वहाबी पंथ : एक इस्लामी धर्मपंथ. मुहम्मद बिन अब्द-अल्-वह्हाब (अब्दुल वहाब-१७०३-८७) हा ह्या पंथाचा संस्थापक. मुळात ‘वहाबी’ ही संज्ञा या पंथाच्या विरोधकांनी या पंथाला दिलेली होती. तथापि हेच पंथनाम पुढे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या हनबाली शाखेशी नाते सांगणारा हा पंथ आहे. या पंथाची तत्त्वे थोडक्यात अशी : अल्लाखेरीज काहीही पूजनीय नाही. प्रेषितांची, संतांची वा देवदूतांची नावे प्रार्थनेत आणणे, हे बहुदेवतावादाचेच द्योतक होय. काही व्रत करावयाचे असल्यास तेही केवळ अल्लासाठीच करावे अन्य कोणासाठीही नव्हे. जे ज्ञान प्रमाणाधिष्ठित नसेल, म्हणजे कुराणावर वा सुन्नावर आधारलेले नसेल, ते स्वीकारू नये तसेच कुराणाचा अर्थ तवीलने लावू नये. तंबाखू वर्ज्य करावी दाढी करू नये तसेच शिवीगाळ करू नये इत्यादी. जपमाळ वापरणे हेही वहाबी पंथाला निषिद्ध आहे. अव्वल इस्लामची प्रस्थापना करणे, हे अब्दुल वहाबचे उद्दिष्ट होते.
भारतात हा पंथ सय्यद अहमद (ज. १७८६–८७) ह्यांनी आणला व येथे ह्या पंथाला अनुयायीही मिळाले.
करंदीकर, म. अ.