वांगकायो : पेरूच्या मध्य भागातील याच नावाच्या प्रांताची राजधानी आणि देशातील एक प्रसिद्ध व्यापारी शहर. लोकसंख्या १,९५,००० (१९८७ अंदाज). ते अ‍ँडीज पर्वतराजीतील उंच पठारावर (उंची सस.पासून ३,२४९ मी.) लीमाच्या पूर्वेस सु. २०० किमी.वर मांतारो नदीकाठी वसले आहे. इंडियन जमातींतील केचुआ जमातीचे बहुसंख्य लोक अ‍ँडीजच्या पठारावर राहतात. ते केचुअन भाषा बोलतात. केचुअन भाषेत वांका म्हणजे कुळी. त्यावरून त्यांच्या ह्या वसाहतीत वांगकायो (वांकायो) हे नाव पडले. या वसाहतीत १८२३ मध्ये शहराचा दर्जा देण्यात आला. मांतारो नदीचे खारे सुपीक असून शहराच्या आसमंतात गहू, सातू, बटाटे, आणि मका ही प्रमुख पिके घेतली जातात. ही शेतमालाची एक मोठी घाऊक बाजारपेठ व साठवण केंद्र असून इंडियनांच्या वस्त्रोद्योगासाठी तसेच लोकरीच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आसपासच्या खाणींतून तांबे, कोळसा, चांदी इ. खनिजे सापडतात. शहरात अनेक वसाहतकालीन परंतु आकर्षक वस्तू असून १६१७ मधील एक कॅथलिक चर्च आहे. याशिवाय येथे आर्चबिशपचे पीठ असून मुख्य चौकात अनेक आधुनिक इमारती आढळतात. पेरूचे राष्ट्रीय विद्यापीठ (स्था. १९६२) येथे आहे. सभोवतालची शहरे व पेरूची राजधानी लिमा यांच्याशी वांगकायो लोहमार्गांनी जोडले आहे. आल्हाददायक हवामान आणि वसाहतकालीन आकर्षक वास्तू यांमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

देशपांडे, सु. र.