वळ्ळत्तोळ नारायण मेनन : (१६ ऑक्टोबर १८७८-१३ मार्च १९५८). प्रख्यात मल्याळम् कवी व ⇨ कथकळी नृत्याचे पुनरुद्धारक. आधुनिक मलयाळम् साहित्यातील महान कवित्रयींपैकी एक. ⇨ कुमारम आशान (१८७३-१९२४) आणि ⇨उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर (१८७७-१९४९) हे अन्य दोघे कवी.
वळ्ळत्तोळ यांचा जन्म चेन्नरा, वॅट्टत्तुनाटु येथे एका नायर कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण पारंपरिक पद्धतीने गुरुगृही राहून झाले. त्यांचे मामा रामुण्णी मेनन यांनी त्यांना अभिजात संस्कृत साहित्य, ज्योतिष, आयुर्वेद या विषयांचे शिक्षण दिले. पारक्कळम् सुब्रह्मण्यम् शास्त्री, कैक्कुळङ्कर व राम वारियर यांनी त्यांना तर्कशास्त्र शिकवले. करूत्तपार दामोदरन नंपूतिरी हे त्यांचे साहित्यक्षेत्रातील गुरू होते. तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांचाही त्यांच्यावर गाढ प्रभाव होता. टागोरांच्या प्रेरणेतून त्यांची वाङ्मयीन व कलात्मक जडणघडण झाली व महात्मा गांधींच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी प्रवृत्तींना चालना मिळाली. त्यांनी प्रारंभी काही काळ संस्कृतचे अध्यापन व वैद्यकीचा व्यवसाय केला. पुढे वळ्ळत्तोळ यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर वैद्यकीचा व्यवसाय सोडून देऊन वडिलांनी स्थापन केलेल्या नाटकमंडळीची जबाबदारी स्वीकारली, तसेच नाटकांतून भूमिकाही केल्या. त्यांना अभिनयाचेही चांगले अंग होते. ही नाटकमंडळी तीन-चार वर्षे चांगली चालवल्यावर पुढे ती बंद करणे भाग पडले. नंतर त्यांच्या स्नेह्यांनी ‘परिष्काराभिवर्धिनी’ नामक नाट्यसंस्था स्थापन केली. तिच्या स्थापनेत वळ्ळत्तोळ यांनी उत्साहाने भाग घेतला. पण ही संस्थाही अल्पकाळातच बंद पडली. ‘केरळ कल्पद्रूमम्’ मुद्रणालयाचे व्यवस्थापन त्यांनी १९०४ मध्ये स्वीकारले. ह्या मुद्रणालयाचेच पुढे ‘मंगळोदयम्’ नामक प्रकाशनगृहात रूपांतर झाले. केरळोदयम् साप्ताहिक, आलपोषिणी मासिक, रामानुजनपत्रिका यांचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.
वळ्ळत्तोळ यांची वाङ्मयसंपदा विपुल व वैविध्यपूर्ण आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी आपली पहिली काव्यरचना करून वाङ्मयनिर्मितीस प्रारंभ केला व पंच्याहत्तराव्या वर्षी ॠग्वेदाचे भाषांतर करून कारकीर्दीचा कळस गाठला. किरातशतकम् (१९०३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यांच्या निर्मितीत गद्य व पद्य अशा दोन्ही प्रकारांतील स्वतंत्र तसेच अनुवादित वा रूपांतरित वाङ्मयाचा समावेश होतो. त्यांपैकी एक रचना संस्कृतमध्ये असून, मलयाळम्मध्ये एकूण अडुसष्ट साहित्यकृती आहेत. त्यांनी संस्कृतमधून मलयाळम्मध्ये केलेली भाषांतरे पुढीलप्रमाणे : ‘विष्णु’, ‘मार्कंंडेय’, ‘मत्स्य’ व ‘वामन’ ही पुराणे आणि वाल्मीकि रामायणम् (१९०५-०७), अभिज्ञान शाकुंतलम्, स्वप्नवासवदत्तम्, पंचरात्रम्, गजतुविलासम् (१९०० कालिदासाच्या ॠतुसंहाराचे भाषांतर), ॠग्वेद इत्यादी. वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी त्यांनी रामायणाचे भाषांतर केले. त्यांच्या स्वतंत्र साहित्यकृतींमध्ये गणपति (१९१३), चित्रयोगम् हे १८ सर्गांचे महाकाव्य (१९१४), बंधनस्थानाय अनिरूद्धन् (१९१४), शिष्यनुं मकनुम् (१९१८), मग्दलन मरियम (१९२१), कॉच्चु सीता (१९२८), अच्छनुं मकळुम् (१९३६) इ. सात खंडकाव्ये आणि साहित्यमंजरी (अकरा भाग) हा भावकवितांचा संग्रह ह्या प्रमुख साहित्यकृतींचा अंतर्भाव होतो. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यरचनांवर अभिजाततावादी आदर्शांचा प्रभाव जाणवतो. तो काव्याचे पौराणिक विषय व घाट या दृष्टींनी लक्षणीय आहे. चित्रयोगम् महाकाव्य हे या प्रभावाचे उत्तम उदाहरण होय. हे महाकाव्य कथासरित्सागरमधील मदिरावती-सुंदरसेन कथेवर आधारित आहे. वळ्ळत्तोळ यांना वयाच्या एकतिसाव्या वर्षी एक गंभीर आजारात दुर्दैवाने बहिरेपण आले. पण त्यामुळे त्यांच्या दृक्संवेदना जास्त प्रखर व धारदार बनल्या व दृश्य निरीक्षण जास्त सूक्ष्म व सखोल झाले. त्यांचे बधीर विलापम् (१९१०) हे काव्य बहिरेपणाच्या वेदनांचे उत्कट व हृदयस्पर्शी चित्रण करणारे आहे, त्याची तुलना मिल्टनच्या ‘ऑन हिज ब्लाइंडनेस’ ह्या सुनिताशी केली जाते. बधीर विलापम् व बंधनस्थानाय अनिरुद्धन् ही काव्ये वळ्ळत्तोळ यांच्या स्वच्छंदतावादी कल्पनाशक्तीचे उत्कृष्ट आविष्कार होत. बंधनस्थानाय अनिरुद्धन् हे खंडकाव्य उषा व अनिरुद्ध यांच्या पुराणकथेवर आधारित असून त्यात मानवी जीवनावरील कल्पकताप्रचुर भाष्य आढळते. मग्दलन मरियम हे बायबलच्या ‘नव्या करारा’तील एका कथेवर आधारलेले खंडकाव्य ही त्यांची श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. त्यात मेरी मग्दलनच्या जीवनातील पश्चात्तापदग्ध आत्मिक परिवर्तनाचे व शुद्धीचे हृद्य चित्रण आहे. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिरेखेभोवती आधिदैविक शांतीचे एक अपूर्व वलय वळ्ळत्तोळ यांनी निर्मिले आहे. ख्रिस्ती धर्माप्रमाणेच इस्लामी, बौद्ध, जैन या धर्मांतील कथांचाही त्यांनी आपल्या काव्यनिर्मितीमध्ये वापर केला. हिंदू धर्माचे व्यापक अधिष्ठान तर त्यांच्या काव्याला आहेच. वळ्ळत्तोळ यांच्या काव्याची सर्व अवस्थांतरे साहित्यमंजरीच्या अकरा भागांतील विपुल व विविध छोट्या भावकाव्यांतून पहावयास मिळतात. अभिजात व स्वच्छंद वृत्तींप्रमाणेच वास्तववादाचे सच्चे प्रकटीकरणही या काव्यांतून घडते. किंबहुना त्यांच्या भावगीतांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून उमटणारा कालस्वर. त्या ज्या काळात लिहिल्या गेल्या, त्या काळाचे चैतन्यतत्त्वच जणू त्यात प्रतिबिंबित झाले आहे. त्यांतून देशभक्तीपर राष्ट्रीय भावभावना तीव्रोत्कटतेने व सच्च्या कळकळीने प्रकट झाल्या. गांधीवादी विचारसरणीचा त्यांनी काव्यातून हिरीरीने पुरस्कार केला. स्वातंत्र्यलढ्यातील सत्याग्रहींना ह्या कविता स्फूर्तिप्रद व प्रेरणादायी ठरल्या. त्यांच्या ‘पोअरा पोअरा नलिल नलिल’ (तिरंगी राष्ट्रध्वजावरील कविता) सारख्या कविता ओठांवर घोळवत हजारो देशभक्त तुरुंगात गेले. ‘एण्टे गुरुनाथन्’ (१९२२) ही गांधीजींवरील त्यांची कविता विलक्षण गाजली. त्यांना गोरगरीबांविषयी वाटणारा खोल जिव्हाळा तसेच जातिभेद, अस्पृश्यता, धार्मिक असहिष्णुता, जमीनदारी प्रथा, साधनसंपत्तीचे विषम वाटप अशा अनेक सामाजिक-आर्थिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या कवितांत उमटल्या आहेत. भारतीय स्त्री हा त्यांच्या परम आदराचा विषय होता आणि स्त्रीपुरुष संबंधात तसेच कौटुंबिक जीवनात उच्च नीतिमूल्यांचे पालन केले पाहिजे, ह्याविषयीची आग्रही भूमिका त्यांनी काही कवितांतून मांडली. फ्रान्स, इंग्लंड, इटली, रशिया इ. अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. रशियाच्या प्रगतीविषयी तसेच साम्यवादी विचारसरणीच्या प्रसारार्थ त्यांनी काही कविता लिहिल्या.
वळ्ळत्तोळ यांनी ‘केरळ कला मंडलम्’ ही नृत्यसंस्था १९३० साली चॅरुतुरुत्ती येथे स्थापन केली व कथकळी या पारंपरिक नृत्यनाट्य प्रकाराला नवे संजीवन व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या संस्थेद्वारे त्यांनी भारतभर तसेच आशियाच्या आग्नेय भागात आपल्या नृत्यपथकाचे दौरे केले. या संस्थेत गुरुकुल पद्धतीने कथकळीचे व अन्य पारंपरिक नृत्यप्रकारांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. ही नृत्यसंस्था १९४१ पासून राज्य शासनातर्फे चालवण्यात येते व आता या संस्थेचे दौरे जगभर सर्वत्र होतात.
वळ्ळत्तोळ यांना अनेक मान-सन्मान लाभले : त्रावणकोरच्या महाराजांकडून कंकण (१९२३), मद्रास शासनातर्फे अस्थान कवी (राजकवी) म्हणून नियुक्ती (१९४८-५३), पद्मभूषण (१९५५) इत्यादी. त्यांच्या अनेक कवितांची हिंदी, इंग्लिश व रशियन भाषांत भाषांतरे झाली आहेत.
आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी ॠग्वेदाच्या भाषांतराचे कार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या ॠग्वेदाच्या भाषांतराचा अखेरचा चौथा खंड प्रकाशित झाल्यानंतर अल्पकाळातच त्यांचे चॅरुतुरुत्ती येथे निधन झाले.
संदर्भ : 1. Hridaya Kumari, Vallathol Narayana Menon, New Delhi, 1974.
२. मेनोन, एम्. श्रीधर, संपा. व अनु., कविश्रीमाला : वल्लतोळ नारायण मेनन, वर्धा, १९६२.
नायर, एस् . के. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)
“