कुवलयमाला : महाराष्ट्री प्राकृतातील एक श्रेष्ठ चंपूकाव्य. उद्योतनसूरी ह्याने ते जालोर येथे ७७९ मध्ये रचिले. ह्या चंपूकाव्यात क्रोधादी विकारांचे परिणाम दर्शविणाऱ्या कथा गुंफल्या आहेत. ह्या कथांना चौकट आहे कुवलयचंद्र आणि कुवलयमाला ह्यांच्या कथेची.

कुवलयचंद्र हा मध्यदेशाच्या विनीता नगरीचा राजा दृढवर्मा याचा मुलगा. समुद्रकल्लोल नावाचा घोडा त्याला दूर जंगलात घेऊन जातो. तेथे घोडा मरतो. त्यावेळी एक आकाशवाणी होऊन कुवलयचंद्राला दक्षिणेकडे जाण्याचा आदेश मिळतो. दक्षिणेकडे जात असता कुवलयचंद्राला विंध्यारण्यात एका विशाल वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला मुनी दिसतो. त्या मुनीच्या सल्ल्यानुसार कुवलयचंद्र विजयानगरीस जाऊन तेथील राजकन्या कुवलयमाला हिची समस्यापूर्ती करून तिचे हृदय जिंकतो. ह्याच सुमारास त्याच्या शोधात असलेला त्याचा मानलेला वडील भाऊ महेंद्र तेथे पोहोचतो. तो कुवलयचंद्राचा कुवलयमालेच्या मातापित्यांशी परिचय करून देतो. कुवलयचंद्र आणि कुवलयमाला ह्यांचा विवाह होतो. वृद्धापकाळी आत्मकल्याणार्थ ते संसारनिवृत्त होतात.

ह्या काव्यात आश्वास, सर्ग यांसारखे विभाग नाहीत. हे काव्य महाराष्ट्री प्राकृतात असले, तरी संस्कृत, पैशाची, अपभ्रंश इ. भाषांचाही अधूनमधून वापर केलेला आढळतो. भारतातील विविध प्रदेशांत राहणारे लोक आणि त्यांच्या बोली ह्यांची वैशिष्ट्येही प्रसंगोपात्त आलेली आहेत. समासप्रचुर, प्रौढ पण ओघवती गद्यरचना, काव्योचित संवाद, तसेच भावतरल, नादमधूर, लयबद्ध शैली ही कुवलयमालेची वैशिष्ट्ये आहेत. अनेक सुंदर सुभाषिते, मार्मिक प्रश्नोत्तरे व प्रहेलिका ह्यांनी ह्या ग्रंथाची गोडी वाढविली आहे. मध्ययुगीन भारताच्या समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीनेही हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.

पादलिप्तसूरी, सातवाहन, गुणाढ्य, बाण, विमल, रविषेण, हरिभद्र ह्यांसारख्या ग्रंथकारांचा–विशेषतः हरिभद्राचा–ह्या काव्यावर ठसा उमटलेला आहे.

संदर्भ : उपाध्ये, आ. ने. संपा. कुवलयमाला, मुंबई, १९५९.

तगारे, ग. वा.