वज्रेश्वरी:महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या १,३६१ (१९८१). तानसा नदीकाठाजवळ वसलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाण्यापासून सु. ४२ किमी., तर भिवंडीपासून उत्तरेस १९ किमी. अंतरावर आहे. याचे मूळ नाव वडवली असून गावातील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या मंदिरा वरून गावाचे वज्रेश्वरी हे नाव पडलेले आहे. वज्रेश्वरी ह्या नावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. सिंहमार व कलिकाल या दोन असुरांच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी देवीची कृपा संपादन करावी म्हणून वसिष्ठ ऋषींनी येथे एक यज्ञ सुरू केला. यज्ञात सर्व देवतांना हविर्भाग मिळाला, पण इंद्राला तो दिला गेला नाही. त्यामुळे इंद्राने रागावून वसिष्ठावर आपले वज्र फेकले. तेव्हा पार्वतीने प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले, म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव मिळाले.
वज्रेश्वरी देवीचे मंदिर व जवळील गरम पाण्याचे झरे यांमुळे हे गाव विशेष प्रसिद्धीस आले. नदीकाठावरील एका टेकडीवर असलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती मोठा कोट आहे. पेशवाईचा उदयापर्यंत येथील मंदिर खूपच लहान होते. वसईचा किल्ला काबीज झाल्यावर चिमाजी आप्पांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधले, असे सांगितले जाते. सभामंडपाचा भाग बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी, तर पायऱ्या व दीपमाळ नासिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. सभामंडप व दोन गाभारे असे मंदिराचे तीन भाग आहेत. प्रमुख गाभाऱ्यात पाच मूर्ती आहेत. त्यांत मध्यभागी वज्रेश्वरी, तिच्या उजव्या बाजूला सावित्री-सरस्वती आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-भार्गव यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गाभऱ्यात गणपती, वेताळ, कालभैरव इत्यादींच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या व्यवस्थापन-खर्चासाठी वसई व भिवंडी ह्या तालुक्यांतील प्रत्येकी तीन अशी सहा गावे पेशव्यांनी इनाम दिलेली आहेत. १८७० मधील इंग्रज-मराठा चकमक वज्रेश्वरीजवळच झाली होती.
वज्रेश्वरी गावाच्या परिसरात, नदीतीरावर ६.४ किमी. अंतरापर्यंत गरम पाण्याची अनेक कुंडे आहेत. हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी समजले जाते. या कुंडांना अग्निकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, वायुकुंड, रामकुंड, लक्ष्मणकुंड व सीताकुंड अशी नावे दिलेली आहेत स्नानासाठी मोठ्या संख्येने येथे लोक येत असतात. वज्रेश्वरीजवळील अकलोली आणि गणेशपुरी येथे अनुक्रमे गरम पाण्याची कुंडे, आरोग्यधाम, जलोपचार केंद्र आणि नित्यानंद स्वामींची समाधी असून भाविकांची समाधीच्या दर्शनासाठी गर्दी असते.
चौधरी, वसंत
“