वझीराबाद: पाकिस्तानच्या गुजराणवाला जिल्ह्यातील एक व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या ८०,५१२ (१९७२). लाहोरच्या वायव्येस सु. ९६ किमी. वर वसलेले हे शहर चिनाब नदीच्या उजव्या काठावर विस्तारलेले असून पाकिस्तान वेस्टर्न रेल्वेच्या सियालकोट–ल्यालपूर (फैसलाबाद) फाट्यावरील ते महत्त्वाचे प्रस्थानक आहे. १८७६ साली बांधलेल्या अँलेक्झांड्रा रेल्वे पुलाने हे नदीच्या दुसऱ्या भागाशी जोडलेले आहे.
या शहराची स्थापना शाहजहानच्या कारकीर्दीत, सतराव्या शतकात वझीरखानाने (सरहिंद प्रांताचा गव्हर्नर) केल्याचे मानतात. १७६० मध्ये चरतसिंगाने (रणजिकसिंगचे आजोबा) हे शहर घेतले व तेव्हापासून याचे नाव परिचित झाले. पुढे १८०९ मध्ये रणजितसिंगाने या शहरावर ताबा मिळविला आणि आपल्या ॲव्हिताबिले या इटालियन जनरलला येथील गव्हर्नरपद दिले. त्याने या शहराची पुनर्रचना करून शपरात रूंद बाजारपेठ व काटकोनातील रस्त्यांची बांधणी केली. हे शहर पूर्वीच्या वझीराबाद जिल्ह्याचे व त्यानंतर १८५१–५२ मध्ये याच नावाच्या कँटोनमेंटचे मुख्यालय होते. १८५५ मध्ये अनहितकारक वातावरणामुळे येथील मुख्यालय सियालकोट येथे हलविण्यात आले. शहरात १८६७ पासून नगरपालिका आहे.
पूर्वीपासूनच लाकडाची व्यापारपेठ म्हणून हे प्रसिद्ध असून काश्मीर खोऱ्यातून चिनाब नदीमार्गे लाकडाचे ओंडके येथे आणले जातात. याशिवाय येथे कापूस, धान्य, साखर यांची मोठी बाजारपेठ आहे. शहरात प्रामुख्याने धातूच्या व रबरी वस्तू, तलवारी, चाकू, सुऱ्या, खोकी इ. वस्तू तयार करण्याच्या छोट्या उद्योगांबरोबरच बोटी बांधण्याचा उद्योगही चालतो.
चौंडे, मा. ल.