प्रवरसेन : (पाचवे शतक). माहाराष्ट्री प्राकृतातील ⇨सेतुबंध ह्या सर्वोत्कृष्ट महाकाव्याचा कर्ता आणि ‘दुसरा प्रवरसेन’ ह्या नावाने ओळखला जाणारा एक वाकाटक वंशीय राजा. दुसऱ्‍या रुद्रसेनाचा प्रवरसेन हा कनिष्ठ पुत्र आणि सम्राट दुसरा चंद्रगुप्त ह्याचा तो नातू. दुसरा रुदसेन निवर्तला, तेव्हा प्रवरसेनाचा ज्येष्ठ बंधू युवराज दिवाकरसेन ह्याच्या नावाने दुसऱ्‍या रुद्रसेनाची राणी प्रभावती गुप्ता ही राज्यकारभार पाहू लागली परंतु ४२० च्या सुमारास दिवाकरसेन हा मरण पावल्यामुळे प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनाचे मूळ नाव दामोदरसेन असे होते. प्रवरसेन हे त्याने राज्यारोहणप्रसंगी घेतलेले नाव. प्रभावती गुप्ता ही राज्यकारभार पाहत असताना तिचा पिता सम्राट दुसरा चंद्रगुप्त ह्याने तिचा एक सल्लागार म्हणून महाकवी कालिदासाला पाठविले होते आणि कालिदासानेच सेतुबंधाची रचना केली, अशी एक समजूत आहे. सेतुबंधाच्या काही हस्तलिखितांतून आढळणाऱ्‍या पुष्पिकांतून (कोलोफोन) प्रवरसेन आणि कालिदास ह्या दोघांची नावे आढळतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता, उपर्युक्त समजूत बरोबर असावी, असे अलीकडील काही विद्वानांना वाटते. असे असले, तरी बाणाच्या हर्षचरितासेतुबंधाचे कर्तृत्व प्रवरसेनास दिलेले आहे. कंबोजचा राजा यशोवर्मा ह्याच्या एका शिलालेखातही तसा उल्लेख आहे. लंकेवर स्वारी करण्यासाठी वानरसेनेने बांधलेला सेतू आणि त्यानंतर रामाने केलेला रावणवध हा सेतुबंधाचा विषय होय.

तगारे, ग. वा.