वरधारा : (१) संयुक्त पर्ण, (२) फुलोरा, (३) संवर्त, (४) पुष्पमुकुट, (५) फूल, (६) पाकळ्या काढलेले फूल, (७) संदले व किंजमंडल, (८) फळ.वरधारा : (सांबर वेल, म्हैस वेल हिं. विधारा, वृद्धदारू गु. वरधारो क. फिरंगी चक्की सं. वृद्धदारुक, वृद्धा लॅ. रौरिया सेंटॅलॉइडिस, सेंटॅलॉइडिस मायनस कुल-कॉनेरेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील ह्या ⇨महालतेचा (मोठ्या वेलीचा) प्रसार कोकण, दख्खन, कारवार ते त्रावणकोर असा आहे. रौरिया या तिच्या प्रजातीत एकूण १०० जाती असून भारतात फक्त ५ आढळतात. शिवाय प. बंगाल, आसाम, मणिपूर, अंदमान व निकोबार बेटे येथे ही आढळते. फांद्या बारीक व पाने विषमदली, संयुक्त व पिसासारखी असतात. दले ५९, चिवट, दीर्घवृत्ताकृती किंवा खड्गाकृती आणि वरून चकचकीत असतात. फुले सुगंधी, पांढरी, लहान व पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस, परिमंजरीवर ऑक्टोबरात येतात, पाकळ्यांच्या खाली संदले ५, फळाबरोबर वाढणारी व तळाला वेढणारी प्रदले (पाकळ्या) ५ व केसरदले (पुं-केसर) १०, तळाशी जुळलेली ५ किंजपुटांपैकी ४ अपूर्ण असतात. पेटीसारखी परंतु तिरपी व लंबगोल, शुष्क (२ सेंमी. लांब) [⟶फूल]. फळे गर्द तपकिरी व सूक्ष्म रेषांकित असून खालच्या शिवणीवर तडकून फुटतात बी १ सेंमी. लंबगोल असून त्यावर शेंदरी किंवा लाल अध्यावरण (आच्छादनासारखे उपांग) असते. या वेलीचे मूळ व खोडाचे तुकडे कडू व पौष्टिक असून संधिवात, मधुमेह व फुप्फुसाच्या तक्रारींवर उपयुक्त असतात. जखमा व त्वचाविकारांवर बाहेरून लावतात.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.