वाक्पतिराज : (इ. स. आठवे शतक). माहाराष्ट्री प्राकृतातील ⇨ गउडहो (गौडवध) ह्या महाकाव्याचा कर्ता. कनौजचा राजा यशोवर्मा (कार. इ. स.  ७०० – ७४०) ह्याच्या दरबारी वाक्पतिराज हा कविराज म्हणून होता. तसेच यशोवर्म्याचा तो एक साहित्यिक मित्रही होता. श्रेष्ठ संस्कृत नाटककार ⇨भवभूती हाही यशोवर्म्याच्या दरबारी होता, असे म्हटले जाते. वाक्पतिराज हा भवभूतीचा शिष्य वा चाहता होता, असे दिसते. आपल्या काव्यात आढळणारे अमृतबिंदू भवभूति-वाङ्‍मय-महोदधीचे मंथन करून मिळाले आहेत. अशा आशयाचे उद्गार त्याने गउडहोत काढले आहेत.

वाक्पतिराजाने गउडहोत जे आत्मकथन केले आहे, त्यावरून तो न्यायशास्त्र, काव्यशास्त्र तसेच नाट्यवाङ्‍मय व पुराणवाङ्‍मय ह्यांचा उत्तम अभ्यास केलेला पंडित होता, असे दिसते.

वाक्पतिराजाने गउडवहो लिहिण्यापूर्वी महु-मह-विअअ (मधु-मथ-विजय) ह्या नावाचे काव्य लिहिले होते. त्यातील उतारे अभिनवगुप्त, हेमचंद्र इ. उत्तरकालीन अलंकारशास्त्रज्ञांनी दिले आहेत. तथापि ते काव्य आज उपलब्ध नाही.  

तगारे, ग. वा.