समराइच्चकहा : (समरादित्यकथा). एक धर्मकथा. कर्ता श्र्वेतांबर जैन पंथीय ग्रंथकार ⇨हरिभद्र. ह्याचा काळ आठव्या शतकाचा उत्तरार्ध-काहींच्या मते ८०० ते ८३० पर्यंत- मानला जातो. जैन आगमांवर त्याने अनेक संस्कृत टीका, भाष्ये लिहिली आहेत तथापि असे गंभीर लेखन करणाऱ्या हरिभद्राने समराइच्च्कहा ही धर्मकथाही लिहिली आहे. ह्या कथेत उज्जैनचा राजा समरादित्य आणि त्याचा सूड घेण्यास प्रवृत्त झालेला अग्निशर्मा ह्यांच्या नऊ जन्मांची कथा आहे. पूर्वजन्मात समरादित्य राजकुमार गुणसेन असताना त्याच्या वडिलांच्या राजपुरोहिताचा पुत्र अग्निशर्मा ह्याच्या कुरूपपणाची थट्टा करीत असे आणि त्याला अपमानकारक पद्धतीने वागवत असे. त्यामुळे वैतागून अग्निशर्म्याने गाव सोडले आणि कौंडिन्यनामक एका तापस कुलपतीच्या आश्रमात जाऊन तपश्र्चर्या करू लागला. पुढे गुणसेन हा राजा झाल्यावर अग्निशर्मा हा महातपस्वी झाल्याचे त्याला कळले. तो अग्निशर्म्याच्या दर्शनास गेला. पूर्वी जे घडले, त्याबद्दल अग्निशर्म्याची माफी मागून मासोपवासाचे पारणे फेडण्यासाठी त्याने अग्निशर्म्याला राजवाडयावर येण्याचे निमंत्रण दिले पण राजवाड्यावर अग्निशर्म्याची उपेक्षाच झाली, तो उपाशीच निघून गेला. असे तीन वेळा घडले. मात्र गुणसेनाचा तसा हेतू नव्हता. त्यामुळे आताही राजा आपली थट्टाच करील असा अग्निशर्म्याचा समज होऊन त्याने पुढील जन्मी राजाचा सूड घेण्याचे ठरविले. पुढला जन्म मिळण्यासाठी आमरण उपोषण केले. असे त्याचे आणि गुणसेनाचे नऊ जन्म झाले. नवव्या जन्मात अग्निशर्मा हा गिरिसेन नामक चांडाळ होता, तर गुणसेन हा समरादित्य नावाचा राजा होता. गिरिसेनाने समरादित्याचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अयशस्वी झाला आणि शेवटी नरकास गेला. गुणसेन मात्र मोक्षास गेला, अशी थोडक्यात ही कथा.

हरिभद्राने ग्रंथाच्या प्रस्तावनेत कथेबद्दलच्या ज्या आठ संगही गाथा उद्‌धृत केल्या आहेत, त्यावरून ही धर्मकथा परंपरागत असावी, असेवाटते तथापि हरिभद्राने आपल्या प्रतिभेने तिला कलाकृतीचे रूप दिले आहे.

ह्या धर्मकथेतून वर्णिलेल्या प्रसंगांमधून तत्कालीन जीवन-विशेषत: सर्वसामान्यांचे जीवन- कसे होते, याची स्पष्ट कल्पना येते. ही कथा साध्या, ओघवत्या अशा गदय शैलीत लिहिलेली आहे. क्वचित गाथा छंदातलीव्दिपदा, विपुला असे छंदही वापरले आहेत, पदयेही आहेत. बाणाची कादंबरी, हर्षकृत रत्नावलि अशा संस्कृत ग्रंथांचा हरिभद्रावर प्रभाव जाणवितो. हेर्मान याकोबी यांनी ही कथा संपादिली आहे (१९१६).

तगारे, ग. वा.