गुणचंद्र : (अकरावे शतक). महावीरचरिय  ह्या गद्यपद्यात्मक महाराष्ट्री ग्रंथाचा कर्ता. ह्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही आणि त्याने स्वतःही त्या संदर्भात मुग्धताच पाळली आहे. चंद्रकुलीन गच्छातील प्रसन्नसूरीचा हा शिष्य. महावीरचरियाची रचना त्याने छत्रालनिवासी व्यापारी बंधू शिष्ट व वीर ह्यांच्या विनंतीवरून १०८२ मध्ये केली. त्याचा समकालीन देवेंद्रगणी उर्फ नेमिचंद्रसूरी व उत्तरकालीन देवभद्रसूरी ह्या ग्रंथकारांनीही महावीरचरित्रे लिहिली परंतु ती पद्यात होती. गुणचंद्राच्या गद्यपद्यात्मक महावीरचरियातून प्राकृत चंपूचे पूर्वरूप प्रत्ययास येते. 

पहा : महावीरचरिय.               

तगारे, ग. वा.