वाताशय : वाताशय ही माशांच्या शरीरात आढळणारी वायूने भरलेली एक लांबट पिशवी आहे. मासे पाण्यात राहात असल्यामुळे त्यांच्या शरीराची ठेवण, आकार, हालचाल इ. सभोवतालच्या पाण्यावर अवलंबून असतात. पाण्याच्या पृष्ठभागापासून तळाकडे जात असताना त्यांच्या शरीरावरचा दाब क्रमशः वाढत जातो. अशा परिस्थितीत शरीराचा दाब आणि भोवतालच्या पाण्याचा दाब सारखाच ठेवता आला, तर शरीर विनायासास स्थिर ठेवता येते. पाण्यात खालीवर जाण्याकरिता आणि शरीर स्थिर ठेवण्याकरिता मासे वाताशयाचा उपयोग करतात. वाताशय अस्थिमीन (शरीरात हाडे असणारे मासे) व फुप्फुसमीन (डिप्नोई) यांत आढळतो. खोल समुद्रात आणि उथळ पाण्यात राहणारे मासे व चपट मासे यांत तो नसतो.
वाताशय देहगुहेच्या वरच्या भागात पाठीच्या कण्याखाली आतड्याच्या वर पण ⇨पर्युदराच्या बाहेर असतो. बहुधा घशापासून गुदद्वारापर्यंत तो पसरलेला असतो. सामान्यतः तो एकच असतो परंतु काही माशांमध्ये तो द्विशाखित असतो, तर इतर काही प्रकारांत त्यांची जोडी असते. वाताशयाची भित्ती पातळ, लवचिक पण मजबूत असते. यामुळे तो लहानमोठा होऊ शकतो. वाताशयाचे मागचे टोक बंद असते. काही माशांमध्ये त्याच्या पुढील टोकाजवळून एक वातवाहिनी निघून अन्ननलिकेच्या घशाजवळील भागात उघडते काहींमध्ये त्याचे पुढचे टोक बंद असते. वातवाहिनीमुळे वाताशयात हवा येण्याजाण्याचा मार्ग मोकळा असतो पण सगळ्या बाजूंनी बंद असलेल्या वाताशयात हे शक्य नसल्यामुळे वाताशयातच वायू उत्पन्न करण्याची सोय असते. वाताशयातील वायू म्हणजे सामान्यतः ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांचे मिश्रण असते.
वातवाहिनी नसणाऱ्या माशांचा वाताशय बंद असून त्यांत दोन कप्पे असतात व ते एका पडद्याने अलग झालेले असतात. या पडद्यात लहान मोठे करता येणारे छिद्र असते. वाताशयाच्या भित्तीला आतून उपकलेचे (समान कोशिकांच्या-पेशींच्या-स्तराचे) अस्तर असते. पुढच्या कप्प्याच्या उपकलेचे परिवर्तन होऊन एक रक्त ग्रंथी तयार होते. ऑक्सिजन उत्पन्न करणे हे तिचे कार्य असते. वाताशयात असलेल वायूत ऑक्सिजनाचे प्रमाण मोठे असते. वाताशयात वायूचे प्रमाण जास्त झाले, तर वातवाहिनीमधून अतिरिक्त वायू बाहेर निघून जातो पण वातवाहिनी नसणाऱ्या प्रकारात पुढचा कप्पा वायूने भरल्यावर जास्त झालेला वायू मागच्या कप्पयात येतो. मागच्या कप्प्याच्या पातळ अस्तराखाली केशिकांचे दाट जाळे असते आणि या कप्प्यात येणारा सगळा ऑक्सिजन त्या शोषून घेतात. या कप्प्यातला बहुतेक वायू शोषला गेल्यावर पुढच्या कप्प्यातला जादा वायू मधल्या छिद्रातून पुन्हा मागच्या कप्प्यात आणता येतो किंवा मधले छिद्र पूर्ण बंद करून पुढच्या कप्प्यातच ठेवता येतो. अशा तऱ्हेने वाताशयातील वायूचे प्रमाण जरूरीप्रमाणे कमीजास्त करता येते.
वाताशयाची विविध कार्ये आहेत. त्याची उत्पत्ती मूलतः जरी श्वसनाकरिता झाली असली, तरी बहुतेक प्रकारांत त्याचा जलस्थैतिक अंग म्हणून उपयोग होतो. त्याच्या साहाय्याने कोशिकांचा उपयोग न करता शरीर पाण्यामध्ये पाहिजे त्या ठिकाणी स्थिर ठेवता येते. वाताशयातील वायूचे प्रमाण वाढविले म्हणजे मासा पाण्यात वर येऊ शकतो आणि कमी केले म्हणजे खाली जाऊ शकतो. शिवाय, वाताशयावर कोशिकांचा दाब घालून माशाला पाण्यात एका ठराविक पातळीवर राहून विविध प्रकारच्या हालचाली सहज करता येतात.
काही माशांमध्ये, विशेषतः मार्जारमिनांमध्ये, वाताशयाचा दीर्घित अग्र भाग प्रत्यक्ष अथवा अस्थिकांच्या एका साखळीने (वेबर अंग) कानाच्या आतल्या भागाला जोडलेला असतो. वाताशयाच्या ताणात होणारे फेरबदल या मार्गाने आतल्या कानाला पोहोचतात. या योजनेमुळे आतल्या कानाचा बहुधा दाबमापक किंवा वायुदाबमापकाप्रमाणे उपयोग होत असावा असे दिसते.
श्वसन हे देखील वाताशयाचे एक कार्य आहे. फुप्फुसमीन वाताशयाने श्वासोच्छ्वास करतात. या माशांत दोन वाताशय असून ते घशात उघडतात. त्यांचे स्वरूप उभयचरांत (जमिनीवर व पाण्यात राहाणाऱ्या प्राण्यांत) आढळणाऱ्या साध्या फुप्फुसांसारखे असते आणि फुप्फुसांप्रमाणेच ते रक्तशुद्धीचे कार्य करतात.
संदर्भ : Walter, H. E. Sayles, L. P. Biology of the Vertebrates, New York, 1957.
गद्रे, प्र. रा.
“