कर्पूरमंजरी : कवी राजशेखरकृत (८६४–९२५) प्राकृत ⇨सट्टक (प्राकृतमधील एक नृत्यप्रधान नाट्यप्रकार). राजशेखराची कवयित्री पत्नी अवंतीसुंदरी, हिच्या मनोरंजनार्थ राजशेखराने कर्पूरमंजरी लिहिली. हे सट्टक मुख्यतः शौरसेनी प्राकृतमध्ये आहे तथापि त्यातील काही पद्यभाग माहाराष्ट्रीला जवळचा आहे तसेच त्यात थोडाफार संस्कृतचाही उपयोग केला आहे. त्यात राजा चंद्रपाल व कर्पूरमंजरी यांची प्रेमकथा आहे.

एका वसंतोत्सवात राजा चंद्रपाल योगी भैरवानंदाने योगसामर्थ्याने आणवलेल्या कर्पूरमंजरी या राजकन्येच्या प्रेमात पडतो. राणी विभ्रमलेखेला हे न खपून ती कर्पूरमंजरी व राजा यांची भेट होऊ देत नाही. पण राजाचे लग्न लाटदेशाची राजकन्या घनसारमंजरीशी झाल्यास तो चक्रवर्ती होईल, असे भैरवानंदाकडून समजल्यावरून ती त्या विवाहास संमती देते. प्रत्यक्ष लग्नात कर्पूरमंजरी व घनसारमंजरी या एकच असल्याचे आढळते व हे सट्टक सुखान्त होते. सट्टकाच्या कथांच्या सर्वसाधारण साच्यात बसणारीच ही कथा आहे. कर्पूरमंजरीची भाषाशैली ओघवती, ललित आणि अनुप्रासयुक्त आहे. तीत १४४ गाथा असून १७ प्रकारचे छंद आहेत. वसंत, संध्या, चंद्रोदय, ऋतू, मीलन, विरह यांची काव्यमय वर्णनेही आढळतात. म्हणी, वाक्‌संप्रदाय ह्यांचादेखील उपयोग केला आहे. हास्यरसही काही ठिकाणी रंगतदार आहे. प्राकृतमधील पाच सट्टकांत कर्पूरमंजरी हे सर्वश्रेष्ठ गणले जाते. 

तगारे, ग.वा.