वांगे : (१) पानेफुले व फळांसह फांदी, (२) फूल, (३) लंबगोल फळ, (४) लांबट फळ.वांगे : (क. वडाने कायी गु. बेंगन, रिंगणा हिं., बैंगन इं. ब्रिंजल, एगप्लँट लॅ. सोलॅनम मेलोंजेना कुल-सोलॅनेसी). वांग्याचे मूलस्थान भारत आहे. प्राचीन काळापासून वांग्याचा (फळांचा) भाजीसाठी उपयोग केला जातो. बंगालमध्ये अनेक लहान फळे असलेली रानवांगी (सो. इंसानम) आढळतात. दक्षिण-पूर्व आशियात विविध आकारमानांची व रंगांची वांगी आढळतात. मलेशियात पिवळ्या रंगाच्या फळांची एक जात (सो. फेरोक्स) आढळते. चीनमध्ये १,५०० वर्षांपासून वांगी माहीत आहेत. रानवांगी बहुवर्षायू (एकापेक्षा जास्त हंगामांत जीवनचक्र पूर्ण करणारी) असून फळे कडू असतात. आफ्रिकेतील वांगे काटेरी असतात.  

वनस्पतीविज्ञानाच्या दृष्टीने वांग्याच्या तीन प्रमुख जाती आहेत. सो.एस्कूलेंटम जातीची वांगी गोलाकार किंवा अंड्याच्या आकाराची असतात. सो. सर्पेंटिनम जातीची वांगी लांब व सडपातळ असतात. सो. डिप्रेसम जातीच्या वांग्याची झाडे ठेंगणी असतात. 

वांग्याची लागवड मुख्यतः भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, फिलिपीन्स या देशांत करतात. यांशिवाय फ्रान्स, इटली व अमेरिकेत वांगी लोकप्रिय आहेत. उंच पहाडी प्रदेश सोडून भारतात सर्वत्र वर्षभर वांग्याची लागवड करतात. म्हणून ही फळभाजी वर्षभर उपलब्ध असते. 

खोड काटेरी किंवा बिनकाटेरी असून वनस्पतीचे सर्व भाग केसाळ असतात. झुडपाला अनेक फांद्या असून त्याची उंची ०.६ ते २.४ मी. असते. पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती व खंडित किनारीची असतात. फुले निळसर जांभळी असून ती एकेकटी अथवा २ ते ५ च्या गुच्छांत असतात. वांग्याच्या सर्व फुलांना फळे धरत नाहीत. शास्त्रज्ञांनी फुलातील किंजलाच्या [⟶ फुल] लांबीनुसार त्यांची चार गटांत विभागणी केली आहे : लांब किंजल, मध्यम किंजल, थोडे आखूड किंंजल व सूक्ष्म किंजल. यांपैकी पहिल्या दोनच प्रकारच्या फुलांना फलधारणा होते. अशा फुलांचा देठाजवळचा भाग बाहेरून फुगीर दिसतो. अर्का कुसुमाकर व वैशाली प्रकारांमध्ये फुले पुंजक्यानी येतात. त्यांपैकी बहुतेक सर्व फुले पहिल्या दोन गटांत मोडणारी असतात. त्यामुळे ह्या प्रकारात फळांचे घोस लागतात. मृदुफळे मोठी, लंबगोल अथवा लांबोळी, पांढरी, पिवळी, हिरवी, गडद जांभळी अथवा या रंगांच्या विविध छटा किंवा रेषा असलेली, २.५ ते २५ सेंमी. लांब, चकचकीत व गुळगुळीत असतात. फळाबरोबर वाढणारा संवर्त (पुष्पकोश) जाड असतो. फळाचे वजन २५ ते ५०० ग्रॅ. असते. बिया अनेक, लहान व चकतीसारख्या व सपाट असतात. 

जोशी, रा. ना. 

लहान आकारमानाच्या वांग्यांची भाजी व मोठ्या आकारमानाच्या वांग्यांचे भरीत करतात. वांग्याचे लोणचे करतात. वांग्याच्या फोडी उन्हात वाळवून ठेवतात. त्यांना ‘उसऱ्या’ म्हणतात. त्यांची भाजी करतात. कोवळे वांगे त्रिदोषनाशक, बद्धकोष्ठता व अजीर्णकारक असते. यकृताच्या विकारांवर ते वापरतात. पांढरी वांगी मधुमेहाच्या रोग्याकरिता उत्तम मानली जातात. तिळाच्या तेलात तळलेली वांगी खाल्ल्याने दातदुखी थांबते. पाने संवेदना कमी करणारी व निद्राजनक असतात. वांग्यातील ग्लायकोअल्कलॉइडामुळे कडूपणा येतो. १०० ग्रॅ. ताज्या फळात २० मिग्रॅ. हे द्रव्य असल्यास ते कडू लागते. लागवडीच्या वांग्यात हे प्रमाण १०० ग्रॅ. ला ०.३७ ते ४.८३ मिग्रॅ. असते. पोषक द्रव्याच्या बाबतीत वांग्याची टॉमेटोशी तुलना करता येते. १०० ग्रॅ. फळात जलांश ९२.७ ग्रॅ., प्रथिने १.४ ग्रॅ., स्निग्ध पदार्थ ०.३ ग्रॅ., कार्बोहायड्रेट ४ ग्रॅ., खनिजे ०.३ ग्रॅ., तंतू १.३ ग्रॅ.,कॅल्शिअम १८ मिग्रॅ., मॅग्नेशिअम १६ मिग्रॅ., ऑक्झॅलिक आम्‍ल १८ मिग्रॅ., फॉस्फरस ४७ मिग्रॅ., लोह ०.९ मिग्रॅ., सोडियम ३ मिग्रॅ., पोटॅशिअम २ मिग्रॅ., तांबे ०.१७ मिग्रॅ., गंधक ४४ मिग्रॅ., क्लोरीन ५२ मिग्रॅ., अ जीवनसत्व १२४ आंतरराष्ट्रीय एकके, थायामीन ०.०४ मिग्रॅ. रिबोफ्लाविन ०.११ मिग्रॅ., निकोटिनिक अम्‍ल ०.०९ मिग्रॅ. आणि क जीवनसत्त्व १२ मिग्रॅ. असते. 

प्रकार : वांग्याचे विविध प्रकार आहेत. फळांचा रंग, आकारमान व आकार यांमध्येही विविधता आढळते. वांग्याचे दोन मुख्य प्रकार गोल व लांबट असून भारतात सर्वत्र पिकविले जातात. वांग्याचे महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 

पुसा पर्पल लाँग, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.महाराष्ट्रात शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार : मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब हे आहेत. विविध राज्यांत वांग्याच्या अनेक इतर प्रकारांची शिफारस केलेली आहेत. 


अलीकडे वांग्याच्या संकरित वाणांचा झपाट्याने प्रसार होत आहे. उदा., पुसा अनमोल व सफल. ह्या वाणांपासून अधिक उत्पादन तर मिळतेच पण फळाची गुणवत्ता, मोठे आकारमान व सारखा आकार ह्यांत हे वाण सरस असून हे कीड व रोगांना प्रतिकारक आहेत. ठराविक भागांत विशिष्ट प्रकारांची वांगीच लोकांना आवडतात. त्यांनाच बाजारात मागणी असते. 

हवामान : वांग्याच्या यशस्वी लागवडीकरिता दीर्घकाळ उष्ण हंगाम पाहिजे. अल्प मुदतीच्या प्रकारापेक्षा दीर्घ मुदतीचे प्रकार थंडी सहन करू शकतात. थंड रात्री व अल्प काळ उन्हाळा असल्यास चांगले उत्पादन मिळत नाही. दररोजचे सरासरी तापमान १३ ते २१ से. असल्यास पिकाची वाढ चांगली होते आणि अधिक उत्पादन मिळते. अशा हवामानात बहुतेक फुलकळ्यांचे फळात रूपांतर होते. थंड हवामानात झाडांची वाढ हळू होते. फळांची प्रत – आकार व रंग चांगली नसते. वांग्याचे बी २५ से. तापमानास चांगले उगवते.

हंगाम : वांग्याचे बी पेरून रोपे तयार करण्याचे काम कृषि-हवामानावर म्हणजे तापमान, पर्जन्यमान व सिंचनाची सोय यांवर अवलंबून असते. उत्तर भारतात वांग्याच्या लागवडीचे जून-जुलै व नोव्हेंबर असे दोन हंगाम आहेत. पूर्व व दक्षिण भारतात वांग्याचे पीक वर्षातून केव्हाही घेता येते पण मुख्यतः जुलै-ऑगस्ट महिन्यांत पेरणी-लावणी करतात. पहाडी मुलुखात बी मार्च ते एप्रिल महिन्यात पेरून रोपांचे स्थलांतर मे महिन्यात करतात. महाराष्ट्रात जून-जुलै व डिसेंबर-जानेवारी महिन्यांत लागवड करतात.

रोपवाटीका : वांग्याचे रोप गादी वाफ्यावर किंवा सपाट वाफ्यात (१ × ३ मी.) तयार करतात. सपाट वाफ्यात बी फोकून पेरतात. गादी वाफ्यावर दोन ओळींत ५ सेंमी. अंतर ठेवून ६ ते १२ मिमि. खोल बी पेरतात. गादी वाफ्यातून पाण्याचा निचरा चांगला होतो आणि रोपे कोलमडत नाहीत. गादी वाफ्याची जमीन सुपीक असावी, म्हणून त्यात कंपोस्ट व फॉस्फरसयुक्त खत मिसळतात.

वांग्याचे बी वजनात हलके (एका ग्रॅममध्ये २५० बिया) असते आणि उगवण ७५ ते ८० टक्के होते. एक हेक्टर लागवडीसाठी ५०० ते ७५० ग्रॅ. बी लागते. ४-५ आठवड्यांच्या रोपांचे स्थलांतर करतात. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी देतात. त्यानंतर जरूरीप्रमाणे पाटाने पाणी देतात. पेरणीपूर्वी एक किग्रॅ. बियांस ३ ग्रॅ. थायरम किंवा पारायुक्त औषध चोळतात. पेरणीनंतर १५-२० दिवसांनी (रोपावर ४-६ पाने असताना) प्रत्येक वाफ्यास २०-२५ ग्रॅ. यूरिया दोन ओळींमध्ये खुरप्याने काफरी पाडून देतात आणि मातीने बुजवून टाकतात.

जमीन : वांग्याचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येते पण या पिकाला मध्यम प्रतीची, निचऱ्याची जमीन चांगली असते. हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते आणि चिकण पोयट्याच्या व गाळाच्या पोयट्याच्या जमिनीत उत्पादन मिळते. जमीन खोल सुपीक व उत्तम निचऱ्याची असावी लागते.

पूर्वमशागत : जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन सऱ्या – वरंबे तयार करतात. दोन वरंब्यांत ६० सेमी. आणि दोन रोपांत ४५ सेमी. अंतर ठेवतात.

खते : जमिनीची मशागत करताना हेक्टरी २०-२५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळतात. रोप लावणीपूर्वी हेक्टरी ५० किग्रॅ. नायट्रोजनयुक्त, ५० किग्रॅ. फॉस्फरसयुक्त व ५० किग्रॅ. पोटॅशयुक्त खते देतात. लावणीनंतर एक महिन्यामध्ये ५० किग्रॅ. नायट्रोजन देतात. समतोल खते दिल्याने अधिक उत्पादन मिळते. नायट्रोजनाची कमतरता असल्यास झाडे निस्तेज दिसतात आणि खुरटतात. फॉस्फरसाची कमतरता असल्यास पाने मळकट करड्या हिरव्या रंगाची दिसतात आणि अकाली गळतात. पोटॅश व लोहाची कमतरता असल्यास कोवळ्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पाने पिवळी पडून गळतात.  

सिंचन : वांग्याच्या झाडाची मुळे खोल जात नाहीत. त्यामुळे वारंवार पाणी द्यावे लागते. पाणी वेळेवर दिल्याने उत्पादन वाढते. कडक थंडीचा संभव असल्यास पाणी देऊन जमिनीत ओलावा ठेवतात. खरीप पिकाला पावसाची उघडीप असताना आवश्यकतेप्रमाणे पाण्याची पाळी देतात. उन्हाळी पिकाची एकूण पाण्याची गरज ८५ ते ९० सेंमी. असते. पाण्याची पाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने देतात. एकूण १४-१५ पाळ्या द्याव्या लागतात.


आंतरमशागत : सुरुवातीला पिकाची वाढ हळू होते म्हणून पीक तणाशी स्पर्धा करू शकत नाही. तणामुळे कीड व रोगाचा प्रसार होण्यास मदत होते, म्हणून पिकातील तण काढणे महत्त्वाचे असते. निंदणी-खुरपी करून तण काढतात. त्यावेळी जमीन खोल उकरू नये, कारण मुळ्यांना इजा होते. वांग्याच्या मुळांवर बंबाखू (आरोबँकी) हे परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) तण वाढते. ते लागलीच काढून टाकावे. याकरिता डीसीपीए ह्या तणनाशकाची शिफारस केली आहे.

संजीवकांचा उपयोग : लावणीपूर्वी वांग्याची एक महिन्याची रोपांची मुळे ॲस्कॉर्बिक अम्‍लाच्या विशिष्टविद्रावात बुडवून काढल्यास फुलधारणा ४-५ दिवस उशिरा होते आणि फळांचे उत्पादन वाढते.

 

वांग्याच्या झाडांना फुलधारणा झाल्यापासून ६० ते ७० दिवसांपर्यंत एका आठवड्याच्या अंतराने २ पीपीएम २, ४ डी या वनस्पती वृद्धि-नियंत्रकाची फवारणी केल्याने उत्पादनात ५० टक्के वाढ होते. ४-सीपीए व एनएए या वृद्धि – नियंत्रकांची झाडावर फुलधारणेच्या काळात फवारणी केल्याने उत्पादनात वाढ होते.

काढणी : वांग्याच्या फळांची तोडणी फळे पूर्णपणे पिकण्यापूर्वी योग्य आकारमानाची व रंगाची झाल्यानंतर करतात. त्या वेळी फळावर चकाकी असते . पिकलेली फळे हिरवट पिवळ्या रंगाची असून गर कोरडा व जरड (तंतुमय) होतो. ती बाजारात खपत नाहीत. तीक्ष्ण धारेच्या चाकूने देठ कापून फळे झाडावरून काढतात. मोठ्या आकारमानाच्या गोल फळांची हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागते. फुलापासून फळ तयार होईपर्यंत १९ दिवस फळातील ॲस्कॉर्बिक अम्‍लाचे प्रमाण वाढते. त्यानंतर ते घटत जाते. वांग्याची फळे टोपल्यांत भरून बाजारात पाठवतात. पोत्यात भरलेली फळे दबतात आणि घासतात. वैशाली प्रकाराचे हेक्टरी सरासरी उत्पादन ३० ते ४० टन आणि इतर प्रकारांचे १५ ते २० टन मिळते. फळांची तोडणी ४ ते ८ दिवसांत सातत्याने करावी लागते. अशा पिकांना लावणीनंतरची वरखते २-४ हप्त्यांत विभागून दिल्यास उत्पादनात वाढ होते.

वांग्याची फळे उन्हाळ्यात १-२ दिवस आणि हिवाळ्यात ३-४ दिवस ताजी राहतात परंतू ७.२ ते १० से. तापमान व ८५ ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या जागी ७ ते १० दिवस चांगल्या स्थितीत राहतात. शीतगृहात ८.३ ते १० से. तापमान व ८७ ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेत २८ दिवस मोठी फळे ठेवल्यास चांगली टिकतात पण लहान फळे (१४-१८ ग्रॅ.) चांगली राहत नाहीत.

भोरे, द. पा राहुडकर, वा. ब.

कीड : (अ) वांग्याचा शेंडा व फळे पोखरणारी अळी : पूर्ण वाढलेल्या अळ्या पांढऱ्या रंगाच्या व १२ मिमी. लांब असतात. अळ्या प्रथम झाडाचा शेंडा पोखरतात. त्यामुळे शेंडा वाळतो. नंतर अळ्या फळे पोखरतात. यावर पुढील उपाय योजतात : (१) रोप तयार करताना २ x १ मी. वाफ्यात फोरेट २०.३० ग्रॅ. जमिनीत मिसळतात. (२) शेतात लावण्यापूर्वी रोपे मोनोक्रोटोफॉस (२६% १५ मिली.) व ॲक्रीमायसीन (०.०५% ५ ग्रॅ.) १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवतात. (३) पुढील कीटकनाशकांच्या फवारण्या (५-६) आलटून पालटून पिकावर करतात : (अ) मोनोक्रोटोफॉस (३६% ३१० मिलि.) २५० लिटर पाण्यात (आ) पाण्यात मिसळणारी कार्बारिल ५० टक्के भुकटी पाण्यात मिसळून फवारणी करतात. शेंडे सुकलेले दिसताच आतील अळीसह ते कापून नष्ट करतात.

(आ) पाने गुंडाळणारी अळी : पूर्ण वाढलेल्या अळ्या बदामी रंगाच्या असून शरीरावर पिवळे ठिपके व केस असतात. अळ्या पानाच्या गुंडाळ्या करतात. यावर उपाय म्हणून कार्बारिल १०% भुकटी हेक्टरी २० किग्रॅ. धुरळतात.

(इ) मावा, तुडतुडे व फुलकिडे : मावा कीड पिवळसर व काळपट हिरवी असून पानाच्या मागील भागावर राहून पानातील सर शोषते. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे हिरव्या रंगाचे असतात. उपाय : यावरील उपाय म्हणून रोपवाटिकेत दाणेदार फोरेट वापरले नसेल, तर पुढीलपैकी एकाची रोपावर पेरणीनंतर दोन आठवड्यांनी फवारणी करतात. एंडोसल्फान, मॅलॅथिऑन, फॉस्फोमिडॉन अथवा डायमेथोएट वा थायोमेटॉन पाण्यात मिसळून फवारणी करतात.


रोग : वांग्याच्या पिकावर अनेक रोग पडतात. त्यामुळे मुळ्या, पाने, खोड व फळांना इजा होते. रोगाची तीव्रता हंगाम व लागवडीच्या प्रदेशावर अवलंबून असते. काही रोगांचा प्रादुर्भाव एखाद्याच वर्षी होतो, तर थोडे रोग काही प्रदेशांत दरवर्षी आढळतात आणि ह्या रोगाच्या तीव्रतेप्रमाणे पिकाचे नुकसान होते.

रोपे कोलमडणे : पिथियम, फायटोफ्थोराऱ्हायझोक्टोनिया या कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) हा रोग बी उगवणीपासून रोपांना होतो. त्यामुळे रोपे जमिनीवर कोलमडून पडतात. कवकाची बाधा जमिनीतून होते. बी पेरण्यापूर्वी त्याला सेरेसान चोळतात किंवा बी ५१.७ से. तापमानाच्या पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवतात, नंतर सावलीत वाळवून पेरतात.

मर : फ्युजेरियम सोलानी इ. कवकांमुळे हा रोग होतो. त्यामुळे रोपे मरतात. सूक्ष्मजंतू व सूत्रकृतींमुळेही रोपे मरतात. कवकाची बाधा जमिनीतून होते, म्हणून जमिनीवर उपचार करावा लागतो. त्यासाठी बेनलेट किंवा बाविस्टीन ०.०५ ते ०.१ टक्का विद्राव तयार करून जमिनीवर फवारतात किंवा बी ०.०५ टक्का हायड्रोक्विनाइन किंवा ०.०५ टक्का मिथिलीन ब्‍ल्यूच्या विद्रावात भिजवून काढतात.

पानांवरील ठिपके : आल्टर्नेरियासर्कोस्पोरा कवकांमुळे हा रोग होतो. पानांवर अनियमित आकाराचे ४-८ मिमि. व्यासाचे ठिपके दिसतात. ते पानावर पसरतात. पाने गळतात. फळावरही ठिपके पडतात, फळे पिवळी पडतात आणि अकाली गळतात. उपाय : शेतात स्वच्छता ठेवतात. रोगाची बाधा झालेली पाने (गळलेली) जाळून टाकतात. पिकावर डायथेन झेड-७८, फायटोलान किंवा ब्लायटॉक्सची फवारणी करतात. ह्या रोगाला मांजरी गोटा, ब्लॅक राऊंड, जुनागढ सेल २ (लांब), पी-८, पुसा पर्पल क्लस्टर व एच-४ हे प्रकार काहीसे प्रतिरोधी आहेत.

बारीक पाने : हा रोग व्हायरसामुळे होतो. रोगाची बाधा झालेली झाडे सामान्य झाडांपेक्षा खुरटी राहतात. पाने बारीक व पिवळी वाढतात. झाडाला खुप फांद्या, मुळ्या व पाने वाढतात. फुले विकृत येतात पण त्यांपासून फळे लागत नाहीत. लागलीच तर टणक राहतात. उपाय म्हणून लहान असतानाच रोगट झाडे उपटून टाकतात. राहिलेल्या झाडावर फळे लागेपर्यंत एकाटॉक्स किंवा फॉलीडॉलची फवारणी करतात म्हणजे रोगाचा प्रसार निरोगी झाडावर होत नाही. लावणीच्या वेळी रोपे १,००० पीपीएम टेट्रासायक्लीनच्या विद्रावात बुडवून काढावी.

मोझाइक : हा व्हायरसामुळे होणारा रोग आहे. काकडीच्या मोझाइक व्हायरसामुळे त्याचा प्रसार होतो. पाने पिवळी पडतात. उपाय म्हणून रोगाची बाधा झालेली झाडे उपटून टाकतात. शेतात स्वच्छता ठेवतात.

वांग्याचे बी ७ महिने कोठी तापमानात साठवून ठेवून नंतर ते पेरणीस वापरल्यास त्यावरील व्हायरस नष्ट होतो. बियांच्या उगवणक्षमतेत फारसा फरक पडत नाही.

सूत्रकृमी : वांग्याच्या झाडावर सूत्रकृमींचा परिणाम होतो. मुळावर गाठी धरतात. झाडे खुरटतात. पाने पिवळी पडतात. फळांचे उत्पादन घटते. उपाय म्हणून पिकांची फेरपालट करतात. झेंडू व लसूण ह्या पिकांनंतर वांग्याचे पीक घेतात म्हणजे जमिनीतील सूत्रकृमींची संख्या कमी राहते. बीटाच्या पिकानंतर वांग्याचे पीक घेतल्यास सूत्रकृमींची जमिनीतील संख्या वाढते. झेंडू व तिळाचे आंतरपीक घेतल्यास वांग्याच्या पिकाचे सूत्रकृमीपासून होणारे नुकसान कमी होते. जमिनीच्या १५ सेंमी. थरात दर हेक्टरी १ किग्रॅ. आल्डीकार्ब मिसळतात. निंबोळी, करंज व एरंडीची पेंड जमिनीत मिसळल्यास सूत्रकृमींची संख्या कमी होते. सेल ९६-२, सेल ४१९, पोल बैंगन, विजय, ब्लॅक ब्युटी टी-२, बनारस जायंट हे प्रकार सूत्रकृमींना प्रतिरोधी आहेत. 

संदर्भ : 1. Bose, T. K. Som, M. G., Eds., Vegetable Crops of India, Calcutta, 1986.

           2. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.

           3. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1983.

           4. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

          ५ . महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषिदर्शनी  १९८८, राहुरी, १९८८.

रुईकर, स. के. राहुडकर, वा. ब.