिनेत्रीने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. वायलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन लष्करी दलात सेवा बजावली (१९४२ – ४५). या काळात त्याने अमेरिकन वायुदलासाठी काही अनुबोधपट दिग्दर्शित केले. मेम्फिस बेल्ले (१९४४) हा अनुबोधपट त्यांपैकीच एक होय. वायलरने युद्धोत्तर काळात दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाइव्ह्ज (१९४६) हा अत्यंत प्रभावी ठरला. ह्या चित्रपटासाठी त्याला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे अकॅडेमी पारितोषिक लाभले (१९४७). पुढे त्याने दिग्दर्शित केलेल्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांनी त्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. उदंड लोकप्रियता व उच्च कलात्मक दर्जा यांचा सुयोग्य मेळ अशा चित्रपटांतून बेमालूम रीत्या साधला गेल्याचे दिसून येते. द हेअरेस (१९४९), डिटेक्टिव्ह स्टोरी (१९५१), कॅरी (१९५२), रोमन हॉलिडे (१९५३), द डेस्परेट अवर्स (१९५५), फ्रेंडली पर्स्वेझन (१९५६) आदी चित्रपटांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. द बिग कंट्री (१९५८) हा या मालिकेतला एक अतिशय रंजक चित्रपट होय. बेन-हर या भव्य चित्रपटाची पुनर्निर्मिती ‘एम्. जी. एम्.’ या चित्रसंस्थेसाठी सॅम झिम्बॅलिस्ट या निर्मात्याने १९५९ मध्ये केली. ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी वायलरला अकॅडेमी पारितोषिक लाभले (१९५९). वायलर दिग्दर्शित द चिल्ड्रेन्स अवर (१९६२ ग्रेट ब्रिटनमध्ये द लाउडेस्ट व्हिस्पर या नावाने प्रदर्शित), द कलेक्टर (१९६५), हाऊ टू स्टील अ मिल्यन (१९६६), फनी गर्ल (१९६८), द लिबरेशन ऑफ एल्. बी. जोन्स (१९७०) इ. चित्रपटही उल्लेखनीय आहेत. वायलरने आपल्या उत्कृष्ट चित्रपटांतून मानवी नातेसंबंधांच्या जटिल, गुंतागुंतीच्या विविध रूपांचे चित्रण कथनाचा गतिमान स्वाभाविक ओघ व व्यावसायिक तंत्रसफाई यांच्याशी सांगड घालून प्रभावी रीत्या केले. वायलरच्या दिग्दर्शनशैलीचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटाच्या विषयानुरूप वातावरणनिर्मिती करण्यासाठी वायलरने भव्य नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा तसेच कॅमेऱ्याचे कौशल्यपूर्ण चलन यांचा प्रामुख्याने उपयोग केला व पडद्यावर या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी मंद गतीचे संकलन केले.
बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया येथे त्याचे निधन झाले.
इनामदार, श्री. दे.