वज्जालग्ग: हालकृत ⇨गाहा सत्तसईच्या धर्तीवर जयवल्लभाने संपादिलेल्या, माहाराष्ट्री प्राकृतातील विविध विषयांवरील सुभाषितांचा संग्रह. जयवल्लभाच्या कुल-स्थळ-कालाविषयी माहिती नसली, तरी रत्नदेवाने ह्या ग्रंथावर १३३६ मध्ये संस्कृत टीका लिहिली असल्यामुळे ह्याचा काळ चौदाव्या शतकाच्या पूर्वीचा असण्याचा संभव आहे. तसेच ग्रंथाच्या मंगलाचरणावरून हा श्वेतांबर जैन असावा, असे वाटते.

ह्या ग्रंथाला विज्जालग्ग, पज्जालय, विज्जालय, अशी नावे असली, तरी वज्जालग्ग हेच नाव अधिकृत आहे. एकाच विषयावर जेथे अनेक गाथा म्हटल्या (संगृहीत केल्या) जातात, त्याला ‘वज्जालग्ग’ म्हणतात”. ‘वज्जा’ म्हणजे ‘पद्धती’ अशा आशयाचे स्पष्टीकरण ह्या ग्रंथातच दिलेले आहे.

‘वज्जा’ चे संस्कृतीकरण ‘व्रज्या’ करून टीकाकार रत्नदेवाने ‘सजातीय गाथांचे एकत्रीकरण’ असा अर्थ जरी दिलेला असला, तरी ‘वद्’—‘बोलणे’पासून ‘वद्या’&gt वज्जा ‘म्हण किंवा सुभाषित’ असाही अर्थ घेता येईल. वज्जालग्गात प्रथम ७०० गाथा असाव्यात, असे ह्या ग्रंथाच्या काही पोथ्यांतील पुष्पिका पाहता दिसते. तथापि ह्या ग्रंथाच्या ८ पोथ्यांच्या आधारे यूलिअस लाबेर ह्याने संपादिलेल्या वज्जालग्गात ७९५ गाथा आहेत. ह्या ग्रंथातील गाथा वसंतादी ऋतू, चंदन, वटादी वृक्ष, गज, सिंह, हरिण इ. पशू, स्त्रियांची अंगप्रत्यंगे इ. वज्जांत वा प्रकरणांत विभागलेल्या आहेत. वज्जालग्गात अधूनमधून अपभ्रंश भाषेची रूपे येतात.

संस्कृत अलंकारशास्त्रज्ञांनी हालाच्या गाहा सत्तसईतील अनेक गाथा उदधृत केल्या आहेत. परंतु त्यांनी ह्या ग्रंथाची अशा प्रकारे दखल घेतलेली दिसत नाही.

तगारे, ग. बा.