वनस्पति, औषधी : रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून ( उदा., पाने, मुळे, खोड इ. ) तयार केलेले काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.

इतिहास : फार प्राचीन काळापासून प्राणिसृष्टी तिच्या दररोजच्या गरजा भागविण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून रहात आहे. एकूण जीवसृष्टीमध्ये वनस्पतीच स्वयंपूर्ण आहेत. आदिमानवाच्या काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष पुरवू लागला. निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे, फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे, हे त्याने नीट पाहिले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे वर्गीकरण केले. अमुक एक वनस्पती खाद्योपयोगी आहे, तिची रूची गोड आहे, ती कोणत्या ऋतुमानात येते, तीपासून खाद्योपयोगी पदार्थ कसा बनविता येईल इ. आडाखे त्याने बांधले. काही ठराविक वनस्पती सारक आहेत, काही शरीराच्या वाढीस उपयुक्त, तर काही निरूपयोगी आहेत. ह्या वनस्पतिसृष्टीच्या अनुभवाबरोबरच आयुष्यक्रमात निरनिराळ्या निसर्ग आविष्करांचाही त्याने अनुभव घेतला. त्यामुळे झालेल्या काही परिणामांनी जेव्हा तो त्रस्त झाला, तेव्हा त्याने पंचमहाभूतांची पूजा केली, प्राण्यांचा बळी दिला, वनस्पतींच्या समिधांचा होम केला. वनस्पतींवर विश्वास ठेवून संकट निवारण व्हावे म्हणून त्या भक्षण केल्या. बऱ्यावाईट अनुभवांनंतर वनस्पतींच्या निरनिराळ्या उपयोगांचे त्याला ज्ञान झाले. जादुटोण्याकरिता वापरावयाच्या जालीम वनस्पतींबरोबरच अंगाचा दाह कमी करण्यासाठी उटणी म्हणून वापरावयाच्या वनस्पती त्याने शोधून काढल्या. वेगवेगळे अनुभव व निरीक्षणे ह्यांवर आधारित अनुभवी माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, तसेच रोग दूर करून आराम देणाऱ्या दिव्य औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.

भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या  वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे. 

चरकसंहितेमध्ये ७०० च्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. इ. स. दुसऱ्या शतकातील ह्या ग्रंथामध्ये वनौषधी व त्यांचे उपयोग इतकेच नाही, तर वनस्पती कशा ओळखाव्यात, केव्हा व कशा रीतीने गोळा कराव्यात, ह्याची देखील नोंद केली गेली आहे.

वैद्यकशास्त्राचा ‘औषधिविद्या’ नावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे वर्णन व औषधी योजना असे दोन पोटविभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग, आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे आहे.

वनौषधी ओळखण्याची सुलभ पद्धत म्हणजे तिला दिलेले शास्त्रीय द्विनाम. वनस्पतीस द्विनाम द्यावयाची पद्धत यूरोपमध्ये अठराव्या शतकात कार्ल लिनीअस यांनी सुरू केली परंतु भारतात त्याही पूर्वी तज्ञांनी औषधी वनस्पतीच्या वर्गीकरणाची एक पद्धत सुरू केली होती. उदा., बलाचे किंवा रानमेथीचे वेगवेगळे प्रकार वेगळ्या नामावलींनी दर्शविले आहेत : बला (सिडा ॲक्यूटा ), अतिबला (सिडा ऱ्हाँबिफोलिया ), भूमिबला (सिडा व्हेरोनिसिफोलिया ), नागबला (सिडा स्पायनोजा ) (कंसात लॅटिन द्विनामे तुलनेसाठी दिली आहेत).

बहुधा एकाच कुलातील वनस्पती ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जात असावी. प्राचीन काळी औषधी वनस्पतिज्ञानाच्या प्रबोधनासाठी होमहवनाबरोबर चर्चासत्रेही आयोजित केली जात असत. त्यांमध्ये गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषीही भाग घेत असत. बुद्धकाळामध्ये परोपकार, दया यांबरोबरच रूग्णांच्या शुश्रूषेलाही महत्त्व होते. बुद्ध-अशोक काळात भारतीय औषधी ज्ञानभांडार उच्च प्रतीचे मानले गेले होते.

पुढे यावनी आक्रमणानंतर ह्या सर्व संशोधनात खंड पडून अर्धवट ज्ञानी किंवा बैरागी, वैदू वा आदिवासी यांनी औषधी वनस्पतींची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अर्धवट ज्ञानाने चुकीच्या काष्ठौषधी पुरवल्या जाऊन औषधांचा गुण येईनासा झाला. चांगल्या, उत्तम ज्ञानी वैद्यांनी वनौषधींचे ज्ञान पुढील पिढीस दिले नाही किंवा तसे शिष्यगणही निर्माण केले नाहीत.

पुढे ब्रिटिश कारकीर्दीत मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनास सुरूवात झाली. भारतीय वनस्पतींवर व समृद्ध निसर्गावर ब्रिटिश, यूरोपीय शास्त्रज्ञांनी अनेक पुस्तके लिहिली. डब्ल्यू. डॉयमॉक, जी. वॉट आदि परकीयांबरोबरच व्ही. सी. दत्त, ⇨कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, बी. डी. बसू, आर्‌. एन्‌. चोप्रा, के. एम्‌. नाडकर्णी वगैरे भारतीयांनीही वनौषधींच्या ज्ञानात भर घातली.

महाराष्ट्रात वनौषधी जागृतीचे काम आयुर्वेद महोपाध्याम शंकर दाजीशास्त्री पदे ह्यांनी केले. त्यांनी १८८८ साली आर्यभिषक नावाचे मासिक सुरू करून ठिकठिकाणी वैद्यसभांची स्थापना केली. १८९३ मध्ये वनौषधी गुणादर्श हा ग्रंथ सात भागांमध्ये त्यांनी लिहिला. वा. ग. देसाई ह्यांनी ओषधीसंग्रह म्हणजे वनस्पती कशा ओळखाव्यात, त्यांचे गुणदोष, उपयोग, द्यावयाचे प्रमाण, तयार करण्याच्या पद्धती इत्यादींचा सुबोध ग्रंथ १९२७ मध्ये मातृभाषेतून−मराठीतून–लिहिला. ह्या ग्रंथात निरनिराळ्या रोगांवर उपयोगी अशा सु. १,००० वनस्पतींची माहिती आहे. भारतात इतर भाषांमधूनही वनौषधींवर काम झाले. वनस्पतींची शास्त्रीय दृष्ट्या बरोबर व रेखीव चित्रे मात्र अजूनही कीर्तिकर आणि बसू ह्यांचीच प्रमाणभूत मानण्यात येतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शं. पु. आघारकरांच्या नेतृत्वाखाली स. रा. गोडबोले ह्यांनी महाराष्ट्रातील वनस्पतींचे संकलन केले. स. य. सावंत व कोल्हापूरच्या हरिचंद मेहता पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अनेक पुस्तिका ह्यांनी महाराष्ट्राच्या वनस्पतीसंबंधीच्या माहितीत महत्त्वाची भर घातली.

सांप्रत परिस्थिती : संशोधन व व्यापार : आधुनिक यंत्रज्ञान व विविध प्रगत शास्त्रे ह्यांच्या ज्ञानावर अवलंबून वनस्पती ओळखण्यासाठी वनस्पतिविज्ञानाचा आणि त्यांचे गुणधर्म निश्चित करण्यासाठी रसायनशास्त्र व भौतिकी ह्यांचा उपयोग करून वनस्पतिजन्य औषधांचे व्यापारी पद्धतीने उत्पादन करण्याची आज आवश्यकता आहे परंतु भारतातील वैद्य अजूनही मूळ कल्पना, रूढी, उपयुक्त पण खंडित परंपरा, ठाम समजुती ह्यांमुळे असे विज्ञाननिष्ठ प्रयोग करावयास फारसे धजावत नाहीत. संगीत नाद, चंद्रप्रकाश, तिथी, नक्षत्रे अशा परंपरांवर विसंबल्यामुळे आणि बनावट वनस्पतींमुळे रामबाण औषधीही काही वेळा निरूपयोगी ठरू शकतात.


कोष्ठक क्र. १. भारतातून निर्यात होणाऱ्या औषधी वनस्पती ( किंमत हजार रूपयांत )

 वनस्पती

१९७८ – ७९

१९७९ – ८०

१९८२ – ८३

( अंदाजित )

अनंतमूळ ( सार्सापरिला ) 

१७,७५६.६ 

९,५४७.० 

अफू : बोंडे 

२,३६१.३ 

४,०२४.४ 

अफू : कच्च्या रूपातील 

३,१९,५७६.५ 

७९,२२२.४ 

अफू : इतर कच्च्या रूपातील  औषधे 

४२,४७७.० 

४२,५८३.५ 

१५,२५५.५ 

आयुर्वेदीय औषधी 

३,६६८.६ 

२,६९९.० 

इपेकॅक : वाळलेली मूलक्षोडे  व मुळे 

६१.९ 

इसबगोल : टरफले 

८०,०००.० 

८१,८५१.० 

७१,०५९.२ 

इसबगोल : बिया 

१७,७५६.० 

९,५४७.४ 

२६,८६१.३ 

कचोरा : मुळे 

३४२.० 

११९.० 

३०८.९ 

किराईत 

४५.३ 

१४.३ 

१५९.२ 

कुचला : वाळलेल्या पक्क बिया 

१८७.७ 

१४.९ 

कोष्ट कोळिंजन 

२२०.५ 

२५४.१ 

११४.१ 

कोष्ठ : मुळे 

९३३.३ 

५८३.७ 

खसखस 

८३४.७ 

ज्येष्ठमध : वाळलेली मूलक्षोडे 

२.४ 

०.५ 

बेलाडोना : पाने व मुळे 

२०.० 

२५.२ 

रानतुळस 

५४३.० 

४३५.७ 

४६४.६ 

सदाफुली : मुळे 

१,४८६.६ 

१,१६३.७ 

सर्पगंधा : मुळे 

६०.९ 

६१.६ 

सोनामुखी : पाने व शेंगा 

२,०००.५ 

१७,०८७.५ 

१५,०४४.८ 

एकूण

१,६६,९६८.८

४,७९,५१०.२

२,१३,६७८.१

   

आयुर्वेदीय पद्धतीने काढे, मलमे, चूर्णे, भस्मे, गुटिका, आसवे इत्यादींचे यांत्रिक उत्पादन करण्यासाठी खात्रीच्या कच्च्या मालाचा पुरवठा अत्यावश्यक आहे परंतु यंत्राच्या अमर्याद भुकेपुढे हा पुरवठा कमी पडतो, तसेच स्थानिक आदिवासी वा गिरिजन ह्यांच्या तुटपुंज्या ज्ञानामुळे भेसळयुक्त माल तर येतोच परंतु औषधी वनस्पतींच्या अमर्याद तोडीने सर्पगंधा, कुटकी, पादवेल ( पाप्रा ), अनंतमूळ, दंती इ. वनस्पती नाहीशा होतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. जंगलवासी, गिरिजन, वन कामगार इ. लोक औषधी वनस्पती ओरबाडूनच बहुधा काढतात. त्यात बऱ्याच वेळा भेसळ असते. व्यापारी व दलाल हा कच्चा माल मातीमोलाने विकत घेऊन तो भरमसाठ किंमतीने विकतात. ह्यासाठी वनस्पतींचा जीवनक्रम अभ्यासून त्यांची शास्त्रशुद्ध पैदास करणे आवश्यक आहे. ह्याकरिता त्यांच्या वाढीसाठी लागणारी परिस्थिती, पाणीपुरवठा, खते, रोग व त्यांपासून त्यांचे संरक्षण, कोणता भाग उपयुक्त आहे व तो केव्हा गोळा करावा इ. ज्ञान वनस्पतिवैज्ञानिकांकडून माहीत करून घेणे आवश्यक आहे. शास्त्रशुद्ध पैदास करतानादेखील कोणत्या वनस्पतींची निवड करावी व त्यांचा कशा प्रकारे साठा करावा ह्याचे ज्ञान असावयास हवे. कच्च्या मालाची ताबडतोब निर्यातीची व्यवस्था अथवा शास्त्रशुद्ध साठवण ही एक अत्यावश्यक बाब आहे.

कोष्टक क्र. २. भारतातून निर्यात होणारी वनस्पतिजन्य औषधी रसायने

(किंमत हजार रूपयांत).

रसायन 

 

१९७८ – ७९

(अंदजित) 

१९७९ – ८०

(अंदजित) 

१९८२ – ८३

(अंदजित) 

अफूतील अल्कलॉइडे 

५,१७६.० 

 

 

अरगट अल्कलॉइडे 

 

१०.० 

 

अरगट लवणे व इतर अनुजात 

१,००७.८ 

 

 

ॲट्रोपीन सल्फेट 

१,०५७.२ 

९०.० 

 

एफेड्रीन हायड्रोक्लोराइड 

१३०.० 

२९१.३ 

२२४.८ 

एमेटीन अल्कलॉइडे 

५३१.० 

६१२.४ 

 

कुचल्यातील अल्कलॉइडाची /ब्रुसिनाची लवणे व इतर अनुजात

९८५.५

९५५.७

७,७३९.५

क्विनीन अल्कलॉइडे 

 

२६८.० 

 

क्विनीन लवणे व इतर अनुजात  

३,७७३.५ 

१,२२४.८ 

 

क्विनीन सल्फेट 

२,०८३.२ 

१,८४५.३ 

 

क्विनीन हायड्रोक्लोराइड 

१,८४१.९ 

२,२२२.२ 

 

नेओसोरॅलेन, मॅक्सॉरॅलेन व ट्रायमेटॉक्सी सोरॅलेन  

५००.०

 

 

पेपन ( शुद्ध ) 

१५,३८५.६ 

१,०८६.५ 

१०,१६६.४ 

बेर्‌बेरीन हायड्रोक्लोराइड 

५,०७०.० 

५,६७९.४ 

२,५२३.२ 

बीटा–आयोनोन

४४,९३९.२ 

३६,३१०.९ 

७३,१६५.६ 

वनस्पतिजन्य अल्कलॉइडे 

७४९.१ 

५,३१२.२ 

 

वनस्पतिजन्य औषधे / सममूल्यी रसायनांचे अनुजात 

९,५९५.६

९०१.१

 

सर्पगंधा ( रॉव्होल्फिया ) अल्कलॉइडे व औषधे 

१९५.७

९०१.४

४३८.६

सोलॅनेसॉल 

१०,१७३.० 

 

 

स्ट्रिक्‍नीन अल्कलॉइडे व लवणे 

१,६४४.८

९२०.८

३.१५२.४

हॉर्मोने ( इतर ) 

 

१६९.४ 

 

एकूण

१,०४,८७२.१

६८,५५०.४

९७,४१०.५

  


संश्लेषित (साध्या संयुगांच्या वा मूलद्रव्यांच्या संयोगाने कृत्रिम रीत्या तयार करण्यात येणाऱ्या) औषधांच्या वापरात रोग्यांवर जे इतर विषारी परिणाम घडून येतात त्यांची कल्पना आता पाश्चात्यांनाही आली आहे. त्यामुळे वनस्पतींपासून निर्माण करता येणाऱ्या औषधांच्या संशोधनाकडे यूरोप व अमेरिकेतील विकसित राष्ट्रे वळली आहेत. जगातील मोठ्या औषधी कंपन्या आता परंपरागत औषधी पद्धतीत (उदा., आयुर्वेद, युनानी पद्धती) उपयोगात येणाऱ्या वनस्पतींच्या चाचण्या करीत आहेत. ही गोष्ट भारतासारख्या देशाला लाभदायक ठरणार आहे, कारण भारत औषधी वनस्पतींच्या बाबतीत संपन्न असून त्यांपैकी बऱ्याच वनस्पतींचा आयुर्वेदीय चिकित्सेत उपयोग करण्यात येतो.

भारतात औषधी वनस्पतींच्या सु. २,००० जाती आढळतात. त्या भिन्न अशा विस्तारलेल्या भौगोलिक क्षेत्रांत पसरलेल्या आहेत. निरनिराळ्या वनस्पतींचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) क्षेत्रही भिन्न आहे. त्यांपैकी बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीलाही यशस्वीपणे तोंड देऊ शकतात आणि म्हणून जिराईत पीक म्हणून त्यांची लागवड करणे शक्य आहे, औषधी वनस्पतींची लागवड झाल्यास ग्रामीण जनतेला नवीन व्यवसाय उपलब्ध होईल आणि परकी चलन निर्यातीच्याद्वारे मिळविता येईल. भारतात वन विभागातर्फे हिरडा, बेहडा, आवळा, वावडिंग, धावडा, अर्जुन, वाकेरी इ. दरसाल उत्पन्न देणाऱ्या वनस्पती जमा केल्या जातात. औषधी वनस्पतींच्या जीवनक्रमासंबंधी  व लागवडीसंबंधी संशोधन सुरू आहे. डिकेमाली, टेटू, पळस, सातवीण, बिब्बा, बेल, शिवण, वायवर्णा, साबर, हिरडा, बेहडा, जीतसई (जितसाया), गोरखचिंच इ. झाडांचे संवर्धन होऊन त्यांची जळणासाठी लाकूड म्हणून तोड होणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. थोड्या मुदतीत उत्पन्न देणाऱ्या शतावरी, इसबगोल, रिंगणी, ज्येष्ठमध, आंबेहळद, पिठवण, सोनामुखी, कोरफड इत्यादींवर बरीच माहिती गोळा करण्यात आलेली असून त्यासंबंधी प्रयोग होत आहेत. औषधी वनस्पतींचे हे महत्त्व जाणून इंडियन कौन्सिल ऑफ  ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या संस्थेने औषधी व सुगंधी वनस्पतींच्या सुधारणेसाठी १९७२ साली एक सुसूत्र प्रकल्प सुरू केला. ह्या प्रकल्पाद्वारे आठ प्रमुख पिकांवर [अफू, इसबगोल, सोनामुखी, सर्पगंधा, कीटक्षोद (पायरेथ्रम), ज्येष्ठमध, डिजिटॅलीस व सदाफुली] देशातील निरनिराळ्या भागांत संशोधन हाती घेण्यात आले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च व इंडियन कौन्सिल ऑफ  ॲग्रिकल्चरल रिसर्च यांच्या निरनिराळ्या प्रयोगशाळा, विशेषतः लखनौ येथील सेंट्रल इन्स्ट्यिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लँट्‌स, जम्मू, जोरहाट व भुवनेश्वर येथील रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, नवी दिल्ली येथील नॅशनल ब्यूरो ऑफ प्लँट जेनेटिक रीसोर्स आणि बंगलोर येथील इंडियन  ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च येथे औषधी वनस्पतींवर संशोधन चालू आहे. शिवाय काही कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठांतही ह्या विषयाला चालना मिळाली आहे.

अनुभवसिद्ध औषधी खूप आहेत व अनेकांवर कामही सुरू आहे. शास्त्रीय मदतीने वनस्पतीपासून तयार झालेले खात्रीचे औषध मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी कच्चा माल म्हणजेच वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या तपासून घेतल्यास नक्कीच परिणामकारक औषध उपलब्ध होईल. 

 

औषधी वनस्पतींची उपयुक्तता आता जगातील सर्वच राष्ट्रांना पटलेली आहे. यूरोपीय देश व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांसारख्या विकसित राष्ट्रांत आज रोगांच्या उपचाराबाबत जी निर्देशपत्रे देण्यात येतात, त्यांतील २५% पेक्षा जास्त वनस्पती औषधींचा समावेश असलेली असतात. आशिया खंडात भारत, चीन व दक्षिण कोरिया ही राष्ट्रे प्रमुख आहेत. चीनमध्ये तर प्रथमतः आसपास वाढणारी वनस्पती वैद्यकीय उपाययोजनेत लक्षात घेतली जाते.

निसर्गात केव्हाही आढळणाऱ्या आणि स्वस्त परंतु अत्यंत उपयुक्त व गुणकारी अशा वनौषधींना आता आंतरराष्ट्रीय व्यापारातही महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आयुर्वेद, युनानी यांसारख्या औषधी पद्धतींवर आता जोर देण्यास सुरूवात केली असून विकसनशील राष्ट्रांत उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतींचा कच्चा माल वापरण्याची विकसित राष्ट्रांना शिफारस केली आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड व जपान ही सहा विकसित राष्ट्रे भारतातून औषधी वनस्पतींची आयात करणारी प्रमुख राष्ट्रे होत. भारताच्या औषधी वनस्पतींच्या निर्यातीचा ७५%भाग ह्या राष्ट्रांत निर्यात होतो. याखेरीज कॅनडा, बेल्जियम, इटली, नेदर्लड्‌स, डेन्मार्क, स्पेन,रशिया, चेकोस्लोव्हाकिया व सिंगापूर या राष्ट्रांनाही भारतीय औषधी वनस्पती निर्यात होतात.

भारतातून १९६३-६४ मध्ये औषधी वनस्पतींची निर्यात ३.६३४ कोटी रूपये होती. १९७३-७४ मध्ये ७.६९९ कोटी रूपये झाली, तर १९८४-८५ मध्ये ती ७९. १७ कोटी रूपये झाली. भारतातील औषधी वनस्पतींच्या निर्यातीत इसबगोलाचा सर्वांत मोठा वाटा आहे आणि त्यानंतर आता अफू व मग सोनामुखी यांचे क्रमांक लागतात. याशिवाय किराईत ( काडेचिराईत ), कुचला, इपेकॅक, कोष्ठ कोळिंजन, सदाफुली, कचोरा, रानतुळशीचे बी ह्या वनौषधीही मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. सिंकोना अल्कलॉइडाच्या निर्यातीच्या बाबतीत जे तीन देश आघाडीवर आहेत त्यांत भारताचाही समावेश आहे पण अलीकडच्या काळात दक्षिण कोरिया व चीनसारख्या देशांनी औषधी वनस्पतींच्या (मुख्यत्वे गिंसेंग ) निर्यातीत भारताला मागे टाकले आहे. १९७८ मध्ये दक्षिण कोरियाची निर्यात ७५ कोटी रूपयांची होती.

कोष्टक क्र. १ मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या औषधी वनस्पती कोष्टक क्र. २ मध्ये भारतातून निर्यात होणारी वनस्पतिजन्य औषधी रसायने कोष्टक क्र. ३ मध्ये निवडक देशांतील औषधी वनस्पती, वनस्पतींचा रस व अर्क, एंझाइमे, अल्कलॉइडे, हॉर्मोने व ग्लाकयकोसाइडे यांचा व्यापार आणि कोष्टक क्र. ४ मध्ये अनेक महत्त्वाच्या रामबाण वनौषधींपैकी काही महत्त्वाच्या वनौषधी, त्यांचे कुल, गुणधर्म व उपयोग दिलेले आहेत.

कोष्टक क्र. ३. निवडक देशांतील औषधी वनस्पती, वनस्पतींचा रस व अर्क, एंझाइमे, अल्कलॉइडे, हॉर्मोने व ग्लानयकोसाइडे यांचा व्यापार

(किंमत हजार डॉलरांमध्ये) (१९७९).

उत्पादन

पश्चिम जर्मनी

फ्रान्स

ग्रेट ब्रिटन

स्वित्झर्लड

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

जपान

 आयात : 

औषधी वनस्पती 

५६,७९९ 

३३,११७ 

१२,६२९ 

७,५९९ 

४६,०१० 

५०,८९७ 

वनस्पतींचा रस व अर्क 

५६,५९५

४२,२०५

४३,९९८

९,८१९

१,१८,६४५

७१,५७८

एंझाइमे 

३१,५९३ 

१९,९९० 

११,४०६ 

६,०२२ 

५५,५६९ 

३६,६९५ 

अल्कलॉइडे 

८४,७४८ 

१,०८,१९४ 

२२,७७२ 

१२,१३० 

८५,९१६ 

२२,१८८ 

हॉर्मोने 

४१,६७७ 

४९,६९० 

३७,१४६ 

९,९२८ 

५१,७६८ 

५४,९४६ 

ग्‍लायकोसाइडे 

१३,६४० 

१६,९१० 

९८३ 

४,९६३ 

१९१ 

२,२१२ 

एकूण …  

२,८५,०५२ 

२,७०,१०६ 

१,२८,९२८ 

५०,४६१ 

३,५८,०९९ 

२,३८,५१६ 

 

निर्यात

औषधी वनस्पती 

२३,२७६ 

७,६९२ 

१,७६३ 

३,०५३ 

३२,५०७ 

२१,१४२ 

वनस्पतींचा रस व अर्क 

६९,१८१ 

४०,८७१ 

७,५२१ 

११,७५२ 

१३,५३८ 

९,८५२ 

 

 

 

 

 

 

 

एंझाइमे 

३९,१७३ 

१८,७९९ 

११,५४७ 

९,९९८ 

२९,८५२ 

१६,४२८ 

अल्कलॉइडे 

१,४४,१९५ 

१८,५८४ 

१९,३३५ 

२,३०,७९८ 

२२,२१२ 

३,९९८ 

हॉर्मोने 

९७,०५१ 

३६,१७७ 

३२,४३५ 

२८,३०५ 

१,२६,६४३ 

२,१५९ 

ग्‍लायकोसाइडे 

१७,५०५ 

५,०६९ 

१,८५१ 

२१,६१५ 

५५४ 

७,२०९ 

 एकूण … 

 ३,८९,३८१ 

 १,०८,६०९ 

 ७४,४५२ 

 ३,०५,५२१ 

 २,२५,३०६ 

 ६०,७८८ 


  

कोष्टक क्र. ४. काही महत्त्वाच्या वनौषधी, त्यांचे गुणधर्म व उपयोग

मराठी नाव

शास्त्रीय नाव व कुल

रसायनशास्त्र व गुणधर्म

वापरण्यात येणारा भाग व उपयोग

अडुळसा 

 

ॲघँटोडा व्हॅसिका कुल – ॲकँथेसी

वासिसाईन हे अल्कलॉइड कफनाशक. 

पाने व मूळ कफ रोगात उत्तम. 

 

अतिविष 

ॲकॉनिटम हेटेरोफयलम कुल – रॅनन्क्युलेसी

ॲटिसीन हे अल्कलॉइड कटुपौष्टिक, मलवरोधक, पाचक. 

मूळ औषधात वापरतात. अतिसार व संग्रहणी ह्यांत उपयुक्त. 

अनंतमूळ (अळसरी)

हेमिडेल्मस इंडिकस कुल – ॲस्क्‌लेपीएडेसी

सुगंधी बाष्पनशील द्रव्य मूत्रल, क्षुधाशामक. 

मूळ मूत्ररोगात अत्यंत उपयोगी. 

 

अफू 

 

पॅपॅव्हर सोम्‍निफेरम कुल – पॅपॅव्हरेसी

 

अनेक अल्कलॉइडे गुंगी, झोप आणणार्‍या, दु:ख वेदनाशामक औषधांत वापरतात. 

बोंडे, पाने, फुले, पाकळ्या व बी बोंडे दाहयुक्त सूज व कानशील दाह यांवर बी (खसखस) व तेल अतिसार, आमांश, भाजल्याच्या जखमा इत्यादींवर पाने व फुले वेदनाशामक म्हणून वापरतात. 

अश्वगंधा 

 

विथानिया सोम्‍निफेरा कुल – सोलॅनेसी

मूत्रजनक 

 

मूळ तंत्रिका तंतूंवर (मज्‍जातंतूंवर) क्रिया होते. सांधेदुखी, मूत्ररोगात उपयुक्त. 

अस्मानिया 

 

एफेड्रा जिरार्डिआना कुल – एफेर्डेसी

एफेड्रीन हे अल्कलॉइड कफनाशक, मूत्रजनक, कृमिनाशक. 

खोड कफरोग, दमा व ज्‍वर यांत उपयुक्त. 

 

आवळा 

 

एंब्‍लिका ऑफिसिनॅलिस कुल – यूफोर्बिएसी

क जीवनसत्त्वाचा नैसर्गिक साठा पौष्टिक, पित्तनाशक, पाचक. 

फळ त्रिफळ्यातील एक द्रव्य. उत्तम पौष्टिक, च्यवनप्राशामधील महत्त्वाचे फळ. 

इपेकॅक 

सेफीलिस इपेकॅक्युन्हा कुल – रूबिएसी

एमेटीन व सफेलीन ही अल्कलॉइडे कफनाशक. 

मूळ कफरोगात उलटी झाल्यावर, अतिसारात वापरतात. 

इसबगोल 

प्‍लँटॅगो ओव्हॅटा कुल – प्‍लँटॅजिनेसी

श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्ययुक्त शीतल, स्तंभक. 

बी सर्व प्रकारच्या आतड्याच्या रोगांत, रक्ती आव, तिसारात अत्यंत उपयुक्त. 

ईश्वरी (सापसंद) 

ॲरिस्टोलोकिया इंडिका कुल – ॲरिस्टोलोकिएसी

ॲरिस्टोलोकीन हे अल्कलॉइड व सुगंधी द्रव्य कटुपौष्टिक, वायुनाशी तंत्रिका उत्तेजक. 

पंचांग (साल, पान, फूल, मूळ व फळ) कुपचन, उलटी, अतिसार, ज्वर ह्यांत उपयोगी. 

एरंड 

 

रिसिनस कम्युनिस कुल – यूफोर्बिएसी

तेल सौम्य विरेचक, दाहशामक, वायुनाशी. 

बी आतड्यास मऊपणा येतो सौम्य विरेचन, निरनिराळी त्वचारोग मलमे तयार करण्यास उपयोगी. 

कडू कवठ 

 

हिद्‌नोकार्पस लॉरिफोलिया कुल – फ्लॅकोर्टिएसी

तेल कृमिनाशक, वर्णशोधक, रक्तशोधक. 

बी तेल सर्व त्वचारोगांत उपयुक्त 

कडू निंब 

 

ॲझॅडिराक्टा इंडिका कुल – मेलिएसी

बाष्पनशील तेल, एक प्रकारचे रेझीन, काषय व रवाळ द्रव्य ज्वर प्रतिबंधक, कृमिनाशक, वर्ण भरून काढणारे. 

साल, पाने व मूळ सालीचा उपयोग सिंकोनाप्रमाणे करतात, त्वचारोगात पोटात रस देतात व त्याच्या पाण्याने व्रण धुतात. बियांचे तेल उत्तम कृमिनाशक. 

काटे रिंगणी 

 

सोलॅनम झँथोकार्पस कुल – सोलॅनेसी

विषारी द्रव्य, ग्‍लुको अल्कलॉइड कफनाशक, ज्वरप्रतिबंधक. 

मूळ सर्व प्रकारच्या कफरोगांत, ज्वरात देतात.  

  


  

मराठी नाव

शास्त्रीय नाव व कुल

रसायनशास्त्र व गुणधर्म

वापरण्यात येणारा भाग व उपयोग

काळी  कुटकी  

 

पिक्रोर्‍हायझा कुरोआ कुल – स्क्रोफ्यूलॅरिएसी

पिक्रोर्‍हायझीन हे अल्कलॉइड रेचक, दीपक. 

मूळ पित्तरस स्रवण्यास मदत. 

 

किराईत (काडेचिराईत) 

स्वार्शिया चिराता कुल – जेन्शिएनेसी (स्व. अंगुस्तिफोलिया म्हणजे पहाडी चिराईताचा कधीकधी  किराईतात भेसळ म्हणून उपयोग केला जातो.

अम्‍लीय द्रव्य कडू, दीपक, ज्वरशामक. 

पंचांग सर्व प्रकारच्या ज्वरांत व आमाशयाच्या शिथिलतेत उपयुक्त. 

कीटक्षोद 

पायरेथ्रम, कुल – कंपॉझिटी

ख्रिसँथिमम अँनेथिफोलियम व ख्रि. कॉक्सियनियम या जातींपासून मिळणारे इराणी कीटक्षोद आणि ख्रि. सिनेरॅरिफोलियम व ख्रि. मार्शली यांपासून मिळणारे डाल्मेशियन कीटक्षोद ही कीटकनाशके चूर्णरूपात स्पर्श -विष म्हणून उपयोगी. 

गुलदौडी हे कडू, सुगंधी दीपक औषध म्हणून वापरतात. 

 

कुचला 

स्ट्रिक्‌नॉस नक्स-व्होमिका कुल –लोगॅनिएसी

स्ट्रिक्‍नीन व ब्रुसीन ही अल्कलॉइडे तंत्रिका तंतूस उत्तेजक, पाचक. 

मूळ व पाने तंत्रिका विकार, रक्तभिसरण सुधारण्यास अत्यंत उपयोगी. 

कुडा  (पांढरा)

 

होलॅर्‍हीना अँटिडिसेंटेरिका कुल – ॲपोसायनेसी

कूर्चीन, कूर्चीसीन ही  अल्कलॉइडे दीपक, रक्तसंग्राहक, वेदनास्थापक. 

मूळ व बी रक्ती आवेत उत्तम, बी (इंद्रजव) उत्तम कटुपौष्टिक. 

कोष्ठ 

सौसुरिया लाप्पा कुल – कंपॉझिटी

सौसुरीन हे अल्कलॉइड, बाष्पनशील तेल इ. पूतिहर, कफनाशक, कृमिनाशक. 

मूळ दमा, त्वचारोग ह्यांत उपयुक्त. 

 

खोरासनी ओवा (खुरासनी ओवा)  

हायसायमस नायगर कुल – सोलॅनेसी

हायसायामीन, स्कोपोलामीन व ॲट्रोपीन ही अल्कलॉइडे वेदनास्थापक, तंत्रिका तंतूंना बल्य. 

पाने व फुले वेदना कमी करण्यासाठी उन्मादावर (हिस्टेरियावर) उपयुक्त. 

गुळवेल  

टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया कुल – मेनिस्पर्मेसी

पंचांगापासून सत्व काढतात पौष्टिक. 

उत्तम पौष्टिक अतिसार व आवेत वापरतात. 

गोखरू 

 

ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस कुल – झायगोफायलेसी

लवण, चरबी, रेझीन शीतल, वेदनास्थापक, मूत्रजनक, बल्य. 

फळ मूत्रपिंडाच्या सर्व विकारांवर उपयुक्त. 

चंदन 

 

सँटँलम आल्बम कुल – सँटॅलेसी

तेल शीतल, मूत्रजनक, कृमिनाशक, मलावरोधक. 

खोड रक्ती अतिसारात, ज्वरात, त्वचारोगांत वापरतात . 

चौलमुग्रा 

 

हिद्‌नोकार्पस कुर्झी कुल – फ्लॅकोर्टिएसी

तेल कृमिनाशक, वर्णशोधक, रक्तशोधक. 

बी तेल सर्व प्रकारच्या त्वचारोगांत उपयुक्त.

  


  

मराठी नाव

शास्त्रीय नाव व कुल

रसायनशास्त्र व गुणधर्म

वापरण्यात येणारा भाग व उपयोग

जटामांसी 

 

नार्डोस्टॅकिस जटामांसी कुल – व्हॅलेरिएनेसी

एक प्रकारचे रेझीन, कापूर, गोंद व अम्‍लधर्मी  पदार्थ तिक्त, सुगंधी, कडू, हृद्‌बल्य. 

मूळ मेंदू व तंत्रिका तंतूंच्या विकारांवर, पोटदुखी व त्वचारोग यांत उपयुक्त. 

जिंतियाण 

जेन्शियाना कुरूआ कुल – जेन्शिएनेसी

कटुपौष्टिक, यकृत उत्तेजक.

मूळ पाचक, पौष्टिक, सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांत. 

ज्येष्ठमध  

 

ग्‍लिसिर्‍हायझ ग्‍लॅबा कुल – लेग्युमिनोजी

ग्‍लिसिर्‍हायझीन हे गोड द्रव्य मधुर, शीतल, कफशामक, मूत्रजनक. 

मूळ स्वरभंग, खोकला, मूत्रविकार ह्यांत अत्यंत उपयुक्त. 

तालिमखाना (कोळसुंदा)

 

हायग्रोफिला स्पायनोजा कुल – ॲकँथेसी

तेल शीतल, वेदनास्थापक, मूत्रजनक. 

पंचांग मूत्ररोगांत, संधिवातात उपयुक्त. 

तिलपुष्पी  

 

डिजिटॅलीस पुर्पुरिया कुल – स्क्रोफ्यूलॅरिएसी

ग्‍लायकोसाइड डिजिटॅलीन हृदयावर व रक्तभिसरणावर. 

पाने हदयरोगावर उपयुक्त. 

 

तुळस 

 

ऑसिमन सँक्टम, कुल – लॅबिएटी

एक प्रकारचे तेल कृमिनाशक, कफनाशक, ज्वरशामक. 

पंचांग थंडी, पडशासाठी, त्वचारोगात, मूत्ररोगात उपयोगी. 

दारूहळद 

 

बबेंरिस अँरिस्टँटा कुल – बर्बेरिडेसी

बर्बेरीन हे अल्कलॉइड कटुपौष्टिक, सौम्य मलावरोधक, स्वेदकारक. 

मूळ मौल्यवान औषधी, सर्व प्रकारच्या ज्वरांत वापरतात, नेत्ररोगात लेप करतात. 

दालचिनी  

 

सिनॅमोमम झेलॅनिकम कुल – लॉरेसी

सुगंधी बाष्पनशील द्रव्य उष्ण, दीपक, पाचक, उत्तेजक, व्रण भरून काढणारे. 

साल व पाने पोटात वात धरल्यास, अतिसार व आव यांत उपयुक्त. 

धोतरा (काळा)

 

दतुरा फॅस्टुओजा (द. मेटल) कुल – सोलॅनेसी

 

हायसायमीन व स्कोपोलामीन ही अल्कलॉइडे क्रिया बेलाडोनासारखी होते. 

पाने, मूळ व बी तंत्रिका तंतूंचे विकार, दमा व कफरोग यांत उपयुक्त. 

नीरब्राह्मी 

 

बॅकोपा  मोनिएरा कुल – स्क्रोफ्यूलॅरिएसी

ब्रह्याइन हे अल्कलॉइड तंत्रिका तंतू उत्तेजक, मूत्रजनक, कफनाशक. 

पंचांग कफरोगात वापरतात, इतर वनौषधींबरोबर वापरतात.

पादवेल 

 

पोडोफायलम हेक्झँड्रम (पो. इमोदी) कुल – बर्बेरिडेसी

पोडोफायलोटॉक्सिन विरेचक, पित्तसारक. 

मूळ आमवातात व त्वचारोगात उपयुक्त, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीस देतात. 

पिंपळी  

 

पायपर लाँगम कुल – पायरेसी

 

तेल उष्ण, वायुनाशी, दीपक, ज्वरप्रतिबंधक. 

फळ ज्वरात, सांधेदुखीत, कफरोगात उपयुक्त. 

पुदिना 

 

मेंथा स्पायकँटा कुल – लॅबिएटी

 

पाने व फुले यांपासून तेल काढतात उत्तेजक, कफनाशक, मूत्रजनक, वायुनाशी. 

पाने व फुले कुपचन, अपचन, पोटफुगी त्वचारोग व संधिवात यांत उपयोगी. 

पुनर्नवा 

 

बुर्‍हाबिया डिफ्यूजा कुल – निक्टॅजिनेसी

पुनर्नव्हाइन हे अल्कलॉइड दीपक, मूत्रल, कफनाशक. 

पंचांग उत्तम मूत्रजनक आहे. सर्व प्रकारच्या शोथांत (दाहयुक्त सुजेत) वापरतात. 

  


  

मराठी नाव

शास्त्रीय नाव व कुल

रसायनशास्त्र व गुणधर्म

वापरण्यात येणारा भाग व उपयोग ४

बावची 

 

सोरॅलिया कॉरिलिफोलिया कुल – लेग्युमिनोजी

तेल कृमिनाशक, व्रणशोधक (व्रणाची शुद्धी करणारे ). 

बी सर्व प्रकारच्या त्वचारोगांत. 

 

बाहवा 

कॅसिया फिस्‌चुला कुल – लेग्युमिनोजी

दाहशामक, सौम्य विरेचक. 

शेंगेतील गर, पाने, फुले चांगले विरेचक, ज्वरातही वापरतात. 

बेल 

 

ईगल मार्मेलॉस कुल – रूटेसी

तंत्रिका तंतुशामक फळाचा गर संग्राहक व आतड्यास शक्ती देणारा. 

मूळ, दशमूलातील एक ज्वर व अतिसारात उपयोगी. 

बेलाडोना 

 

अँट्रोपा अँक्युमिनाटा कुल – सोलॅनेसी

ॲट्रोपीन व हायसायमीन ही  अल्कलॉइडे अल्प प्रमाणात हृदयबल्य, रक्तप्रतिबंधक, वेदनास्थापक. 

वाळलेली  पाने हृदयरोगात व श्वास रोगात फार वापरतात. 

 

बेहडा 

 

टर्मिनॅलिया बेलिरिका कुल – काँब्रेटेसी

टॅनीन विरेचक 

 

फळ पोटदुखीवर उपयुक्त, त्रिफळ्यातील उत्तम घटक, पौष्टिक अतिसार व आवयांत वापरतात. 

ब्राह्मी (कारिवणा)

सेटेला एशियाटिका कुल – अंबेलिफेरी

हायड्रोकॉटिलीन हे अल्कलॉइड. 

पंचांग रक्तशुद्धीसाठी उपयुक्त. कुष्ठरोगात, सर्व प्रकारच्या त्वचारोगांत वापरतात. 

मोह  

 

मधुका लाँगिफोलिया कुल – सॅपोटेसी

फुलात एक प्रकारची साखर असते, तीपासून मद्य तयार करतात. 

फुले रक्तभिसरणावर उपयोगी. 

 

रानतुळस 

 

ऑसिमम ग्रॅटिसिमम कुल – लॅबिएटी

बाष्पनशील तेल 

 

झाडापासून तेल काढतात. तेल स्थानिक संवेदनाहारक, कमी विषारी आणि आगकारक (दाहयुक्त) असते. ते कानदुखी, दातदुखी व लहान मुलांतील पोटदुखीवर वापरतात. झाडाचे भाग सारक, पोष्टिक, मूत्रल, वांतिशामक, जंतुनाशक असतात. बी डोकेदुखी व हगवणीवर उपयुक्त, इतर वनस्पतींबरोबर कफनाशक म्हणून वापरतात. 

रेवंदचिनी 

 

र्‍हीयम इमोदी कुल – पॉलिगोनेसी

ऑक्झॅलिक अम्‍ल, ग्‍लायकोसाइडे कडू, दीपक, मलावरोधक. 

मूळ कुपचन, अतिसार व आव यांत बहुमोल औषध. 

वावडिंग 

 

एंबेलिया राइब्ज कुल – मिर्सिनेसी

अम्‍लधर्मी  द्रव्य उष्ण, पाचक, कृमिनाशक, रक्तशोधक. 

फळ कृमी, अतिसार व संग्रहणी यांत उत्तम. 

वेखंड 

 

अँकॉरस कॅलॅमस कुल – ॲरॉइडी

मुळात अल्कलॉइड व सुगंधी तेल कफनाशक, कृमिनाशक, वायुनाशी, वेदनास्थापक. 

मूळ इतर औषधांबरोबर वापरतात. कफ व उलटी  ह्यांवर उपयोगी. 

वेलदोडा 

एलेटॅरिया कार्डामोमम कुल – झिंझिबरेसी

सुगंधी बाष्पनशील तेल रोचक, पाचक, वायुनाशी. 

बी मुरडा, पोटदुखीत उत्तम औषध. 

  


  

मराठी नाव

शास्त्रीय नाव व कुल

रसायनशास्त्र व गुणधर्म

वापरण्यात येणारा भाग व उपयोग ४

सदाफुली 

 

व्हिंका रोझिया ( लॉक्नेरा रोझिया ) कुल – ॲपोसायनेसी

मुळात अनेक अल्कलॉइडे रक्तदाब कमी करणारी, शामक व शांतक ह्यातील अल्कलॉइड व्हिन्काल्युको – ब्‍लास्टिनाच्या कर्करोगातील उपयोगावर संशोधन होत आहे.

पाने व मूळ पानांचा रस गांधील माशीच्या दंशावर लावतात फांट ( काढा ) अतिस्रावावर देतात मधुमेहावरही वापरतात. 

 

सर्पगंधा 

 

रॉव्होल्फिया सपेंटिना कुल – ॲपोसायनेसी

अजमलीन, रेसरपीन ही अल्कलॉइडे. 

मूळ  व पाने अतिरक्तदाबावर अत्यंत उपयुक्त. 

सातवीण 

 

अल्स्टोनिया स्केलॅरिस कुल – ॲपोसायनेसी

एकिटामीन हे अल्कलॉइड व लवण सत्त्वाचे गुणधर्म क्किनिनासारखे. 

साल सर्व तर्‍हेच्या ज्वरांत, त्वचारोगांत, अतिसारात व आवेत देतात. 

सिंकोना 

 

सिंकोना कॅलिसाया कुल – रूबिएसी

क्किनीन हे अल्कलॉइड कटुपौष्टिक, नियतकालिक ज्वरप्रतिबंधक. 

साल मलेरियात, आब, कफरोगात उपयुक्त. मात्रा प्रमाण मात्र योग्य द्यावयास हवे. 

सोनामुखी 

 

कॅसिया अंगुस्तिफोलिया कुल – लेग्युमिनोजी

रेचक, लहान आतड्यावर क्रिया होते पचनक्रिया सुधारते. 

पाने व शेंगा कुपचन, शौचास साफ न होणे ह्या वेळी वापरतात. 

हरमल 

पेगँनम हर्मला कुल – झायगोफायलेसी

रेझीन, अम्‍लद्रव्य आणि हर्मलीन, हर्मालॉल व हर्मीन ही अल्कलॉइडे कफनाशक, वायुनाशी, तंत्रिका तंतुबल्य, संभ्रमकारी. 

बी दमा, सांधेदुखी, ज्वर व उन्माद यांत वापरतात. 

   

[मराठी विश्वकोशात ज्या वनस्पतींवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत त्या बहुतेकांत त्या वनस्पतीमध्ये आढळणारी रासायनिक द्रव्ये, त्यांचे औषधी गुणधर्म व उपयोग इत्यादींविषयी माहिती दिलेली  आहे.]

पृथ्वीतलावरील प्रत्येक वनस्पतीत काही ना काही ना काही तरी उपयुक्त गुणधर्म आहेत. हे बरेवाईट गुणधर्म जाणून घेऊन त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करणे महत्त्वाचे आहे. साधारणतः आयुर्वेदिक औषधे अनेक वनस्पतींची मिळून बनलेली असतात. औषधामधील प्रत्येक वनस्पती ही महत्त्वाची असते. केवळ नावाने नाही, तर वनस्पतिवैज्ञानिक दृष्टीने ती पारखून घेऊन ठराविक प्रमाणात तिची मात्रा घेतल्यास ती रूग्णास आराम देऊ शकते पण अशा औषधी देणाऱ्या स्वस्त व सुलभ योजना फार थोड्या आहेत. आज ह्या औषधींचा पुनरपी विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात चालत आलेली थोर परंपरा अत्यंत डोळसपणे अभ्यासून आधुनिक विज्ञानाच्या निकषावर पारखून आयुर्वेदाचा पाया परत स्थिर केला पाहिजे. त्यासाठी वनस्पतिविज्ञानाचा फार मोठा उपयोग करून घेऊन दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन करून त्या जतन करावयास हव्यात. ह्यामुळे गरीब, मागासलेल्या देशांत सहज सुलभपणे निरोगी आयुष्याची जोपासना करणे शक्य होईल.

अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, जपान, चीन यांसारख्या पुढारलेल्या देशांत देखील आयुर्वेदातील चिकित्सा पद्धतीवर अभ्यास सुरू आहे. आयुर्वेदाने मानलेल्या वनस्पतींवर देखील या देशांत फार मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. पुढारलेल्या देशांतील वैज्ञानिक भारतात येऊन आयुर्वेदाचा सखोल, शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. परदेशी सहकार्याने चाललेले काही कारखाने, तर स्थानिक नावाजलेल्या वनस्पतींचा वापर करून भरमसाठ किंमतीची औषधे तयार करीत आहेत.

 

भारत सरकारनेही गेल्या वर्षात भारतामधील पारंपारिक प्रचलित औषधी पद्धतीचा जास्तीत जास्त उपयोग व प्रसार व्हावा म्हणून उच्च पातळीवर एक खास विभाग सुरू केला आहे. त्यामध्ये आधुनिक विज्ञानाचे साहाय्य घेऊन स्थानिक देशी औषधी पद्धतीचा जास्तीत जास्त परिणामकारक रीतीने कसा उपयोग करता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे.

आयुर्वेदीय औषधांचा वापर यशस्वी रीत्या ग्रामीण आरोग्य सेवेसाठी करावयाचा झाल्यास विज्ञानातील विविध शास्त्रांचा उपयोग करून कारखानदारीमधून निर्भेळ औषधे परवडणाऱ्या किंमतीमध्ये कशी तयार येतील, याचा विचार व्हावयास पाहिजे. वनस्पतिवैज्ञानिकांकडून वनस्पतीची ओळख पटवून घेणे, त्या वनस्पतीची सर्वागीण माहिती संग्रहालयातून मिळविणे, वनस्पती सर्वेक्षण विभागाकडून अशी वनस्पती कोठे किती प्रमाणात मिळेल याची माहिती घेणे, अशा औषधी वनस्पती स्थानिक विपुलतेस धोका न येईल अशा तर्हेमने भरपूर प्रमाणात गोळा करणे, त्यांचे रसायनशास्त्रज्ञाकडून विश्लेषण करून त्यांमधील मूलभूत द्रव्यांचा अभ्यास करणे, अशा द्रव्यांचा ससा, उंदीर यांसारख्या प्राण्यांवर काय शारीरिक परिणाम होतो हे विविध शास्त्रीय उपकरणे वापरून पाहाणे आणि नंतर मग मानवावर अशा औषधींचा परिणाम काय होतो याचा दीर्घ मुदतीचा काळात अभ्यास करून जर हे औषधी द्रव्य खरोखरीच गुणकारी ठरेल, तर त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन  करण्यासाठी रासायनिक अभियांत्रिकीची मदत घेऊन नंतर त्याचे व्यापारी तत्वावर वितरण करता येईल. अशा प्रकारच्या यंत्रणा पुढारलेल्या देशांत विविध स्वरूपांत आढळतात, पण भारतात अशा तऱ्हेचा विचारच प्राथमिक अवस्थेमध्ये आहे.

जर सर्पगंधा, इसबगोल, अश्वगंधा, शतावरी यांसारख्या व इतर अनेक वनस्पती औषधनिर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ठरल्या, तर त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड कशी करता येईल याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी कृषितज्ञ, आनुवंशिकीविज्ञ यांच्याकडून असा वनस्पतींवर सखोल संशोधन होऊन पिकांच्या स्वरूपात या वनस्पतींची लागवड करण्यात आली पाहिजे म्हणजे कारखानदारीला कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही. रायवरील अरगटाची (क्लॅव्हिसप्स पुर्पुरियाची ) भारतात काही प्रमाणात निर्मिती होते. ज्यांत अल्कलॉइडांचे जास्त प्रमाण आहे असे याचे ⇨कृत्तक निर्माण करण्याची गरज आहे. भारतात लागवड होऊ शकतील अशा उपयुक्त परदेशी औषधी वनस्पती प्रचारात आणावयास पाहिजेत. याबाबतीत ॲम्मी माजूस (हिंदी नाव खुंबी) ह्या वनस्पतीचे उदाहरण लक्षणीय आहे. ही वनस्पती युनेस्कोच्या सौजन्याने प्रथम डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आली. तिच्यावर करण्यात आलेल्या संशोधनावरून पंजाबात तिची लागवड यशस्वीपणे करता येईल, असे दिसून आले. या वनस्पतीत ०.४% झँथोटॉक्सिन असून पांढऱ्या कोडावर त्याचा उपचार करतात. शिवाय ते उन्हाने कातडी तपकिरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धावन द्रव्यात वापरण्यात येते. ह्या वनस्पतीला औषधनिर्मितीच्या उद्योगातून मोठी मागणी आहे. एखाद्या औषधी वनस्पतीच्या ऐवजी विशिष्ट औषधाच्या निर्मितीसाठी दुसरी वनस्पती सोयीस्कर ठरत असल्यास तिच्याही लागवडीचा विचार करण्यात आला पाहिजे. उदा., डायॉस्कोरिया प्रजातीतील काही वनस्पतींची (मेक्सिको व ग्वाटेमाला येथील स्थानिक याम जातींची) लागवड काही स्टेरॉइडांच्या निर्मितीसाठी करण्यात येते. कारण त्यांच्यात डायोसजेनीन आहे (प्रारंभीच्या संततिप्रतिबंधक गोळ्यांत याचा उपयोग करण्यात येत होता) पण ह्या वनस्पतींच्या लागवडीत उत्पादनाच्या दृष्टीने काही तोटे आहेत म्हणून रशियात डायोसजेनिनाला पर्याय म्हणून सोलॅसोडिनाचा विचार करण्यात आला. सोलॅनम प्रजातीतील काही जातींत हे स्टेरॉइडल अल्कलॉइड लापडते. भारतातील खासी–जैंतिया टेकड्यांच्या प्रदेशात सोलॅनम व्हायारम (सो. खासियानम प्रकार चटर्जीयानम ) ही वनस्पती आढळते. हिच्यात सोलॅसोडीन १ ते २% असते. उत्पादनाच्या दृष्टीने हे प्रमाण २.५%च्या वर असावयास पाहिजे म्हणून आनुवांशिक दृष्ट्या ह्या वनस्पतींवर आता बरेच संशोधन करण्यात येऊन फायदेशीर असे उत्परिवर्त (आनुवंशिक वैशिष्ट्यांत बदल घडून आलेले प्रकार) मिळविण्यात आलेले आहेत व ते आता काही ठिकाणी लागवडीखाली आले आहेत.

वनस्पतींवर आधारित असलेल्या बऱ्याच औषधांच्या निर्मितीबाबत जरी भारत आता स्वयंपूर्ण झालेला असला, तरी अजूनही त्याला काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती व वनस्पतिजन्य औषधे आयात करावी लागतात. जरी भारतातून औषधी वनस्पतींची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी त्या बहुतेक वनस्पतींतील औषधियुक्त द्रव्ये मात्र निर्यात होत नाहीत. यांतील मुख्यतः बीटा आयोनोन (गवती चहातील बाष्पनशील तेलापासून मिळणारे संयुग), बर्बेरीन लवण व पेपेन मोठ्या  प्रमाणात निर्यात होतात. इतर निर्यात होणाऱ्या वनस्पतींतील औषधियुक्त द्रव्यांच्या निर्यातीवरही म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे.

औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत केवळ संशोधन आणि तिचा विकास यांबाबतीतच विचार करून चालणार नाही, तर त्यांच्या विक्रीच्या किंमती ठरविण्याच्या दृष्टीने देखील सरकारी धोरणे ठरवावी लागतील. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य तो फायदा मिळाला पाहिजे आणि दलाल व निर्यातदारांकडून त्यांची पिळणूक होणार नाही अशा रीतीने या किंमती निर्धारित झाल्या पाहिजेत.

उष्ण कटिबंधातील वर्षावनांतील वनस्पतींच्या हजारो जातींपासून भविष्यात औषधे मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन औषधांचाही शोध सुरू आहे. या कामी वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर (डब्ल्यू. डब्ल्यू. एफ.) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे ब्राझील, कोस्टारीका, निकाराग्वा इ. देशांत या दृष्टीने प्रकल्प हाती घेण्यात आलेले असून कवकसंसर्ग, कर्करोग, अतिसार, श्वसन तंत्र विकार वगैरे विकारांत उपयोगी अशा वनस्पतींवर (उदा., बी–डी, झ्यूलॅनिया क्किडोनिया, पेरू, गवती चहा, निलगिरी इ.) संशोधन चालू आहे. इंग्लंडमधील रॉयल बोटॅनिक गार्डन्स (क्यू गार्डन्स) येथील जीवरसायनशास्त्रज्ञांनी उष्ण कटिबंधातील वनस्पतींच्या अर्काच्या औषधी उपयोगांवर संशोधन हाती घेतले असून त्यात कर्करोग, मधुमेह, एड्स इ. विकारांवर उपयुक्त ठरणारी औषधे मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटने ३,००० वनस्पती कर्करोगाच्या कोशिकांविरूद्ध (पेशींविरुद्ध) क्रियाशील असल्याचे शोधून काढले असून त्यांपैकी ७०% वनस्पती उष्ण कटिबंधीय वनांतील आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मेक्सिकोमधील केंद्रात ॲझटेक, माया व अन्य पूर्वकालीन संस्कृतींना माहीत असलेल्या वनस्पतींवर औषधिक्रियाविज्ञान, रसायनशास्त्र व वनस्पतिविज्ञान या दृष्टीने संशोधन चालू आहे. पारंपारिक औषध पद्धतीच्या वापराला संघटनेने प्रोत्साहन दिलेले आहे. या कार्यक्रमाद्वारे संघटनेने जगातील ८०% लोक आपल्या प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपारिक उपचारांवर अवलंबून आहेत, असा निष्कर्ष काढलेला आहे. काही देशांत पारंपारिक औषधोपचार पद्धतींना शासनाने प्रोत्साहन दिलेले आहे उदा., चीनमध्ये ४०% रूग्णांवर अशा तऱ्हेने उपचार केले जातात.

पहा : अल्कलॉइडे औषधनिर्मिती औषधिकल्प. 

संदर्भ :  1. Chopra, R. N. and others, The Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1956.

            2. I. C. A. R. Indian Horticulture, Jan–mar. 1984, Special Number on Medicinal Plants, Vol. 28, No. 4, New Delhi, 1984.

            3. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968.

            4. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vols. 4, Delhi, 1975.

            5. Mooss, N. S., Ayurvedic Flora Medica, Kottayam, 1953.

            ६. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

            ७. पदे, शंकर दाजीशास्त्री वनस्पती-गुणादर्श, मुंबई, १९७३.

            ८. सावंत, स. य. महाराष्ट्रातील दिव्य वनौषधी, पुणे, १९७४.

वर्तक, वा. द. ज्ञानसागर, वि. रा. जमदाडे, ज. वि.