वाचा : मानवप्राणी आपले विचार व माहिती दुसऱ्यास कळविण्यासाठी आपली बुद्धी आणि स्वरयंत्रणा वापरून जी गुंतागुंतीची ध्वनींची पद्धत वापरतो तिला संभाषण असे म्हणतात. काही शारीरिक अवयवांच्या (श्वसनाचे अवयव, स्वरयंत्र व उच्चारण अवयव) संघटित व सुसंबद्ध हालचालींद्वारे हवेत कंपने निर्माण करून निर्माण केलेल्या श्राव्य ध्वनींच्या संचास वाचा असे म्हणता येईल. स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास कळविण्यासाठी मानवप्राणी या ध्वनींना विशिष्ट सांकेतिक अर्थ देऊन त्याचा वापर करतो.

अनेक प्राणी अनेक प्रकारे निरनिराळे ध्वनी निर्माण करतात व त्यांद्वारे एका प्राथमिक पातळीपर्यंत स्वतःचे विचार दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचवू शकतात परंतु मानवप्राणी जास्त गुंतागुंतीचे आयुष्य जगत असल्याने त्याला जास्त गुंतागुंतीचे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे भाग पडते. यासाठी जास्त गुंतागुंतीच्या भाषेची माणसाला जरूर भासते. श्राव्य ध्वनींच्या माध्यमातून होणाऱ्या या भाषेच्या सुव्यक्तीकरणास वाचा असे म्हणता येईल.

लिहिणे व वाचणे या क्रियांत सांकेतिक (दृश्य-लिखित) आकृतीबंधांच्या साहाय्याने भाषेचे आविष्करण होते. (म्हणजे उदा, ‘आई’ ही संकल्पना व्यक्त करण्यासाठी वाचेत ‘आ’ आणि ‘ई’ हे स्वर अनुक्रमे उच्चारले जातात व ऐकणाऱ्याला ‘आई’ ही संकल्पना समजते, तसेच लिहिताना ‘आ’ आणि ‘ई’ या चित्रखुणा एकीपुढे एक लिहिल्या जातात व पाहणाऱ्याला–मनात वाचणाऱ्याला-‘आई’ ही संकल्पना समजते. मोठ्याने वाचून दाखवताना ‘आ’ या चित्रखुणेसाठी ‘आ’ हा स्वर व ‘ई’ या चित्रखुणेसाठी ‘ई’ हा स्वर वाचणारा उच्चारतो आणि वाचणाऱ्याला व ऐकणाऱ्याला दोघांनाही अर्थबोध होतो तसेच इतरही अनेक प्रकारच्या सांकेतिक खुणांच्या साहाय्याने भाषेचे आविष्करण होऊ शकते (उदा., मॉर्स सांकेतिक लिपी). म्हणजेच भाषेचा उपयोग करण्याचे वाचा हे एक माध्यम आहे. (जसे लिपी हे दुसरे माध्यम आहे). वाचेमध्ये ध्वनितरंगांच्या साहाय्याने संदेशवहन केले जाते.

भाषा अनेक आहेत. त्यामानाने वाचा ध्वनी मर्यादित आहेत परंतु त्यांच्या संयोजनाने अनेक ध्वनी-आकृतिबंध निर्माण होऊ शकतात. तसेच विशिष्ट भाषांत काही विशेष ध्वनींचा उपयोग केला जातो, काही ध्वनी जास्त प्रमाणात वापरले जातात, तर काही ध्वनी क्वचितच आढळतात किंवा पूर्णतः वगळलेले असतात.

ध्वनि-आकृतिबंधाला विशिष्ट अर्थ देण्याची किंवा विशिष्ट अर्थासाठी व संकल्पनेसाठी विशिष्ट ध्वनि-समूह वापरण्याची प्रक्रिया परंपरागत व समाजमान्य पद्धतींनी चालते म्हणजेच विशिष्ट ध्वनिरचनेला असलेला विशिष्ट अर्थ त्या समाजाच्या त्या भाषेपुरता मर्यादित असतो. त्याच ध्वनिरचनेला दुसऱ्या भाषेत दुसरा अर्थ असू शकतो (उदा.,’मूल’ या अक्षरांनी दर्शविलेल्या ध्वनिरचनेचा मराठीतील अर्थ ‘बालक’ व संस्कृतमध्ये ‘वनस्पतीचे मूळ’) आणि त्याच अर्थासाठी दुसऱ्या भाषेत दुसरी ध्वनिरचना असू शकते (उदा., मराठीत ‘मूळ’ आणि इंग्रजीत ‘रूट’ म्हणजे जमिनीत जाऊन अन्नरस शोषणारा वनस्पतीचा अवयव किंवा भाग).

आ. १. काही निवडक बाबींविषयीची बालकाची वाचिक वर्तनातील प्रगती व वय यांतील संबंध


वाचिक प्रगती : सुरुवातीस बालक जे ध्वनी करू लागते ते अनियमित, विनाकारण केलेले व निरर्थक असतात. स्वेच्छेने वा मुद्दाम ध्वनी निर्माण करणे, ध्वनीला विशिष्ट आकार अथवा स्वरूप देणे व विशिष्ट भाषेच्या संदर्भात त्याला विशिष्ट अर्थ देणे या गोष्टी शारीरिक ध्वनियंत्रणेचा विकास व शिक्षण यांवर अवलंबून असतात. प्रथम मातेकडून व नंतर कुटुंब, शाळा, समाज इत्यादींकडून बालक विशिष्ट भाषेची (मातृभाषा) शब्दसंपत्ती, ती वापरण्याच्या पद्धती (व्याकरण) आणि विशिष्ट भाषिक खुणा व लकबी इ. आत्मसात करत जाते.

बालकाची वाचिक प्रगती साधारणपणे पाच टप्प्यांत वर्णन करणे शक्य आहे (हे टप्पे आ. १ मध्ये दर्शविले आहेत.)

टप्पा १ : उद्दीपन दिल्यास बालक रडण्याचा आवाज करते, ही अनैच्छिक प्रतिक्रिया असते व सर्वसाधारण प्रतिक्रियात्मक भावना शारीरमाध्यमातून व्यक्त करण्याचा रडणे हा एक भाग असतो.

टप्पा २ : सहा ते सात आठवडे वयापासून बालकाला ते करीत असलेल्या आवाजांची जाणीव असते आणि आवाज करणे त्याला आवडते.

टप्पा ३ : स्वतः करीत असलेले आवाज ऐकून तसेच आवाज बालक पुनःपुन्हा करते म्हणजेच आवाज निर्माण करणे व ते ऐकणे यांत संबंध जुळविण्यास बालक शिकते.

टप्पा ४ : ९ ते १० महिन्यांच्या सुमारास बालक इतरांनी (मुख्यतः आई व इतर कुटुंबीय) केलेल्या आवाजांची अर्थ न समजता नक्कल करते.

टप्पा ५ : १२ ते १८ महिन्यांच्या सुमारास, विशिष्ट भाषेतील रूढ ध्वनी-आकृतिबंधांचा अर्थपूर्ण वापर बालक हेतुतः करू लागते, तरीसुद्धा विशिष्ट भाषेतील सर्व आवश्यक ध्वनींचे स्पष्ट उच्चारण करणे शिकण्यास आणखी वर्ष-दोन वर्षाचा काळ जावा लागतो.

सर्वसाधारणपणे स्वरांचा उच्चार करण्यास बालक प्रथम शिकते आणि व्यंजनांपैकी ओष्ठ्य व्यंजनांचा उच्चार ते प्रथम शिकते.

भाषेचा पूर्ण विकास होण्यास आणखी काही वर्षे जावी लागतात आणि पूर्ण विकसित भाषेचे वाचिक आविष्करण मूल साधारण ६ ते ७ वर्षांच्या वयात करू लागते. त्यानंतरही उपलब्ध भाषिक वातावरणानुसार व्यक्तीचा भाषाविकास चालूच राहतो. भाषिक वातावरण बदलत राहिल्यास त्यानुसार व्यक्ती निरनिराळ्या भाषा शिकत राहते.

वयाच्या २-३ वर्षांनंतर चित्र व संकल्पना यांचा संबंध जोडता येऊ लागल्यानंतर हळूहळू अक्षरांची ओळख करून देता येते व हाताच्या बोटांच्या हालचालींवर तीन-चार वर्षे वयाच्या सुमारास, पुरेसा ताबा आल्यावर अक्षरलेखन शिकविता येते. सहा ते सात वर्षे वयाचा मुलगा प्राथमिक पातळीपर्यंत लिहू-वाचू शकतो.

मातृभाषा आत्मसात झालेली असली, तरी तिचे व्याकरण नंतर मुद्दाम शिकावे लागते.

सर्वसाधारणपणे भाषेचा आविष्कार करण्याच्या वाचा, वाचन व लेखन या पद्धतींचा विकास वयाच्या सहा ते सात वर्षांपर्यंत पूर्ण होत असला, तरी भाषेचा विकास आयुष्यभर सतत होत असतो.


 वाचानिर्मिती : श्वसन, ध्वनिनिर्मिती व उच्चारण या संलग्न व परस्परावलंबी क्रियांच्या साहाय्याने वाचानिर्मिती होते. या क्रियांना चालना देणे, त्यांचे सुसूत्र संचालन करणे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे या गोष्टी श्रवणीय व गतिबोधक प्रतिसंभरणाच्या साहाय्याने तंत्रिका तंत्राद्वारे (मज्जासंस्थेद्वारे) केल्या जातात [ ⟶ प्रेरक तंत्र].

आ. २. स्वरयंत्रदर्शकातून दिसणारे स्वरद्वार व ध्वनिपटले यांचे दृष्य : (१) जिव्हा गिलायू, (२) ध्वनिपटल, (३) दर्वी–अधिस्वर–द्वारीय वली, (४) स्वरद्वार, (५) नासपतीरूप कोटर, (६) शृंगी गुलिका, (७) कीलाकार गुलिका, (८) मोर्गान्ये कोटर, (९) आभासी ध्वनिपटल, (१0) अधिस्वरद्वार, (११) तालू गिलायू.श्वसन : श्वसनाच्या वेळी आत–बाहेर करणाऱ्या हवेच्या झोताच्या दाबाकडून ध्वनिनिर्मितीसाठी ऊर्जा मिळविली जाते. काही ध्वनी श्वास आत घेतानाही निर्माण करता येत असले (व क्वचित काही भाषांत त्यांचा उपयोगही केला जात असला), तरी बहुतेक सर्व मानवी भाषांतील ध्वनी श्वास बाहेर टाकताना निर्माण केले जातात. याचे कारण त्या वेळी रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे श्वसनाचे मुख्य काम झालेले असते व बाहेर टाकल्या जाणाऱ्या हवेच्या झोतावर व दाबावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येते. ध्वनीनिर्मितीसाठी हवेच्या झोताचा योग्य प्रवाह व दाब कायम ठेवण्यासाठी, उच्छ्‌वासाच्या वेळी छातीच्या पोकळीतील दाब वाढविणारी छातीच्या पिंजऱ्याच्या व मध्यपटलाच्या (उदरीय व वक्षीय पोकळ्यांना विभागणाऱ्या स्ना‍युयुक्त पटलाच्या) स्नायूंची हालचाल, ध्वनिपटलांतील फटीचे आकारमान व त्यांच्यावरील ताण कमीजास्त करणारी ⇨स्वरयंत्रातील स्नायूंची हालचाल आणि स्वरयंत्रावरील मार्गाचा आकार बदलणाऱ्या स्नायूंची हालचाल यांच्यात सुसूत्रता ठेवली जाते. ध्वनिपटलांच्या कंपाचा प्रकार (व्यक्तिवैशिष्ट्यदर्शक) व कंप्रता (दर सेकंदाला होणारी कंपनसंख्या म्हणजेच ध्वनीचा स्वर) काही प्रमाणात हवेच्या झोताच्या वायुगतिकीवर (वायुची गती, ती निर्माण करणाऱ्या प्रेरणा व तीमुळे होणारे परिणाम यांविषयीच्या शास्त्रावर) अवलंबून असते आणि ध्वनीचा गरिमा (लहान-मोठेपणा) व उच्चाराचा जोर स्वरयंत्राखालील श्वसनमार्गातील हवेच्या दाबावर अवलंबून असतो.

ध्वनिनिर्मिती : मानवी ध्वनिनिर्मिती अवयव ही एक निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे व्यास असलेल्या नळीच्या स्वरूपातील ध्वनिकीय प्रणाली असून तिचा सर्वांत खालचा किंवा पहिला भाग स्वरयंत्राने बनलेला असतो. त्यानंतर घशाची पोकळी असून शेवटचा भाग नाकाची पोकळी व तोंडाची पोकळी यांमध्ये दुभागलेला असतो. शिवाय नाकाच्या पोकळीला जोडून हाडांतील अनेक पोकळ्या असून त्यांचा उपयोग आवाज मोठा करण्यासाठी वा घुमण्यासाठी होतो. ध्वनिमार्गाची पुरुषांमध्ये सरासरी लांबी १६ सेंमी. असते आणि ती ओठ आवळून वा स्वरयंत्र खाली घेऊन वाढविता येते.

आ. ३. ध्वनिमार्गातील ध्वनिनिर्मिती करणारे अवयव व उच्चारणाची शक्य असलली स्थाने : (१ ते ९ या आकड्यांनी खालच्या उच्चारण अवयवापासून वरच्या उच्चारण अवयवापर्यंत दर्शविलेले बाण उच्चारण प्रकार दाखवितात आणि १० ते २६ संबंधित अवयव दाखवितात). (१) व्द्योष्ठ्य, (२) ओष्ठदंत्य, (३) दंत्य व अंतर्दंत्य, (४) दंतमूलीय (५) दंतमूलोत्तर : (अ) मूर्धन्य, (आ) तालु – दंतमूलीय (६) तालव्य, (७) मृदुतालव्य, (८) तालुपटीय, (९) ग्रसनीय, (१०) स्वरद्वार व ध्वनिपटले, (११) अधिस्वरद्वार, (१२) ग्रसनी, (१३) तालुपट, (१४) मृदू तालू, (१५) नासागुहा, (१६) दृढ (कठीण) तालू, (१७) दंतमूलीय कंगोरा, (१८) वरचा ओठ, (१९) खालचा ओठ, (२०) जिभेचे टोक, (२१) जिभेचे पाते, (२२) जिभेचा अग्रभाग, (२३) जिभेचा मध्यभाग, (२४) जिभेचा पश्चभाग, (२५) जिभेचा मूळभाग, (२६) खालचा जबडा.स्वरयंत्रामध्ये संयोजी ऊतक (समान रचना व कार्य–येथे जोडण्याचे कार्य–असणाऱ्या कोशिकांचा पेशींचा समूह) व स्नायू यांनी बनलेली दोन पातळ ध्वनिपटले आडवी बसविलेली असतात. स्वरयंत्रातील निरनिराळ्या स्नायूंच्या समन्वित क्रियेने ध्वनिपटलांवरील ताण कमी जास्त करता येतो व त्यांच्या स्थितीत फेरफार करून स्वरद्वार (ध्वनिपटलांच्या मधली फट) कमीजास्त रुंद करता येते. श्वसनाच्या वेळी हे द्वार पूर्ण उघडे असते. ध्वनिनिर्मितीच्या वेळी श्वास सोडताना ध्वनिपटलांमधील फट बंद केली जाते. त्यामुळे ध्वनिपटलांखालील छातीतील हवेचा दाब वाढत जातो व ध्वनिपटले बाजूला फेकली जाऊन हवेचा एक लोळ बाहेर पडतो. त्याबरोबर छातीतील दाब कमी झाल्याने मूळचा ताण, स्थितिस्थापक (मूळ स्थितीत परत येण्याचा) गुणधर्म व ध्वनिपटलांमधून हवेचा झोत वाहताना निर्माण झालेला ॠण दाब यांमुळे ध्वनिपटले एकमेकांजवळ खेचली जाऊन स्वरद्वार पुन्हा बंद होते. ही क्रिया वारंवार घडत राहून ध्वनिपटले कंप पावत राहतात व त्यांच्या कंप्रतेच्या प्रमाणात खंडित लोळांच्या स्वरूपात श्वास बाहेर टाकला जातो म्हणजेच ऊर्जा ध्वनीच्या स्वरूपात बाहेर पडते. बाहेर पडणाऱ्या हवेचे प्रमाण व प्रवाह खंडित होण्याची कंप्रता यांद्वारे बाहेर पडणाऱ्या ध्वनि-ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्याचे काम ध्वनिपटले करतात (परंतु स्वतःमात्र फारच कमी ऊर्जा प्रक्षेपित करतात). याप्रमाणे ध्वनिपटलांचे कंप पावणे निष्क्रिय असते व ध्वनिपटलांच्या स्नायूंचे काम ती कंप पावण्याच्या अवस्थेत ठेवणे हे असते म्हणजेच ध्वनिपटले कंप पावणे ही वायुगतिकीय नियमांनी घडणारी यांत्रिक घटना असून उडत्या किड्यांच्या पंखांच्या थरथरीप्रमाणे क्रियाशील घटना नाही. ध्वनिपटले कंप पावू लागताच मूळ स्वर निर्माण होतो. ध्वनिपटलांवरील ताणाच्या सम प्रमाणात व लांबीच्या व्यस्त प्रमाणात कंप्रता बदलते आणि त्यानुसार स्वरात उच्चनीचता आणता येते. याचा उपयोग विशिष्ट भाषिक कार्यासाठी (उदा., एकाच उच्चाराच्या शब्दांचा अर्थ बदलणे, अर्थ सुस्पष्ट करणे, वाक्यातील विशिष्ट शब्दांचे महत्त्व दर्शविणे इ.) व गाताना केला जातो. प्रत्येकाचा मूळ स्वर वेगळा असून त्यावरून पुरुष, स्त्री किंवा मुलाचा आवाज वेगवेगळा ओळखू येतो. ध्वनिपटलांचा कंप पावण्याचा प्रकार ध्वनिपटलांची स्थिती, स्वरद्वाराचा आकार, हवेचा झोताचा दाब व वेग यांवर अवलंबून असतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या आवाजाला व्यक्तिविशिष्ट स्वरूप मिळते. [⟶ स्वरयंत्र].

उच्चारण किंवा उच्चारणानुसार ध्वनिविचार : [⟶ ध्वनिविचार]. स्वरयंत्रात निर्माण झालेला ध्वनी पुढे ध्वनिमार्गातून प्रवास करून बाहेर पडतो. ध्वनिमार्गाचे ग्रसनी (घसा) व पुढे मुखगुहा (तोंडाची पोकळी) व नासागुहा (नाकाची पोकळी) अशा दोन समांतर पोकळ्या असे भाग पडतात. ध्वनिनिर्मितीच्या वेळी हवा मुख्यतः तोंडाच्या पोकळीवाटे बाहेर पडते (श्वसनाच्या वेळी ती नाकावाटे बाहेर पडते) व नाकाचा मार्ग मृदू तालूने बंद केलेला असतो परंतु नाकाचा मार्गही उघडा असल्यास त्या आवाजाला अनुनासिकत्व प्राप्त होते.


स्वरयंत्रात निर्माण केलेल्या ध्वनि-उर्जेला स्वरूप देण्याचे कार्य ध्वनीमार्ग करतो म्हणजेच ध्वनिमार्गाच्या हालचालींमुळे मूळ ध्वनीत बदल होतात. हे बदल मुख्यतः ध्वनिमार्गातील अडथळ्यांचे ठिकाण व स्वरूप यांवर अवलंबून असतात व त्यानुसार उच्चारित ध्वनीचे स्वर, अर्धस्वर व व्यंजने असे वर्गीकरण सोयीसाठी केले जाते परंतु या तीनही प्रकारांच्या अचूक व्याख्या करणे व त्यांतील भेद पूर्णपणे दाखविणे अवघड आहे.

आ. ४. विविध स्वरध्वनींकरिता असणारी जिभेची स्थिती

(१) स्वर : ध्वनी निर्माण होताना बाहेर पडणाऱ्या हवेला जवळजवळ शून्य अडथळा असल्यास त्यास स्वर म्हणतात. तोंडाची (ओठांची) आकृती व जिभेचे स्थान यांमुळे ध्वनिमार्गाचा सर्वसाधारण आकार बदलल्याने मूळ स्वरात बदल होऊन ‘इ’, ‘उ’ वगैरे स्वर निर्माण होतात. ते अवयवक्षम असतात (म्हणजे त्यांचे उच्चारण पूर्ण होते).

(२) अर्धस्वर : अर्धवट अडथळ्यांमुळे ध्वनिमार्ग काही ठिकाणी चिंचोळा वा अरुंद झाल्यास मूळ स्वरात विकृती येऊन अर्धस्वर बनतात. उदा., ‘इ’ चा ‘य’, ‘उ’ चा ‘व’ इत्यादी.

(३) व्यंजने: ध्वनिमार्गात अडथळा निर्माण होऊन किंवा ध्वनिमार्ग विशिष्ट बिंदूंशी आकुंचित होऊन अनिर्बंध ध्वनिप्रवाहात खंड पडल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनिविशेषांना व्यंजने असे म्हणतात. स्वरांशिवाय त्यांचा उच्चार बहुधा पूर्ण होत नाही किंवा दोन स्वरांमधील बदल किंवा अडथळ्याच्या स्वरूपात ती निर्माण होतात. म्हणजेच एका स्वरापासून दुसरा स्वर निर्माण करताना ध्वनिमार्गाची स्थिती विशिष्ट पद्धतींनी बदलताना व्यंजनांची निर्मिती होते व म्हणून सुटी व्यंजने निर्माण करता येत नाहीत (ती अवयवक्षम नसतात). अडथळ्याच्या स्थानाप्रमाणे त्यांचे कंठ्य, तालव्य, दंततालव्य, दंत्य व ओष्ठ्य इ. प्रकारांत किंवा अडथळ्याच्या स्वरूपाप्रमाणे त्यांचे स्फोटक, अर्धस्फोटक, घर्षक, कंपक, पार्श्विक, अनुनासिक इ. प्रकारे वर्गीकरण करता येते. [ ⟶ ध्वनिविचार].

ध्वनिपटले कंप पावत असल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनीस सकंप किंवा सघोष व ध्वनिपटले कंप पावत नसल्यास त्यास निष्कंप किंवा अघोष ध्वनी असे म्हणतात. बहुतेक सर्व स्वर, अर्धस्वर, ‘ग, ज, ड, द, ब’ वगैरे व्यंजने व अनुनासिक सघोष असतात आणि क, च, ट, त, प, ह, स, श, ष, वगैरे व्यंजने अघोष असतात. तसेच कुजबुजताना बहुतेक सर्व स्वर व व्यंजने अघोष असू शकतात.

स्वर किंवा स्वर व एक किंवा अनेक व्यंजनांच्या मिश्रणाने एका वेळी पूर्ण उच्चारता येण्याजोगा अवयव निर्माण होतो. अशा एक किंवा अनेक अवयवांच्या एकत्रित अर्थपूर्ण उच्चारणाला शब्द असे म्हणतात व व्याकरणाच्या दृष्टीने विशिष्ट क्रमाने शब्दरूप ध्वनिसंकेतांच्या अर्थपूर्ण उच्चारणाला वाक्य असे म्हणतात. त्यांची मिळूनच वाचा तयार होते.

ध्वनिक्रीय ध्वनिविचार : [⟶ ध्वनि ध्वनिविचार]. केंद्रीय तंत्रिका तंत्रातील वाचा केंद्रातील घडामोडी, प्रेरक संकेत, ध्वनिनिर्मितीत सहभागी असलेल्या अनेक स्नायूंच्या त्याप्रमाणे होणाऱ्या हालचाली व एकमेकांच्या हालचालींवर गुंतागुंतीच्या प्रतिसंभरण प्रक्रियांनी एककालिक आणि कालसंदर्भात सतत नियत्रंण इ. प्रक्रिया व त्यांचा शेवटचा परिणाम म्हणून निर्माण होणारे ध्वनितरंग यांतील संबंध गुंतागुंतीचा व अनेकांस एक या स्वरूपाचा असतो.

यांपैकी शेवटचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या वाचा-ध्वनींच्या ध्वनिकीय अभ्यासास ध्वनिकीय ध्वनिविचार म्हणता येईल. या दृष्टीने वाचा-ध्वनी म्हणते कानांना समजण्यासारखी (श्रवणगोचर) हवेच्या दाबातील सूक्ष्म कंपने अथवा बदल होत व त्यांचेही (वाचा-ध्वनींचे) इतर ध्वनींप्रमाणेच दोन प्रकार पडतात : (१) आवर्ती ध्वनी (उदा., सर्व सकंप ध्वनी, कारण ते निर्माण होताना ध्वनिपटलांच्या नियमित हालचाली हवेच्या दाबात नियमित स्पंद निर्माण करतात) व (२) इतर प्रकारे उत्पन्न झालेले ध्वनी. 


आ. ५. रूपरेषात्मक ध्वनि–वर्णपट : यात आ. ४ मध्ये दर्शविलेल्या स्वरांच्या पहिल्या तीन ध्वनि–गुणलक्षण घटकांच्या कंप्रता दाखविलेल्या आहेत.

श्रोत्याच्या दृष्टीने कोणत्याही ध्वनीला उच्चनीचता (स्वरपद), गरिमा (लहानमोठेपणा) आणि वैशिष्ट्यदर्शक गुणधर्म (स्वरविशेषत्व) असतात. आवर्ती तरंगाच्या बाबतीत ध्वनीची उच्चनीचता तरंगाच्या मूळ कंप्रतेवर अवलंबून असते, तर गरिमा तरंगाच्या परमप्रसरावर (स्थिर स्थितीपासून होणाऱ्या महत्तम विस्थापनावर) अवलंबून असतो. याशिवाय तरंगाच्या मूळ कंप्रतेत होणाऱ्या मोठ्या बदलांवर अध्यारोपित केलेल्या हवेच्या दाबातील सूक्ष्म बदलांवर वैशिष्ट्यदर्शक गुणधर्म ठरतात.

वचिक ध्वनीच्या संदर्भात ध्वनिमार्गाचा आकार व आकारमान यांमुळे मूळ स्वराला वैशिष्ट्यदर्शक गुणधर्म प्राप्त होतो. ध्वनिपटले कंप पावू लागताच निर्माण झालेले हवेचे तरंग ध्वनिमार्गातील हवेवर तीव्र धक्के देऊ लागतात. त्यामुळे ध्वनिमार्गातील हवा स्वराच्या मूळ कंप्रतेहून भिन्न अशा तीन-चार वेगवेगळ्या कंप्रतांत एकाच वेळी कंप पावू लागते. या कंप्रतांना ‘ध्वनिमार्गाच्या अनुस्पंदनी कंप्रता’ असे म्हणतात. काही विशिष्ट कंप्रतांत केंद्रीभूत झालेल्या ऊर्जा पट्टांच्या स्वरूपात स्वर ध्वनि-वर्णपटावर दिसतात [⟶ ध्वनि]. या ध्वनिपट्टांना ‘ध्वनि-गुणलक्षण घटक’ असे म्हणतात. या घटकांची ध्वनि-वर्णपटातील स्थाने ध्वनिमार्गाच्या अनुस्पंदनी कंप्रतांशी जुळतात.

या प्रकारे स्वरांसाठी अनुस्पंदनी कंप्रता ध्वनिमार्गाच्या विशिष्ट आकारावर अवलंबून असतात. अनुनासिक व पार्श्विक इ. सकंप व्यंजनांच्या निर्मितीच्या वेळी ध्वनिमार्ग एकाच नलिकेच्या स्वरूपात नसल्याने अनुस्पंदनी कंप्रतांचे सापेक्ष परमप्रसर बदलतात. इतर सकंप व्यंजनांच्या अनुस्पंदनी कंप्रता स्वरांप्रमाणेच ध्वनिमार्गाच्या तात्कालिक आकारावर ठरतात परंतु स्वरांच्या तुलनेत त्यांच्यात फारच कमी ध्वनिकीय ऊर्जा असते. निष्कंप ध्वनींना निश्चित मूळ कंप्रता असलेला आवर्ती तरंगाकार नसतो, तरीसुद्धा हवेच्या क्षुब्ध झोतामुळे निर्माण झालेल्या हवेच्या दाबातील बदलांबरोबर काही प्रमाणात उच्चनीचतेची जाणीव होते. हे सर्व कमी ऊर्जेचे ध्वनी असतात.

सारांशरूपाने असे म्हणता येईल की, वाचा-ध्वनींचे निश्चित वर्णन नऊ ध्वनिकीय घटकांनी करता येईल. पहिल्या तीन अनुस्पदंनी कंप्रता हे पहिले तीन घटक असून ते ध्वनिमार्गाचे आकारनिदर्शक असल्याने वाचा-ध्वनी हा स्वर, अनुनासिक, पार्श्विक किंवा सकंप व्यंजन आहे याची निश्चिती करतात. त्यामुळे वाचिक माहितीचा मोठा भाग या घटकांद्वारे सांगितला जातो. (चवथी व उच्च अनुस्पंदनी कंप्रता त्यामानाने जास्त बदलत नाहीत.) वाचा-ध्वनी तरंगाची मूळ कंप्रता (स्थूलमानाने उच्चनीचता) हा चवथा घटक असून त्याचा परमप्रसर (स्थूलमानाने गरिमा) हा पाचवा घटक आहे. या दोन्हींमुळे स्वरशैली व भार अथवा जोर या प्रकारची माहिती मिळते. तसेच हे घटक सकंप व निष्कंप ध्वनींमधील भेद दर्शवितात. निष्कंप ध्वनींतील उच्च कंप्रतांच्या सीत्कार ध्वनींची मध्य कंप्रता हा सहावा घटक असून या ध्वनीचा परमप्रसर सातवा घटक आहे. हे दोन घटक निष्कंप ध्वनींतील भेदनिदर्शक आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या अनुस्पंदनाचा पहिल्या अनुस्पंदनाच्या तुलनेतील परमप्रसर हे आठवे व नववे घटक होत (एकूण अनुस्पंदनाचा परमप्रसर मूळ स्वराच्या परमप्रसरावरून ठरतो). ते कमी महत्त्वाचे असून अनुनासिक व पार्श्विक ध्वनींसंबंधी अतिरिक्त माहिती पुरवितात.

अशा प्रकारे ध्वनिकीच्या दृष्टीने वाचा-ध्वनी म्हणजे स्पंद, आवर्ती तरंग आणि अनावर्ती तरंग या स्वरूपातील ऊर्जांचे एककालिक व अनुक्रमाने येणारे आणि मध्ये निरनिराळ्या कालखंडांच्या विरामाने खंडित झालेले संयोग आहेत, असे म्हणता येईल.

भाषाशास्त्रीय ध्वनिविचार : भाषेचे अन्वेषणात्मक वर्णन करण्यास उपयुक्त ठरतील असे प्रकार वा वर्ग ठरविणे हा ध्वनिविचाराचा एक महत्त्वाचा उद्देश असल्याने ध्वनिविचार हा भाषाशास्त्राचाच एक भाग आहे.

मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या सर्व श्रवणगोचर ध्वनींच्या भाषानिरपेक्ष अभ्यासाला सामान्य ध्वनिविचार म्हणतात आणि एखाद्या बोलीभाषेतील ध्वनींच्या अभ्यासाला त्या भाषेचा ध्वनिविचार म्हणतात [⟶ भाषाशास्त्र].

वाचेचे तंत्रिकाविज्ञान : मेंदूतील वा केंद्रीय तंत्रिका तंत्रातील प्रक्रिया : श्रवण व इतर संवेदना, त्यांचा एकमेकींशी व जुन्या आठवणींशी संबंध, स्वतःचे विचार, भाषिक शब्दसंग्रह, अर्थपूर्ण व व्याकरणशुद्ध वाक्यरचना आणि सुसंगत व अर्थपूर्ण वाचानिर्मिती या सर्व प्रक्रिया गुंतागुंतीच्या असून त्यांच्याशी संबंधित तंत्रिकाविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान, ध्वनिकी, मानसशास्त्र, भाषाशास्त्र इ. ज्ञान शाखांतील नातेही अतिशय गुंतागुंतीचे आहे. तसेच विशिष्ट वाचा ध्वनिनिर्मितीची क्षमता लहानपणीच्या भाषिक वातावरणावर व शिक्षणावर (बाह्य अनियंत्रित परिस्थितीवर) मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने ही गुंतागुंत आणखीनच वाढते. या सर्वांवर तंत्रिकाविज्ञान, तंत्रिका शरीरक्रियाविज्ञान, मानसशास्त्र, मानसभाषाशास्त्र, वाचाभगंशास्त्र, वाचाविकृतिविज्ञान, ⇨ सायबरनेटिक्स इ. अनेक क्षेत्रांत सतत संशोधन सुरू असूनही बोलताना किंवा लिहिताना केंद्रीय तंत्रिका तंत्रात कोणत्या प्रक्रिया वा घडामोडी घडतात, याचे पुरेसे आकलन अद्याप झालेले नाही परंतु त्यासंबंधी स्थूलपणाने आकलन झालेल्या मूलभूत गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. (यातील शरीररचनात्मक भागांंच्या स्पष्टीकरणासाठी ‘तंत्रिका तंत्र व मेंदू’ या नोंदी पहाव्यात).


आ. ६. वाचेसंबधीच्या हालचालींशी निगडीत असलेली प्रमस्तिष्क बाह्यकातील क्षेत्रे व सहयोगी म्हणून समजली जाणारी क्षेत्रे : (१) जीभ, (२) स्वरयंत्र, (३) वाचा आकलन, (४) श्रवण, (५) व्हर्निके, क्षेत्र (हे क्षेत्र अनिश्चित असल्याने तुटक रेषांनी दाखविले आहे), (६) भाषा सूत्रीकरण, (७) वाचन, (८) मध्य-पूर्व संवेलक, (९) ग्रसनी (घसा), (१0) चेहरा, (११) लेखन, (१२) ब्रॉका क्षेत्र.

मानवप्राण्यात वैचारिक व हालचालींच्या क्रिया (ज्यांत बोलणे व लिहिणे यांचाही समावेश होतो) प्रमस्तिष्क बाह्यकाच्या मार्गदर्शनाखाली होतात. त्यामध्ये वाचा व भाषेसंबंधीची केंद्रे प्रमस्तिष्काच्या प्रभावी गोलार्धात असतात. ही केंद्रे उजव्या हाताच्या व्यक्तींत डाव्या बाजूच्या गोलार्धात, तर डावखोऱ्या व्यक्तींत ही केंद्रे दोन्ही गोलार्धांत अनियमितपणे विभागलेली असतात.

श्रवणेंद्रियांकडून आलेल्या तंत्रिका प्रथम लंबमज्जेतील श्रवण केंद्रांकडे येतात. तेथून निघणाऱ्या तंत्रिका श्रवणीय प्रतिक्षेपी क्रिया व दिशात्मक श्रवण यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रामार्फत शेवटी शंखक खंडाच्या वरच्या संवेलकाच्या (वळीच्या) बाह्यकातील श्रवण केंद्रांकडे येतात. तेथे ध्वनीची ढोबळ जाणीव व आकलन होते. त्यापुढे शंखक खंडातील इतर भागांतील आंतर व बाह्य मनोश्रवण केंद्रांत सर्व प्रकारच्या ध्वनींचे संपूर्ण आकलन व संस्मरण होते. याच केंद्रांपैकी शंखक खंडाच्या वरच्या संवेलकाचा पाठीमागचा तिसरा भाग जर्मन शारीरविज्ञ कार्ल व्हर्निके यांच्या नावावरून व्हर्निके क्षेत्र म्हणून ओळखला जात असून तो मुख्यतः वाचाध्वनींचे ग्रहण व आकलन यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो (याच्या नाशामुळे ग्रहण क्षम वाचाभंग होतो याचे वर्णन पुढे दिले आहे).

गुंतागुंतीच्या शारीरिक हालचालींसाठी प्रेरक संदेश देणारी प्रेरक क्षेत्रे मध्य-पूर्व संवेलकाच्या बाह्यकात असतात (तोंड, घसा व स्वरयंत्र यांतील स्नायूंची प्रेरक क्षेत्रे या संवेलकाच्या तळाच्या भागात व हाताच्या स्नायूंची मधल्या भागात असतात). या भागाजवळील, ललाट खंडाच्या तिसऱ्या संवेलकाचा तळाचा भाग, पी. पी. ब्रॉका या फ्रेंच शास्त्रज्ञांच्या नावावरून ब्रॉका क्षेत्र म्हणून ओळखला जातो.भाषा सुव्यक्तीकरणाशी संबंधित असलेल्या हालचालींवर (बोलण्यासाठी स्वरयंत्र, घसा व तोंडाच्या हालचाली व लिहिण्यासाठी हाताच्या हालचाली) प्रेरक संदेशांद्वारे बारकाव्याने आणि सुसूत्रपणे नियंत्रण ठेवण्याशी हे क्षेत्र संबंधित असते. (या क्षेत्राचा नाश सुव्यक्तीकरणात्मक वाचाभंगास कारणीभूत होतो याचे वर्णन पुढे दिले आहे).

वाचा आकलन व निर्मितीसाठी फक्त वरील केंद्रे सुस्थितीत व कार्यक्षम असणे पुरेसे नाही. या दृष्टीने मस्तिष्कातील किनारी तंत्राचे कार्य महत्त्वाचे आहे. [⟶ मेंदू]. हा तांत्रिका तंत्राचा सर्वांत आधी विकसित झालेला भाग असून ऊर्जा व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी दोन्ही गोलार्धांतील सर्व जीवनावश्यक केंद्रे जोडत तो पुढून मागेपर्यंत जातो. जागृतावस्थेशी संबंधित लंबमज्जेतील जालिकाकार संक्रियण तंत्र हा त्याचाच भाग आहे. या भागामार्फत वरील वाचाकेंद्रे अनेक सहयोगी क्षेत्रांशी, उपबाह्यक केंद्रांशी, थॅलॅमसाशी व निमस्तिष्काशी जोडलेली असतात.

अर्थपूर्ण वाचानिर्मितीची क्षमता काही प्रमाणात मस्तिष्कातील सहयोगी क्षेत्रांवर अवलंबून असते. ही क्षेत्रे संवेदना क्षेत्रांशी व प्रेरक क्षेत्रांशी जोडलेली असतात. येणाऱ्या अनेक व निरनिराळ्या प्रकारच्या संदेशांचा एकमेकांशी संबंध जोडणे व त्यानुसार प्रेरक क्षेत्रांकडे संदेश पोचविणे हे काम ही केंद्रे करतात.

वाचानिर्मितीशी संबंधित संदेशाचे वहन स्तूप, स्तूपबाह्य आणि निमस्तिष्क प्रेरक तंत्रिकमार्गांद्वारे होते [⟶ प्रेरक तंत्र]. लंबमज्जेत सुरू होणाऱ्या व स्वरयंत्र, घसा, तालू, जीभ, ओठ इ. अवयवांतील स्नायूंपर्यंत जाणाऱ्या तंत्रिकांवर या तीन मार्गांद्वारे येणाऱ्या संदेशाचे नियंत्रण असते. मध्य-पूर्व संवेलकाच्या बाह्यकातील प्रेरक केंद्रापासून स्तूपमार्ग निघतो व अवयवांच्या मुख्य हालचाली घडवून आणतो. पुच्छाभ केंद्रक, श्वेत गोलाकृती केंद्रक व भावनिक एकात्मतेची थॅलॅमसातील केंद्रे यांपासून मुख्यतः निघालेल्या व प्रेरक तंत्रिकांकडे जाणाऱ्या तंत्रिका स्तूपबाह्यमार्गातून जातात. एकमेकांविरुद्ध क्रिया करणाऱ्या स्नायूंवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून वाचानिर्मितीशी संबंधित हालचालींत सूक्ष्मपणा व सुसंगतपणा आणण्याचे कार्य या मार्गाद्वारे होते. या स्नायूंच्या व मुख्यतः श्वसनाच्या स्नायूंच्या हालचालींत व ताणात सुसूत्रता आणण्याचे कार्य निमस्तिष्क तंत्रिकामार्गाद्वारे केले जाते. या सर्व मार्गाद्वारे आलेले प्रेरक संदेश त्रिमूल, आनन, जिव्हाग्रसनी, प्राणेशा, मेरुरज्जू साहाय्यक व अधोजिव्ह या मास्तिष्क तंत्रिकांद्वारे वाचानिर्मितीशी संबंधित असलेल्या स्नायूंकडे जातात. [⟶ प्रेरक तंत्र].

प्रतिसंभरण: वरील सर्व संवेदनात्मक, केंद्रीय तंत्रिका तंत्रीय व प्रेरक प्रक्रिया आणि शेवटी स्नायूंच्या हालचालींद्वारे ध्वनिनिर्मिती व उच्चारण यांवर प्रतिसंभरण क्रियांद्वारे तात्काल व सतत नियंत्रण ठेवले जाते. प्रतिसंभरण क्रियांसाठी संवेदनात्मक माहिती दोन प्रकारांनी पुरविली जाते. एक म्हणजे वाचा-ध्वनी निर्माण होताक्षणीच ते ऐकले जातात व त्यांचे आकलन होते आणि त्यानुसार पुढील ध्वनी निर्माण होतानाच त्यांत आवश्यक दुरुस्त्या वा बदल केले जातात. दुसऱ्या प्रकारच्या संवेदना (अंतर्गत संवेदना), स्नायू, स्‍नायुबंध, सांधे इ. अवयवांतील संवेदनाग्राहक रचनांद्धारे पाठविल्या जातात. हालचाल करणाऱ्या वरील सर्व अवयवांची तात्कालिक अवस्था व स्थिती यांची माहिती या संवेदनांद्वारे सतत केंद्रीय तंत्रिका तंत्राकडे पाठविली जाते व त्यानुसार (ध्वनिनिर्मिती व उच्चारण होताना) स्नायू व सांध्यांच्या हालचालींत आवश्यक सुधारणा वा बदल तात्काल केले जातात. 


आ. ७. वाचा साखळीतील घटनांची मालिका : वक्त्याच्या मनापासून टप्प्यांच्या मालिकेद्वारे श्रोत्याच्या मनापर्यंत माहितीचे प्रेषण होते : (१) वक्ता, (२) प्रेरक तंत्रिका, (३) ध्वनिनिर्मिती करणारे स्नायू, (४) ध्वनितंरग, (५) प्रतिसंभरण दुवा, (६) कान, (७) संवेदक तंत्रिका, (८) श्रोता, (९) कान, (१०) संवेदक तंत्रिका.

वाचेचे आकलन : ऐकणारी व्यक्ती वाचिक ध्वनितरंगांचे रूपांतर नैसर्गिक भाषेतील भाषादृष्ट्या अर्थपूर्ण ध्वनींत ज्या प्रक्रियेने करते त्या प्रक्रियेला वाचा आकलन असे म्हणतात. बोली भाषेवर मेंदूत केल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा अभ्यास मुख्यतः ध्वनीवर अर्थाचे रोपण करण्याशी संबंधित असतो परंतु वाचा आकलनाच्या प्रक्रियेचा अभ्यास, मनुष्य स्वतःच्या भाषेतील ध्वनींचे आकलन व उच्चारण कसे करतो याच्याशी संबंधित असतो. तसेच ही प्रक्रिया व सर्वसाधारण श्रवण–प्रक्रिया यांतही काही मूलभूत फरक आहेत. उदा., (१) श्रवण प्रक्रियेचा अभ्यास करताना साधे अलग व गणिती अचूकता असलेले ध्वनी वापरले जातात आणि कंप्रता, परमप्रसर किंवा कला (ठराविक संदर्भापासून असणारी गतिविषयक स्थिती) यांपैकी एकाच अक्षावर त्यांत बदल केले जातात. याउलट वाचा आकलनाच्या अभ्यासात काळाच्या ओघात बदलणाऱ्या ध्वनींच्या गुंतागुंतीच्या आकृतीबंधांतील नातेसंबंध तपासले जातात. (२) श्रवण–प्रक्रिया कानातील प्रक्रियांचा अभ्यास करते. याउलट वाचा आकलनामध्ये केंद्रीय तंत्रिका तंत्रातील प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. (३) श्रवण–प्रक्रियेत ध्वनींतील भेदाभेद समजण्याची क्षमता तपासली जाते, तर वाचा आकलनाच्या अभ्यासात बोललेली भाषा ओळखण्याची व समजण्याची क्षमता अभ्यासली जाते आणि (४) श्रवण–प्रक्रियेत श्रवण घटनेचा अभ्यास पुरेसा असतो, उलट वाचा आकलन प्रक्रियेत ऐकणाऱ्याची भाषिक पार्श्वभूमी व अनुभव यांच्यासह असणारी भाषिक घटना अभ्यासावी लागते.

वाचा साखळी : वक्ता आपण बोललेला संदेश श्रोत्यापर्यंत कसा प्रेषित करतो त्या घटनांच्या साखळीला वाचा साखळी असे म्हणतात. वक्ता त्याच्या मनातील विचार व्यक्त करू शकणारे शब्द निवडून त्यांची व्याकरणशुद्ध व अर्थवाही वाक्यांत रचना करतो. ही माहिती मेंदूकडून ध्वनिनिर्मिती व उच्चारण यांच्याशी असलेल्या संबंधित स्नायूंकडे प्रेरक तंत्रिकांद्वारे पोचविली जाते. या स्नायूंच्या हालचालींमुळे त्यानुसार ध्वनितरंग निर्माण केले जातात. या ध्वनितरंगांनी श्रोत्याच्या श्रवणयंत्रणेला चालना मिळते व ध्वनिकीय स्वरूपातील माहितीचे श्रवण तंत्रिकेतील संदेशात रूपांतर होऊन हा संदेश केंद्रीय तंत्रिका तंत्राकडे पोचविला जातो. तिथे तंत्रिका कोशिकांतील क्रियांनी व बोधनक्रियांनी संदेशाची उकल केली जाऊन श्रोत्याला संदेश समजतो. याप्रमाणे वक्त्याच्या मनातील अर्थ श्रोत्याला समजतो म्हणजेच संदेशाची निर्मिती, वहन, ग्रहण व संदेशाची उकल अशा घटनांच्या साखळीने संचारण प्रक्रिया पूर्ण होते.

वाचेची रचना : वाचा ही वर्ण, अवयव, शब्द व वाक्ये यांची मिळून बनते. दोन भाषिक रचनांत कानांना जाणवण्याइतका फरक करू शकणाऱ्या वाचेच्या सर्वांत लहान खंडास ध्वनिखंड वा वर्ण असे म्हणतात (उदा., बिन–पिन, बिट्–बिड् इ. जोड्यांमधील ध्वनिरचनांमधील फरक). वर्ण ही अमूर्त संकल्पना आहे व तो सुटा उच्चारता येत नाही परंतु त्याच्या ध्वनिकीय तरंगरचनेत वैशिष्ट्यदर्शक सूचक चिन्ह किंवा संकेत असल्याने त्याचे सुटे आकलन होऊ शकते (आकलानाच्या दृष्टीने वर्ण हा वाचेचा सर्वांत लहान घटक असतो). अशा वर्णांच्या साखळीस अवयव म्हणतात व त्याचा सुटा उच्चार करता येतो (उच्चाराच्या दृष्टीने अवयव हा वाचेचा सर्वांत लहान घटक वा एकक असतो). अशा एक किंवा अनेक अवयवांचा शब्द बनतो व त्यास स्वतःचा विशिष्ट अर्थ असतो (अर्थाच्या दृष्टीने शब्द हा वाचेचा सर्वांत लहान घटक अथवा एकक असतो). अशा अनेक शब्दांच्या अर्थपूर्ण व व्याकरणदृष्ट्या योग्य जुळणीस वाक्य असे म्हणतात.

वाचाध्वनींची वा वर्णांची निर्मिती : याविषयीच्या माहितीकरिता ‘ध्वनिनिर्मिती’ या उपशीर्षकाखालील माहिती पहावी.

वाचेची ध्वनिकीय वैशिष्ट्ये : वाचेतील विशिष्ट ध्वनिसंकेत किंवा वाचेची ध्वनिकीय वैशिष्ट्ये यांचा अभ्यास म्हणजेच वाचा आकलनाचा अभ्यास हा वाचा संश्लेषणाची तंत्रे व वाचेच्या ध्वनि-वर्णपटांचे परीक्षण यांवरून करता येतो. [⟶ ध्वनि].

उच्चारणातील निरनिराळ्या कंप्रतांची तीव्रता ध्वनि-वर्णपटात कमी अधिक ठळकपणे दर्शविली जाते. त्यातील ठळक पट्ट स्वर किंवा स्वरसदृश ध्वनींच्या ध्वनि-गुणलक्षण घटकांना अनुसरून असतात परंतु स्वर, व्यंजने इ. ऐकणाऱ्याला जाणवणाऱ्या भाषिक खंडांशी ध्वनि-वर्णपटातील सुटे ध्वनिकीय खंड नेहमीच जुळतात असे नाही. ध्वनिकीय पातळीवर सुट्या खंडांच्या मालिकेच्या स्वरूपात वर्ण दर्शविले जात नाहीत, तर स्वर व व्यंजने अवयवात एकत्र होऊन हे अवयव ध्वनिकीय गुणधर्माचे वर्णावरील गुंतागुंतीचे आलेखन प्रतिबिंबित करतात. या दृष्टीने वाचेचे संकेत छापलेल्या मजकुरापेक्षा वेगळे असतात. छापलेल्या मजकुरात सुट्या अक्षरावर आधीच्या किंवा नंतरच्या अक्षराचा प्रभाव पडत नाही. उलट वर्णाच्या उच्चाराच्या (व आकलनाच्या) बाबतीत संदर्भाप्रमाणे (म्हणजेच आधीच्या व नंतर येणाऱ्या वर्णाप्रमाणे) बदल होतात (‘मानस ध्वनिकी’ या उपशीर्षकाखालील माहितीही पहावी).


ध्वनि-वर्णपट : ध्वनि-वर्णपटांच्या विश्लेषणातून व आकलनाच्या प्रयोगांतून काही नवीन गोष्टी उजेडात येत आहेत तसेच निरनिराळ्या उद्दीपकांच्या आकलनातील सुसंगतता, एकसारख्या उद्दीपकांच्या आकलनातील भेद व भोवतालचा भौतिक परिसर आकलनाच्या दृष्टीने आत (मेंदूत वा केंद्रीय तंत्रिका तंत्रात) कसा प्रतिबिंबित केला जातो, असे सर्वसाधारण आकलनासंबंधीचेच प्रश्न यातून निर्माण होत आहेत. या अभ्यासातून समजलेल्या काही गोष्टी खालीलप्रमाणे :

आ. ८. speech pictures या इंग्रजी वाक्यांशाचा ध्वनि-वर्णपट : आडव्या अक्षावर काल व उभ्या अक्षावर कंप्रता दर्शविलेल्याप्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणीच्या घटक कंप्रतांचा परमप्रसर तेथील बिंदूच्या काळेपणाने दाखविला आहे.(१) रेखीव गुणधर्म : ध्वनितरंगाकृतीत प्रत्येक वर्णाशी सहयोगी असा ध्वनिकीय माहितीचा विस्तार असतो परंतु वाचा विश्लेषणावरून वर्ण हे इतक्या साध्या रेखीय पद्धतीने बद्ध नसतात, असे दिसून आले आहे. अनेक वर्णांच्या बाबतीत ध्वनिकीय संकेत परस्परव्यापी असून ते जटिल रीतीने एकमेकांत मिसळतात.

(२) अविचलता: प्रत्येक वर्णासाठी ध्वनिकीय गुणधर्माचा संच सर्व संदर्भात उपलब्ध असतो तथापि आकलन झालेल्या संदर्भरहित वर्णाच्या बाबतीत सुजोड असा ध्वनिकीय संकेताचा विश्वसनीय संच अलग करणे संशोधकांना शक्य झालेले नाही. एकाच वक्त्याने एकाच ध्वनीच्या केलेल्या निरनिराळ्या निर्मितींत वाचा तरंगाकृतींमध्ये बराच मोठा भौतिकीय बदल आढळून आलेला आहे.

(३) प्राकृतीभवन : बोलण्याचा वेग, बोलण्याची शैली, बोलण्यातील दोष, बोलीभाषेचे वैशिष्ट्ये व बदल इत्यादींमुळे भाषिक संदेशात कितीही वेगळेपणा आला आणि श्रवणाची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ऐकणारा त्या वाचिक संदेशातील ध्वनि-आकृतीबंधाचे (व संदेशाच्या अर्थाचे) सामान्यतः व्यवस्थितपणे आकलन करू शकतो. ही गोष्ट अनेक प्रकारच्या प्राकृतीभवन प्रक्रियांमार्फत घडत असावी.

यांवरून असे सुचवण्यात आले आहे की, वाचेच्या आकलनात्मक विश्लेषणासाठी विशेष तंत्रिका तंत्रीय यंत्रणा व प्रक्रिया काम करत असाव्यात. काही वाचिक ध्वनींचे (उदा., स्फोटक व्यंजने) प्रकाराप्रमाणे आकलन होते व काहींचे नाही, असे सुचवणारे काही प्रयोग आणि उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या डाव्या बाजूचा प्रमतिष्कार्ध भाषिकदृष्ट्या प्रबळ व भाषिक विश्लेषणाच्या दृष्टीने विशेष पारंगत असतो. या कल्पनेला पुष्टी देणारे वर्तणुकीच्या अभ्यासातील पुरावे यांवरून वर सुचविलेल्या उपपत्तीला आधार मिळतो.

उपपत्ती : वाचिक ध्वनितरंगातील ध्वनिकीय माहितीचे आकलन कसे होते व बोलणाऱ्याच्या मनातील भाव वा अर्थ ऐकणारा कसे जाणतो यावर प्रकाश पाडण्यासाठी सुचविण्यात आलेल्या काही उपपत्ती खाली दिलेल्या आहेत.

(१) प्रेरक उपपत्ती : वाचानिर्मिती करताना वापरलेल्या प्रेरक संदेशांद्वारेच वाचा आकलन होते, असे ही उपपत्ती सुचविते. या दृष्टिकोनातून अविचलतेच्या नियमाचा प्रश्न सुटू शकतो कारण या उपपत्तीप्रमाणे विशिष्ट वर्णासाठी वेगवेगळ्या वेळी ध्वनिकीय संदेश वेगवेगळा असला, तरी त्या वर्णाचे आकलन एकसारखेच होते. कारण त्या वर्णासाठीची तरंगाकृती एकाच उच्चारण पद्धतीने निर्माण केलेली असते किंवा त्या उच्चारणामागची प्रेरक आज्ञा एकच असते म्हणजेच प्रेरक आज्ञेमधील अविचलतेमुळे ध्वनिसंकेतातील बदलांचे आकलन करताना भरपाई होते.

(२) संश्लेषणातून विश्लेषण : या उपपत्तीप्रमाणे, जेव्हा वाचा संदेशातील ध्वनी वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात संदर्भावर अवलंबून नसतात, तेव्हा या वाचा संदेशावरील परिसरीय प्रक्रियेनेच (ज्ञानेंद्रियात इतर प्रकारच्या ऊर्जांच्या स्वरूपात येणाऱ्या संदेशांचे तंत्रीकांतून वाहणाऱ्या विद्युत् संदेशांत रूपांतर करण्याच्या ज्ञानेंद्रियात घडणाऱ्या प्रक्रियेने) श्रवण संवेदनेचे ध्वनी वैशिष्ट्यांच्या स्वरूपात सरळ आलेखन करणे शक्य होते.

वाचा आकलनाच्या प्रक्रिया व वाचा निर्मितीच्या प्रक्रिया यांमध्ये जवळचा दुवा आहे, असे या दोन्ही उपपत्तींत गृहीत धरले आहे परंतु हा दुवा प्रेरक पातळीवर आहे असे प्रेरक उपपत्ती मानते, तर तो ध्वनिकी-तंत्रिका पातळीवर आहे, असे दुसरी उपपत्ती मानते.


(३) वैशिष्ट्ये वा गुणधर्म शोधक : या उपपत्तीप्रमाणे ध्वनी संदेशाच्या विशिष्ट गुणधर्मांना सूक्ष्मपणे संवेदनाक्षम असलेले गुणधर्म शोधक तंत्रिक तंत्रात असतात व येणाऱ्या ध्वनी संदेशातील विशिष्ट गुणधर्मांची ते नोंद घेतात. या नोंदींनुसार भाषिक व वाचिक वैशिष्ट्यांचे केंद्रीय तंत्रिका तंत्रात आकलन होते.

भाषाशास्त्रीय विचार : ध्वनिकीय गुणधर्मांचे खंड सुटे सुटे ओळखणे व त्यांचे विश्लेषण करणे एवढ्यावरच फक्त आकलन प्रक्रिया पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. संदर्भ, इतर ठिकाणांहून व इतर ज्ञानेंद्रियांमार्फत होणारे ज्ञान (उदा., बोलणाऱ्याच्या हालचाली व चेहेऱ्यावरील भाव यांचे डोळ्यांमार्फत होणारे ज्ञान) व पूर्वानुभव इ. गोष्टींचा उपयोग श्रोता वाचा आकलनासाठी करत असतो. उदा., काही प्रयोगांत, गोंगाट चालू असताना काही शब्द ऐकविल्यास, ते वाक्याच्या संदर्भात आले असल्यास श्रोत्याला समजले परंतु संदर्भरहित सुट्या शब्दांचे आकलन, ते जास्त स्पष्ट ऐकवूनसुद्धा, झाले नाही.

संभाषण प्रक्रिया : कल्पना मूक असते व मानवनिर्मित ध्वनी निरर्थक असतात. कल्पना व ध्वनी यांची सांगड घातली गेल्यास त्या विशिष्ट ध्वनीस अर्थ मिळतो. कल्पना व तिची अभिव्यक्ती यांचे बोधचिन्ह म्हणजे भाषिक संज्ञा होय आणि ती कल्पनासूचक किंवा अर्थपूर्ण विशिष्ट ध्वनीची बनलेली असते (किंवा इतर संदेशवहन पद्धतींत इतर विशिष्ट चिन्हांची बनलेली असते). भाषिक संज्ञेतील कल्पना व ध्वनी यांचा हा संबंध अकारण, समाजाने मुद्दाम ठरविलेला, परंपरागत व एकमेवाद्वितीय असतो.

विशिष्ट समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूत भाषिक संज्ञांचा साठा व त्या वापरण्याची विशिष्ट समाजमान्य पद्धत अव्यक्त स्वरूपात उपलब्ध असते, तिला भाषा (त्या समाजाची) असे म्हणतात व व्यक्तिमुखातून अर्थपूर्ण ध्वनींच्या स्वरूपात होणाऱ्या तिच्या विनिमयक्षम आविष्कारास वाचा असे म्हणतात (नोंदीच्या प्रारंभी दिलेल्या भाषा व वाचा यांच्या व्याख्याही पहाव्यात तसेच ‘भाषाशास्त्र’ या नोंदीतील ‘तत्त्वविचार’ या उपउपशीर्षकाखालील माहिती पहावी).

एक व्यक्ती दुसरीशी बोलते तेव्हा प्रथम व्यक्त करण्याच्या कल्पनेला अनुसरून भाषिक संज्ञा शोधल्या जातात आणि त्यांची व्याकरणशुद्ध व अर्थवाही वाक्यांत रचना केली जाते. ध्वनिनिर्मिती करणाऱ्या अवयवांना त्यानुसार विशिष्ट क्रमाने विशिष्ट ध्वनींच्या उच्चारणाचे आदेश प्रेरक तंत्रिकांद्वारे केंद्रीय तंत्रिका तंत्राकडून दिले जातात. याप्रमाणे पहिल्या (बोलणाऱ्या) व्यक्तीने ध्वनिर्मिती केल्यावर ते ध्वनी दुसऱ्या (ऐकणाऱ्या) व्यक्तीच्या कानावर पडतात. तेथून ऐकलेल्या ध्वनीची सूचना मेंदूपर्यंत गेल्यावर दुसरी (ऐकणारी) व्यक्ती स्वतःच्या मेंदूतील भाषिक संज्ञांशी हे ध्वनिसंकेत ताडून पाहून त्यांचा अर्थ लावते व सांगणाऱ्याच्या मेंदूतील कल्पना समजावून घेते (‘वाचा साखळी’ या उपउपशीर्षकाखालील माहिती पहावी). या कल्पनेला अनुसरून दुसरी प्रतिक्रियात्मक कल्पना दुसरी व्यक्ती पुन्हा पहिलीस ध्वनिसंकेतांच्या साहाय्याने (व याच वाचा साखळीद्वारे) सांगते. यास संभाषण म्हणतात व त्यात संदेशाचे एकाकडून दुसऱ्याकडे व उलट असे वहन ध्वनिमाध्यमातून होते.

चालू संभाषण नियंत्रित करण्यासाठी प्रतिसंभरणाचा उपयोग होतो. संभाषण कमीत कमी दोन व्यक्तींत व क्रियाप्रतिक्रिया या स्वरूपात होत असल्याने बोलणाऱ्याइतकेच ऐकणाऱ्या व्यक्तीला पण महत्त्व असते. ऐकणारी व्यक्ती, बोलणारी व्यक्ती वापरत असलेले शब्द, वाक्यरचना करण्याची पद्धत, शब्दांवरील जोर, मुद्रेवरील बोलण्याच्या व भावदर्शक हालचाली, शरीराच्या हालचाली इ. गोष्टींचा सतत अभ्यास करत असते. त्यानुसार बोलणाऱ्याच्या वाचा-वैशिष्ट्यांचा साचा बनविला जाऊन त्यानुसार बोलणाऱ्याचे महत्त्वाचे शब्द साच्यात बसविले जातात. परिचित व्यक्तीच्या बाबतीत तर तिच्या ध्वनी व वाचा वैशिष्ट्यांचा पूर्ण साचा कायम तयार असल्याने व विचाराची व वर्तणुकीची पद्धत माहीत असल्याने अर्धवट बोलण्याचा किंवा एखाद्या उद्‌गाराचा आशयही लगेच समजून येतो परंतु अपरिचित व्यक्तीच्या बाबतीत असा साचा तात्कालिक अभ्यासावर तात्काल बनविला जातो. या पद्धतीने सु. ४२% महत्त्वाचे शब्द समजल्यावर ९०%संभाषण आपोआप समजावून घेता येते. बहिरी व्यक्तीदेखील बोलणाऱ्या व्यक्तीचा मुद्राभिनय, शरीराच्या हालचाली व मुख्यतः ओठांच्या हालचाली यांवरून महत्त्वाचे शब्द तर्काने जाणून बोलण्याचा आशय समजावून घेते. याचाच उपयोग करून मूकबधिरांना ओष्ठवाचन शिकविले जाते. [⟶ अपंग : कल्याण व शिक्षण].

मानस ध्वनिकी : मानव व ध्वनिविश्व यांच्यातील सर्व मानसिक आंतरसंबंधांना आणि/किंवा आंतरक्रियांना मानस ध्वनिकी असे म्हणतात. त्यामुळे त्यात श्रवन व ध्वनि-आकलन (यातच वाचा आकलनाचा समावेश होतो) आणि वाचानिर्मिती यांच्याशी संबंधित सर्व अभ्यासांचा समावेश होतो.

श्रवण : साध्या ध्वनींच्या ज्या तरंगांचे [त्रिकोणमितीतील ‘ज्या’ गुणोत्तराच्या वक्राच्या आकारासारख्या तरंगांचे ⟶ त्रिकोणमिति] कंप्रता व परमप्रसर हे दोन भौतिक गुणधर्म असतात आणि उच्चनीचता (स्वरपद) व गरिमा हे जाणवणारे गुणधर्म असतात परंतु भौतिक गुणधर्म व जाणवणारे गुणधर्म यांच्यात एकास–एक असे नाते नसते. ध्वनीचा जाणवणारा गरिमा ध्वनितरंगाच्या तीव्रतेवर (परमप्रसरावर) मोठ्या प्रमाणात अवलंबून असला, तरी काही प्रमाणात तो कंप्रतेवरही अवलंबून असतो. तसेच ध्वनीची उच्चनीचताही प्रामुख्याने कंप्रतेवर अवलंबून असली, तरी काही प्रमाणात परमप्रसरावरही अवलंबून असते. याशिवाय वैयक्तिक ध्वनिवैशिष्ट्ये व वाद्यसंगीतातील ध्वनींच्या संदर्भात स्वरविशेषत्व इ. ध्वनींच्या इतर गुणधर्मांचाही विचार करावा लागतो.


ध्वनीचे अभिज्ञान व विवेचकक्षमता (दोन ध्वनी वेगवेगळे ओळखण्याची क्षमता) हे ध्वनीची कंप्रता, तीव्रता, वर्णपट इ. भौतिक गुणधर्मांवर तसेच पार्श्व गोंगाटाच्या आच्छादक परिणामावर अवलंबून असतात. [⟶ श्रवणक्रिया].

वाचा-आकलन : वाचा-ध्वनितरंगांतील ऊर्जा ५० ते १०,००० हर्ट्‌झ या कंप्रता मर्यादेत प्रेषित केली जाते. त्यातील २०० ते ७,००० हर्ट्‌झचे तरंग आकलनासाठी उपयुक्त माहितीचे प्रामुख्याने वहन करतात. या ऊर्जेचे आलेखन ध्वनि-वर्णपटाच्या स्वरूपात केले जाते व त्यावरून वाचा ध्वनितरंगांचा अभ्यास करता येतो. वाचेच्या ध्वनिवर्णपटांत स्वर हे काही विशिष्ट कंप्रतांमध्ये केंद्रीभूत झालेल्या ऊर्जापट्टांच्या स्वरूपात दिसतात. या ऊर्जा-पट्टांना ध्वनि-गुणलक्षण घटक असे म्हणतात. ध्वनिमार्गाच्या अनुस्पंदनी कंप्रतांशी ध्वनि-गुणलक्षण घटकांची वर्णपटावरील स्थाने जुळतात (म्हणजेच स्वरांच्या ध्वनि-गुणलक्षण घटकांमधील ऊर्जा ध्वनिमार्गाच्या अनुस्पंदनी कंप्रतांच्या ठिकाणी केंद्रीभूत झालेली असते).

जेथे व्यंजने ऐकू येतात ती स्थाने ध्वनि-वर्णपटात ध्वनिस्फोट, विराम व दोन ध्वनि-लक्षण घटकांमधील बदल या स्वरूपात दर्शविली जातात परंतु ध्वनि-वर्णपटातील एकाच संकेतावरून त्या ठिकाणचे व्यंजन ओळखणे प्रत्येक वेळी शक्य नसते. व्यंजनाचे आकलन फक्त त्या क्षणाच्या ध्वनिकीय संकेतावर अवलंबून नसून भोवतालच्या (पुढच्या व मागच्या) ध्वनिकीय माहितीच्या आकृतिबंधावर अवलंबून असते.

वाचेतील ऊर्जा मोठ्या प्रमाणात स्वरांमार्फत येत असली, तरी वाचेतून सांगितली जाणारी माहिती मुख्यतः व्यंजनांमार्फत मिळते.

वाचानिर्मिती : वाचा-ध्वनी म्हणजे फुप्फुसातून बाहेर सोडलेल्या हवेवर रोपण केलेले ध्वनिकीय आकृतिबंध होत. या आकृतिबंधांना अर्थ देणे व अशा अर्थपूर्ण ध्वनिकीय आकृतिबंधांचा समाजमान्य पद्धतीने संदेशवहनासाठी उपयोग करणे म्हणजे वाचानिर्मिती होय (‘वाचानिर्मिती’या उपशीर्षकाखालील माहिती पहावी).

वाचेच्या अभ्यासाच्या पद्धती : वाचेमध्ये श्वसन, उच्चारण, श्रवण व तंत्रिका तंत्राकडून या सर्वांवर ठेवण्यात येणारे नियंत्रण इ. शरीर क्रिया, स्वरयंत्र, कान, श्वसन, वायुगतिकी इत्यादींशी संबंधित यांत्रिक क्रिया, ध्वनी, वाचा, भाषा, अर्थ यांतील सांकेतिकता व परस्परसंबंध इ. तत्त्वविचार अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असल्याने त्या निरनिराळ्या अंगांनी व शास्त्रांच्या निरनिराळ्या शाखांमध्ये वाचेचा अभ्यास केला गेला आहे व केला जात आहे. या अभ्यासाच्या काही प्रमुख पद्धती खाली दिल्या आहेत.

श्वसनाचा अभ्यास : श्वसनाच्या वेळी श्वसनमार्गातील निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळी असलेल्या दाबांचे आलेख व विद्युत् स्नायुदर्शन (शरीराच्या सांगाड्यातील कार्यकारी स्नायूशी संबंधित असलेल्या विद्युत् क्रियेचे विशिष्ट उपकरणाद्वारे दृश्य नोंदीत वा ध्वनीत केलेले रूपांतर), तसेच श्वसन क्रियेतील हालचालींसाठी क्ष-किरण चलचित्रणाचा अभ्यास इ. पद्धतींनी हा अभ्यास केला जातो.

ध्वनिनिर्मितीचा अभ्यास : ध्वनिपटलांच्या हालचालींचे गुणधर्म समजावून घेण्यासाठी स्वरयंत्रापासून निरनिराळ्या ठिकाणी ध्वनिग्राहक ठेवून ध्वनिमुद्रण करणे, क्ष-किरण छायाचित्रण, ⇨ आवृत्तिदर्शक व उच्च वेगाचे चलच्चित्रण यांच्या साहाय्याने ध्वनिपटलांच्या प्रत्यक्ष हालचालींचे निरीक्षण करणे इ. पद्धती वापरल्या जातात. एकाच वेळी बोलणे, ध्वनिमुद्रित करणे व प्रत्यक्ष स्वरयंत्रात निरनिराळ्या ठिकाणी विद्युत् अग्रे खुपसून त्यांद्वारे बोलताना स्वरयंत्राच्या स्नायूंत निर्माण होणाऱ्या सूक्ष्म विद्युत् तरंगांचे आलेखन करणे व त्यांचा तौलनिक अभ्यास करणे अशा प्रकारचे प्रयोगही केले जात आहेत.

ध्वनिविचार म्हणजे वाचेतील ध्वनींचा अभ्यास, ही वाचेतील ध्वनींच्या अभ्यासाची मुख्य व रूढ पद्धत असून उच्चारणानुसार, श्रवणानुसार व भाषाशास्त्राच्या अनुषंगाने हा अभ्यास करता येतो. [⟶ ध्वनिविचार].

ज्ञानेंद्रिये, विशेषतः श्रवण व दृष्टी आणि सर्वसाधारण आकलन प्रक्रिया यांचा अभ्यास, मानस ध्वनिकीच्या दृष्टीने अभ्यास, तंत्रिका तंत्राचा व त्याच्या रोगांचा अभ्यास इ. वाचेच्या संदर्भात मेंदूत होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांच्या आकलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.


बोलणारा व ऐकणारा यांमधील प्रत्यक्ष दुवा व वाचासंदेशाच्या वहनाचे प्रत्यक्ष माध्यम असलेल्या ध्वनीचा अभ्यास भौतिकीच्या दृष्टीने केला जातो [⟶ ध्वनि ध्वनिकी ].

यांशिवाय मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान या मानव्य शाखांत, बालरोगविज्ञान, वृद्धत्वविज्ञान, नाक-कान-घसा, डोळे इ. वैद्यकीय शाखांत संदेशवहनशास्त्रात व संगणकशास्त्रात (माहितीचे आकलन, साठवण व आवश्यकतेप्रमाणे सुव्यक्तीकरण आणि मुख्यतः वाचिक सूचनांचे आकलन आणि कृत्रिम वाचा-ध्वनींची निर्मिती व वाचेने सुव्यक्तीकरण इ. संशोधनासाठी) त्या त्या विषयाच्या अनुषंगाने वाचेचा अभ्यास केला जातो.

वाचा-ध्वनींची कृत्रिम निर्मिती : वाचेची मूलभूत कल्पना व तिची कृत्रिम पुनर्निर्मिती यांची शास्त्रज्ञांना अनेक शतके मोहिनी घातलेली होती. प्रारंभीची बोलणारी यंत्रे ही साधी सर्कसमधील चलाखी वा सरळ लबाडी या स्वरूपाची होती. एका ऑस्ट्रियन हौशी ध्वनिविचारविज्ञांनी कृत्रिम रीतीने वाचा-ध्वनी निर्माण करणाऱ्या एका वायुदाब-यांत्रिक तत्त्वावर आधारलेल्या प्रयुक्तीचे १७९१ मध्ये एका पुस्तकाद्वारे वर्णन केले होते.

 विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध ध्वनिविचार प्रयोगशाळांनी कोडर, व्होडर (व्हॉइस ऑपरेशन डेमॉन्स्ट्रेटर) वगैरे नावांची ओळखण्यात येणारे निरनिराळे इलेक्ट्रॉनीय वाचा संश्लेषक तयार केले. सारतः हे संश्लेषक म्हणजे मानवी ध्वनिमार्गाची विद्युत् अनुरूपे होती. यांत योग्य प्रकारे रचना केलेल्या विद्युत् मंडलांनी वाचेसारखा सूर निर्माण होतो, तसेच या मूलभूत सुराच्या हरात्मक (पूर्णांकी गुणक असलेल्या कंप्रतांच्या) घटकांत भेद करणारे साधन आणि सीत्कार व इतर अघोषित व्यंजन ध्वनी निर्माण करण्यासाठी फुत्कार ध्वनी जनित्र तयार होतात. अनुस्पंदित विद्युत् मंडलांद्वारे प्रत्येक वाचा-ध्वनीच्या विशिष्ट ध्वनि-गुणलक्षण घटकांच्या सदृशीकरणासाठी विशिष्ट कंप्रता क्षेत्रात ऊर्जा संर्केद्रणे मिळतात. यांतून मिळणारे वाचासदृश ध्वनी चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतात व ते सलगपणे चालू असेपर्यंत आश्चर्यकारक इतके नैसर्गिक वाटतात. उदा., र या अक्षराच्या विविध उच्चार प्रकारांची नक्कल काही थोड्या तरफा वा बटने हालवून करता येते. तथापि अस्खलित वाचेतील इतर अनेक गुणविशेषांची (उदा., लगतच्या ध्वनींचे सह-उच्चारण, फेरबदल होणाऱ्या अनुनासिक ध्वनीचे उच्चारण, तसेच जोड उच्चारणातील इतर खंड-विशेष व अल्पकालिक बदल) नक्कल करताना अधिक अडचणी येतात. असे असले, तरी वाचा-ध्वनींचे आकलन व अभिज्ञान या बाबतींतील विविध भौतिक लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी वाचा संश्लेषकांची खूप मदत झालेली आहे.

वाचा संश्लेषकांची जोडीची प्रयुक्ती म्हणजे वाचा अभिज्ञातक होय. या प्रयुक्तीला ध्वनिग्राहक वा ध्वनि-प्रकाशीय प्रयुक्तीद्वारे वाचा संकेत मिळतात, त्यांतील ध्वनिकीय घटकांचे ती विश्लेषण करते व कागदावर टंकित आलेखीय खुणांच्या रूपात संकेतांचे रूपातंर होते. आधुनिक प्रतिमानांत (मॉडेल्समध्ये) सांगितलेला मजकूर सरळ टंकित करण्यासाठी लागणारी काही माहिती साठवून ठेवण्याकरिता संगणकाचा अंतर्भाव करतात. प्रारंभीच्या प्रतिमानांत सारखाच ध्वनी वाटणाऱ्या पण वर्णलेखन व अर्थ भिन्न असणाऱ्या शब्दांच्या (उदा. to, too, two) मोठ्या अडचणी येत. या शब्दांच्या बाबतीत भेद करण्यात मानवी रूपांतरणकारांना सामान्यतः अडचणी येत नाहीत कारण ते संदर्भ व एकूण प्रसंगावरून प्रत्येक शब्द समजण्यासाठी वाक्याचे मुख्य भाग लक्षपूर्वक ऐकतात. तथापि १९७० नंतरच्या दशकात विकसित झालेल्या संगणकित यंत्रांचे वाचा अभिज्ञानाच्या प्रत्येक तपशीलवार बाबीकरिता कार्यक्रमण करावे लागे. या बाबी सामान्यतः लोक अनेक वर्षांच्या शालेय शिक्षणाने आणि विशेषित प्रशिक्षणाने शिकतात. याखेरीज ही यंत्रे फक्त फार मर्यादित शब्दसंग्रहाकरिता परिणामकारक होती व प्रत्येक व्यक्तिगत वक्त्याकरिता ती जुळवून घ्यावी लागत असत. संकलित इलेक्ट्रॉनीय मंडलांचा व लवचिक कार्यक्रमणाचा उपयोग करणारी विविध वाचावैशिष्ट्ये लक्षात घेणारी संगणकित यंत्रे विकसित करण्यासंबंधी संशोधन करण्यात येत आहे.

वाचाविकृती : वाचानिर्मिती ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने व बाह्य उद्दीपकांना प्रतिक्रिया म्हणून किंवा (बाह्य उद्दीपकांशिवाय) अंतस्थ वैचारिक क्रियेचे प्रकटीकरण म्हणून वाचानिर्मिती होत असल्याने या सर्व प्रक्रियांच्या साखळीत (याच नोंदीतील ‘वाचा साखळी’, ‘वाचा आकलन’ व ‘संभाषण प्रक्रिया’ या उपशीर्षकांखालील माहिती पहावी) अनेक ठिकाणी अनेक कारणांनी दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या वाचाविकृती निर्माण होऊ शकतात. सोयीसाठी व अभ्यासासाठी उपयुक्त होण्याकरिता वाचाविकृतींचे कारणांप्रमाणे, विकृती होण्याच्या वाचा-साखळीतील ठिकाणाप्रमाणे किंवा लक्षणांप्रमाणे इ. अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते.

कारणांप्रमाणे वर्गीकरण : वाचाविकृतींची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे : (१) शारीरिक रोग : यात वाचेशी संबंधित श्रवण अवयव, तंत्रिका तंत्र व ध्वनिनिर्मिती अवयवांचे रोग, विकृती किंवा अभाव यांमुळे होणाऱ्या वाचाविकृतींचा समावेश होतो. (२) अनुकरणात्मक व पर्यावरणात्मक विकृती : यांमध्ये चुकीच्या वा अयोग्य भाषिक वातावरणामुळे मुलाने वा चुकीच्या उच्चारणपद्धती व भाषिक/वाचिक वैशिष्ट्यांचे अनुकरण करण्यामुळे निर्माण होणाऱ्या वाचाविकृतींचा समावेश होतो. (३) मानसिक रोग किंवा विकृतींचा परिणाम म्हणून आढळणाऱ्या वाचाविकृतींना मानसोद्‌भव वाचाविकृती असे म्हणता येईल. या प्रकारचे वर्गीकरण अनुभवात्मक ज्ञानावर अवलंबून असून उपचारांसाठी उपयुक्त ठरते परंतु यात शारीरिक रचना व कार्य वेगळे करता येत नाहीत, हा त्यावरील मुख्य आक्षेप आहे. वरील मुख्य गटांमध्ये ऐकू येणाऱ्या वाचाध्वनींतील दोषांवरून उपविभागणी करण्यात येते. ती ऐकणाऱ्याच्या वैयक्तिक जाणिवेवर अवलंबून असून ती मूळ कारणांऐवजी शेवटच्या श्रवणीय परिणामांनुसार असते, हे त्यावरील आक्षेप आहेत. आता वैद्यकीय, मानसशास्त्रीय, मनोविकृतिवैज्ञानिक शिक्षणशास्त्रीय व वर्तणूकशास्त्रीय अभ्यासाने वर्गीकरणाच्या जास्त चांगल्या पद्धती उपलब्ध होत आहेत आणि त्यांत वर्गीकरण मुख्यतः मूळ कारणाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु हे शारीरिक विकृतींच्या संदर्भात सोपे असले, तरी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या क्रियात्मक विकृतींच्या संदर्भात अवघड आहे.


समाजातील वाचाविकृतींच्या प्रादुर्भावाच्या उदाहरणादाखल अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील १९६९ ची आकडेवारी कोष्टकात दिली आहे.

वाचाविकृतींचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील अंदाजित प्रादुर्भाव (१९६९).

वाचा समस्येचा प्रकार

सर्व वयांच्या व्यक्ती

टक्केवारी

संख्या

क्रियात्मक उच्चारणाबाबत

३.०

६०,००,०००

तोतरेपणा

०.७

१४,००,०००

ध्वनी

०.२

४,००,०००

खंडतालू वाचा

०.१

२,००,०००

मस्तिष्क पक्षाघात वाचा

०.२

४,००,०००

खुंटलेला अप्रगत वाचाविकास

०.३

६,००,०००

बिघडलेली श्रवणक्रिया (वाचाविकृतीसह)

०.५

१०,००,०००

एकूण

५.०

१,००,००,०००

सर्वसाधारणपणे सगळीकडे या प्रमाणात वाचाविकृती आढळतात, असे म्हणता येईल. या निरीक्षणांहून वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणा काही ठिकाणी आढळतो. उदा. ⇨ खंडतालू ही आनुवांशिक विकृती अमेरिकेतील इंडियन जमातींत मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच ती कॉकेशियन, जमातीपेक्षा निग्रो जमातीत खूप कमी प्रमाणात आढळते. तोतरेपणा ही विकृती उत्तरेकडील (विशेषतः स्कँडिनेव्हियन देशांत) व अतिपूर्वेकडील देशांत जास्त आढळते. क्रियात्मक किंवा भावनिक/मानसिक प्रकारांत मोडणाऱ्या विकृती (उदा. शिक्षक किंवा गायकांत आढळणाऱ्या ध्वनिपटलावरील लहान गाठी, स्पर्शव्रण इ.) मानसिक तणावाच्या निदर्शक असल्याने खेड्यांच्या तुलनेत शहरी भागांत त्या जास्त आढळतात.

लक्षणांप्रमाणे वर्गीकरण : उच्चारणाच्या विकृती : स्वरयंत्रापुढील उच्चारण अवयवांच्या विकृतींमुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे या विकृती निर्माण होतात व त्या सौम्य उच्चारण दोषापासून बोलणे समजू न शकण्याइतक्या तीव्र स्वरूपाच्या असू शकतात. त्यांत विशिष्ट ध्वनींचे किंवा ध्वनींच्या गटांचे उच्चार गाळले जातात, विकृत केले जातात किंवा त्यांच्या जागी दुसरे ध्वनी वापरले जातात. जिव्हाग्रावरील ताबा कमी असल्याने जिव्हाग्राचा उपयोग करून निर्माण होणाऱ्या ध्वनींत (उदा.र, ल, ट, ड इत्यादी) येणाऱ्या विकृतीला बोबडेपणा असे म्हणतात. ‘स’ कारात्मक (उदा., स, श, ष, ज, झ इत्यादी) ध्वनींच्या ठिकाणी थ सारखे ध्वनी उच्चाररले गेल्याने बोलणे समजण्यात अडचण येते, अशा विकृतीस सीत्कार दोष असे म्हणतात. शारीरिक आणि/किंवा मानसिक वाढ संथ असल्याने खूप उशीरापर्यंत (मोठ्या वयापर्यंत) वाचेत अनेक व्यंजनांचा अभाव असतो व त्यामुळे बोलणे समजण्यात अडचण येते. अशा विकृतीस उशीरा बोलणे किंवा वाचा विलंब (याचे वर्णन पुढे दिले आहे) असे म्हणतात. उच्चारण अवयव किंवा तंत्रिका तंत्राच्या विकृतींमुळे वा रोगांमुळे निर्माण होणाऱ्या सर्वसाधारण उच्चारण विकृतीस व एकाऐवजी दुसरे बदली उच्चारण केले जाते त्यास कष्टोच्चारण असे म्हणतात. तसेच जीभ, ओठ, जबडा, घसा, तालू यांच्या स्नायूंच्या क्रियांतील सुसंवादित्व नष्ट झाल्यासही कष्टोच्चारण व कष्टवाक्यरचना (‘वाचाभंग’ या पुढे दिलेल्या विकृतीसंबंधीची माहिती पहावी) या प्रकारच्या विकृती होतात. मेंदूपासून या अवयवांपर्यंत येणाऱ्या प्रेरक तंत्रिका मार्गांना जवळजवळ सात-आठ ठिकाणी इजा पोहोचून अशा प्रकारच्या विकृती निर्माण होतात (उदा. छद्म कंद पक्षाघात, कंद पक्षाघात, उपरिकंद पक्षाघात, प्रगतिशील कंद पक्षाघात, मस्तिष्क तंत्रिका पक्षाघात, ऊर्ध्व–प्रेरक तंत्रिका कोशिका रोग, अधर–प्रेरक तंत्रिका कोशिका रोग इत्यादी).

बोलण्याची लय व वेग बदलल्याने होणाऱ्या विकृती : (अ) तोतरेपणा : ही विकृती मोठ्या प्रमाणात आढळून येत असून वयाच्या साधारण तिसऱ्या चवथ्या वर्षापासून व मुलग्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. तोतरेपणाच्या कारणांचे स्पष्टीकरण देणाऱ्या अनेक उपपत्ती आहेत परंतु कोणतीही समाधानकारक नाही. प्राथमिक तोतरेपणात शब्दाच्या सुरुवातीचा ध्वनी, प्रथम अवयव, पूर्ण शब्द किंवा वाक्याचा सुरुवातीचा भाग बोलणाऱ्याला नकळत पुनःपुन्हा उच्चारला जातो. याउलट दुय्यम तोतरेपणात बोलणाऱ्याला कळत असूनही ध्वनिनिर्मितीचे स्नायू बराच काळ अंगग्रह अवस्थेत (अनैच्छिक व अपसामान्य आकुंचित अवस्थेत) राहिल्याने त्–त्, प्–प् असे अर्धवट उच्चार वारंवार केले जातात. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक ताणाची लक्षणे, काही वेळा चेहेरा व शरीर वेडेवाकडे होणे व शरीराला झटके येणे इ. गोष्टी दिसून येतात. मानसिक ताण वाढविणाऱ्या विशिष्ट परिस्थितीत हा तोतरेपणा वाढतो. ही काही वैशिष्ट्ये रोग्याच्या इतर नातेवाईकांतही आढळतात आणि त्या कुटुंबातील वातावरण व वागणुकीच्या कल्पना इतरांहून वेगळ्या आढळतात. अनेकदा तोतरेपणा, डावखोरेपणा, अधिहृषता (ॲलर्जी), जुळी होण्याची प्रवृत्ती, वारंवार श्वसनमार्गाचे रोग इ. गोष्टी एकत्र, एकाच कुटुंबात व पिढ्यान्‌पिढ्या आढळतात. त्यामुळे आनुवांशिकता हे तोतरेपणाचे कारण असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नीतिनिष्ठुर, ध्येयाने भारलेले, पाप पुण्याचा अती विचार करणारे कौटुंबिक वातावरण व साधे, नम्र, पापभिरू, ध्येयवादी, प्रावीण्यवादी व्यक्तिमत्व यांवरून तोतरेपणाची मानसिक व पर्यावरणात्मक कारणेही असू शकतील. तसेच लोकमताला भिऊन वागण्याची व स्वतःच्या तोतरेपणाला स्वतःच्या पापांची शिक्षा मानण्याचीही प्रवृत्ती असू शकते. यांशिवाय तोतरेपणाच्या रोग्यांत रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढलेले आढळणे, मधुमेह होण्याची शक्यता, हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा, केसांचा रंग, कातडी, डोळे, शरीराची ठेवण, हाडांचा बळकटपणा इत्यादींमधील विकृती चयापचयाच्या (शरीरात सतत घडून येणाऱ्या भौतिक–रासायनिक घडामोडींच्या) व हार्मोनांच्या (शरीरात उत्पन्न होणाऱ्या विशिष्ट उद्दीपक द्रव्यांच्या) असंतुलनाचे परिणामही आढळून येतात. यावरून तोतरेपणा हा सर्वसाधारण चयापचयाच्या व ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथींच्या असंतुलनाच्या परिणामांपैकी एक परिणाम असण्याचीही शक्यता आहे. प्राथमिक तोतरेपणात तोतरेपणाची जाणीव न देता व मुख्यतः वाचाशिक्षणाद्वारे उपचार करावे लागतात. दुय्यम तोतरेपणात, शारीरिक रोग आढळल्यास त्यावरील उपचार व रोग्यास विकृतीची पूर्ण माहिती देणे, आत्मविश्वास वाढविणे, जाणीवपूर्वक अनावश्यक हालचाली कमी करण्यास शिकविणे व वाचा उपचार इ. मार्गांनी उपचार करावे लागतात.


(आ) घसरट वाचा : यामध्ये अयोग्य शब्दयोजना, अयोग्य वाक्यरचना व उच्चारणाचा अनावश्यक जास्त वेग यामुळे बोलताना शब्दांचे काही अवयव वगळले जातात व काहींचा उच्चार निसटता, वरवर व घसरट केला जातो.

(इ) तंत्रिका तंत्राच्या काही विकृतींत वा रोगांमध्येही बोलण्याची लय बिघडल्याने होणाऱ्या वाचाविकृती दिसतात. उदा. (१) प्रमस्तिष्क पक्षाघातात अनेकावयवी शब्दोच्चारांस आवश्यक असलेल्या श्वसनाच्या स्नायूंवरील व एका ध्वनीतून दुसऱ्या ध्वनीत सफाईदार बदल करण्यास आवश्यक असलेल्या उच्चारणाच्या स्नायूंवरील ताबा कमी असणे यांमुळे अंगग्रही वाचा ही विकृती निर्माण होते. (२) पार्किनसन रोग [ ⟶ कंपवात], बहु-कर्कशीभवन (मेंदूत वा मेरुरज्जूत कठीण झालेल्या ऊतकांचे तुकडे आढळून येणारी विकृती) व निमस्तिष्काची अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) यांमुळे नेहमीच्या बोलण्याच्या ओघात हिसके व खटके आल्याने अडथळा निर्माण होऊन हातापायांना सतत मंद गती देण्याच्या प्रवृत्तीसह वाचा विकृती निर्माण होते.

उच्चारित ध्वनींतील दोषांमुळे होणाऱ्या विकृती : (अ) ध्वनिस्तरातील दोष : लहान स्वरयंत्र किंवा मानसिक ताणामुळे स्वरयंत्रातील स्नायू जास्त ताणलेल्या अवस्थेत असणे यामुळे जरूरीपेक्षा जास्त वरच्या ध्वनिस्तरात बोलले जाते. तसेच काही वेळा स्वतःच्या बोलण्याच्या ध्वनिस्तरांतील चढ-उतार समजून घेण्यात अडथळा आल्याने व्यक्ती एकाच ध्वनिस्तरात किंवा वारंवार येणाऱ्या स्वरांच्या एकाच आकृतिबंधात बोलत राहते.

(आ) आवाजाच्या जातीतील वा गुणवत्तेतील दोष : (१) घोगरेपणा: स्वरयंत्राच्या किंवा घशाच्या रोगांत, विशेषतः ध्वनिपटलांना सूज असल्याने, इजा झाल्यास आवाजाच्या अयोग्य वापराने व कर्करोग इ. कारणांमुळे ध्वनिपटलांची कंप पावण्याची क्षमता कमी झाल्याने आवाजात घोगरेपणा येतो. स्वरयंत्र तंत्रिकेच्या पक्षाघातानेही घोगरेपणा येतो.

(२) अनुनासिक आवाज : या प्रकारचा दोष ⇨ खंडतालू या विकृतीत किंवा मृदू तालूच्या स्नायूंच्या पक्षाघातामध्ये दिसून येतो. कारण काही उच्चार करताना आवश्यक असलेली, नाकाचा मार्ग पूर्ण बंद करण्याची क्रिया करण्यास तालू असमर्थ बनते किंवा तालूतील फट उघडीच राहते. त्यामुळे सर्वच ध्वनींना व विशेषतः स्वरांना अनुनासिकत्व येते.

खंडतालू ही जन्मजात विकृती असून गर्भाची वाढ होताना (गर्भावस्थेतील अंदाजे ७ ते १२ आठवड्यांच्या वाढीच्या काळात) ओठ, वरील दात, कठीण तालू व मृदू तालू यांचे डावे व उजवे भाग कमीजास्त प्रमाणात एकत्र न जुळल्याने होणाऱ्या विकृतीचा तो एक प्रकार आहे. विकृतीच्या प्रमाणानुसार फक्त तालुपट किंवा फक्त ओठ फाटलेला [⟶ खंडौष्ठ] असण्यापासून ते संपूर्ण नाक व तोंडाची एकच पोकळी असण्यापर्यंत अनेक विकृती उद्‌भवू शकतात. काही वेळा दोन फटीही असतात. ही विकृती होण्याचे नक्की कारण माहीत नसले, तरी बहुधा अप्रभावी आनुवांशिक लक्षणाच्या स्वरूपात ती दिसते. या विकृतीमुळे उच्चारित ध्वनींत अनुनासिकत्व येणे इतकाच फक्त दोष आढळत नसून विकृतीच्या प्रमाणानुसार व ठिकाणानुसार ओष्ठ्य, दंत्य व तालव्य व्यंजनांच्या उच्चारातही दोष असतात. या सर्व गोष्टींआधी जन्मतःच चोखण्याची क्रिया जमत नसल्याने सर्वांत आधी बालकाच्या पोषणाचा प्रमुख प्रश्न असतो. तसेच शरीरातील इतरही (विशेषतः हृदयाच्या) जन्मजात विकृती आढळण्याची शक्यता असल्याने त्यांचाही शोध घेऊन त्यानुसार उपचार करावे लागतात. वरील गोष्टींची काळजी घेतल्यावर साधारण एक वर्ष वयाच्या सुमारास (वाचाविकास सुरू होण्याआधी) शस्त्रक्रियेच्या साहाय्याने दोष सुधारला जातो. म्हणजे वाचाविकृती फारशा उद्‌भववत नाहीत. योग्य वयात योग्य उपचार न केल्यास वरीलप्रमाणे गंभीर वाचाविकृती होऊ शकतात. नंतर शस्त्रक्रिया व वाचा उपचारांच्या साहाय्याने त्यांत सुधारणा होऊ शकते.

याशिवाय विशिष्ट शारीरिक दोष नसताना एखाद्या बोली भाषेचे, विशिष्ट समाजाचे, जमातीचे किंवा प्रादेशिक वैशिष्ट्य म्हणूनही वाचाध्वनींत कमी अधिक प्रमाणात अनुनासिकत्व आढळते.

(३) ध्वनीचे निर्नासिकीभवन : नाकाच्या मार्गाचे रोग उदा., सर्दी, सूज, नाकातील कुर्चेची वाढ, मांसवृद्धी, विचलित नासापटल [⟶ नाक], ग्रसनी गिलायूंची [⟶ ॲडिनॉइडे] सूज आणि वाढ, घसा व नाकातील अर्बुदे व नाकाचे मागचे भोक जन्मतः बंद असणे यामुळे नाकाचा मार्ग योग्य वेळी खुला न झाल्याने अनुनासिक (मूर्धन्य) ङ, ण, न, ग वगैरे उच्चार बद्द येतात आणि असे बोलणे समजण्यात अडचण येते.


(४) ध्वनीचा अभाव व कष्टध्वनी : ध्वनिपटलांच्या स्नायूंच्या पक्षाघात किंवा स्वरयंत्र शस्त्रक्रियेने काढलेले असणे यामुळे सकंप ध्वनी निर्माण होऊ शकत नाहीत. या विकृतीला ध्वनीचा अभाव असे म्हणतात. मात्र निष्कंप ध्वनींच्या साहाय्याने पुटपुटल्यासारखे किंवा कुजबुजल्यासारखे बोलणे शक्य असते. काही वेळा ही विकृती किंवा आवाजातील घोगरेपणा ⇨उन्माद या मानसिक विकृतीत आढळतो व त्यावर मानसोपचार उपयुक्त ठरतात. स्वरयंत्रात बिघाड होऊन मूळ स्वर निर्माण होण्यात अडचण येते किंवा त्रास होतो त्यास कष्टध्वनी असे म्हणतात. ध्वनिपटलांचा शोथ (दाहयुक्त सूज), क्षय, उपदंश यांच्यामुळे व कर्करोगामुळे ध्वनिपटलांवर गाठी किंवा अर्बुदे येणे, आवाजाचा दुरुपयोग किंवा शिक्षक, फेरीवाले, गायक इ. आवाजाचा सतत उपयोग करणाऱ्या व्यक्तींच्या ध्वनिपटलांवर येणाऱ्या छोट्या गाठी ही कष्टध्वनीची कारणे आहेत. यांपैकी बहुतेक कारणांमुळे आवाजात घोगरेपणाही येतो.

(५) बायकी आवाज : आनुवंशिक वा जन्मजात लहान स्वरयंत्र किंवा मानसिक कारणांमुळे पुरुषांत असा आवाज आढळतो.

प्रतीक प्रक्रियेतील दोष : ध्वनी किंवा अक्षराच्या खुणांना अर्थ देणे व विशिष्ट भाषिक वैशिष्ट्ये आत्मसात करणे इ. प्रक्रिया (भाषा तयार होण्याच्या प्रक्रिया) व त्या आधारे भाषेचे आकलन करणे वा ती व्यक्त करणे यांमध्ये दोष निर्माण झाल्याने होणाऱ्या वाचाविकृतींचा यात समावेश होतो.

(अ) वाचाभंग : बोली किंवा लिखित भाषेचा प्रतीकात्मक पद्धतीने उपयोग (वाचा आकलन आणि वाचानिर्मिती) करण्याच्या असमर्थतेस वाचाभंग असे म्हणतात. तो मस्तिष्काच्या इजेमुळे वा रोगांमुळे वा विकृतींमुळे होत असून उच्चारण अवयवांतील स्नायूंचा पक्षाघात, या स्नायूंची असंबद्ध व समकालिक नसलेली हालचाल, श्रवणदोष किंवा दृष्टिदोष, बेशुद्धी आणि संदेशवहनाच्या वा व्यक्त करण्याच्या इच्छेचा अभाव ही त्याची कारणे असू शकत नाहीत.

वाचाभंगाचे खालीलप्रमाणे प्रकार करण्यात येतात.

(१) सुव्यक्तिकरणात्मक वाचाभंग : या विकृतीत आकलन आणि विचारशक्ती सुस्थितीत असते परंतु मनातील प्रतिक्रियात्मक अथवा विचारात्मक संकल्पना भाषेच्या माध्यमातून (बोलून किंवा लिहून) व्यक्त करणे अशक्य होते (वाचानिर्मितीशी संबंधित असलेले स्नायू कार्यक्षम असतानाही हे होते).

(२) ग्रहणक्षम वाचाभंग : भाषिक प्रतीकांचे (ऐकलेले ध्वनी व पाहिलेली अक्षरे) आकलन व झाल्याने ही विकृती होते (ऐकणे व पाहण्याशी संबंधित असलेली ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असतानाही हे होते).

आ. ९. ज्यांना अपाय झाल्यास वाचाभंग होतो असे मानण्यात येणारी प्रमस्तिष्क बाह्यकातील क्षेत्रे. तुटक रेषांच्या आतील क्षेत्रांना विद्युत् रीत्या उद्दीपित केले असता वाचाभंगाला प्रतिरोध होतो असे दिसून आले आहे : (१) सुव्यक्तिकरणात्मक वाचाभंग, (२) लेखनाघात, (३) ग्रहणक्षम वाचाभंग, (४) विस्मृतीय वाचाभंग.(३) विस्मृतीय वाचाभंग : वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव, घटना किंवा नातेसंबंध (वस्तु–वस्तूंतील वस्तु–माणसातील किंवा माणसामाणसांतील) योग्य वेळी न आठवणे असे या विकृतीचे स्वरूप असते.

(४) काही वेळा वरील तिन्ही प्रकारांच्या कमी अधिक मिश्रणाने निर्माण झालेल्या विकृती दिसतात. तसेच काही वेळा लिहिण्याची व वाचण्याची कुवत नाहीशी होते तेव्हा त्या विकृतीस लेखनाघात असे म्हणतात. व्याकरणशुद्ध व अर्थपूर्ण वाक्यरचना पूर्ण करण्याची कुवत नष्ट झाल्यास ‘वाक्यरचनात्मक वाचाभंग’ असे म्हणतात. ऐकलेला एकच शब्द किंवा वाक्याचा भाग किंवा म्हण पुनःपुन्हा उच्चारत राहण्याच्या विकृतीस ‘पुनरुच्चारण विकृती’ असे म्हणतात. अनेक भाषा बोलणाऱ्या पंडितांच्या मेंदूस इजा पोचल्यास मातृभाषेशिवाय इतर भाषांवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.

मस्तिष्काचे रोग (शोथ, क्षय, उपदंश, विद्रधी–म्हणजे भोवती शोथयुक्त ऊतक असलेल्या स्थानीकृत पुवाचा संचय–इ.) इजा, मस्तिष्क वाहिनी–अपघात, मस्तिष्काची अर्बुदे व अपकर्षकारक विकृतिस्थळे ही सर्वसाधारण वाचाभंगाची कारणे असतात. जन्म होण्याआधी, जन्म होताना किंवा जन्म झाल्यावर लगेच मस्तिष्काला इजा पोहोचल्यास (प्रत्यक्ष इजा किंवा ऑक्सिजन पुरवठ्यातील व्यत्ययामुळे झालेली इजा) किंवा मस्तिष्काची वाढ खुंटल्यास अगदी लहान मुलांमध्येही या प्रकारच्या विकृती आढळून येतात. तसेच कोणत्याही उघड कारणाशिवाय, अगदी वृद्ध व्यक्तींत वृद्धापकाळच्या विस्मरणाचा भाग म्हणूनही या विकृती दिसू शकतात.


निरनिराळ्या वाचाभंग विकृतींच्या स्वरूपावरून निरनिराळ्या वाचाकेंद्रांची संकल्पना तंत्रिका तज्ञांनी मांडलेली आहे. मस्तिष्कातील सिल्व्हिअस नालाच्या (फ्रांस्वा दे ले बोए सिल्व्हिअस या फ्रेंच शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या नालाच्या) भोवतालच्या ललाट, शंखक, पार्श्वललाट खंडांच्या भागांना भाषा किंवा वाचा क्षेत्र समजण्यात येते. ही क्षेत्रे उजव्या हाताच्या व्यक्तींत प्रामुख्याने प्रमस्तिष्काच्या डाव्या अर्धगोलात निर्माण होतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या प्रमस्तिष्काच्या डाव्या भागात इजा व रोग झाल्यासच वाचाभंगाच्या विकृती निर्माण होऊ शकतात. डावखोऱ्या व्यक्तीत वाचा क्षेत्रांची अशी बाजूनिश्चिती झालेली नसते व व्यक्तीपरत्वे अनियमितपणे काही क्षेत्रे डाव्या व काही उजव्या अर्धगोलात निर्माण झालेली असतात. त्यामुळे दोन्ही अर्धगोलांतील इजांमुळे वा रोगांमुळे अशा व्यक्तींना वाचाभंग होऊ शकतो.

वाचाभंगाचे अनेक रोगी पाहिल्यावर लक्षणांचे काही विशिष्ट प्रकार व आकृतीबंध सर्वसाधारणपणे दृष्टीस येतात. मस्तिष्क इजेच्या स्थानाप्रमाणे फक्त उच्चारणात, फक्त संकल्पनांची नावे आठवण्यात, वाक्यरचना करण्यात, ऐकलेला ध्वनी व लिखित शब्द समजण्यात व पुनरुच्चारणात दोष निर्माण होतात. तसेच बोलण्यात चुकीचे शब्द येणे किंवा शब्दांच्या वा ध्वनींच्या निरर्थक संयोगांचा उपयोग करणे व तोंडी वाचनात किंवा लेखनात दोष निर्माण होणे इ. विकृती संभवतात. इजेच्या स्थानाप्रमाणे सर्वसाधारणपणे दिसणारे लक्षणसमूह खालीलप्रमाणे :

(क) स्खलित वाचाभंग : लूईजी रोलांदो या इटालियन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या रोलांदिक किंवा मध्य सीतेच्या (खाचेच्या) अग्रभागी असलेल्या वाचाक्षेत्रास (ब्रॉका क्षेत्रास) इजा पोहोचली, तरी श्रवणीय व दृश्य आकलन चांगले टिकून राहिलेले असते परंतु वाक्यरचना योग्य प्रकारे करता येत नाही व उच्चारण कष्टसाध्य असते. याच प्रकारांना सुव्यक्तिकरणात्मक किंवा प्रेरक वाचाभंग म्हणता येईल.

(ख) अस्खलित वाचाभंग : मध्य सीतेच्या पाठीमागील वाचा क्षेत्रांना इजा झाल्यास बोलण्याचा वेग, उच्चारण व व्याकरणशुद्ध वाक्यरचना, या गोष्टी टिकून असतात (व्यक्ती अस्खलित बोलते) परंतु भाषेची समज किंवा आकलन व योग्य शब्दांची निवड या गोष्टींवर मोठा परिणाम झालेला असतो. याचे तीन मुख्य प्रकार संभवतात.

(ख) व्हर्निके वाचाभंग : यालाच ग्रहणक्षम वाचाभंग असेही म्हणता येईल. यामधे पहिल्या शंखक खंडीय संवेलकाच्या पाठीमागील भागास (व्हर्निके क्षेत्रास) इजा झाल्याने श्रवणीय आकलन बिघडलेले असते आणि वाचा अस्खलित, नेहमीपेक्षा जास्त वेगाने परंतु मोठ्या प्रमाणात अनावश्यक व निरर्थक शब्द घुसडलेली असते.

(ख) नामवाचक वाचाभंग : शंखक खंड व पार्श्वललाट खंड यांच्या संधीच्या जवळ इजा झाल्यास या प्रकारचा वाचाभंग संभवतो. त्यात आकलन, व्याकरणशुद्ध वाक्यरचना व उच्चारण यांवर परिणाम झालेला नसतो परंतु विशेषनामे व संदेशवाहक क्रियापदे आठवत नाहीत.

(ख) संवाहनात्मक वाचाभंग : यात आकलन चांगले व बोलणे अस्खलित असते परंतु पुनरुक्ती करण्याची क्षमता नाहीशी होते. पार्श्वललाट प्रच्छदाच्या खालील पांढऱ्या भागाच्या इजेमुळे खूप वेळा अशी विकृती होऊ शकते.

(ग) प्रमस्तिष्कांतरित वाचाभंग : यामध्ये पुनरुक्ती व पाठ केलेले अस्खलित म्हणणे या क्षमता कायम राहतात परंतु वाचेचा संभाषणात्मक उपयोग करण्याची क्षमता नष्ट होते. यामध्ये इजेच्या स्थानाप्रमाणे अग्र प्रमस्तिष्कांतरित–प्रेरक व पश्च प्रमस्तिष्कांतरित संवेदनात्मक असे प्रकार असू शकतात.

मोठ्या प्रमाणात व सर्व वाचाकेंद्रांवर पसरलेली इजा असल्यास होणाऱ्या वाचाभंगास संपूर्ण वाचाभंग असे म्हणतात.


विशिष्ट वाचाक्षेत्रांच्या इजांप्रमाणे वाचाभंगाचे विशिष्ट प्रकार वर वर्णिलेले असले, तरी बहुधा इजा वा मूळ रोग किंवा विकृती अनेक ठिकाणी उद्‌भवलेली असल्याने किंवा अधिक क्षेत्रांवर पसरलेली असल्याने संमिश्र प्रकार दिसतात. तसेच सर्वसाधारणपणे मस्तिष्काच्या रोगांत, इजांत वा विकारांत व्यक्तिगत वर्तणुकीत व लक्षणांत खूप विविधता दिसत असल्याने वाचाभंग विकृतींचा अभ्यास करणे व वाचाक्षेत्रांतील वाचाकेंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्थानांना विशिष्ट व नेमके कार्य नेमून देणे (मस्तिष्कातील विशिष्ट स्थान व विशिष्ट कार्य यांचा एकास-एक संबंध जोडणे) या गोष्टींस मर्यादा पडतात.

मस्तिष्काच्या एकाच डाव्या अर्धगोलाला इजा झाल्याने होणारा वाचाभंग लहानपणी झालेला असेल, तर अशा मुलांची वाचा लवकर व मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. कारण वाचाकेंद्रे तोपर्यंत डाव्या बाजूला स्थिरावलेली नसल्याने उजव्या बाजूसही निर्माण होऊ शकतात परंतु वाढत्या वयाबरोबर वाचाकेंद्रे (उजव्या हाताच्या व्यक्तींत) डाव्याच बाजूस जसजशी स्थिरावत जातात तसतशा त्या केंद्राच्या इजांमुळे होणाऱ्या वाचाभंग विकृती सुधारण्याची क्षमता कमी कमी होत जाते. प्रौढांत संपूर्ण सुधारणा अशक्य असून (मूळ रोग बरा झाल्यावर) भाषा शिक्षणाशिवाय इतर उपचार उपयुक्त ठरत नाहीत.

(आ) वाचा-विलंब : साधारण दोन वर्षे वयापर्यंत वाचा निर्माण झाली नाही, तर त्याला वाचा-विलंब असे म्हणतात व त्या त्या वयोगटाच्या प्राकृत (सर्वसाधारण) वाचाविकासापेक्षा कमी विकास आढळत असल्यास त्याला अविकसित वा अर्धविकसित वाचा असे म्हणतात. वाचा-विलंबात वाचेचा पूर्ण अभाव असतो किंवा निर्माण होणारे ध्वनी संदेशवहनाच्या दृष्टीने निरर्थक व निरुपयोगी असतात. वाचा-विलंब व अविकसित वाचा यांतील फरक मुख्यतः कमी-जास्त प्रमाणातील आहे. दोन्हीही प्रतीक प्रक्रियेतील दोषच आहेत. असे म्हणता येईल कारण वाचाविकासास आवश्यक भाषिक वातावरणाचा अभाव किंवा कमतरता हे त्यांचे कारण आहे. कोणत्याही कारणाने कमी-जास्त प्रमाणातील बहिरेपणा, लहानपणी वाचाविकासाच्या काळात मोठ्या रोगाने ग्रस्त असणे, मुलातील भावनिक अस्वस्थता, एकटेपणा, असुरक्षितता, न्यूनगंड, सामाजिक परिस्थिती इ. मानसिक कारणे, बुद्धिमांद्य, अन्नातील कमतरतांमुळे शारीरिक दुर्बलता व काही जन्मजात विकृती यांमुळे मूल भाषिक वातावरणापासून अलग पडते आणि वाचानिर्मिती व विकासात अडथळा येतो.

बहिरेपणामुळे होणारा वाचा-विलंब वा वाचाभंग : ऐकलेला ध्वनी व त्याचा समाजमान्य अभिप्रेत अर्थ याची सांगड घालून मस्तिष्कात विशिष्ट ध्वनीला विशिष्ट प्रतीकात्मक अर्थ दिला जातो व या अर्थपूर्ण ध्वनींच्या समाजमान्य उपयोगाची वैशिष्ट्येही (भाषिक वैशिष्ट्ये) आत्मसात केली जातात. या प्रक्रिया श्रवणाअभावी होऊ शकत नाहीत. तसेच प्रतिसंभरणाने स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले व त्यात सुधारणा घडवून आणणेही श्रवणाअभावी अशक्य असते. (‘वाचा आकलन’ व ‘प्रतिसंभरण’ या उपशीर्षकांखालील माहिती पहावी ). यामुळे बहिरेपणा किंवा सदोष श्रवणामुळे वाचा-विलंब, अविकसित वाचा किंवा संभाषणात दोष निर्माण होतात.

सघोष, अघोष, स्वर, अर्धस्वर, व्यंजने इ. स्वरूपांतील वाचिक ध्वनींचा अभ्यास उच्चारणाच्या क्रियेप्रमाणे करण्यात आलेला आहे. श्रवणाच्या दृष्टीने उपयुक्त होण्यास वाचा-ध्वनीचा अभ्यास ध्वनिकीय पद्धतीने केला जातो. कारण ऐकताना, कानातील पडद्याची कंपने कशी होतात, त्यावर कसे आघात होतात, किती दाब पडतो व तो किती वेळ पडतो यावरून ऐकलेल्या ध्वनीचे कसे आकलन होणार हे ठरते. यामुळे कानाच्या पडद्यावर चांगला परिणाम करू शकणारे ध्वनी लवकर शिकता येतात (उदा., स्वर व अर्धस्वर हे सकंप व दीर्घकालिक ध्वनी चागंला परिणाम करतात. उत्स्फोटक व्यंजनांपेक्षा घर्षक व्यंजने चांगला परिणाम करतात. श, य, ह वगैरे व सर्व निष्कंप ध्वनींत अतिशय कमी ऊर्जा असल्याने ते अत्यल्प परिणाम करतात). यामुळे ऐकण्यातील दोष जन्मजात किंवा फार लहानपणी उद्‌भवलेले असल्यास त्याचा भाषा शिक्षणावर विपरीत परिणाम होतो.

लक्षणे सुरू होण्याच्या वयावरून बहिरेपणाचे जन्मजात व नंतर निर्माण झालेला (उपार्जित–हळूहळू किंवा अचानक) बहिरेपणा असे प्रकार करता येतात. दोषाचे ठिकाण व ढोबळ स्वरूप यांवरून बहिरेपणाचे (१) वहनदोषामुळे (ध्वनी तरंगांचे बाह्य कर्णापासून अंतर्कर्णापर्यंत वहन करणाऱ्या यंत्रणेतील दोषांमुळे) येणारा बहिरेपणा, (२) संवेदना-तंत्रिका-दोषांमुळे (अंतर्कर्ण वा श्रवण तंत्रिकेतील दोषांमुळे) आणि (३) केंद्रीय तंत्रिका तंत्रातील दोषांमुळे, असे प्रकार होतात. लक्षणाची तीव्रता व कारणे यांवरून बहिरेपणाचे (१) अंशतः बधिर, (२) स्वरबधिर, (३) पूर्ण बधिर व (४) मूक-बधिर असे चार प्रकार करता येतात.

(१) अंशतः बधिरपणा : नासागिलायूंची वाढ, घशाच्या शोथामुळे ग्रसनी-कर्ण नलिका (घसा व मध्यकर्ण यांना जोडणारी नलिका) बंद होऊन कानाला दडा बसणे, बाह्यकर्ण व मध्यकर्ण विभागांत सूज येणे व पू होणे, कान फुटणे व कानात मळ साठणे इ. कारणांमुळे हा बहिरेपणा निर्माण होतो. अशा मुलांना जोरदार, आघातयुक्त, दीर्घकाल टिकणारे ध्वनी चांगले ऐकू येतात परंतु कमी ताकदीचे व ध्वनिकीच्या दृष्टीने जवळजवळचे, थोडाच फरक असलेले ध्वनी ( उदा., प, ब ) अलग अलग ओळखू न आल्याने संभाषणातील खूप शब्दांचा त्यांना अर्थबोध होत नाही. त्यांचे शब्दभांडारही त्यामुळे कमी असते. त्यामुळे एकूण आकलनशक्ती कमी राहून वागण्यात मंदपणा येतो, चेहेरा भावहीन दिसतो व भाषा बोजड असते. तसेच विचारलेल्या प्रश्नात सुसंबद्ध उत्तर नसण्याची शक्यता असते.


(२) स्वरबधिर : या प्रकारात मुलांत काही विशिष्ट कंप्रतेचे ध्वनी ऐकू येत नाहीत.

(३) पूर्ण बधिरपणा : हा तीव्र स्वरूपातील वरील कारणांमुळे येऊ शकतो. वृद्धापकाळी येणारा बहिरेपणा बहुधा तंत्रिकोद्‌भव व अर्धवट असतो. या बहिरेपणामुळे वाचाविकासावर परिणाम होत नसला, तरी त्यांचे आकलन कमी असल्याने वागण्यात मंदपणा येतो व संभाषण असंबद्ध असते. बहिरेपणाच्या वरील सर्व प्रकारांसाठी, बहिरेपणासाठी संपूर्ण तपासण्या करून शोधलेल्या कारणांवर उपचार, ⇨श्रवण साहाय्यक उपकरणाचा उपयोग, वाचा चिकित्सा इ. प्रकारे उपचार करता येतात.

(४) मूक-बधिर : या प्रकारात आनुवंशिक कारणांमुळे सर्पिल कुहर व कर्णशंकू या अंतर्कर्ण भागांची अपुरी वाढ किंवा मध्यकर्ण विभागातील अस्थिका साखळीतील दोष किंवा दोन्ही यांमुळे पूर्ण बहिरेपणा येतो. तसेच जन्मजात श्रुतिबोधन दोषामध्ये ऐकू येण्याची पातळी खूप कमी असल्याने सर्वसाधारण संभाषण ऐकू येत नाही. यामुळे वाचानिर्मिती व विकास होऊ शकत नाही (ध्वनीचे ग्रहणच न झाल्याने-मस्तिष्कातील यंत्रणा कार्यक्षम असूनही-ध्वनीला प्रतीकात्मक अर्थ देण्याची प्रक्रियाच होऊ शकत नाही) आणि (ध्वनिनिर्मिती व उच्चारण अवयव कार्यक्षम असूनही) मुकेपणा येतो. या प्रकारच्या मूक-बहिरेपणावर उपचार नसल्याने या मुलांना वेगळ्या शाळेत शिक्षण द्यावे लागते. ओष्ठवाचन व वाचा चिकित्सा यांद्वारे सर्वसाधारण समाजात उपयुक्त ठरेल असे संभाषण करण्यास त्यांना शिकवावे लागते किंवा लिखित भाषेद्वारे ते संवाद साधू शकतात. तसेच एकमेकांशी (दोघेही मूक-बधिर) संदेशवहन (किंवा संभाषण) करताना ते खुणांची भाषा वापरू शकतात.

जन्मजात बहिरेपणा मुलाच्या वयाच्या दोन ते तीन वर्षांच्या आत शोधला गेला पाहिजे कारण त्यानंतर भाषा व वाचेत कायमचे दोष राहतात. आता श्रवणाचे मूल्यमापन शैशवावस्थेतही करता येते. त्यावरून जन्मजात स्वरबधिर व अंशतः बधिर मुलांना मुद्दाम त्यांच्या मापाचे व त्यांच्यासाठीच तयार केलेले श्रवण साहाय्यक बसवून त्यांचे श्रवण सुधारता येते. त्यामुळे त्यांच्या भाषा व वाचाविकासात अडथळा येत नाही. पूर्ण बधिर मुलांनाही आधीपासूनच वेगळ्या पद्धतीने शिक्षण देता येते.

वाचाविकास व वाचा विकृती यांच्या टप्प्यांत, स्वरूपात आणि आकृतिबंधांत व्यक्तिसापेक्ष अनेक बदल संभवतात. त्यामुळे त्यावरील संशोधन अवघड असते. तसेच भाषा, वाचा, तंत्रिका तंत्र, मानस ध्वनिकी, शरीरक्रियाविज्ञान, शरीरविकृतिविज्ञान, नाक-कान-घसा इ. अनेक विषयांतील व क्षेत्रांतील तज्ञांचे ज्ञान एकत्र करूनच कोणतेही निष्कर्ष काढावे लागतात.

उपचार : उपचार मुख्यत्वे मूळ कारणांवर अवलंबून असतात. सर्व प्रकारच्या वाचाविकृतींसाठी प्रथम शारीरिक कारण गृहीत धरून संपूर्ण शारीरिक तपासणी करून शारीरिक कारण शोधण्याचा व तक्रारींमागे मोठा शारीरिक रोग नाही याची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला जातो. (उदा., आवाज घोगरा होण्याची तक्रार मुख्यतः वृद्ध वयोगटातील व्यक्तीकडून केली जात असल्यास स्वरयंत्राच्या कर्करोगाची शक्यता विचारात घेऊन तज्ञांकडून त्या दृष्टीने सूक्ष्म तपासणी केली जाते किंवा मस्तिष्काच्या रोगांमध्ये किंवा इजांमध्ये, जीवसंरक्षक उपचारांवर प्रथम लक्ष केंद्रित करून गंभीर गोष्टी प्रथम विचारात घेतल्या जातात).

शारीरिक रोग, विकृती, इजा इ. ऐंद्रीय कारणे आढळल्यास त्या त्या विषयाच्या तज्ञांकडून तपासणी करून उपचार केले जातात. बऱ्याच तक्रारींत रचनात्मक व क्रियात्मक दोष असल्याने व अनेक कारणे एकत्रितपणे आढळत असल्याने अनेक तज्ञांच्या गटाकडून सुसूत्र उपचार व पुनर्वसन करणे जरूर असते. बऱ्याच विकृतींत कमीजास्त प्रमाणात मानसिक स्वरूपाची कारणे आढळत असल्याने मानसोपचारांचीही जरूरी असते. केंद्रीय तंत्रिका तंत्रातील क्रियात्मक दोषांमुळे (प्रतीक प्रक्रियेतील दोषांमुळे) होणाऱ्या विकृतींवर (वाचा-भंग व वाचा-विलंब) विशिष्ट शारीरिक वैद्यकीय उपचार अशक्य असून पुनर्वसनात्मक उपचारच फक्त शक्य असतात.

विशिष्ट विकृतींसाठी उपलब्ध असलेल्या विशिष्ट उपचारांचा उल्लेख त्या त्या विकृतींच्या वर्णनात केलेलाच आहे.

पुनर्वसन : वाचाविकृतीचे मूळ कारण नाहीसे केले गेले, तरी परिणामस्वरूप शिल्लक उरलेल्या विकृतींवर या स्वरूपात मोडणाऱ्या ओष्ठवाचन, वाचाचिकित्सा, वेगळ्या शाळांत वेगळ्या प्रकाराने व वेगळ्या तऱ्हेचे शिक्षण या पद्धतींनी उपचार करावे लागतात. नंतर कामासाठी विशिष्ट क्षेत्रे निवडून त्यानुसार धंदेशिक्षण द्यावे लागते. [⟶ अपंग : कल्याण व शिक्षण].


दुरुपयोगामुळे बिघडलेल्या आवाजाचे पुनर्वसन करण्यासाठी काही तंत्रे विकसित करण्यात आली आहेत. वाचा चिकित्सेमुळे श्वसनात व उदराच्या आधारात सुलभता येते. त्याचप्रमाणे स्वरयंत्र व मान यांतील अनावश्यक ताण काढून टाकला जातो. ध्वनिपटलांच्या काही रचनात्मक विकारांवरही (विशेषतः त्यांवरील कठीण गाठी) उपाय होऊ शकतो. या चिकित्सेमुळे रुग्णाला दोन्ही ध्वनिमार्गाच्या प्रत्येक घटकाचा उपयोग ताण टाळून कसा करावा, ध्वनीमार्गात आर्द्रतेची व श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्याची योग्य ती पातळी कशी ठेवावी आणि वातावरणातील धूर व इतर धोकादायक द्रव्यांच्या परिणामांचे उपशमन कसे करावे यांसंबंधी मदत मिळते.

वाचा व वाचाविकृती यांच्या महत्त्वाचे रुग्णांना, गायन, अभिनय या कलांच्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला शिक्षण दिल्यास चांगला प्रतिबंधात्मक परिणाम होतो, असे दिसून आले आहे.

प्रभुणे, रा. प.

आयुर्वेदीय चिकित्सा : वाचा हे कर्मेंद्रिय आहे. वाग्‌विकार हा कर्मेंद्रियांचा विकार आहे. प्राणवायू इंद्रियाचे धारण करतो आणि उदान वाचा निर्माण करतो.

वाचाविकार जन्मतः असेल, तर तो रोगी बहिराही असतो. बहिरेपणा नसताना जर वाचाविकार असेल आणि तो रोग्याच्या आहाराविहारादि कारणांनी निर्माण झाला असेल आणि तो नवा असेल, तर साध्य होतो. वाचाविकाराचे नाकात बोलणे, अस्पष्ट बोलणे व मुकेपणा असे तीन प्रकार सामान्यतः दिसतात. हे विकार वातकफांच्या विकृतीने होतात. ह्याकरिता वातनाशक अशा द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल नाकात, कानात घालण्याकरिता उपयोग करावा. त्या तेलाच्या गुळण्या कराव्यात. जिभेच्या खालच्या बाजूला जळवा लावून रक्त काढावे.

आहारामध्ये इंद्रियप्रसादनकर मधुर रस व इंद्रिय दृढकर आम्लरस ह्यांचे सेवन प्राधान्याने करावे.

पटवर्धन, शुभदा अ.

पहा : कान ध्वनि ध्वनिकी ध्वनिविचार स्वरयंत्र.

संदर्भ : 1. Brown, B. B. Speech Therapy, 1981.

            2. Fant, G. Acoustic Theory of Speech Production, 1970.

            3. Fry, D. B. The Physics of Speech, Cambridge, 1979.

            4. Ladefoged, P. Elements of Acoustic Phonetics, Chicago, 1962.

             5. Singh, R. P. Anatomy of Hearing and Speech, 1980.

             6. Travis, L. E. Ed., Handbook of Speech Pathology, New York, 1957.

             7. Van Riper, C. G. Speech Correction : Principles and Methods, Englewood Chiffs, N.J., 1978.

             8. Zemlin, W. R.  Speech and Hearing Science : Anatomy and Physiology, Englewood Cliffs, N. J., 1981.