वसू : (श्वेत पुनर्नवा, पांढरी घेंटुळी हिं. सांथी, लाल साबुनी गु. श्वेत साटोडी क. बिळे गणजली, मुच्चगणी सं. वसुक इं. हॉर्स पर्स्लेन लॅ. ट्रायॅंथेमा पोर्चुलॅकॅस्ट्रम, ट्रा. मोनोगायना कुल-फायकॉइडी किंवा ऐझोएसी). फुलझाडांपैकी [⇨ वनस्पति, आवृतबीज उप-विभाग] ही काहीशी मांसल, अनेक फांद्यांची व जमिनीसरपट वाढणारी वर्षायू (एक वर्षभर जगणारी) ⇨ ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी शेतात व रस्त्यांच्या कडेनेही आढळते. शिवाय श्रीलंका व इतर उष्ण कटिबंधीय प्रदेशांतही सामान्य आहे. हिचे खोड व फांद्या जांभळट असून त्यांवर साधी पाने समोरासमोर, टोकाशी गोलसर व तळाशी निमुळती असतात पानांच्या जोडीपैकी एक दुसऱ्यापेक्षा थोडे लहान असते. फुले तांबूस, बिनदेठाची व पानांच्या बगलेत एकेकटी असून त्यांत पाकळ्या नसतात. त्याखालचा भाग (संवर्त) नळीसारखा व त्यावर चिकटून राहणारी १०-१२ केसरदले (पुंकेसर) असतात. किंजपुटात (स्त्री-केसराच्या तळभागात) १-२ कप्पे व त्यांवर एकच किंजल असतो [ ⟶ फूल]. फळे (बोंडे) पानांच्या देठांच्या तळाशी असलेल्या पोकळीत काहीशी दडलेली असून ती लहान करंड्याप्रमाणे उघडतात, तेव्हा एखादे बी वरच्या टोपणास चिकटून राहते व इतर ३-५ उरलेल्या भागात राहतात. बी मूत्रपिंडाकृती व काळसर असते, खोड, फांद्या, देठ, पानांची किनार व फुले पांढऱ्या रंगाची असलेला एक प्रकारही आढळतो. इतर सामान्य शारीरिक लखणे ⇨ फायकॉइडी कुलात (वालुक कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. ⇨ पुनर्नवा ह्या वनस्पतीशी वसूचे साम्य दिसले, तरी त्या दोन्ही भिन्न असल्याने एकीच्याऐवजी दुसरीचा उपयोग करीत नाहीत.
वसूची पाने मूत्रल (लघवी साफ करणारी) असून जलशोफात (शरीरात पाणी साचून आलेल्या सूजेवर) देतात मुळांचे चूर्ण कडू व विरेचक (पोट साफ करणारे) असून दाह (आग) करते. मुळांचा काढा आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा) आणि जास्त घेतल्यास गर्भपातक असतो. कोवळ्या पानांची भाजी करतात परंतु त्यामुळे अतिसार व पक्षाघात होण्याचा धोका असतो. कोवळा पाला दीपक (भूक वाढविणारा), वातहर व कफघ्न (कफ पाडून टाकणारा) आहे. यकृत व प्लीहा (पानथरी) यांच्या दाहयुक्त सूजेवर वसू गुणकारी आहे. पाला जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा होण्याचा संभव असतो. अन्नधान्ये व इतर बी-बियाणे ह्यांत वसूच्या बियाणाच्या संपर्काने दोष निर्माण होतो म्हणून तिचा नाश करण्यास फेर्नोझोन वापरतात. ती जमिनीत गाडून टाकल्यास चांगले खत बनते. चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत ‘वर्षाभू’ या नावाने वसूचा उल्लेख आढळतो.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.
परांडेकर, शं. आ.
“