तिथि : पंचांगाचे एक अंग व चांद्रमासाचा तिसावा भाग. चंद्राची दृश्य गती सूर्याच्या दृश्य गतीपेक्षा जास्त असल्याने चंद्र सूर्याच्या पुढेपुढे म्हणजे पूर्वेकडे सरकतो. अशा प्रकारे सूर्य व चंद्र यांतील अंतर ० अंशापासून ३६० अंशांपर्यंत वाढत जाते. या अंतरापैकी प्रत्येक १२ अंशांचे (म्हणजे ०° ते १२°, १२° ते २४°, २४° ते ३६° इ.) भोगात्मक [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] अंतर पडण्यास जो कालावधी लागतो, त्याला तिथी म्हणतात. अंशात्मक अंतराच्या दृष्टीने पाहिल्यास तिथी सारख्याच म्हणजे बारा बारा अंशाच्या असल्या, तरी चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे तिथींचा कालावधी असमान म्हणजे ५० ते ६८ घटका असतो, उलट दिवस ६० घटकांचा असतो. पंचांगानुसार ० अंश ते १८० अंशांपर्यंत १५ तिथी होतात व या कालावधीला शुद्ध, शुक्ल किंवा सित पक्ष (पंधरवडा) म्हणतात. पुढे म्हणजे १८० अंश ते ३६० अंश (किंवा ० अंश) पर्यंत आणखी १५ तिथी होतात व या कालवधीला वद्य, कृष्ण किंवा बहुल पक्ष म्हणतात. प्रतिपदा, द्वितीया, … … … चतुर्दशी या तिथी दोन्ही पक्षांत असून शुद्ध पक्षातील १५व्या तिथीला पूर्ण चंद्र दिसतो म्हणून पौर्णिमा व वद्य पक्षातील १५व्या तिथीला चंद्र-सूर्य एकत्र येतात म्हणून अमावस्या म्हणतात. अशा प्रकारे चांद्रमासात एकूण ३० तिथी असतात. ०°, १२°, २४°, … …, १८०°, … …, ३६०° ही अंतरे नेहमीच सूर्योदयाला, मध्यान्हीला वा सूर्यास्ताला नसतात. त्यामुळे संपूर्ण दिवसाच्या अवधीत तिथी केव्हाही सुरू होणे व केव्हाही संपणे शक्य असते. पंचागातील दिवस सूर्योदयापासून सुरू होतो व सोयीसाठी सूर्योदयाच्यावेळी जी तिथी असेल ती त्या सबंध दिवसाची तिथी समजतात. यामुळे ६० घटकांपेक्षा लहान तिथीचा क्षय वा लोप होण्याची शक्यता असते, तर ६० घटकांहून मोठ्या तिथीची वृद्धी होण्याची म्हणजे लागोपाठचे दोन दिवस तीच तिथी येण्याची शक्यता असते. परिणामी पक्षातील तिथींची संख्या कमीजास्त होऊ शकते. अशा प्रकारे व्यवहारात तिथी निरुपयोगी असल्या तरी धार्मिक सण, विधी व समारंभ हे तिथीप्रमाणे होतात. प्रत्येक तिथीचा स्वामी व शुभाशुभ फले मानलेली आहेत. वेदांगज्योतिष काळी (शकपूर्व १४००) तिथी प्रचारात होत्या. वेद, बृह्‌वृच ब्राम्हण, सूत्र वाङ्‌मय व २०० सालचा एक शिलालेख यांत तिथीचा उल्लेख आढळला आहे [→ पंचांग].

हिंदी मुसलमानांमध्ये इस्लामी महिन्यांच्या दिवसांना तिथींप्रमाणे स्वतंत्र नावे दिलेली नाहीत, तर इंग्रजी महिन्यांप्रमाणेच या महिन्यांच्या १ ते २९ वा ३० तारखा असतात. अमावस्येनंतर प्रथम ज्या दिवशी चंद्र दिसतो, त्या दिवशी नव्या मुसलमानी महिन्याची पहिली तारीख मानतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे हिंदू तिथी एक दिवसाने मुसलमानी तारखेच्या पुढे असते. इराणी लोकांमध्ये आणि इलाही कालगणनेत महिन्यातील प्रत्येक दिवसाला स्वतंत्र नाव दिलेले आढळते.

ठाकूर, अ. ना.