वनस्पतींची अभिवृद्धि : वनस्पतींचे नियंत्रित चिरस्थायित्व प्रस्थापित करणे म्हणजे त्यांची अभिवृद्धी होय. उद्यान विज्ञानातील ही अगदी मूलभूत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे वनस्पतीची (झाडाची) संख्या वाढविणे व तिच्या अत्यावश्यक लक्षणांचे परिरक्षण करणे हे दोन उद्देश आहेत. अभिवृद्धी बी लावून लैंगिक रीतीने, वनस्पतीच्या विशेषित शाकीय भागांचा [उदा., ग्रंथिक्षोड, कंद, मुलक्षोड ⟶ खोड] उपयोग करून अलैंगिक पद्धतीने किंवा विविध प्रकारची कलमे करणे, तसेच ⇨ऊतकसंवर्धन, पुनःसंयोगित डीएनए तंत्र [⟶ रेणवीय जीवविज्ञान वनस्पति प्रजनन] यांसारखी प्रायोगिक तंत्रे वापरून करण्यात येते. महत्त्वाच्या वनस्पतींच्या (उदा., आंबा, ऊस, मका, बटाटा वगैरे) अभिवृद्धीच्या पद्धती त्या त्या वनस्पतीवरील स्वतंत्र नोंदीत दिलेल्या आहेत. प्रस्तुत नोंदीत अभिवृद्धीच्या सर्वसाधारण पद्धतीचे वर्णन दिलेले आहे. 

बियांद्वारे अभिवृद्धी : अनेक प्रकारच्या बागायती झाडांची (विशेषतः वर्षायू-एकाच हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्या व द्विवर्षायू झाडांची) अभिवृद्धी बिया लावूनच करतातस्वपरागित. [ ⟶ परागण] झाडांच्या बाबतीत ही अभिवृद्धीची सर्वसामान्य पद्धत आहे. कित्येक परपरागित झाडांच्या बाबतीतही बियांद्वारे अभिवृद्धी करण्यात येते. ही पद्धत सोपी व कमी खर्चाची असते. बियांपासून तयार केलेली रोपे तौलानिक दृष्ट्या शाकीय पद्धतीने तयार केलेल्या रोपांपेक्षा जास्त जोमदार असतात व रोगांना लवकर बळी पडत नाहीत. अशा झाडांचा विस्तार मोठा असल्याने फळांचे उत्पादन कलमी झाडांपेक्षा जास्त मिळते. त्याचप्रमाणे या झाडांचे आयुष्य कलमी झाडांपेक्षा जास्त असते.

 

शुष्क व थंड परिस्थितीत ठेवलेल्या बियांत एका हंगामापासून पुढील लागवडीच्या हंगामापर्यंत सामान्यतः अंकुरणक्षमता (रुजण्याची क्षमता) टिकून राहते. काही झाडांच्या बिया योग्य परिस्थितीत कित्ये वर्षे सुस्थितीत साठविता येतात. बियांपासून अभिवृद्धी केल्यास बहुसंख्य रोगांपासून मुक्त असलेल्या झाडांच्या प्रारंभ करणे शक्य होते. बहुतेक व्हायरसजन्य रोग बियांद्वारे संक्रमित होत नसल्याने या रोगांच्या बाबतीत बियांपासून केलेली अभिवृद्धी हितावह ठरते.  

बियांपासून केलेल्या अभिवृद्धीचे दोन तोटे आहेत. पहिला म्हणजे परपरागित वनस्पतीत आनुवंशिकीय बदल घडून येतात म्हणजे बियांपासून वाढविलेल्या झाडात त्याच्या पितरांची सर्व इष्ट लक्षणे तंतोतंत उतरतीलच असे नाही किंबहुना त्यात अनिष्ट लक्षणेही असण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे काही झाडांना बियांपासून परिपक्व अवस्थेपर्यंत वाढ होण्यास दीर्घ काळ लागतो. उदा., बटाटे बियांपासून चांगल्या प्रकारे उगवत नाहीत व पहिल्या वर्षी त्यांपासून मोठी ग्रंथिक्षोडे (बटाटे) मिळत नाहीत. शाकीय अभिवृद्धीचा अवलंब करून या तोट्यांवर मात करता येते. केळी, अननस यांसारख्या फळझाडांत सर्वसाधारणपणे बी तयार होत नाही तर ऊस, बटाटे यांसारख्या काही पिकाच्या बाबतीत बियांपासून त्यांची अभिवृद्धी करणे जिकीरीचे व खर्चाचे होते. यामुळे बियांपासून केलेली अभिवृद्धी काही वनस्पतींच्या बाबतीत लाभदायक ठरत नाही. अर्थात पपई, नारळ इ. फळझाडांच्या अभिवृद्धींचा बियांशिवाय अन्य मार्ग नसल्याने त्यांच्यासाठी बियांचाच उपयोग करावा लागतो. अक्रोड, बदाम यांसारख्या झाडांच्या बिया कठीण आवरणामुळे सहजासहजी रूजत नाहीत. त्यासाठी त्यांवर काही वेळा विशेष प्रकारची प्रक्रिया करावी लागते. [⟶ बीज शेतीची कामे]. 

 

शाकीय अभिवृद्धी : अलैंगिक वा शाकीय अभिवृद्धी वनस्पतींच्या ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या पेशींच्या-समूहांचे) व भागांचे ⇨पुनर्जनन होण्यांच्या क्षमतेवर आधारलेली आहे. काही वनस्पतींत शाकीय अभिवृद्धी ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया असते, तर इतर वनस्पतींच्या बाबतीत ती कृत्रिम असते. या अभिवृद्धीचे अनेक फायदे आहेत. त्यांत नैसर्गिक रीत्या परपरागित झालेल्या झाडांच्या फेरबदलरहित चिरस्थायित्वाची व बीजरहित संतती उत्पन्न होण्याची शक्यता असते. याचा अर्थ सरस वा श्रेष्ठ वनस्पतीचे काहीही बदल न होता निरंतर प्रजोत्पादन होऊ शकते. याखेरीज शाकीय अभिवृद्धी बियांपासून करण्यात येणाऱ्या अभिवृद्धीपेक्षा अधिक सोपी व जलद होऊ शकते, कारण बियांच्या⇨प्रसुप्तावस्थेच्या समस्यांचे निराकरण होऊन काही बीज-अभिवृद्धीत झाडांतील अल्पवयीन पुष्परहित अवस्था गाळली जाते व तिचा अवधी कमी होतो. बियांपासूनतयार केलेल्या झाडांपेक्षा या पद्धतीने तयार केलेली झाडे लवकर फळे देऊ लागतात, उदा., आंबा, संत्रे, मोसंबी, पेरू, द्राक्ष, रोगप्रतिकारकप्रकाराचा खुंट म्हणून वापर करून पन्हेरी बागेत (रोपवाटिकेत) रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो. उदा., डिंक्या रोगासाठी जंबुरीच्या खुंटावर मोसंबीचे डोळे भरतात. यामुळे शाकीय अभिवृद्धी पद्धतीने कलमे वगैरे करून लागवड करणे पुष्कळ वेळा श्रेयस्कर असते. केळी, गुलाब इ. वनस्पतींत फळामध्ये बी धरत नसल्याने त्यांची अभिवृद्धी याच पद्धतीने करावी लागते. या पद्धतीत एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे व ती म्हणजे जनक झाडामध्ये काही अनिष्ट गुणधर्म असले, तर त्याच्यापासून तयार केलेली झाडे अनिष्ट गुणधर्माची निपजतील यासाठी जनक झाडाची फार कसोशीने निवड करणे आवश्यक असते.  

शाकीय अभिवृद्धी पुढील प्रकारांच्या उपयोगाने करण्यात येते : (१) असंगजनित बी (२) धावते खोड, कंद, मूलक्षोड, अपप्ररोह, ग्रंथिक्षोड, खोडे व मुळे यांसारख्या विशेषित शाकीय संरचना (३) विविध प्रकारची कलमे (४) ऊतक संवर्धन.  

असंगजनन : काही बागायती झाडांच्या (उदा., आंबा, लिंबू वर्गीय फळे) बाबतीत सामान्य लैंगिक पद्धतीने तयार न झालेल्या बीजाचा (अलैंगिक बीजाचा) विकास हा शाकीय अभिवृद्धीचा प्रकार म्हणून वापरण्यात येतो. संत्र्याच्या बीजकाच्या मध्यावर व गर्भकोश अंतर्भूत असलेल्या पातळ भित्तीच्या कोशिकासमूहमापासून [प्रदेहापासून ⟶ फूल] बनविलेल्या बीजापासून व्हायरसमुक्त संतती निर्माण करता येते.  

शाकीय संरचना : अनेक वनस्पती अभिवृद्धीकरिता उपयोगात आणता येतील अशा विशेषित शाकीय संरचना निर्माण करतात. या संरचना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या व अन्न साठविण्याचे कार्य करणाऱ्या ग्रंथिक्षोडासारखे अवयव किंवा वनस्पती जलद पसरू शकेल असे नैसर्गिक अभिवृद्धीसाठी अनुकूलन झालेले धावते खोड वा मूलक्षोड यांसारखे अवयव अशा रूपात असू शकतात. 


कंद अभिवृद्धी : कंद हे मूलभूत रूपांतरित खोड असते. या रूपांतरित खोडाभोवती जाड मांसल शल्क (खवले) असतात. त्यांत अन्न साठविलेले असते. या शल्कांच्या बेचक्यात छोटे कंद तयार होतात. हे जर जमिनीत खोडावर लागले, तर त्यांना कंदिका म्हणतात. ट्यूलिप, डॅफोडिल, लिली यांची अभिवृद्धी या कंदांपासून मिळणाऱ्या अपप्ररोहापासून होते. निशिगंधाची अभिवृद्धी याच पद्धतीने करण्यात येते.   

घनकंद किंवा गड्डा अभिवृद्धी : घनकंद म्हणजे रूपांतरित खोड असून त्याच्याभोवती शल्कासारखी दिसणारी पाने असतात. या रूपांतरित खोडावर पेरे असतात. या खोडात वनस्पतीचे अन्न साठविलेले असते. गड्ड्याच्या वरच्या टोकावर पाने व फुले वाढतात. गड्‌ड्याला बगल अंकुर असतात. जुन्या म्हणजे मातृ गड्‌ड्यावर लहान लहान गड्डे (कन्या) फुटतात. ते वेगळे करून त्यांची लागवड करतात. लहान गड्डे एक-दोन वर्षे जमिनीत वाढून नंतर मोठे झाल्यावर त्यांना फुले येतात. ग्लॅडिओलसाची अभिवृद्धी या पद्धतीने करतात. जर गड्डे मोठे असतील, तर त्यांचे तुकडे करून त्या तुकड्यांचा अभिवृद्धीसाठी उपयोग करतात. तुकडे केलेल्या गड्‌ड्यावर लागवडीपूर्वी⇨कवकनाशकाचा उपचार करतात. प्रत्येक तुकड्यावर अंकुर असणे आवश्यक असते. केळीच्या गड्‌ड्याची लागवड असे तुकडे करून करता येते. हळद व सुरण यांची लागवड या पद्धतीनेच करतात.

ग्रंथिक्षोड अभिवृद्धी : ग्रंथिक्षोड हे जमिनीत वाढणारे रूपांतरित खोड होय. अन्नसाठ्यामुळे हे रूपांतरित खोड मांसल असते. याचे परिचित उदाहरण म्हणजे बटाटा. ग्रंथिक्षोडापासून अभिवृद्धी करतांना एकतर संपूर्ण ग्रंथिक्षोड लावतात किंवा डोळे असलेला भाग ठेवून विभाजन करून ते तुकडे लावतात. बटाट्याच्या बाबतीत हे तुकडे प्रत्येकी ३०ते ५०ग्रॅ. वजनाचे आणि एक डोळा असलेले असणे आवश्यक असते. 

मूलक्षोड अभिवृद्धी : मूलक्षोड जमिनीचा पृष्ठभागाला समांतर आडवे वाढत राहते. ते कधीकधी जमिनीत वाढते. बांबू, केळी, कर्दळी, आले यांची अभिवृद्धी मूलक्षोडापासून करण्यात येते. मूलक्षोड मांसल व आखूड पेरे असलेले खोड असते. अभिवृद्धीकरिता मूलक्षोडाचे तुकडे करतात.  

आभासी कंद अभिवृद्धी : आभासी कंद म्हणजे अन्नासाठी असलेले वनस्पतीचे अवयव असतात. ऑर्किडामध्ये अशा प्रकारचे आभासी कंद मिळतात. यात खोडाचेच भाग फुगलेले असतात. ऑर्किडाची अभिवृद्धी करताना आभासी कंदाचे विभाजन करतात व ते आभासी कंद प्रसुप्तावस्थेत असताना करतात.  

ग्रंथिल मुलापासून अभिवृद्धी : काही वनस्पतींची मुळे ग्रंथिल असतात. त्यांत अन्नाचा साठा असतो व त्याचबरोबर त्यांत मुळांचे गुणधर्म असतात. त्यांना खोडासारखे पेरे नसतात. ग्रंथिल मुळांवप केसाळ आगंतुक मुळे असतात. या ग्रंथिल मुळांचे तुकडे करून त्यांची लागवड करतात. डेलियाची अभिवृद्धी या पद्धतीने करतात. शोभेच्या पानाच्या ट्यूबरस बिगोनियाची ग्रंथिल मुळेदेखील याच पद्धतीने अलग करून त्यांपासून अभिवृद्धी करतात.  

कलमे : कलमांचे फाटे कलम, डोळा कलम (डोळा भरणे), भेट कलम, जिभली कलम, खुटी कलम, बगल कलम, दाब कलम, गुटी कलम वगैरे विविध प्रकार आहेत. कलम करताना अभाव असलेल्या भागांचे (सामान्यतः आगंतुकमुळे वा प्ररोह म्हणजेच कोंब किंवा धुमारा यांचे) पुनर्जनन होण्याची क्रिया प्रवर्तित करतात अथवा वनस्पतीचे भाग ऊतक पुर्नजननाने जोडतात.[⟶कलमे].  

ऊतक संवर्धन : या तंत्रामध्ये गर्भ, प्ररोह अग्रे व किण (ज्यातून नवीन वृद्धिबिदू विकसित होतात असा पातळ भित्तियुक्त कोशिकापुंजका) यांचा अभिवृद्धीची एक पद्धत म्हणून उपयोग करतात. या प्रक्रियेत निर्जंतुक तंत्रे व अकार्बनी मुलद्रव्ये पुरविण्यासाठी खास संवर्धन माध्यमे (शर्करा, जीवनसत्त्वे आणि ऊतकानुसार वृद्धी नियंत्रक द्रव्ये व शहाळ्यातील पाणी, यीस्ट ॲमिनो अम्ल अर्क यांसारखी कार्बनी जटिले) आवश्यक असतात.  

गर्भ संवर्धनाचा उपयोग ज्या फळात सामान्यत: गर्भविकास होणार नाही अशा वनस्पतींच्या निर्मितीकरिता करण्यात आलेला आहे. लवकर पक्व होणाऱ्या पीचमध्ये व भिन्न जातींत केलेल्या काही संकरणांमध्ये गर्भ-विकास होत नाही. बीजांच्या प्रसुतावस्थेवर मात करण्यासाठी गर्भ संवर्धन वापरता येते.  

प्ररोह अन्न तोडून त्याचे संवर्धन केल्यावर त्याच्या तळाशी मुळे निर्माण होऊ शकतात. या तंत्राचा उपयोग रोगमुक्त वनस्पतीच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला आहे. या पद्धतीने काही ऑर्किडांचे जलद गुणन करता येते. संवर्धित प्ररोह अग्रांची एक गर्भसदृश अवस्था तयार होते व जलद मोठ्या प्रमाणावरील साठा तयार करण्यासाठी तिचे अमर्यादपणे छेदन करता येते. छेदन न केलेले कंदसदृश पिंड अगदी छोट्या वनस्पतीत विकसित होतात. कार्नेशन या वनस्पतीकरिता यासारखीच पद्धती वापरण्यात येते व तीत प्ररोह अग्र हे अविभाजन करता येणारा कोशिका पुंज बनते.  

किण ऊतकसंवर्धन  तंत्र हे अतिशय विशेषित तंत्र असून त्यात किणाची वृद्धी व त्यानंतर अवयव विभेदन (भिन्न अवयवांची समग्र संघटना तयार होण्याची क्रिया) प्रवर्तित करण्याच्या पद्धती यांचा अंतर्भाव होतो. या तंत्राचा गाजर, शतावरी, तंबाखू यांसारख्या अनेक वनस्पतींसाठी उपयोग करण्यात आलेला आहे. संशोधनात विस्तृतपणे वापरण्यात येत असलेली ही पद्धती अभिवृद्धीची व्यावहारिक पद्धती म्हणून मात्र अद्यापि मानण्यात येत नाही. किण संवर्धनामुळे आनुवंशिक फेरबदल घडून येतात कारण काही वनस्पतींच्या बाबतीत कोशिकांतील गुणसूत्रांची (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या दुप्पट होते. भात व तंबाखू यांच्या बाबतीत परागापासून तयार झालेल्या किणापासून परिपक्व वनस्पती मिळविण्यात आलेल्या आहेत. या वनस्पतीत गुणसूत्रांची संख्या त्यांच्या सर्वसाधारण संख्येच्या निम्मी असते. 

संदर्भ : 1. Macmillan, H. F. Tropical Planting and Gardening, London, 1956.

           2. Venkataratnam, L. Ed., Fruit Nursery Practices in India, New Delhi, 1962.

           ३. नागपाल, रघवीर लाल (म. भा.) पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती,पुणे १९६३.  

           ४. परांजपे, ह. पु. फळझाडांचा बाग, पुणे, १९५०.  

           ५. पाटील, अ. व्यं. रोपवाटिका संगोपन,पुणे, १९८४.

पाटील, अ. व्यं राहुडकर, वा. ब.