वर्णविचार : कोणत्याही भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करताना भाषेची दोन अंगे लक्षात घ्यावी लागतात. एक म्हणजे बोलणारा करतो व ऐकणारा ओळखतो ते शब्दोच्चार (शब्दांग) आणि दुसरे म्हणजे बोलणाराच्या मनातला आणि ऐकणाराच्या मनात शिरलेला भाषाबाह्य जगाबद्दलचा विचार (अर्थांग). मात्र या दोन्ही अंगांची सांगड घातली जाते, ती त्या त्या भाषेतील रूपांच्या मुळे-जी एका बाजूला शब्दरूपे असतात तर दुसऱ्या बाजूला अर्थरूपे असतात. शब्दांग आणि शब्दांगाची शब्दरूपांशी जोड यांचा विचार म्हणजे वर्णविचार, शब्दरूपांची अर्थरूपांशी जोड यांचा विचार म्हणजे कोश व व्याकरण, अर्थांग आणि अर्थांगाशी अर्थरूपांशी जोड म्हणजे अर्थविचार. सर्व मिळून भाषेचे वर्णन पुरे होते. [⟶ भाषाशास्त्र].

वर्णविचार हा शब्दांगावर जोर देऊन करता येतो. हा वर्णविचाराचा उच्चारण-श्रवण-पक्ष. त्याचप्रमाणे तो शब्दरूपांवर जोर देऊनही करता येतो. हा वर्णविचाराचा शब्दांकन-शब्दग्रहण-पक्ष (इंग्रजीत यांना अनुक्रमे ‘फोनेटिक्स’ व ‘फोनॉलजी’ म्हणतात). उच्चार आणि श्रुती शेकडो असतात. शब्दरूपे हजारो असतात. पण या दोहोंना जोडणारे वर्ण मात्र कोणत्याही भाषेत वीस ते साठपर्यंत असतात. हे कसे जमते ते वर्णविचार केल्याने लक्षात येते.

उच्चारण – श्रवण – पक्ष : माणूस हा बोलणारा प्राणी आहे. शब्दव्यापाराचे मुख्य इंद्रिय म्हणजे मेंदू : या मेंदूमुळे माणसाला कंठ, जीभ, ओठ, तालुपटल (नाक आणि तोंड यांना विभक्त करणारा मांसल पडदा-हा टाळूच्या मागच्या बाजूला असतो) यांच्या चपळ हालचालींमध्ये त्या त्या भाषेचा बारकावा लहानपणी तरी शिकणे जमते आणि यासाठी पूर्वतयारी म्हणून आवाजाची पट्टी (स्वरमान), त्याच लहानमोठेपणा (ध्वनिगरिमा), त्याची विशिष्ट गुणवत्ता (ध्वनिविशिष्टता) आणि त्याची कालपटावर मांडणी (ध्वनिकालयोजन) या अंगानी बोललेले ऐकण्याचा बारकावा त्याला लहानपणापासून साधतो. (मराठी शिकणाऱ्या इंग्लिश भाषकाला त आणि ट यांची ध्वनिविशिष्टता पकडणे आणि जिभेने वठवणे प्रौढवयात अवघड जाईल, तर बालवयात त्याला ते सहजसाध्य होईल).

उच्चारण म्हणजे काय? तर घसा, तोंड, नाक या पोकळ्यांमधून श्वास आणि उच्छ्‌वास यांच्या रूपाने वाहणाऱ्या हवेला कंठ, जीभ, ओठ, तालुपटल यांच्या मदतीने कमीअधिक अडवून ध्वनिलहरी उत्पन्न करणे आणि त्यांना या पोकळ्यांमधून घुमवणे. उच्चारणात मुख्यतः उच्छ्‌वासाचा वापर होतो. निःशब्दतेपासून निःशब्दतेपर्यंत वक्ता जो एक वर्णप्रवाहाचा टप्पा गाठतो त्याला आपण उक्ती म्हणू. उक्ती निश्चित करायची म्हणजे वर्णप्रवाहातला प्रत्येक वर्ण निश्चित करायचा आणि त्या वर्णाची रचना निश्चित करायची. बोलायचे ते ऐकण्यासाठी, त्यामुळे ही निश्चिती करताना उच्चारणावर श्रवणाचे नियंत्रण चालते (हे नियंत्रण उपलब्ध नसल्यामुळे तर बहिऱ्या माणसाला बोलणे जमत नाही).

वर्ण निश्चित होतो तो तीन निकषांवर : (१) मुखप्रयत्न म्हणजे तोंडाच्या पोकळीमधील हवेची अडवणूक, (२) प्रयत्नाचे नेमके ठिकाण म्हणजेच स्थान आणि (३) कंठद्वारीय प्रयत्न म्हणजे कंठमण्याच्या आत डाव्या-उजव्या अंगाला असलेल्या मांसल वळ्या (घोषवली) हलवून केलेली हवेची अडवणूक. मुख्यप्रयत्न मुख्यतः दोन प्रकारचे असतात – स्वरजातीय (हवेला खुली वाट ठेवणे) व व्यंजनजातीय (तिला कमीअधिक रोखणे). स्वरजातीय वर्ण अधिकाधिक खुले असू शकतात-य्, ई, ए, ॲ. व्यंजनजातीय वर्ण अधिकाधिक रोखणारे असू शकतात. वीट मधला व, vote मधला v वर्णोच्चार. व्यंजनजातीय वर्णांचे मुखप्रयत्नानुसार ठळक वर्ग म्हणजे अनुक्रमे ईषत्-विवृत (घर्षकल्प), ईषत्-स्पृष्ट (घर्षक), मौखिक स्पर्श (रोधक). असेच इतर काही वर्ग म्हणजे नासिक्य स्पर्श (म् सारखे), पार्श्विक (ल् ळ् मध्ये जिभेच्या डाव्या उजव्या बाजूनेच वाट राहते), आणि आस्पंदित (रामपूर मधले र, हिंदीमधल्या खड़ा मधला ड़, इंग्रजी throw मधला r-यांमध्ये जिभेचा शेंडा अनुक्रमे फडफडावला, झटकला आणि आपटला जातो आणि हवा तात्पुरती अडते). दुसरा निकष प्रयत्नाचे स्थान हा. स्वरजातीय मुखप्रयत्नाचे स्थान लक्षात घेतले, तर स्वरजातीय वर्णांचे पुढीलप्रमाणे वर्ग पडतात-जिव्हा-प्रयत्नाचे स्थान तालव्य (अग्रजिव्हीय), तालुसीमीय (मध्यजिव्हीय) किंवा तालुपटलीय (पश्चजिव्हीय) असू शकते. उदा., अनुक्रमे ॲ, आ, ऑ प्रत्येकाचे पुन्हा दोन उपवर्ग ओष्ठप्रयत्नानुसार पडतात. कुंचितोष्ठ (ऊ, ओ, ऑ मध्ये ओठाचे कोपरे जवळ येऊन जिवणी वाटोळी होते)आणि प्रसृतोष्ठ (ई, ए, ॲ मध्ये ओठाचे कोपरे दूर जाऊन जिवणी लांबोळी होते). व्यंजनातील मुखप्रयत्नाचे स्थान लक्षात घेतले, तर व्यंजनजातीय वर्णाचे पुढीलप्रमाणे वर्ग पडतात-तोंडात शिरून क्रमाने आत जायचे, तर ओष्ठ्य (ब, म मध्ये वरचा-खालचा ओठ), दंत्यौष्ठ्य (इंग्रजी  v  मध्ये वरचे दात-खालचा ओठ), दंत्य (द, न मध्ये वरचे दात-खाली जिभेचा शेंडा), दंतमूलीय (मराठी र, इंग्रजी d, n, r मध्ये वरच्या दातांच्या मागच्या हिरड्या-खाली जिभेचा शेंडा), प्रतिवेष्ठित (ड, ळ मध्ये वर टाळूचा मूर्धन्य भाग-खाली जिभेचा उलट वळवलेला शेंडा), दंत्यतालव्य (चाड, जाड, झाड, साप यांतील आद्यवर्णांमध्ये वरचे दात व हिरड्या-खाली जिभेचा शेंडा व पाते), तालव्य (चीड, छे, जीव, झीज, शाप यांतील आद्यवर्णांमध्ये वरच्या हिरड्या व लागूनचा टाळूचा भाग-खाली जिभेचे पाते व लागूनची अग्रजिव्हा), तालुपटलीय (ग, ङ मध्ये वर तालुपटलखाली पश्चजिव्हा), कंठद्वारीय (मराठी ह, इंग्रजी  h, संस्कृत विसर्ग-यांमध्ये मधोमध कंठद्वार-बाजूला घोषवली). तिसरा निकष राहिला कंठद्वारीय प्रयत्नठ हा-त्यानुसार वर्णाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात सघोष वर्णात घोषवलींची कंपन-सदृष जलद उघडमीट होते (उदा., ब, भ, म, ल, य, आ). अघोष वर्णात ती तशी होत नाही (उदा., प, फ, हूं मधला आद्य नासिक्य स्पर्श, विसर्ग). प्रत्येकाचे दोन उपवर्ग पडतात. अल्पप्राण (उदा., प, ब, म, ल, आ) आणि महाप्राण (उदा., फ, भ, म्हण मधला आद्य नासिक्य स्पर्श, हिंदी तरह मधला अंत्य स्वरजातीय वर्ण).

या काहीशा गुंतागुंतीच्या वर्गीकरणाच्या मदतीने वर्णावर्णामधल्या साम्यवैषम्याचा शोध घेऊन वर्णप्रवाहाचा एक-एक वर्ण निश्चित करता येतो. यामुळे दोन भाषांमधल्या सारख्या वाटणाऱ्या वर्णांची तुलना करता येते (उदा., इंग्रजी vote मधला v हा सघोष अल्पप्राण दंत्यौष्ठ घर्षक आहे, तर मराठी पुढे व्हा मधला व्ह् हा सघोष महाप्राण दंतौष्ठ्य घर्षकल्प आहे), तशीच एकाच भाषेतल्या दोन सारख्या वाटणाऱ्या वर्णांची तुलना करता येते (उदा., मराठी वीट मधला व हा सघोष अल्पप्राण दंत्यौष्ठ घर्षकल्प आहे, तर गाव मधला व हा सघोष अल्पप्राण तालुपटलीय कुंचितोष्ठ अतिसंवृत्त स्वरजातीय आहे). अतिसंवृत म्हणजे हवेला खुली वाट अत्यल्प असलेला.

वर्णप्रवाहाचा एक-एक वर्ण निश्चित करायचा, त्याप्रमाणे त्यातील वर्णरचनाही निश्चित करावी लागते. वर्णनिश्चिती मुख्यतः ध्वनिविशिष्टतेची निश्चिती असते, तर वर्णरचनानिश्चिती मुख्यतः ध्वनिकालयोजन, ध्वनिगरिमा आणि स्वरमान यांची निश्चिती असते. उदा., ‘तसं?’ –  ही छोटेखानी उक्ती घेतली तर तिच्यात त्, अ, स्, अ हे वर्ण या कालक्रमाने आले आहेत पहिल्या अ पेक्षा दुसऱ्या अ चे कालमान, ध्वनिगरिमा आणि स्वरमान अधिक आहे – तो अधिक लांबलेला आहे, अधिक मोठ्याने बोलला जातो, अधिक चढ्या सुरातला आहे आणि त् अ मिळून एक अक्षर आणि स् अ मिळून दुसरे अक्षर अशी त्या चार वर्णांची दोन अक्षरांमध्ये उच्चारणाच्या दृष्टीने विभागणी होते. अक्षर म्हणजे या ठिकाणी  ‘सिलॅबल’.


शब्दांकन-शब्दग्रहण-पक्ष : शेकडो उच्चार आणि श्रुती यांमधून वीस ते साठच वर्ण भाषेसाठी उपलब्ध होतात, ते कसे? एकतर बरेचसे उच्चार आणि श्रुती वापरलेच जात नाहीत. (मराठीभाषक कुटुंबात वाढणारे नऊ-दहा महिन्यांचे मूल असे अनेक उच्चार ऐकवते, की ज्यांचा त्याला पुढे मराठी बोलताना काहीच उपयोग नसतो). दुसरे म्हणजे सूक्ष्म, साम्य व वैषम्य यांची जागा स्थूल, अभेद व भेद हे घेतात. वीट मधला व आणि गाव मधला व यांच्यामधले साम्य महत्त्वाचे पण वैषम्य गैरमहत्त्वाचे ठरते, परिणामी दोन्ही वर्णांचा मराठीत तरी  अभेद मानला जातो. या भेद-अभेदाचे नाते शेवटी शब्दरूपांमधल्या भेद अभेदाशी जडते.

थोडक्यात वर्णांमधून हजारो शब्दरूपे कशी तयार होतात, ते आता पहायचे. दोन शब्दरूपांमध्ये तीन प्रकारे भेद पडू शकतो-वर्ण उपस्थित असणे किंवा नसणे (वृक्ष/ऋक्ष, ये ये /ए ए, भांडं/भाडं या जोड्यांतले अनुक्रमे व्, य्, ण् हे वर्ण) हा वर्ण किंवा तो वर्ण उपस्थित असणे (चाड/जाड/झाड, बेट/बॅट, चार गाईंना चार) किंवा वर्णक्रम वेगळा असणे (कान/नाक मधले क्, न्, आ हे तीनतीन वर्ण, वाडे/वेडा मधले व्, ड्, आ, ए हे चार-चार वर्ण). दोन शब्दरूपांमध्ये दोन प्रकारे अभेद असू शकतो-वर्णांमधला भेद दुर्लक्षित राहणे (कोलांटी उडी/गोलांटी उडी, चिकटणे/चिटकणे) किंवा वर्णांमध्ये भेदच नसणे (मग उच्चारवैषम्य असले, तरी ते दुर्लक्षित राहणे- ‘भोज्याला शीव’ यातला अंत्य वर्ण दंत्यौष्ठ्य घर्षकल्प असेल, किंवा कुंचितोष्ठ अतिसंवृत्त स्वरजातीय असेल-शब्दरूप तेच राहते).

दोन वर्णांमध्ये तीन प्रकारे भेद पडू शकतो-मुखप्रयत्न, स्थान किंवा कंठप्रयत्न (चाप/साप मधल्या आद्य वर्णात मुखप्रयत्नाचा भेद आहे, तर चाड/जाड किंवा जाड/झाड मधल्या आद्य वर्णात कंठप्रयत्नाचा भेद आहे). दोन वर्णांमध्ये तीन प्रकारे अभेद असू शकतो – उच्चार-श्रुती यात वैषम्य नसणे (चाप, चोप मधले आद्य वर्ण), उच्चार-श्रुतीमधले वैषम्य दुर्लक्षित राहणे (शीव मधल्या अंत्य वर्णाचे वैकल्पिक उच्चार-श्रुती यातले वैषम्य), किंवा उच्चार-श्रुती मधले वैषम्य इतर भेदांच्या आश्रयाने राहणे (वीट मधला व् अक्षराच्या आरंभी व ईच्या संगतीत दंत्यौष्ठ्य आहे, तर गाव मधला व् अक्षराच्या अंती आणि आ च्या संगतीत केवळ कुंचितोष्ठ आहे).

वर्णरचनेचा विचार शब्दरूपांच्या अंगाने केला, तर एक गोष्ट ध्यानात येते. स्वरजातीय सामान्यतः अक्षराच्या केंद्रस्थानी असतात (वीट मधला ई), क्वचित अक्षराच्या सीमेवर असतात (या, गाय मधला य्), तर व्यंजनजातीय सामान्यतः अक्षराच्या सीमेवर असतात (गार मधले ग्, र्), क्वचित अक्षराच्या केंद्रस्थानी असतात (prism मधला m, संस्कृत क्लृप्ति मधला लृ च्या जागचा ल्), मुख्यतः स्वरमानावर आधारलेले सुरभेद आणि मुख्यतः ध्वनिगरिम्यावर आधारलेले बलभेद सामान्यतः वाक्यसापेक्ष असतात, क्वचित पदसापेक्ष असतात.

काही उदाहरणे देऊन हे स्पष्ट करता येईल –

वाक्यसुर : कोण-कोण-आलं-होतं ।। (दुसऱ्या शब्दापासून अवरोही स्वरमान व्यंजना : प्रश्नाचं उत्तर मला वाटत आहे तेच असावं । प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल । प्रश्नाचं उत्तर मिळायलाच पाहिजे) कोण-कोण-आलं-होतं /।। (दुसऱ्या शब्दापासून आरोह व्यंजना याच्या उलट).

शब्दसुर : पंजाबी कोड़ा (चाबूक), कोड़ा √ (घोडा) (अनुक्रमे अवरोही स्वरमान,  ऱ्हस्व अवरोह-दीर्घ आरोह स्वरमान).

वाक्यबल : त्या-नं काही एक-चूक केलेली नाही /।। (ए पासून चूक पर्यंत घटता ध्वनिगरिमा, ए वर घटता ताण, ए ला अधिक कालमान, नाही शब्दावर आरोही स्वरमान व्यंजना : एकच चूक नाही तर अनेक) त्या-नं काही एक चूक केलेली नाही   \//(ए वर वाढता ताण, अधिक ध्वनिगरिमा, क ला अधिक कालमान, केलेली पासून अवरोही स्वरमान, व्यंजना : एक देखील चूक नाही, अनेक चुका तर दूरच राहू द्या).

शब्दबल : ‘Permit (per या पहिल्या अक्षरावर बल, परवाना),  per’mit (mit या दुसऱ्या अक्षरावर बल, परवानगी देणे).

वर्णाच्या कालमानाचे भेद पदसापेक्ष असतात. स्वर लांबला तर तो भिन्न वर्ण उरतो – रुपं (चांदी), रूपं (रूप चे बहुवचन). व्यंजन लांबले तर तो दोनदा आलेला वर्ण ठरतो-किसा (किसणे आज्ञार्थी), किस्सा (चटकदार कथन).

लेखन-वाचन-पक्ष : आतापर्यंत दिलेला वर्णविचार केवळ बोलण्याच्या अंगाने केला. काही भाषांसाठी (उदा., मराठी, इंग्रजी) वर्णप्रवाह लिहून दाखविण्याचीही रूढ सोय असते. अशा रूढ लेखनपद्धतीत काही ठिकाणी वर्णप्रवाह लेखनात सरळपणे प्रतिबिंबित होतो (उदा., मराठी वारा, इंग्रजी fit). मात्र काही ठिकाणी तो कमीअधिक आडवळणाने प्रतिबिंबित होतो (उदा., मराठी चार गाईंना चार, सुवाच्य याचा वर्णोच्चार सुवाच्च, इंग्रजी feat, know, colonel अनुक्रमे फीट, नो, कर्नल). काही ठिकाणी तर वर्णांना अजिबात डावलून शब्द-रूपाचे लेखन होते (उदा., इंग्रजी &amp अँड).   

संदर्भ : 1. Allen, W. S. Phonetics in Ancient India, London, 1953.

           २. कालेलकर, ना. गो. ध्वनिविचार, पुणे, १९५५.

           ३. केळकर, अशोक रा. “मराठीचे श्रवणप्रत्ययी लेखन”, वैखरी, मुंबई, १९८३.

                                                           केळकर,  अशोक रा.