वरेरकर, भार्गवराम विठ्ठल : (२७ एप्रिल १८८३–२३ सप्टेंबर १९६४). मराठीतील पुरोगामी नाटककार आणि कादंबरीकार. मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध. जन्म चिपळूणचा. बालपण मालवणला गेले. त्यांचे प्राथमिक व थोडेफार माध्यमिक शिक्षण मालवणलाच झाले. १८९८ साली त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढून रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलात डॉक्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ‘मेडिकल प्यूपिल’ म्हणून पाठविले. शारीरिक दुबळेपणामुळे त्यांना हे शिक्षण मधेच सोडून टपाल खात्यात नोकरी करावी लागली. परंतु ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना मराठी कवी डॉ. ⇨कान्होबा रणछोडदास कीर्तिकर त्यांना अध्यापक म्हणून भेटले. कीर्तिकरांच्या सहवासाचा आणि त्यांच्या दुर्मिळ ग्रंथसंग्रहाचा लाभ वरेरकरांना झाला. शेक्सपिअरची नाटके कीर्तिकरांनी त्यांच्याकडून अभ्यासून घेतली. विख्यात नॉर्वेजिअन नाटककार ⇨ हेन्रिक इब्सेन ह्याच्या नाटकांचा परिचय कीर्तिकरांमुळेच त्यांना होऊ शकला. फ्रेंच नाटककार⇨मोल्येर ह्याची नाटकेही त्यांनी वाचली. कीर्तिकर हे प्रगतिक विचारांचे असल्यामुळे वरेरकरांच्या लेखणीला पुरोगामीपणाचे विशिष्ट वळणही मिळाले. टपाल खात्यात वरेरकरांनी वीस वर्षे नोकरी केली. त्यानंतर मात्र लेखन हाच त्यांचा आमरण व्यवसाय होता. नाटके, कांदबऱ्या, कथा, रहस्यकथा असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते गुरुस्थानी मानीत.
वरेरकरांनी नाट्यलेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केले, ते कुंजविहारी (१९१४) हे नाटक लिहून. त्यांच्या अन्य नाटकांत हाच मुलाचा बाप (१९१७), संन्याशाचा संसार (१९२०), सत्तेचे गुलाम (१९२२), करीन ती पूर्व (१९२७), सोन्याचा कळस (१९३२), उडती पाखरे (१९४१), सारस्वत (१९४२), जिवा-शिवाची भेट (१९५०), अ-पूर्व बंगाल (१९५३) आणि भूमिकन्या सीता (१९५५) ही काही विशेष उल्लेखनीय होत. काही एकांकिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर, जेम्स बॅरी, हेन्रिक इब्सेन, विल्यम बॅरेट ह्या नाटककारांच्या नाटकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले.
किर्लोस्करप्रणीत रंगभूमीचा पुढे बराच विस्तार झाला, तरी तिचा चेहरामोहरा दीर्घकाल पौराणिक-ऐतिहासिक थाटाचा व संगीतप्रधान असाच राहिला. पण मराठी नाटक वास्तववादी व सुटसुटीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न वरेरकरांनी केला. समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालणारे विषय त्यांनी आपल्या नाटकांसाठी निवडले. मराठी रंगभूमीवर माजलेले संगीताचे अवाजवी प्रस्थ त्यांनी कमी केले. त्यांची दृष्टी आधुनिक व प्रयोगशील होती. नाटकांतल्या स्वगतांना त्यांनी फाटा दिला. एक अंक एक प्रवेश हे रचनातंत्र यथावकाश स्वीकारले. तत्कालीन सामाजिक, राजकीय आंदोलनांचे प़डसाद त्यांच्या नाटकांत उमटले. हाच मुलाचा बाप ह्या नाटकात त्यांनी हुंड्याचा प्रश्न मांडला. संन्याशाचा संसार हे त्यांचे नाटक पतितपरावर्तनाच्या प्रश्नावर आधारलेले आहे. असहकारितेची चळवळ जोरात असताना, तिच्या प्रभावाखाली त्यांनी सत्तेचे गुलाम लिहिले. तुरुंगाच्या दारात (१९२३) ह्या त्यांच्या नाटकाचा विषय अस्पृश्योद्धार हा आहे, तर सोन्याचा कळस हे नाटक मजूर-मालक संघर्षावर लिहिले आहे. रामाने सीतेवर केलेला अन्याय त्यांनी भूमिकन्या सीता ह्या नाटकातून प्रभावीपणे उभा करून पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला केला आहे. पूर्व बंगालमधील नोआखालीला झालेल्या हत्याकांडात अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले. त्यांना भ्रष्ट करण्यात आले. वरेरकर स्वत: नोआखालील जाऊन त्या स्त्रियांच्या व्यथा-वेदना पाहून आले होते. त्याच अनुभवांच्या आधारे त्यांनी अ-पूर्व बंगाल हे नाटक लिहिले. प्रचारकी धोरण, अतिरंजितपणा, काव्यात्मतेचा अभाव हे त्यांच्या नाटकांतले दोष म्हणून दाखविले जात असले, तरी त्यांच्या नाटकांचे विविध गुणविशेष दुर्लक्षण्यासारखे नाहीत. त्यांची नाट्यनिष्ठा फार मोठी होती. त्यांनी अनुवादिलेल्या नाटकांत खेळघर (इब्सेनच्या डॉल्स हाउसवरून लिहिलेले) विशेष उल्लेखनीय आहे.
वरेरकरांनी कादंबऱ्याही विपुल लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यांतही अनेक सामाजिक प्रश्नांचे चित्रण येते. संसार की संन्यास (१९११) ही त्यांची पहिली कादंबरी पण विधवाकुमारी (१९२८) ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. लग्न होते न होते, तोच वैधव्य आलेल्या एका गरीब मुलीने निश्चय आणि चिकाटी ह्यांच्या आधराने आयुष्यात कशी कर्तबगारी दाखविली ह्याचे चित्रण वरेरकरांनी ह्या कादंबरीत केले आहे. गतभर्तृका ह्या टोपणानावाने वरेरकरांनी ही कादंबरी प्रसिद्ध केली होती. धावता धोटा (१९३३) ही त्यांची कादंबरीही उल्लेखनीय आहे. तीत गिरणगावातील जीवनाचे आणि तिथल्या आसमंताचे प्रत्ययकारी चित्र वरेरकरांनी उभे केले आहे. मराठीतल्या पहिल्या राजकीय कादंबरीचा मान काही समीक्षकांनी ह्या कादंबरीला दिलेला आहे. त्यांच्या गोदू गोखले ह्या कादंबरीची त्याच नावाची नायिका असांकेतिक बंडखोर जीवन जगते. त्यांची फाटकी वाकळ (१९४१) ही कादंबरी ग्रमसुधआरणेसाठी खेड्यात जाणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाची कथा आहे. ह्या कादंबरीचा उत्तरार्ध मी रामजोशी (१९४१) ह्या नावाने त्यांनी लिहिला. लढाईनंतर (१९४७) ह्या कादंबरीत एका सैनिकाच्या मनःस्थितीचे चित्रण केलेले दिसते. त्याचप्रमाणे विनाशाच्या भयाने ग्रस्त झालेल्या जनतेच्या मनातली बेचैनीही त्यांनी ह्या कादंबरीतून व्यक्तविली आहे. कादंबरीलेखनासाठी त्यांनी निवडलेल्या विषयांचे क्षेत्र अनेक मराठी कादंबरीकारांच्या तुलनेत खूपच विस्तृत आहे आणि नाटकांप्रमाणेच कादंबऱ्या लिहितानाही वास्तव चित्रणावर त्यांनी भर दिलेला आहे. यथार्थ वास्तववादी चित्रण हा वाङ्मयाचा प्राण आहे, असे वरेरकर मानत.
‘जीवनासाठी कला’ ही वरेरकरांची भूमिका होती. लोकजागृती करणे हेच हिंदुस्थानच्या वाङ्मयाचे एकमेव ध्येय राहिले पाहिजे असे ते म्हणत. त्यामुळेच त्यांच्या लेखनात प्रचारकी सूर उमटले, तरी त्यांनी त्यांची फिकीर केली नाही.
बंगाली कथा-कादंबऱ्यांचे त्यांनी केलेले अनुवाद हा त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. हे अनुवाद सहजरम्य व सरस उतरले आहेत. त्यातील काही असे : शरत्चंद्र चतर्जीकृत कादंबऱ्यांचे– चंद्रनाथ (१९३८), श्रीकांत (भाग १ ते ४, १९३९- ४१), बिराजबउ (१९१४–अनुवाद विराज-वहिनी, १९४३), शेषप्रश्न (१९४७), चरित्रहीन (१९४९) इत्यादी. बंकिमचंद्र चतर्जीकृत कादंबऱ्यांचे – आनंदमठ (१९५२), कपालकुंडला (१९५४),चंद्रशेखर (१९५४), दुर्गेशनंदिनी (१९५४). प्रभातकुमार मुखर्जी ह्यांच्या कादंबऱ्यांचे- रत्नदीप (१९५५), सत्यबाला (१९५६). त्यांच्या कथासंग्रहांचे–षोडशी (१९३६), एकादशी (१९४४). शरत्चंद्र चतर्जी, रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या कथाही त्यांनी अनुवादिल्या आहेत. स्वतःच्या नाटकांतील पदांखेरीज ‘विजयादशमी’, ‘उमाजी नाइकाचा पोवाडा’ अशी काही काव्यनिर्मितीही त्यांनी केली. माझा नाटकी संसार (४ भाग, १९४१, १९५२, १९५९ व १९६२) ह्या नावाने त्यांनी आपले आत्मवृत्तही लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या रहस्यकथांची संख्याही बरीच आहे. त्यांनी अनेक स्फुट लेखही लिहिले.
पुणे येथे १९३८ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. धुळे येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे ते अध्यक्ष होते. १९५६ साली भारत सरकारकडून पद्मभूषण ही पदवी त्यांना देण्यात आली. त्याच वर्षी ते राज्यसभेचे नियुक्त सदस्य झाले. १९६२ पर्यंत ते राज्यसभेवर होते. १९५९ साली त्यांना पद्मविभूषण ही पदवी देण्यात आली. १९६३ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप त्यांना दिली गेली. भारतात ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या खाजगी कंपनीने रेडिओकेंद्र सुरु केल्यापासून त्यांचा रेडिओ ह्या माध्यमाशी संबंध होता. आकाशवाणीशी त्यांचे निकटचे नाते होते. ह्या माध्यमासाठीही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांत अनेक नभोनाट्यांचा समावेश आहे. ह्या विशिष्ट लेखनप्रकारचे महाराष्ट्रातले आद्यत्व त्यांना द्याला हवे.
दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
कुलकर्णी, गो. म.
“