वाडी हॅल्फा : हॅल्फा. सूदानच्या उत्तर प्रांतातील हॅल्फा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व देशाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार. लोकसंख्या ११,००६ (१९७१) ईजिप्त व सूदान यांच्या सरहद्दीजवळ, नाईल नदीवरील दुसऱ्या प्रपाताच्या दक्षिणेस सु. १० किमी.वर न्यूबिया सरोवराच्या पूर्व काठावर हे शहर वसलेले आहे. आस्वान धरणामुळे निर्माण झालेल्या नासर जलाशयाशी न्यूबिया जलाशय जोडला गेलेला आहे, त्यामुळे उत्तरेकडून होणाऱ्या जलवाहतुकीचे तसेच दक्षिणेकडून खार्टूम येथून येणाऱ्या सूदान लोहमार्गाचे हे अंतिम स्थानक बनले आहे. 

प्राचीन ⇨न्यूबिया प्रदेशातील या शहराची स्थापना एकोणिसाव्या शतकात झाली असून सूदानवरील महादींची सत्ता संपुष्टात आणण्याच्या हेतूने १८८५-९८ या काळात अँग्लो ईजिप्शियन सैन्याने आपला मुख्य तळ येथे उभारला होता. या कारवाईसाठीच वाडी हॅल्फापासून नाईल नदीच्या वरच्या खोऱ्यात खार्टूमपर्यंत लोहमार्ग टाकण्यात आला. दुसऱ्या महायुद्धकाळात मध्य आफ्रिकेतून ईजिप्तकडे होणाऱ्या मित्रराष्ट्रांच्या संदेशवहन मार्गावरील मध्यवर्ती केंद्र म्हणून याला महत्त्व होते. ईजिप्त संस्कृतीच्या अभ्यासासाठी नाईल नदीखोऱ्यात अनेक उत्खनने करण्यात आली. परंतु तो भाग तसेच जुने वाडी हॅल्फा शहर धरणांच्या जलाशयांखाली गेल्याने तेथील पुरावशेष नवीन वाडी हॅल्फा येथे जतन करून ठेवण्यात आले. त्यामुळे १९७० पासून याला पुरातत्वीय दृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. 

वाडी हॅल्फा हे कापूस, गहू, सातू, मका, फळे इ. शेतमालाचे व्यापारकेंद्र असून ही गुरांची मोठी बाजारपेठे आहे. देशातील इतर शहरांतून व पोर्ट सूदान बंदरातून येथपर्यंत लोहमार्गाने मालवाहतूक होते व पुढे जलमार्गाने मालाची निर्यात ईजिप्तमध्ये केली जाते. शहरात संसर्गरोध केंद्र असलेले शासकीय रुग्णालय व रेल्वे कर्मशाळा असून याच्या नैर्ऋत्येस, नाईल नदीच्या पश्चिम काठावर बुहेन (इ.स. पू.सु. २०४० ते १७८६) या ईजिप्शियन वसाहतीचे अवशेष पहावयास मिळतात.  

चौंडे, मा. ल.