वाटाण्याची फांदी : (१) संयुक्त पान, (२) फूल, (३) शेंग, (४) प्रतान.वाटाणा : (मटार हिं. केख, मटर क. बट्टगडले गु. लीला वाटाणा सं. वर्तुळा, वृत्तांग इं. ग्रीन पी, गार्डन पी लॅ. पिसम सॅटिव्हम कुल–लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). हे एक उपयुक्त कडधान्य आहे. हे मोठ्या प्रमाणावर भारतात सर्वत्र विशेषतः हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांत व इतरत्र उष्ण प्रदेशात म्हणजे पश्चिम आशिया , उत्तर व दक्षिण अमेरिका, यूरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये पिकविले जाते. याचे मूलस्थान निश्चित नसून ते बहुधा पश्चिम आशियातून इतरत्र पसरले असावे. याची शिंबावंत (शेंगा येणारी) वेल वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण करणारी) असून ती प्रतानांच्या (तणाव्यांच्या) साहाय्याने आधार घेऊन १ मी.पर्यंत वाढते. पाने संयुक्त, पिसासारखी, दले ६ जोड्या, शेवटच्या दोन जोड्या व टोकाचे दल प्रतानरूप असतात. उपपर्णे दोन, हिरवी, पर्णसम फुले एकटी किंवा लहान मंजिऱ्यांवर, पांढरी किंवा जांभळी पतंगरूप व लहान असतात. शिंबा (शेंग) गोल, टपोरी, २.५ × १.५ सेंमी. आणि बिया ३–९, वाटोळ्या व पांढऱ्या असतात. हिरव्या व लहान बियांची एक देशी जात पि. आर्वेसे (ग्रे किंवा फील्ड पी) महाराष्ट्रात बरीच पिकविली जाते. वाटाण्याच्या पिकात तीन प्रकार आढळतात. एका प्रकारात शेंगा लहानसर, दाणे बारीक व हिरवट काळसर रंगाचे असतात. याच्या वाळलेल्या दाण्यांपासून डाळ तयार करतात. दुसऱ्या प्रकारातील शेंगा मोठ्या आकारमानाच्या आणि दाणे ढोबळ व पांढुरके असतात. वाटाण्याच्या हिरव्या शेंगांतील दाण्यांची उसळ करतात, ते अन्य भाज्यांत वा मसाले भातासारख्या पदार्थात घालतात. त्या दाण्यांत अ, ब, क जीवनसत्वे, तसेच प्रथिने बरीच असतात. तिसरा प्रकार विलायती वाटाणा हा असून याचे वेल उंच वाढणारे असतात. त्यामुळे त्या वेलांना आधार द्यावा लागतो. पहिल्या व दुसऱ्या प्रकारांतील वेलांना आधार द्यावा लागत नाही. वाटाण्याची डाळ पौष्टिक खाद्य आहे.डाळ वातूळ, प्रशीतकर (थंडावा देणारी), क्षुधावर्धक (भूक वाढविणारी), पित्तशामक, कफ व चर्मदाह कमी करणारी असते. वाटाण्याचे सार पचनसुलभ, स्तंभक (आकुंचन करणारे) व रक्तदोषांवर गुणकारी आहे. हिरव्या वाटाण्यांत भरपूर प्रथिने, कार्बोहायड्रेटे, अ व क जीवनसत्वे आणि कॅल्शिअम व फॉस्फरस ही खनिजे असतात, म्हणून वाटाण्यातील हिरवे दाणे हवाबंद डब्यात भरून ठेवतात, गोठवून ठेवतात आणि सुकवून ठेवतात. यामुळे बिगर हंगामात ते उपयोगी पडतात. वाटाण्याचे काड गुरांसाठी सकस चारा असतो. वाटाण्याच्या १०० ग्रॅ. खाद्य भागाचे पोषणमूल्य पुढीलप्रमाणे असते : जलांश ७२ ग्रॅ., वसा (तैलांश) ०.१ ग्रॅ., तंतू ४ ग्रॅ. ऊष्मांक (कॅलरीज) ९३, मॅग्नेशियम ३४ मिग्रॅ., फॉस्फरस १३९ मिग्रॅ., सोडियम ७.८ मिग्रॅ., तांबे ०.२३ मिग्रॅ., रिबोफ्लाविन ०.०१ मिग्रॅ., प्रथिन ७.२ ग्रॅ., खनिजे ०.८ ग्रॅ., अन्य कार्बोहायड्रेटे १५ ग्रॅ., कॅल्शियम २० मिग्रॅ., लोह १.५ मिग्रॅ., पोटॅशियम ७९ मिग्रॅ., गंधक ९५ मिग्रॅ., थायामिन ०.२५ मिग्रॅ., निकोटिनिक अम्ल. ०.५ मिग्रॅ., क जीवनसत्व ९ मिग्रॅ., अ जीवनसत्व १३९ आंतरराष्ट्रीय एकके.

परांडेकर, शं. आ. 

हवामान : थंड व कोरडे हवामान वाटाण्याला चांगले मानवते. पांढऱ्या वाटाण्याची लागवड भारतात रब्बी हंगामात पाण्याखाली करतात. महाराष्ट्रात अशा हवामानाच्या भागात वाटाणा रबी हंगामात बहुतेक कोरडवाहू पीक म्हणून लावतात. उत्तम वाढीसाठी तापमान १० ते १८.३ से. असते. खरीप व उन्हाळी हंगामांत वाटाण्याचे पीक घेतले जाते.  

जमीन : निचऱ्याची मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन वाटाण्याला मानवते. कोरडवाहू पिकासाठी ओल धरून ठेवणारी जमीन चांगली असते. अम्ल जमीन अयोग्य असते.  

मशागत : नांगराने जमीन १२ ते १५ सेंमी. खोल नांगरून काही दिवस उन्हात तापू देतात व कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन ती मऊ आणि भुसभुशीत करतात. जमीन तयार करताना तिच्यामध्ये बागायत पिकासाठी १२–१८ टन आणि कोरडवाहू पिकासाठी ६–१२ टन कुजलेले शेणखत हेक्टरी घालून मातीत चांगले मिसळवून घेतात. 


पेरणी : खरीप पिकासाठी जुलै महिन्यात आणि रबी पिकासाठी ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्यात दोन फणांत ४५–६० सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने बी पेरतात. ठेंगण्या जातीसाठी ओळींतील अंतर २२.५ ते ३० सेंमी. व झाडांतील अंतर ३.७५ ते ५ सेंमी. ठेवतात. ठेंगण्या व कमी मुदतीच्या जातीचे हेक्टरी १००–१२०किग्रॅ. पर्यंत बी लागते. मध्यम व दीर्घ मुदतीच्या जातीचे ८० ते ९० किग्रॅ. बी लागते. बागायती पिकाचे बी हाताने टोकल्यास थोडे कमी लागते. कोरडवाहू पीक पावसाच्या पाण्यावरच घेतले जाते. बागायती पिकाला बी पेरल्याबरोबर वाफे करून पाणी देतात. पुढे १०–१२ दिवसांच्या अंतराने पिकाच्या सबंध आयुष्यात ६-८ वेळा पाणी देतात. अधिक पाणी दिल्याने पालेवाढ होऊन शेंगा कमी लागतात. या पिकाला वरखत देण्याचा प्रघात नाही पण बागायत पिकाला पेरणीच्या वेळी हेक्टरी २६ किग्रॅ. नायट्रोजन आणि ५० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल मिळेल अशा हिशेबाने वरखत घातल्यास फायदा होतो, असे प्रयोगांती आढळले आहे. 

बी पेरल्यापासून एक-दोन महिन्यांत पोसलेल्या हिरव्या शेंगा, दाणे पूर्ण पक्क होण्याआधी भाजीसाठी काढून घेण्यास सुरुवात करतात. ही शेंगातोडणी पुढे दीड ते दोन महिने चालते. ७ ते १० दिवसांच्या अंतराने ३-४ तोडण्या करतात. दाण्यासाठी लावलेले पीक चार महिन्यांत दाणे पूर्ण पक्क बनून काढणीस तयार होते. वाटाण्याच्या पिकापासून पौष्टिक वैरण मिळते म्हणून ओटच्या पिकात वाटाण्याचे मिश्रण करतात.  

जाती : वाटाण्याच्या पुढील जाती महत्त्वाच्या आहेत: (१) अल्प मुदतीच्या मऊ बियांच्या जाती : आसौजी, लखनौ बोनिया, अलास्का, अर्ली, सुपर्ब मेटेओर (२) अल्प मुदतीच्या सुरकुतलेल्या बियांच्या जाती : आरकेल, अर्ली बॅजर, लिट्ल मारवेल, केलवेडान वंडर, अर्ली डिसेंबर (३) सुरकुतलेल्या बियांची मुख्य हंगामी दीर्घ मुदतीच्या जाती: बोनव्हीला, टी १९, लिंकन, डेल्व्हीचे कमांडो, खापरखेडा, एनपी २९, पर्‌फेक्शन, न्यू लाईन, टॉमस लॅक्स्टन, आल्डरमन, जीसी १४, जीसी १९५ (४) मऊ बियांची मुख्य हंगामी जात : किनौरी आणि (५) खाण्याच्या शेंगांची जात : सिल्व्हिया 

महाराष्ट्रात वाटाण्याच्या पुढील जातींची शिफारस केली आहे : बोनव्हीला, खापरखेडा, ॲर्ली बॅजर, एनपी २९, वाई वाटाणा, सिलेक्शन ८२ व सिलेक्शन ९३. 

उत्पादन : भाजीसाठी काढलेल्या हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पादन अल्प मुदतीच्या जातीचे २५ ते ४० क्विंटल, मध्यम मुदतीच्या जातीचे ६५ ते ८० क्विंटल व दीर्घ मुदतीच्या जातीचे ८५ ते ११५ क्विंटल मिळते. वाटाण्याच्या ताज्या हिरव्या शेंगा ० से. तापमान व ८५ ते ९० सापेक्ष आर्द्रता असलेल्या खोलीत दोन आठवडे चांगल्या स्थितीत रहातात. मात्र २१.५ से. तापमानात पाच दिवसांनंतर त्या विक्रीयोग्य राहत नाहीत.  

भोसले, रा. जि.

रोग : भुरी, तांबेरा, मर, केवडा, मूळकूज, करपा इ. रोग वाटाण्यावर पडतात.  


भुरी : हा रोग एरिसायफे पॉलिगोनाय या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) पीक फुलोऱ्यावर असताना उद्‌भवतो आणि त्यामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होतो. रोगामुळे पिकाच्या खोडे, पाने, इ. भागांवर राखेप्रमाणे पांढरी कवकाची वाढ आढळते. रोगावर उपाय म्हणून पिकावर अती बारीक गंधक भुकटी पिस्कारतात. याशिवाय ०.०३% कॅलिक्झीन, ०.२%कॅरॅथेन आणि १,००० पीपीएम बावीस्टीनची फवारणी करून ह्या रोगाचे उत्तम प्रकारे नियंत्रण करता येते. [⟶ भुरी ].  

तांबेरा : यूरोमायसीज फेबी कवकामुळे हा उद्‌भवतो. पानांवर व खोडावर तांबेऱ्याचे ठिपके आढळतात व पाने पिवळी पडतात. रोग आर्द्र हवामानात आढळतो. त्यावर उपाय म्हणून पिकावर गंधकाची अती बारीक भुकटी पिस्करतात. रोगट पीक काढून घेतल्यांनंतर त्याची त्या जमिनीतील बुडखी गोळा करून जाळून टाकून पिकांची फेरपालट करतात. [⟶ तांबेरा]. 

मर : फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम, प्रभेद पिसाय कवकामुळे हा रोग होतो. यामुळे रोपे पिवळी पडून मरून जातात. रोगप्रसार जमिनीमधून होतो. पिकांची फेरपालट, रोगप्रतिकारक जातींची लागवड हे यावरील उपाय आहेत. तसेच पेरणीपूर्वी वाटाण्याचे बी ३० मिनिटे ०.१% डायफोलाटान, ०.२% कॅप्टन द्रावणात ३०से. तापमानात भिजत ठेवून ते खोलीच्या तापमानात ३.५ तास सुकवितात. रोगामुळे पिकाचे बरेच नुकसान होते. [⟶ मर]. 

केवडा : हा रोग पेरोनोस्पोरा पिसाय कवकामुळे आर्द्र हवामानात उद्‌भवतो. पानांच्या पृष्ठभागावर पिवळसर ठिपके व खालच्या बाजूवर भुरकट जांभळ्या रंगाच्या कवकाची वाढ आढळते. यावर उपाय म्हणून ०.२%  झायनेब पिकावर फवारतात. [⟶ केवडा रोग]. 

मूळकूज: हा रोग जमिनीतील कवकांमुळे उद्‌भवतो. त्याने वाढत असलेली रोपे एकाएकी मरतात. यावर उपाय म्हणून या रोगाला प्रतिबंधक जातीचे बी वापरतात किंवा स्पर्गान किंवा अरॅसानसारख्या कवकनाशकामध्ये बी पेरणीपूर्वी चांगले घोळून घेऊन पेरतात.  

करपा : हा रोग कोलेटॉट्रिकम प्रजातीतील कवकांमुळे होतो. रोगामुळे पाने, शेंगा इ.  हिरव्या भागांवर खोल ठिपके आढळतात. यावर इलाज म्हणून वाटाण्याचे बी रोगमुक्त प्रदेशातून आणून पेरतात. बी स्ट्रेप्टोमायसीनच्या द्रावणात दोन तास भिजत ठेवून नंतर पेरतात. [⟶ करपा]. 

कीड : वाटाण्याच्या पिकावर मावा आणि शेंगेतील अळी या कीटकांचा उपद्रव आढळतो.  

मावा : शेंगा लागण्याच्या आधी मावा पिकावर पडल्या १०% बीएचसी पिस्कारतात. शेंगा लागल्यानंतर पिकावर मावा पडल्यास निकोटीन सल्फेटचे १ : ६०० प्रमाणात केलेले विद्रावण फवारतात. [⟶ मावा].  


शेंगेतील अळी : ही अळी शेंगेत प्रवेश करून तिच्यामधील दाणे पोखरून खाते. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून १०% बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात. कार्बारील या कीटकनाशकाचाही उपयोग होऊ शकतो. कीटकनाशक पिकावर फवारले असता सु. तीन आठवड्यांपर्यंत शेंगांचा आहारात उपयोग केला जात नाही.

भुंगेरे : याच्या नियंत्रणासाठी ०.०५  मेथीओकार्बची फवारणी करतात. मावा नियंत्रणासाठी केलेल्या उपायामुळे भुंगेऱ्यांची संख्या कमी होते. [⟶ भुंगेरा ].

सूत्रकृमी : यांवर उपाय म्हणून हेक्टरी ५ किग्रॅ. आल्डीकार्ब जमिनीत मिसळतात. [⟶ सूत्रकृमीजन्य वनस्पतिरोग].

पहा : कडधान्ये, लेग्युमिनोजी. 

रुईकर, स. के. राहुडकर, वा. ब. 

संदर्भ : 1. Bose, T. K. Som, M. G. Vegetable Crops in India, Calcutta, 1985.

           2. Chauvan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.

           3. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.

           4. C. S.  I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

           5. Yawalkar, K. S. Vegetable Crops of India, Nagpur, 1963.