वर्णगोल : सूर्याच्या अत्यंत तेजस्वी बिंबाला वेढणारा पण त्याच्या किरिटाखाली असलेला सूर्याच्या वातावरणाचा तळचा विभाग [⟶ सूर्य]. त्याची जाडी काही हजार किमी. असूनही तो अत्यंत विरल असल्यामुळे दीप्तिगोलाच्या प्रचंड तेजामुळे सामान्यपणे दिसू शकत नाही. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रबिंब सूर्यबिंबास झाकत असताना ग्रहण पूर्ण होण्यापूर्वी काही क्षण व ग्रहण सुटण्यास आरंभ झाल्याबरोबर काही क्षण चंद्राच्या काळ्या बिंबाला चिकटलेली वर्णगोलाची तांबूस गुलाबी कोर दिसते. वर्णगोलातील क्षुब्ध हायड्रोजन वायूच्या तांबूस रंगामुळे वर्णगोल वेगळा दिसू शकतो, म्हणून सर जोसेफ नॉर्मन लॉक्यर यांनी १९६८ मध्ये या विभागास वर्णगोल असे नाव दिले. खग्रास सूर्यग्रहण नसतानाही आता वर्णगोलाची निरीक्षणे करता येतात. मात्र यासाठी दीप्तिगोलाचा प्रखर प्रकाश कौशल्याने टाळण्याचे तंत्र समाविष्ट असलेली सौरवर्णपटलेखक व किरीटलेखक ही उपकरणे किंवा विशिष्ट प्रकाश गाळण्या यांचे साहाय्य घ्यावे लागते.
वर्णगोलाच्या खालच्या स्तरांचे स्वरूप दीप्तिगोलासारखेच असते, ही गोष्ट खरी असली, तरी सु. ५०० किमी. जाडीच्या भागाचे तापमान दीप्तिगोलाच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा कमी आहे. दीप्तिगोलापासून ते ६,०००° ते ४,०००° के. पर्यंत कमी होत जाते. तापमानाची अशी परिस्थिती दीप्तिगोलाच्या वर्णपटांतील काही उत्सर्जित प्रकाश तरंगांचे या थंड विभागात शोषण होऊन दीप्तिगोलाच्या वर्णपटात काळ्या रेषा दिसतात. यांनाच फ्राउनहोफर वर्णपट रेषा म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी दीप्तिगोल पूर्णपणे झाकला जाईपर्यंत सौरवर्णपटांत फ्राउनहोफर रेषा दिसतात परंतु दीप्तिगोल झाकला जाताच वर्णगोलाच्या मंद प्रकाशाच्या वर्णपटांत या काळ्या रेषांच्या जागी प्रभावी उत्सर्जन रेषा दिसतात. अशा वर्णपटाचे अस्तित्व काही क्षणच टिकते. बहुतेक वर्णगोलाच्या खालच्या स्तरात प्रकाश उत्सर्जनाचे तर वरच्या स्तरात शोषणाचे प्रमाण अधिक आहे.
वर्णगोलाची सरासरी जाडी सु. २,००० किमी. आहे पण वर्णगोल ३०,००० किमी. पर्यंतही जाड होतो. वर्णगोलाची घनता १०–१२ ग्रॅ. प्रती घ. सेंमी. असून पृथ्वीच्या वातावरणाच्या सापेक्ष विचार केल्यास तो जवळजवळ निर्वात प्रदेश आहे. वर्णगोलाच्या तळभागाचे तापमान सु. ४,५००° के. मानल्यास १·५०० किमी. उंचीवर तापमान २०,०००° के. पर्यंत वाढते आणि सरतेशेवटी किरिटाच्या नजीक तापमान १०६ अंश के. इतके चढते. दीप्तिगोलात असलेली बहुतेक मूलद्रव्ये वर्णगोलात असतात. वर्णगोलात कॅल्शियम, हीलियम व हायड्रोजन यांचे आधिक्य असून प्रक्षुब्ध हायड्रोजन अणूच्या दुसऱ्या, किमान ऊर्जा पातळीला इलेक्ट्रॉन येताना हायड्रोजनाच्या वाल्मर रेषा उत्सर्जित होतात. यामुळे वर्णगोल गुलाबी रंगाचा दिसतो. वर्णगोलाच्या चमकत्या वर्णपटात उदासीन (विद्युत् भाररहित) आणि आयनीभूत (विद्युत् भारित) अशा दोन्ही हीलियम अणूंच्या रेषा त्याचप्रमाणे दीप्तिगोलाच्या वर्णपटात नसलेल्या धातूंच्या रेषा दिसतात. यावरून वर्णगोलाचे तापमान दीप्तिगोलाच्या तापमानापेक्षा खूप अधिक असल्याचे स्पष्ट होते. १८६८ सालच्या खग्रास सूर्यग्रहणात वर्णगोलात वर्णपटांत प्रभावी पिवळसर नारिंगी प्रकाश रेषा प्रथमच आढळली. ती रेषा त्या वेळी माहीत असलेल्या कोणत्याही मूलद्रव्याच्या रेषेशी जुळत नव्हती म्हणून ती रेषा त्या वेळेपर्यंत माहीत नसलेल्या कोणत्या तरी अणूची आहे असे धरून त्याला हीलियम असे नाव देण्यात आले. पुढे १८९५ मध्ये हीलियम अणू पृथ्वीवर प्रयोगशाळेत प्रत्यक्ष वेगळा करण्यात यश आले.
दीप्तिगोलापासून दूर जावे तसे वर्णगोलाचे तापमान कमी कमी होत जाण्याऐवजी प्रचंड प्रमाणात वाढत जाते. ही क्रिया ⇨ऊष्मागतिकीच्या नियमाविरुद्ध असल्यामुळे तिचे स्पष्टीकरण शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत.
मराठे, स. चिं. नेने, य. रा.