वाकटी : हा मासा फीत माशांपैकी असून त्याचा समावेश ट्रायकियुरिडी या कुलात करतात. याचे शास्त्रीय नाव ट्रायकियुरस सवाला (लेपुराकेन्यस सवाला) असे आहे. ट्रायकियुरिडा कुलातील ट्रा. हॉमेलाट्रा. म्युटिकस या दोन्ही जातींसहित सर्व जाती वाकटी, बागा किंवा बाले या नावांनी ओळखल्या जातात. वाकटीचा प्रसार अरबी समुद्र, हिंदी महासागर व त्यापलीकडेही आहे. तो केरळ, कोकण, मुंबई व ओरिसा येथे अगदी सर्रास आढळतो.

वाकटी

वाकटीचा रंग रुपेरी असून लांबी जवळजवळ १.२० मी. असते. शरीर खूप लांबट असून दोन्ही बाजूंनी फारच चपटे असते, त्यामुळे तो रुपेरी फीतीसारखा दिसतो. पाठीकडील बाह्यरेखा थोडीशी अंतर्गोल असते. पाठीवरील व गुदाजवळील पर अरुंद असून त्यातील काटे मऊ असतात. शेपटीचा पर नसतो. धड लांब धाग्यासारख्या संरचनेमध्ये निमुळते होत जाते व मासा पोहत जाताना ते मागे ओढत येते. पर पिवळसर पांढरे असतात.

वाकटी फार खादाड मांसाहारी मासा आहे. त्याची पिले झिंग्यांवर उपजीविका करतात, तर प्रौढ मासे मुख्यतः इतर मासे खाऊन उदरनिर्वाह करतात. यांची वीण जुन महिन्यात होते. तेव्हा ते अपतट भागात स्थलांतर करतात. हे मासे पकडण्यासाठी डोल, रापण व ट्रॉल जाळे वापरतात. ते मुख्यतः उन्हात वाळवितात किंवा खारवितात. किनारी प्रदेशात त्याला फारशी मागणी नसते परंतु देशाच्या आतल्या भागात गरीब लोक तो आवडीने खातात.

पहा : फीत मासा. 

जमदाडे, ज. वि.