रामपाणिवाद : (१७०७ – ७५). संस्कृत-प्राकृत भाषांत काव्ये आणि नाटके रचिणारा साहित्यिक. केरळातील किळ्ळिक्कुरिच्ची (मंगलग्राम हा ह्या नावाचा संस्कृत पर्याय) येथे त्याचा जन्म झाला. नारायणभट्टनामक पंडिताकडे त्याने अध्ययन केले. रामपाणिवादाने वीररायमहाराज, देवनारायण ह्यांसारख्या राजांचा उल्लेख आपले आश्रयदाते म्हणून आपल्या ग्रंथांत केलेला आहे.

रामपाणिवादाच्या संस्कृत ग्रंथांत राघवीयम् (महाकाव्य-२० सर्ग, १,५७६ श्लोक), सीताराघवम् (नाटक), चंद्रिका आणि लीलावती ह्या दोन वीथी (वीथी म्हणजे जास्तीत जास्त तीन पात्रे असलेली शृंगारप्रधान एकांकिका) यांचा अंतर्भाव होतो. कंसवहो (खंडकाव्य, ४ सर्ग), उसाणिरुद्ध (खंडकाव्य, ४ सर्ग) आणि प्राकृतवृत्ति (वररुचीच्या प्राकृतप्रकाशावरील टीका) हे त्याचे प्राकृत ग्रंथ होत.

प्रख्यात मल्याळम्‌ कवी आणि ओट्टन तुळ्ळल ह्या नृत्यप्रकाराचा प्रवर्तक मानला गेलेला ⇨ कुंचन नंप्यार हाच रामपाणिवाद होय, असे एक मत मांडले गेलेले आहे. तथापि हे निर्णायक नाही. शिवपुराणम्, विष्णुगीता, श्रीकृष्णचरितम्, पंचतंत्र, रुक्‌मागंदचरित हे मल्याळम् भाषेतील ग्रंथ रामपाणिवादाने लिहिले किंवा काय, ही बाबही वादग्रस्त आहे कारण ह्या ग्रंथांच्या पुष्पिकांत (कोलोफोन) ग्रंथकर्ता म्हणून कधी रामपाणिवादाचा, तर कधी कुंचन नंप्यारचा उल्लेख येतो. कुंचन नंप्यार म्हणजेच रामपाणिवाद, असे निर्णायकपणे सिद्ध झाले असते, तर हे मल्याळम् ग्रंथ रामपाणिवादाचे आहेत, असे म्हणता आले असते.

कोपरकर, द. गं.