वरुण−१ : एक महत्त्वाची वैदिक देवता. वरुणाच्या मूळ स्वरूपाविषयी निरनिराळी मते विद्वानांनी पुढे मांडली आहेत. ‘वरुण’ हा शब्द ‘वृ’ या ‘झाकणे’, ‘सामावून घेणे’ या अर्थाच्या धातूपासून साधित झाला असल्याचे गृहीत धरून वरुणाला सामान्यपणे आकाशदेवता मानण्यात आले आहे (रोट, श्रडर, ब्लूमफील्ड, द्युमेझिल हे विद्वान ह्यात मताचे आहेत). ग्रीक आकाशदेवता यूरेनॉस अथवा यूरानस हिच्याशी त्याचे नाम- स्वरूप–सादृश्य कल्पिले आहे. याशिवाय, वरुणाच्या केवळ काही वैशिष्ट्यांवर भर देऊन त्याला रात्रिदेवता (मेयर), चंद्रदेवता (ओल्डेनबर्ग, हिलेब्रांट), जलदेवता (पिशेल, कुइपर), किंवा शपथदेवता (ल्यूड्यर्स) असेही मानण्यात आले आहे (कंसातील नावे तसे मानणाऱ्या संबंधित विद्वानांची). ही सर्व मते एकांगी वाटतात.
वरुणाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना ऋग्वेदात वर्णिलेली त्याची पुढील वैशिष्ट्ये साकल्याने लक्षात घेणे आवश्यक आहे ‘ऋता’ चा मूळ अध्यादेशक व पालक वरुण ‘असुर’ वरुण वरुणाचे पाश वरुणाची माया वरुणाचे वैश्विक आधिपत्य वरुणाचे मित्रदेवतेशी असलेले निकटचे साहचर्य आणि वरुण व इंद्र यांच्यातील स्पर्धा. ज्या उपपत्तीच्या आधारे ही सर्व वैशिष्ट्ये परस्परसुसंगत वाटतील तीच उपपत्ती स्वीकार्य मानावयास पाहिजे. पूर्वार्यांचे म्हणजेच वैदिक आर्य व इराणी आर्य यांच्या पूर्वजांचे–दैवतशास्त्र प्रारंभी निसर्गाधिष्ठित होते पण निसर्ग अतिविशाल असला, तरी तो विस्कळित, अनियंत्रित, किंवा यादृच्छिक नाही त्याचे सर्व व्यापार एका वैश्विक नियमनानुसार चाललेले असतात या गोष्टीची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली आणि याच जाणीवेतून त्यांना ऋताची म्हणजेच वैश्विक प्रशासनाची संकल्पना स्फुरली. ऋत म्हणजेच विश्वाचा कायदा आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम वरुणाचे. ऋतप्रवर्तनाचे हे प्रचंड काम वरुण करू शकतो याचे कारण तो असुर आहे. ‘असु’ म्हणजेच सर्वव्यापक यातुशक्ती. ती शक्ती ज्याच्याजवळ भरपूर प्रमाणात आहे तो असुर (‘र’ हा मत्वर्थीय प्रत्यय). असुर वरुण प्राचीन इराणी आर्यांच्या दैवतशास्त्रात ‘अहुर मझ्द’ या स्वरुपात अवतरला आहे. मानवाला अगम्य वाटणारी वरुणाची विश्वसंघटनेची क्षमता म्हणजे त्याची माया (‘मि’ या धातूपासून साधित).‘वरुण’ हा शब्द ‘वृ’ म्हणजे ‘बांधणे’ या धातूपासून साधवयास पाहिजे. विश्वाच्या सर्व घटकांना जणू काही व्यवस्थितपणे बांधून ठेवून वरुण त्यांच्याकडून योग्य व आवश्यक असे व्यापार करवून घेतो. वरुणाच्या पाशांचे मर्म हेच आहे. एकीकडे आपल्या पाशांनी विश्वाचे नियंत्रण करावयाचे व दुसरीकडे आपल्या कायद्याचा भंग करणाऱ्यास त्याच पाशांनी शासन करावयाचे. असुर वरुणाला ‘सम्राट’ मानण्यात आले आहे ते यामुळेच.
मित्र या वैदिक देवतेचे ‘मानवी जीवनाचा नियामक’ (यातयज्जन) हे मूळ स्वरूप लक्षात घेतले, की ‘वैश्विक जीवनाचा नियामक’ वरुण याच्याशी असलेल्या त्या देवतेच्या साहचर्याचे औचित्य स्पष्ट होते. आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या विकासक्रमात वैदिक आर्य पुढे आपल्या विजिगीषू प्रवृत्तीशी अनुरुप अशा ‘वृत्रहा’ इंद्र या देवतेस सर्वश्रेष्ठ मानू लागले. यामुळे वरुण आणि इंद्र या दोघांच्या अनुयायांत एक प्रकारची स्पर्धा निर्माण होणे साहजिक होते पण त्या स्पर्धेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी वैदिक ऋषींनीविशेषत: वसिष्ठांनीमोठ्या चातुर्याने त्या देवतांचे कार्यक्षेत्र निश्चित केले (उदा., वृत्राण्यन्यः समिथेषु जिघ्नते व्रतान्यन्यो अभिरक्षते सदा ऋग्वेद, ७.८३.९) आणि इंद्रावरुणौ या द्वंद्वदेवतेची संकल्पना प्रसृत केली.
वेदोत्तर काळात अनेक कारणांमुळे वरुणाचे वैश्विक आधिपत्य संपुष्टात आले व केवळ समुद्राचा अधिष्ठाता देव हे त्याचे व्यक्तिमत्त्व प्रस्थापित झाले.
संदर्भ : दांडेकर, रा. ना. वैदिक देवतांचे अभिनव दर्शन, पुणे, १९५१.
दांडेकर, रा. ना.
“