वनस्पतींचे जीवांचे आश्रयस्थान : धन्य जीवांच्या संरक्षणाकरिता राष्ट्रीय उद्याने, संरक्षित नैसर्गिक प्रदेश व आश्रयस्थान (अभयारण्य) यांची उभारणी करतात. यापैकी पहिल्या दोन्हींची माहिती ‘राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश’ या नोंदीत दिलेली असूनत्या नोंदीतील कोष्कांमध्ये महाराष्ट्र व भारतासहित जगातील काही महत्त्वाच्या आश्रयस्थानांचीही माहीती दिलेली आहे.
राष्ट्रीय उद्यान अथवा संरक्षित नैसर्गिक प्रदेश यांच्या तुलनेने आश्रयस्थानाविषयीची कल्पना अधिक मर्यादित स्वरूपाची आहे.ठराविक जीवजाती, वन्य जीवांचे गट किंवा वनस्पतींचे समूह यांचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्राचा मर्यादीत अर्थाने वापर करणे, हा आश्रयस्थानाचा हेतू असतो. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने संरक्षित वनक्षेत्रालाही आश्रयस्थान म्हणतात. विशेषकरून प्राण्यांच्या, वनस्पतींच्या अथवा दोन्हींच्या ज्या जातींची संख्या व प्रसार यांवर गंभीर परिणाम होऊन त्या निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत, अशा जीवजातींच्या संरक्षणासाठी आश्रयस्थाने उभारतात. उदा., महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर जिल्हे), गव्यांसाठी असलेले राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर जिल्हा), कच्छाच्या रणातील रानटी गाढवांचे आश्रयस्थान, दक्षिण आफ्रिकेतील पांढऱ्या गेंड्यांचे उंफोलोझी गेम रिझर्व्ह अथवा न्युझीलंड येथील स्थानिक झुडपांचे आश्रयस्थान.
आश्रयस्थान हे विशिष्ट जीवजातीच्या संरक्षणासाठी असते. त्यामुळे तेथे या उद्देशाला मारक ठरणारा जमिनीचा उपयोग करीत नाहीत. मात्र जमिनीच्या अन्य उपयोगांना तेथे मुभा असते. उलट संरक्षण करावयाच्या जीवाच्या प्रजोत्पादनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरू शकणाऱ्या जमिनीच्या वापराला उत्तेजनच देतात.
कधीकधी तुलनेने अधिक विपुल असणाऱ्या जीवजातींसाठीही आश्रयस्थान उभारतात. काही जीवजातींना त्यांच्या जीवनचक्रातीलविशिष्ट अवस्थेत अथवा एखाद्या क्षेत्रात प्रजोत्पादनार्थ गोळा झाल्या असताना संरक्षण मिळणे आवश्यक असते. याकरिता अशी आश्रयस्थाने असतात. यूरोपात व अमेरिकेत अशी आश्रयस्थाने अधिक आहेत. विश्रांतीचा काळ, प्रजनन, हिवाळ्यातील वास्तव्य यावेळी जीवांचे रक्षण करण्यासाठी ही खास आश्रयस्थाने आहेत (उदा., पाण कोंबड्यांचे आश्रयस्थान). अन्यथा या क्षेत्राबाहेर या प्राण्यांची शिकार होत असते.
आश्रयस्थानात काही व्यवस्थानाविषयक उपाय योजावे लागतात. त्यामुळे संबंधित जीवजातीच्या अधिवासात सुधारणा होते तसेच त्यांच्या प्रजननात अडथळा आणणाऱ्या आणि पिलांना घातक अशा जीवजातींना या क्षेत्रात थारा मिळत नाही. राष्ट्रीय उद्यानात किंवा संरक्षित नैसर्गिक प्रदेशात अशा उपाययोजना अपेक्षित नसतात. कारणतेथे एखाद्या ठराविक नव्हे, तर समग्र जीवजातींचे संरक्षण अपेक्षित असते.
जमिनीवरील जीवाप्रमाणेच पाण्यातील जीवांसाठीही अशा उपाययोजना आवश्यक ठरतात. म्हणून जगातील पुष्कळ भागांत खाऱ्या व गोड्या पाण्यातील काही जीवजातींच्या संरक्षणासाठी असे उपाय योजन्यात आले असून या क्षेत्रांनाही आश्रयस्थाने म्हणता येईल. उदा., प्रवाळांच्या भित्तींच्या संरक्षणासाठीउभारलेले ग्रेट बॅरिअर सागरी उद्यान, ओखा−जामनगरलगतच्या किनारी भागातील सागरी उद्यान, मालवणीनजीक उभारावयाचे सागरी उद्यान. रशियातील बैकल सरोवर एका मोठ्या राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट झाले असून त्यामुळे तेथील गोड्या पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टीचेच नव्हे, तर त्या प्रदेशातील पाणलोट क्षेत्राचेही संरक्षण होणार आहे.
प्राचीन काळी ऋषींचे आश्रम हे एका अर्थाने असे आश्रयस्थानच होते. अगदी राजालाही तेथे शिकार करता येत नसे. त्यामुळे आश्रमाच्या परिसरात हरणांचे कळप, जनावरांचे खिल्लार, मोरांसहित पक्ष्यांचे थवे आणि इतर वन्य पशूंचे समूह तेथील घनदाट वृक्षराजीत मुक्तपणे हिंडत असत. अजूनही धार्मिक भावनांमुळे देवरायांमधील वनस्पती व काही नद्यांकाठचे (उदा., इंद्रायणी) वन्य जीव सुरक्षित राहिले आहेत.
तथापि औद्योगिकीकरणाची वाढ आणि जमिनीचा वाढता वापर यांच्यामुळे बेसुमार जंगलतोड व पशुंची हत्या झाली. यामुळे काही जीव जाती नष्ट झाल्या व काही निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून त्यांचे संरक्षण करण्याच्या वरीलसारख्या योजना हाती घेण्यात आल्या. त्याकरिता कायदेही करण्यात आले. जंगलतोड, पशूंची हत्या यांवर बदी अथवा मर्यादा घालण्यात आल्या. शिवाय नैसर्गिक आपत्तीची जीवांना झळ पोहोचू नये म्हणूनही उपाय योजण्यात आले. उदा., दुष्काळाच्या वेळी वा कडक उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देणे अशा उपाययोजनांमुळे काही प्राण्यांची संख्या वाढली असून त्यांमध्ये निर्वंश होऊ घातलेले प्राणीही आहेत. वनांच्या बाबतीतील उपायही काही ठिकाणी यशस्वी ठरले आहेत.
पहा: राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश वन्य जीवांचे रक्षण विलुप्ती-भवन
केतकर, श. म. ठाकूर, अ. ना.