वर्धा नदी : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी. लांबी ४६४ किमी. मध्य प्रदेश राज्याच्या बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर ही नदी उगम पावते. मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्नेयीस वाहत जाते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते. संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयीस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो. एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्नेय भाग निम्न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात. शेती हा वर्धा खोऱ्यातील प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. वर्धा नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी मंदिरे, स्मारके आणि मराठा-पेंढारी काळातील किल्ल्यांचे अवशेष पहावयास मिळतात.
चौधरी, वसंत