वसनवेल :वासनवेल, पारवेल हिं. जमटीकी बेल गु. वेवडी वछन क. दागडी सं. तिक्ता, दीर्घवल्ली, पाताल गरुडी, वत्सादनी इं. ब्रूम क्रीपर, इंक-बेरी लॅ. कॉक्युलस व्हिलोसस, कॉ. हिर्सूटस कुल-मेनिस्पर्मेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]⇨ गुळवेल व ⇨ काकमारी यांच्या कुलातील ही जंगली वेल कोकण, गुजरात शिवाय हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण टोकापर्यंत श्रीलंका, पेगू, दक्षिण चीन, अरबस्तान, उष्ण कटिबंधीय आफ्रिका इ. ठिकाणी आढळते. ही कुंपणावर सामान्यपणे वाढलेली दिसते. खोड बारीक, हिरवट, कोवळे भाग लवदार असतात. पानाच्या विशिष्ट त्रिकोणी (बाणाच्या टोकाप्रमाणे) आकारावरून वेल ओळखू येते. फुले फार लहान, एकलिंगी, हिरवट पिवळी व पानांच्या बगलेत स्वतंत्रपणे झुबक्यांनी डिसेंबरात येतात. फळ काळे, अश्मगर्मी (आठळीयुक्त), वाटाण्याएवढे, सुरकुतलेले व चकचकीत असते.
वसनवेलीची मुळे व पाने औषधी असून ताज्या मुळांचा काढा तिखट, उष्ण, सारक, खूप घाम आणणारा व शीतकर (थंडावा देणारा) असतो. मूळ अग्निमांद्य व संधिवात यांवरही देतात. पानांचा रस पाण्यात घालून साखरेसह ते घट्ट झालेले बुळबुळीत मिश्रण प्रमेहावर देतात. कोकणात लहान मुलांच्या पोटदुखीवर मूळ व गजगा पाण्यात उगाळून देतात. बलुचिस्तानात स्वप्नावस्थेवर दुधात पानांत रस घालून प्यायला देतात. पानांचा रस पाण्यात घालून जेलीसारखा पदाथ बनतो तो इसब, आगपैण इत्यादींवर लावतात. फळांच्या रसापासून निळी, जांभळी शाई बनवितात.
पाटील, शा.दा.
“