वर्गीकरणविज्ञान : वर्गीकरण  म्हणजे गटवारी. कोणत्याही वस्तूंची, घटनांची अगर तत्त्वांची लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्यांमधील साम्य आणि भेदांवर आधारित गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण होय. व्यापक अर्थाने असे वर्गीकरण करण्याच्या पण अधिक नेमकेपणे वनस्पती व प्राणी यांच्या म्हणजे जीवविज्ञानीय वर्गीकरणाच्या अभ्यासाला वर्गीकरणविज्ञान म्हणतात.

इतिहास :  वर्गीकरण करणे ही मानवी मनाची सहजप्रवृत्ती आहे. अगदी अडाणी माणूसदेखील व्यवहारातील सोईसाठी वर्गीकरण करतो. उदा., अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, औषधी वनस्पती इत्यादी. माणसाखेरीज अन्य प्राणीही वर्गीकरण करू शकतात. उदा., मांजराला स्वजातीय आणि कुत्रा यांतला भेद समजतो, दूध व पाणी यांतला भेद समजतो. म्हणजे वर्गीकरण ही एक विश्लेषणात्मक क्रिया आहे, माणसाला भाषा येऊ लागल्याने त्याचा वर्गीकरणाचा पाया अधिक भक्कम झाला आहे.

अशा प्रकारे आदिम संस्कृतींबरोबरच वर्गीकरणविज्ञानाची सुरुवात झाल्याचे दिसते. वर्गीकरणासाठी पूर्वी मुख्यत्वे जीवाच्या कार्याशी निगडित असणारे निकष वापरीत. उदा., धोकादायक मांसाहारी व मवाळ असे मांसाहारी नसलेले (शाकाहारी) प्राणी किंवा खाण्याला चांगल्या  व खाण्यास वाईट वनस्पती वगैरे. हळूहळू माणूस आपल्या परिसराकडे अधिकाधिक विश्लेषणात्मक दृष्टीने पाहू लागला. परिणामी त्याला मांजरासारखे किंवा हरिणासारखे असलेले इतरही प्राणी ओळखता येऊ लागले व त्यांचा एक गट बनविण्याची कल्पना त्याला सुचली. नंतर जीवांच्या आकारवैज्ञानिक साम्यांचा विचार करून त्याने असे गट एकत्रित करण्याचाही प्रयत्न केला. उदा., उंच वाढणाऱ्या व लाकूड देणाऱ्या सर्व वनस्पतींना मिळून तो वृक्ष म्हणू लागला. अर्थात या काळात वर्गीकरण करताना त्याचा मुख्य भर अन्न, वस्त्र, औषधे इत्यादींसारख्या जीवनावश्यक बाबी विचारात घेण्यावर असे.

शास्त्रीय दृष्टीने वर्गीकरण करण्याचा पाया ⇨कार्ल लिनीअस यांनी १७५० च्या सुमारास घातला. त्यांनी ⇨जाती हा सर्वात मूलभूत घटक घेऊन वर्गीकरणाची एक साधी द्विपदनाम पद्धती प्रचलित केली. हिचे अधिक वर्णन पुढे ‘वर्गीकरण’ या उपशीर्षकाखाली दिले आहे.

एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक माहिती, पद्धतिशास्त्र व जीववैज्ञानिक सिद्धांत यांच्यात मोठी वाढ झाली. यामुळे वर्गीकरणविज्ञान हे एक मोठे व्यापक क्षेत्र झाले व त्याचा विज्ञानाच्या सर्व शाखांशी आणि मानवी कृत्यांशीही अनेक प्रकारे संबंध येऊ लागला. अशा प्रकारे विज्ञानामधील प्रगतीच्या अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांचा विचार वर्गीकरणविज्ञानात करणे आवश्यक झाले. असे काही महत्त्वाचे टप्पे पुढील होत : नैसर्गिक निवडीद्वारे जीवांच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत, जीवाश्मांविषयीचे (शिळाभूत जीवावशेषांविषयीचे) विलक्षण शोध, ⇨थ्रेगोर योहान मेंडेल यांचे आनुवंशिकीचे तत्त्व, गुणसूत्रे [⟶ आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे सुतासारखे घटक ⟶ गुणसूत्र] व त्यांच्या कार्याविषयीचे स्पष्टीकरण, आधुनिक जैवमिती व संगणकविज्ञान. त्याचप्रमाणे सूक्ष्मजंतू व व्हायरसांविषयीची सूक्ष्मजीववैज्ञानिकांची निरीक्षणे आणि दूरवरच्या भागांतील वनस्पती व प्राणी यांचा करण्यात आलेला अभ्यास. अर्थात जगातील सर्व जीवांचा अभ्यास ही अजून दूरवरची गोष्ट असून त्यांची अगदी थोडीच गुणवैशिष्ट्ये माहीत झालेली आहेत. (बहुसंख्य आधुनिक वर्गीकरणांवर वरीलपैकी क्रमविकासाच्या  सिद्धांताचा मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक माहिती पुढे ‘क्रमविकासाचा सिद्धांत व जीवांचे वर्गीकरण’ या उपशीर्षकाखाली दिली आहे).

वर्गीकरणाची रीत : सर्वसामान्यतः वर्गीकरण करताना साम्य दर्शविणाऱ्या सर्व वस्तू वा घटना एका गटात समाविष्ट केल्या जातात,तर या साम्यापासून फारकत असलेल्यांचा दुसरा गट तयार होतो. उदा., ‘फूल’ या गुणवैशिष्ट्यानुसार वनस्पतींचे फुले येणाऱ्या सपुष्प वनस्पती आणि फुले नसणाऱ्या अपुष्प वनस्पती हे दोन गट होतात. वर्गीकरण दोन प्रकारे करता येते. एक व्यावहारिक वर्गीकरण व दुसरे शास्त्रीय वर्गीकरण. व्यावहारिक वर्गीकरण करताना सोईचा विचार महत्त्वाचा असतो. उदा., ग्रंथालयातील पुस्तकांचे वर्गीकरण, हे वर्गीकरण ग्रंथाच्या साहित्यिक स्वरूपाप्रमाणे म्हणजे कथा, कादंबरी, काव्य, नाटक, टीका, व्याकरण अशा गटांत केले जाते. केवळ सोय हा एकच निकष लावल्याने असे वर्गीकरण बऱ्याच वेळा कृत्रिम होते. इतर अनेक भेद असले, तरी एखादाच समान गुणधर्म या वर्गीकरणाचा आधार असतो. उदा., हवेत उडता येणे हा व्यावहारिक गुणधर्म विचारात घेतला, तर हवेत उडणाऱ्या प्राण्यांत डास, माशी, वेगवेगळे पक्षी, वटवाघूळ यांचा समावेश होतो पण शास्त्रीय दृष्ट्या या प्राण्यांचा उडता येणे हा एकच समान गुणधर्म सोडला, तर त्यांच्यात इतर काहीच साम्य नाही. कॅक्टस (निवडुंग) वर्गीय म्हणजे शुष्क प्रदेशात वाढणाऱ्या काटेरी वनस्पती. पण एवढे एकच साम्य सोडले, तर या वनस्पतींची फुले अगदी वेगवेगळ्या प्रकारची असतात. परिणामी त्या भिन्न कुलांतील आहेत.

याउलट शास्त्रीय वर्गीकरण हे शास्त्रीय ज्ञानावर अवलंबून असते. त्यामुळे त्याला विशिष्ट मूल्यांचा आधार असतो. वरील उडणाऱ्या प्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केल्यास त्यांचे प्रथम अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे प्राणी) व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे प्राणी)  असे दोन गट तयार होतात. अपृष्ठवंशी गटात डास व माशी यांचा समावेश होतो व ते दोन्ही कीटकवर्गीय आहेत. पक्षी व वटवाघूळ पक्षी नसून स्तनी (सस्तन) वर्गीय प्राणी आहे. [⟶ प्राण्यांचे वर्गीकरण].

शास्त्रीय वर्गीकरणात ठळक, सुस्पष्ट बाह्य लक्षणांचा वापर करून जे गट तयार होतात ते साम्यभेदांवर आधारित असतात. सर्व समानधर्मीयांचा एक गट होतो. उदा. पाठीचा कणा असणे या समान गुणधर्मानुसार मासे, बेडूक, साप, पक्षी, मानव हे सर्व पृष्ठवंशी प्राणी आहेत. याउलट आदिजीव (प्रोटोझोआ), प्रवाळ, कीटक, गोगलगाय, कालव यांना पाठीचा कणा नसल्याने ते सर्व अपृष्ठवंशी या गटात मोडतात. म्हणजे एका समान गुणधर्मापासून फारकत असलेल्यांचा हा दुसरा गट तयार झाला. पुढे या प्रत्येक गटाची विभागणी त्यामधील फरकावर केली जाते व उपगट तयार होतात. या सर्व प्रक्रियेमुळे वर्गीकरण केल्यास निसर्गाचे अधिकाधिक सखोल ज्ञान प्राप्त करण्यास वर्गीकरणविज्ञानाचा हातभार लागतो. त्याचप्रमाणे समानधर्मीयांचा एक गट तयार केल्याने ते स्मरणशक्तीवरचा ताण कमी करते. कारण या वर्गीकरणामुळे प्रत्येक वस्तू वा घटना स्वतंत्रपणे लक्षात न ठेवता त्या सामूहिक स्वरूपात लक्षात ठेवणे अधिक सोपे असते.

वर्गीकरणाचे पायाभूत नियम म्हणून पुढील  नियम महत्त्वाचे आहेत : (१) शास्त्रीय वर्गीकरणात अधिकाधिक महत्त्वाच्या साम्यांचा वापर करून गट तयार करणे. (२) या गटाचे इतर गटांशी जे साम्य असेल त्यानुससार त्यांचे एकत्रीकरण करणे आणि भेदानुसार गट अलग ठेवणे. (३) अगदी लहान स्तरावरील गटांचे मोठ्या गटात एकत्रीकरण करणे आणि अशा मोठ्या गटांचे आणखी मोठ्या गटांत एकत्रीकरण करून पायऱ्या पायऱ्यांची उतरंडीसारखी रचना (मांडणी) तयार करणे. [⟶ वनस्पतींचे वर्गीकरण]. (४) अशा तऱ्हेने तयार होणारी सुसंबद्ध रचना म्हणजेच वर्गीकरण होय.


वर्गीकरण : विविध प्रकारच्या आकृत्या, अंक पद्धती किंवा नामपद्धतीद्वारे वर्गीकरण दर्शवितात. नामपद्धती ही सर्वात जास्त मान्यता पावलेली पद्धती आहे. वर्गीकरणातील जाती या सर्वांत मूलभूत वर्गाकरिता एकपद व द्विपद नामपद्धती वापरतात. खनिजविज्ञानात एकपद नामपद्धती वापरतात. (उदा., क्वार्टझ, गॅलेना). जीवविज्ञानात मात्र कार्ल लिनीअस यांनी द्विपद नामपद्धती रूढ केली. या पद्धतीत प्रत्येक जीवजातीकरिता मान्यता प्राप्त एकमेव नाव स्वीकारतात. त्याकरिता प्रजाती व जाती वा गुणवैशिष्ट्य निर्दिष्ट करणारा एकेक असे दोन  शब्द वापरतात. (उदा., मॅंजिफेरा इंडिका या आंब्याच्या शास्त्रीय नावात मॅंजिफेरा हे प्रजातिवाचक तर इंडिका हे गुणवैशिष्ट्यदर्शक नाव आहे). यातील शब्द बहुतकरून लॅटिन व कधीकधी ग्रीक अथवा लॅटिन रूप दिलेले अन्य भाषांतील शब्द असतात. तसेच जीवाचे प्रथम वर्णन करणाऱ्या  तज्ञाच्या नावाचे संक्षिप्त रूप कधीकधी या दोन शब्दांनंतर देतात (उदा., फायकस  बेंगालेन्सिस लिन. हे वडाचे नाव असून यात लिन. हे लिनीअस यांचे संक्षिप्त रूप आहे) .जातीच्या नावाशी प्रजातीचे नाव जोडण्याच्या या साध्या पद्धतीमुळे परस्परसंबंध उघड झाल्याने नव्याने आढळणारे जीव प्रजातीत समाविष्ट करता येतात. लिनीअस यांची ही सोयीस्कर आणि लवचिक पद्धती समाधानकारक तर ठरलीच शिवाय वेगवेगळे ओळखता येऊ शकतील असे प्राणी व वनस्पती यांचा जगभर शोध घेण्यासही या पद्धतीमुळे चालना मिळाली. जीवाश्मरूपातील जीवांचाही अंतर्भाव करणे या पद्धतीत शक्य झाले मात्र त्याकरिता काही यादृच्छिक बाबी गृहीत धरतात.

जाती हा सहजपणे ओळखता येणारा गट आहे. मात्र जातीची वेगवेगळी व्याख्या केली जाते (उदा., प्राणिविज्ञानात आणि वनस्पतिविज्ञानात). जातीतील परिस्थितीवैज्ञानिक अथवा भौगोलिक दृष्टीने वेगळ्या गटाला उपजाती वा प्रकार म्हणतात. जातीनंतर प्रजाती, कुल, गण, वर्ग व संघ (वनस्पतींच्या बाबतीत विभाग) हे वर्गीकरणातील अधिकाधिक मोठे गट आहेत. कधी कधी त्यांचे उपगट करतात (उदा., उपकुल, उपगण). प्राणी व वनस्पती हे सर्वात व्यापक गट असून त्यांना कोटी वा सृष्टी म्हणतात. शैवले, कवक, आदिजीव, मिक्झोमायसिटीझ इ. जीव स्पष्टपणे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत, हे नक्की सांगता येत नाही म्हणून काही तज्ञ त्यांचा समावेश प्रोटिस्टा या तिसऱ्या स्वतंत्र कोटीत करतात.

क्रमविकासाचा सिद्धांत आणि जीवांचे वर्गीकरण : चार्ल्स डार्विन यांच्या क्रमविकासाच्या सिद्धांताचा जीवांच्या बहुसंख्य आधुनिक वर्गीकरणावर फार मोठा परिणाम घडून आला. डार्विन-पूर्व काळात जीवांचे वर्गीकरण हे व्यावहारिक आणि म्हणूनच बरेचसे कृत्रिम होते. डार्विन यांच्या क्रमविकासाच्या तत्त्वानुसार सर्व जीवांना जोडणारा काही समान धागा आहे. मात्र कालानुसार जीवांत बदल घडत गेले आणि त्यामुळे जीवांत फरक निर्माण झाले अत्यंत साध्या, अप्रगत जीवांपासून अतिशय क्लिष्ट संरचना असणाऱ्या प्रगत जीवांची निर्मिती झाली म्हणूनच जीवांचे वर्गीकरण करताना त्यांच्यामधील साम्यांचा क्रमविकासानुसार विचार करणे आवश्यक ठरते.

डार्विन-पूर्व काळात वर्गीकरण करताना उत्पत्ती सिद्धांताचा संबंधच नव्हता म्हणजे त्या काळच्या वर्गीकरणात विचारात घेतलेले साम्य केवळ बाह्यरूपांवरच आधारित असे. याउलट क्रमविकासाचा सिद्धांत मान्य झाल्यावर विचारात घेतले जाणारे साम्य दोन गटांतील नाते सांगणारे असते. दोन गटांचा आधारभूत मूळ गट, त्यापासून दोन गटांचा दोन वेगवेगळ्या दिशांनी झालेला विकास यांचा अशा प्रकारच्या वर्गीकरणात विचार केला जातो. उदा., सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील पृष्ठवंशी प्राण्यांपासून पक्षी वर्गीय आणि स्तनी वर्गीय म्हणजे गाय, कुत्रा, म्हैस, माकड आणि माणूस या प्राण्यांचा विकास झाला असे मानण्यात येते. अशा प्रकारच्या वर्गीकरणात सरीसृप वर्गीय प्राणी खालच्या पायरीवर तर पक्षी वर्गीय आणि सस्तन प्राणी वरच्या पातळीत दाखवले जातात. म्हणजेच पायऱ्यापायऱ्यांच्या वर्गीकरणात क्रमविकासानुसार अप्रगत प्राणी खालच्या पायरीवर तर क्रमविकसित पावलेले प्राणी वरच्या पायरीवर असतात. अशा तऱ्हेने तयार करण्यात आलेल्या वर्गीकरणामुळे एखाद्या गटाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे स्पष्ट होतात म्हणजे वर्गीकरणाच्या या प्रकाराला जनुकविधाविषयक किंवा विकासविषयक संबंध आधार आहेत. याउलट बाह्य स्वरूपांवर अथवा गुणधर्मांवर आधारलेल्या वर्गीकरणास रूपसंबंधी वर्गीकरण म्हणता येईल.

विकाससंबंधांवर आधारित वर्गीकरणात बाह्य स्वरूपाबरोबरच कोशिकाविज्ञान (पेशींच्या अध्ययनाचे शास्त्र), ऊतकविज्ञान (ऊतकांचा म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांचा अभ्यास), शरीरक्रियाविज्ञान, आनुवंशिकी इ. जीववैज्ञानिक शाखांचा वापर करून सर्वसमावेशक वर्गीकरण तयार केले जाते.

अशा प्रकारे वर्गीकरणविज्ञानाची मूलभूत पद्धती अशी आहे : तुलनात्मक शारीराच्या (शरीररचनाशास्त्राच्या) पद्धतींनी प्राणी व वनस्पतींच्या संरचनात्मक गुणवैशिष्ट्यांची तुलना करणे आणि त्यांच्यातील साम्य व भेदांचे तुलनात्मक आनुवंशिकी, जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, भ्रूणविज्ञान, वर्तन, परिस्थितिविज्ञान व भूगोल यांच्या दृष्टींनी स्पष्टीकरण देणे वा अर्थ लावणे.

अगदी अलीकडच्या काळात सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) वर्गीकरण नावाचा नवीन विचार मांडण्यात आलेला आहे. यानुसार जीवविज्ञानाच्या विविध शाखांकडून उपलब्ध झालेली माहिती संगणकाला पुरवली जाते व काही साख्यिकीय पद्धती वापरून वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणाला प्रयोगातून मिळालेल्या निष्कर्षांची जोड दिली जाते. खेरीज वेळोवेळी नवीन वनस्पती किंवा प्राणी सापडले, तर वर्गीकरणाच्या पद्धतीत नाममात्र  किंवा आमूलाग्र बदल केले जातात.

पहा : जाति जातिवृत्त प्राणिनामपद्धति प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतिनामपद्धति वनस्पीतींचे वर्गीकरण.

संदर्भ : 1. Duncan. T. Stucssy, T. F. Eds., Cladistics : Perspectives on the Reconstruction of  Evolutionary History, London, 1984.

2. Grant, W., Ed., Plant Biosystematics, New York, 1984.

3. Shukla, Priti Misra, Shital, An Introduction to Taxonomy of Anglosperms, New Delhi,  1979.

4. Sncath, P. H. Sokal, R. R. Numerical Taxonomy: The Principles and Practice of  Numerical Classification, 1973.

5. Wiley, E. O. Phylogenetics : The Theory and Practice of Phylogenetic Systematics,  London, 1981.

साने, हेमलता द.