महावीरचरिय : जैन तीर्थंकर महावीर ह्यांच्या जीवनावर ⇨ गुणचंद्राने (अकरावे शतक)  माहाराष्ट्री प्राकृतात रचिलेला गद्यपद्यात्मक ग्रंथ. ह्या ग्रंथाचे आठ प्रस्ताव किंवा अध्याय असून त्यांतील श्लोकसंख्या १२,०२५ इतकी आहे. ह्या ग्रंथाची रचना गुणचंद्राने १०८२ मध्ये केली.

ह्या ग्रंथाच्या आरंभीच्या काही प्रस्तावांतून महावीरांचे पूर्वजन्म सांगितले असून नंतर महावीरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना वर्णिल्या आहेत. उदा., देवानंदा ह्या ब्राह्मणीच्या गर्भातून त्रिशला राणीच्या गर्भात भावी महावीरांचे संक्रमण, महावीरांचा जन्म, त्यांचे पाठशाळेतील अध्ययन, राजा समरवीराची कन्या यशोदा हिच्याबरोबर  महावीरांचा विवाह, आईवडिलांच्या मृत्यूनंतर महावीरांनी आपला भाऊ नंदिवर्धन ह्याच्या अनुमतीने घेतलेली संन्यासदीक्षा महावीरांची तपश्चर्या व पदयात्रा, मंखलीपुत्र गोशालाचा सहवास, महावीरांस झालेली केवलज्ञानप्राप्ती, त्यांनी केलेली चतुर्विध संघाची स्थापना, श्रेणिक आदींना त्यांनी केलेला धर्मोपदेश व निर्वाण.

ह्या ग्रंथातील पद्ये विविध छंदांत रचिलेली असून कालिदास, बाणभट्ट, माघ आदी संस्कृत साहित्यश्रेष्ठींचा प्रभाव त्यावर जाणवतो. अरण्ये, नगरे, उत्सव, विवाहविधी ह्यांची ह्या काव्यातील वर्णने सुंदर उतरली आहेत. ठिकठिकाणी गुणचंद्राने संस्कृत श्लोक उद्‌धृत केलेले आहेत. त्यातील अवहट्ट पद्यावर नागर अपभ्रंशाचा प्रभाव आढळतो. देश्य शब्दांऐवजी  तद्‌भव व तद्‌सम शब्द वापरण्याकडे गुणचंद्राचा कल आहे. महावीरचरियाची रचना गद्यपद्यात्मक असल्यामुळे त्यातून तद्‌भव तत्सव प्राकृत चंपूचे पूर्वरूप प्रत्ययास येते.

तगारे ग. वा.